‘एल निनो’शी संबंधित उष्णतेचे नवे विक्रम नोंदवले जाण्याचा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. जगातील काही भागांमध्ये ‘एल निनो’चा प्रभाव आतापासूनच जाणवू लागला आहे.
जागतिक हवामान संघटनेचा इशारा काय?
‘एल निनो’ची सध्या असलेली स्थिती तीव्रतेच्या बाबतीत अभूतपूर्व असू शकते, असा इशारा जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) आपल्या नव्या अंदाजात दिला आहे. नोव्हेंबर २०२६ ते जानेवारी २०२७ या कालावधीत उष्ण कटिबंधीय, प्रशांत सागरी प्रदेशात तापमान ३.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते असे डब्ल्यूएमओने म्हटले आहे. गेली चार दशके अभ्यासासाठी जी यंत्रणा वापरली जात आहे, त्यापलीकडील ही स्थिती असल्याचे ‘डब्ल्यूएमओ’च्या सरचिटणीस सेलेस्टे साउलो यांनी निवेदनाच्या माध्यमातून सांगितले.
प्रशांत महासागराचे तापमान सर्वोच्च पातळीवर का?
डिसेंबरमध्ये ‘एल निनो’ची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची अपेक्षा असताना, त्याच्या काही आठवडे आधीच त्याची तीव्रता वाढत चालली आहे. ‘एल निनो’शी संबंधित अनेक महत्त्वाचे मापदंड आता विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने ताज्या अहवालात म्हटले आहे की, मध्य प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचे सरासरी साप्ताहिक तापमान आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे.
‘एल निनो’चा विक्रमी प्रभाव काय?
याआधी, सप्टेंबरमध्ये शास्त्रज्ञांनी मध्य-पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागावरील दैनंदिन तापमानाने नवा विक्रम नोंदवल्याचे जाहीर केले होते. २०१५ मध्ये अत्यंत तीव्र ‘एल निनो’च्या काळात नोंदवलेला विक्रम यावेळी मोडला आहे. उष्ण कटिबंधीय प्रशांत महासागराच्या काही भागांमध्ये प्रथमच पाण्याचे तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे.
हवामान बदलामुळे किती तापमानवाढ?
‘एल निनो’ ही नैसर्गिक हवामान प्रक्रिया आहे. साधारणपणे दर दोन ते सात वर्षांनी ती घडते आणि तिचा प्रभाव सुमारे एक वर्ष टिकतो. मात्र, मानवी कृतींमुळे होणार्या हवामान बदलामुळे प्रशांत महासागराचे तापमानही वाढत आहे. त्यामुळे ‘एल निनो’च्या काळात नैसर्गिकरीत्या होणार्या तापमानवाढीची तीव्रता नेमकी किती आहे, हे समजणे कठीण होत आहे. हवामान बदलामुळे होणारी ही अतिरिक्त तापमानवाढ वेगळी ओळखण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील अधिकृत हवामान अंदाज यंत्रणा आता ‘रिलेटिव्ह ओशन ‘एल निनो’ इंडेक्स’ (फडठक) या निर्देशांकाचा वापर करत आहेत. या निर्देशांकामुळे सध्याच्या ‘एल निनो’ची तुलना भूतकाळातील घटनांशी अधिक अचूकपणे करता येते.
तापमानवाढीची व्याप्ती कुठपर्यंत?
प्रशांत महासागरातील तापमानवाढ आता ‘एल निनो’वर लक्ष ठेवण्यासाठी सामान्यत: वापरल्या जाणार्या उष्णकटिबंधीय प्रदेशाच्या पलीकडे पसरली आहे. १९७२-७३, १९८२-८३, १९९७-९८ आणि २०१५-१६ या काळात आलेल्या मोठ्या ‘एल निनो’ घटनांशी सध्याच्या परिस्थितीची तुलना केली असता, प्रशांत महासागराच्या अधिक विस्तृत भागात तसेच मेक्सिकोच्या आखातापर्यंत पाण्याचे तापमान वाढल्याचे दिसून येते.
‘एल निनो’चे परिणाम काय होतील?
पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत याचा प्रभाव जाणवेल. त्यामुळे उष्णतेचे नवे विक्रम नोंदवले जाण्याचा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत. त्यामुळे यंदाचा हिवाळा आव्हानात्मक असेल, अशी शक्यता आहे. ‘एल निनो’ मुळे काही भागांत भीषण दुष्काळ पडू शकतो, तर इतर काही भागांत मुसळधार पाऊस आणि पूर येऊ शकतो. तसेच जगाच्या मोठ्या भागांत उष्णतेचे प्रमाण वाढू शकते.
पुढच्या वर्षी काय होऊ शकते?
जागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) मते, हवामान बदलामुळे ‘एल निनो’च्या घटना अधिक तीव्र किंवा अधिक वारंवार घडत आहेत, याचा सध्या कोणताही पुरावा नाही. मात्र, हा विषय अद्याप वैज्ञानिक संशोधनाचा महत्त्वाचा भाग आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, ‘एल निनो’ असलेल्या वर्षांतील जागतिक तापमान सामान्यत: ‘एल निनो’ नसलेल्या, म्हणजेच तटस्थ परिस्थिती असलेल्या वर्षांपेक्षा अधिक असते. त्यामुळे २०२६ हे वर्ष आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. जागतिक तापमानातील असामान्य वाढ २०२७ मध्येही कायम राहण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’चे सर्वाधिक व्यापक परिणाम या वर्षाच्या उत्तरार्धात आणि २०२७ मध्ये दिसण्याची शक्यता असली, तरी जगातील काही भागांमध्ये त्याचा प्रभाव आतापासूनच जाणवू लागला आहे.
‘एल निनो’मुळे यापूर्वी जगभरात काय काय घडले?
१९९७-९८ मधील ‘एल निनो’मुळे आग्नेय आशियातील अनेक भागांमध्ये भीषण दुष्काळ पडला. त्यामुळे दलदलीच्या जमिनीवर आणि जंगलांमध्ये वणवे लागले. त्याच वेळी, पूर्व आफ्रिकेतील काही भागांमध्ये विनाशकारी पूर आले. तर दक्षिण आफ्रिकेच्या प्रदेशातील देशांना अनेक दशकांतील सर्वांत भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची स्थिती हा आणखी एक वारंवार दिसणारा परिणाम आहे. ‘एल निनो’च्या तीव्र घटनांमुळे सामान्यत: अटलांटिक महासागरातील चक्रीवादळांची संख्या किंवा हालचाल कमी होते, तर प्रशांत महासागराच्या काही भागांमध्ये चक्रीवादळांची सक्रियता वाढते. २०२६ मध्येही असेच चित्र दिसून आले आहे.
manisha.devne@expressindia.com
