SIR And SSR Difference : मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीत (SIR) कथित अनियमितता असल्याचे समोर येताच देशभरातील वातावरण तापले आहे. विरोधकांनी तसेच तरुण विद्यार्थ्यांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. एसआयआरमधील अनियमिततेवरुन असे असंतोषाचे वातावरण असताना, भारतीय निवडणूक आयोगाने (EC) गुरुवारी १५ ऑक्टोबरला १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SSR) करणार असल्याचे जाहीर केले. या मोहिमेचे अधिकृत वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे २०२७ च्या सुरुवातीला ज्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्याची एसएसआरची ही वार्षिक प्रक्रिया निवडणूक आयोगाने काही कारणाने थांबवली होती. निवडणूक आयोगाने यंदा ती पुन्हा सुरु कऱण्याचे जाहीर केले आहे. पण एसएसआर म्हणजे काय? एसआयआरवरुन वाद चिघळला असताना एसएसआर प्रक्रिया सुरु करण्याचे कारण नेमके काय आहे? ही प्रक्रिया एसआयआरपेक्षा कशी वेगळी आहे, याचा हा सविस्तर आढावा.
विशेष संक्षिप्त पुनरावलोकन (SSR) म्हणजे काय?
मतदार यादी तयार करण्याची आणि त्यात बदल करण्याची संपूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाकडे असते. भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२४ नुसार, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याचा अधिकार आयोगाला आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५० आणि मतदार नोंदणी नियम, १९६० मध्ये या याद्या तयार करण्याची आणि त्यात वेळोवेळी सुधारणा कशी करावी प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जाते. ही यादी तयार करण्याची आणि तिच्यात सुधारणा करण्याची कायदेशीर जबाबदारी मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्याकडे असते. १९५० च्या कायद्यातील कलम २१(२) नुसार, लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत सुधारणा करणे आवश्यक असते. याशिवाय, निवडणूक आयोगाने निर्देश दिल्यास, ठरावीक वर्षात आणि निर्धारित प्रक्रियेनुसारही मतदार यादी सुधारता येते.
निवडणुकीच्या आधी मतदार यादीत नव्या मतदारांची नाव नोंदवणं, मृत व्यक्तींची आणि स्थलांतरितांची नाव वगळणं, ही प्रक्रिया नियमितपणे केली जाते. यासाठी निवडणूक आयोग विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SSR) प्रक्रिया राबवतो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी ही प्रक्रिया पार पडतेच, शिवाय दरवर्षी मतदार यादी अद्ययावत केली जाते. म्हणजेच, १ जानेवारीपर्यंत वयाची १८ वर्षं पूर्ण करणाऱ्या तरुणांना मतदार म्हणून नाव नोंदवता येतं.
मात्र, २४ जून २०२५ रोजी निवडणूक आयोगाने एसएसआर राबवण्याची घोषणा केली होती मात्र आयोगाने काही कारणाने २०२६ साठीची ही नियमित एसएसआर प्रक्रिया राबवलीच नाही.
निवडणूक आयोगाची आताची SSR घोषणा काय आहे?
गुरुवारी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार, ज्या १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०२५ आणि २०२६ या वर्षांत SIR ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तेथे आता SSR आयोजित केले जाईल. यासोबतच आसाम राज्यामध्येही हे SSR राबवले जाईल, कारण आयोगाने आसाममध्ये आधी SIR न घेण्याचा निर्णय घेतला होता. या संपूर्ण प्रक्रियेसाठी १ जानेवारी २०२७ ही अधिकृत पात्रता तारीख निश्चित करण्यात आली आहे.
गुरुवारी निवडणूक आयोगाने २०२७ च्या मतदार यादीतील सुधारणांचं वेळापत्रक जाहीर केलं. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २०२५ आणि २०२६ मध्ये एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तिथे ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच आसाममध्ये SIR न करण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता, तिथेही ही प्रक्रिया पार पडणार. या सर्व ठिकाणी १ जानेवारी २०२७ ही मतदार म्हणून पात्र ठरवण्याची तारीख असणार आहे.
SSR प्रक्रियेचं वेळापत्रक
२ नोव्हेंबरपर्यंत : मतदान केंद्रांची पुनर्रचना प्रक्रिया पार पडणार
१२ नोव्हेंबर : मसुदा मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार
१२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर : मतदार यादीबाबत दावे आणि हरकती नोंदवण्याची मुदत
२८ डिसेंबरपर्यंत : दावे आणि हरकतींवर निर्णय घेतला जाणार
४ जानेवारी २०२७ : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार
कोणत्या राज्यांमध्ये SSR होणार?
१७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसएसआर प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात अंदमान आणि निकोबार बेटे, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, मणिपूर, पुद्दुचेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.
मतदारांना नाव नोंदवण्यासाठी काय करावं लागेल?
नवीन मतदारांसाठी : वयाची १८ वर्षं पूर्ण केलेल्या व्यक्तींना मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी फॉर्म ६ भरावा लागणार आहे
पत्ता बदलण्यासाठी किंवा तपशील दुरुस्त करण्यासाठी : मतदार नोंदणी दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करायची असल्यास किंवा यादीतील तपशील दुरुस्त करायचे असल्यास फॉर्म ८ भरावा लागणार आहे
ज्या राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया अद्याप सुरू आहे, तिथे मतदार यादीतील सुधारणांचं वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
SSR आणि SIR मध्ये नेमका फरक काय?
मतदार यादीत आधीपासून नाव असेल, तरी ते कायम ठेवण्यासाठी पुन्हा फेरतपासणी का करावी लागते? SSR आणि SIR या प्रक्रियांमधला हाच मुख्य फरक आहे.
२०२५ मध्ये तब्बल २० वर्षांनंतर आयोगाने मतदार यादीची विशेष सखोल फेरतपासणी म्हणजेच SIR प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेमुळे एसएसआर प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला. एसआयआर प्रक्रियेत प्रत्येक मतदाराला पात्रता सिद्ध कऱण्यासाठी नोंदणीचा फॉर्म भरणे, नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक होते. यामुळे विविध राज्यांतील मसुदा मतदार याद्यांमधून १३ कोटींहून अधिक नावं वगळण्यात आली.
दोन्ही प्रक्रियांमधील फरक असा :
- SSR मध्ये आधीपासून मतदार यादीत असलेली नावं मसुदा यादीत कायम राहतात. मृत व्यक्तींची किंवा दुबार नोंदणी झालेल्यांची नावं वगळण्यासाठी मात्र नोटीस आणि सुनावणी यांसारखी कायदेशीर प्रक्रिया पाळावी लागते.
- SIR मध्ये प्रत्येक मतदाराला गणना अर्ज भरावा लागतो. कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्यास अतिरिक्त कागदपत्रं सादर करणं आवश्यक असतं
दोन्ही प्रक्रियांमध्ये मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा हरकत नोंदवण्यासाठी साधारण महिनाभराची मुदत असते. मात्र, एसआयआरमध्ये कागदपत्रांमध्ये तार्किक विसंगती आढळलेल्या मतदारांना केंद्रीय स्तरावरील नोटिसा पाठवून अतिरिक्त पडताळणी केली जाते. एसएसआरमध्ये अशा प्रकारची व्यापक कागदपत्र पडताळणी प्रक्रिया केली जात नाही.
