पक्षातील फुटीनंतर ऐन पोटनिवडणुकीच्या आधी तृणमूल काँग्रेस हे नाव वापरण्यास बंदी करून पक्षचिन्ह गोठविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. हे नियमानुसारच आहे का?
पक्षातील फुटीनंतर निवडणूक चिन्ह गोठवून पक्षाचे नाव वापरण्यास बंदी का घातली जाते ?
– पक्षात फूट पडल्यावर दोन्ही गटांकडून पक्षाचे नाव व चिन्हावर दावा केला जातो. यावर निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना नोटीस बजावून त्यांना सुनावणी दिली जाते. निवडणूक चिन्हाबाबत १९६८च्या निवडणूक चिन्ह (वाटप आणि राखीव ठेवणे ) आदेशाच्या १५ व्या परिच्छेदात स्पष्टपणे तरतूद करण्यात आली आहे. यानुसार एखाद्या राजकीय पक्षात फूट पडल्यावर दोन्ही बाजूने नाव आणि चिन्हावर दावा करण्यात आल्यास निवडणूक आयोगाने संबंधितांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी. ‘दोन्ही बाजूंची किंवा अन्य कोणी दावा करणार्यांची बाजू ऐकून वस्तुस्थितीनुरूप निवडणूक आयोगाने दोहोंपैकी एका गटाला अधिकृत मान्यता द्यावी किंवा कोणालाच मान्यता देऊ नये,’ अशी या आदेशात तरतूद आहे. ही सुनावणी पूर्ण होऊन अंतिम निवाडा होईपर्यंत निवडणूक आयोगाकडून पक्षाचे नाव वापरण्यास बंदी घातली जाते तसेच निवडणूक चिन्ह गोठवण्यात येते.
तृणमूल काँग्रेसचे नाव व चिन्ह गोठवणे तात्पुरते?
– ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षात विधानसभा निवडणुकीनंतर फूट पडली. निवडून आलेल्या ८० पैकी ६० आमदारांनी ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व झुगारून बंड केले. बंडखोर नेते ऋतब्रता बॅनर्जी यांनी आपल्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाला मान्यता मिळावी, अशी मागणी केली असून त्यावर सध्या निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. दरम्यानच्या काळात पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. ममता बॅनर्जी तसेच बंडखोर गटांच्या उमेदवारांनी अर्जासमावेत पक्षाचे फुले आणि गवत हे चिन्ह मिळावे, अशी मागणी केली होती. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका लक्षात घेता ममता बॅनर्जी व बंडखोर गटांना तात्पुरत्या काळासाठी तृणमूल काँग्रेस हे नाव तसेच पक्षाचे ‘गवत आणि दोन फुले’ हे चिन्ह वापरण्यास दोन्ही गटांना बंदी घातली. तसेच नवीन नाव व पक्षाचे चिन्ह सुचवण्याचा आदेश आयोगाने दिला. दोन्ही गटांनी तीन नावांचे पर्याय दिले होते. यानुसार ममता बॅनर्जी यांच्या गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे पक्षाचे नाव आणि फूटबॉलपटू हे चिन्ह बहाल करण्यात आले. बंडखोर गटाला ‘डेमॉक्रेटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव व लिफाफा हे चिन्ह देण्यात आले आहे.
मग ‘पराभवाची भीती’ ही टीका का?
या घडामोडी घडत असतानाच नंदिग्राम पोटनिवडणुकीत तृणमूलच्या उमेदवाराने माघार घेतल्याने ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांना पाठिंबा जाहीर केला. लगोलग पोलिसांनी २० वर्षांपूर्वीच्या नंदिग्राम हिंसाचाराच्या प्रकरणात काँग्रेस उमेदवाराला अटक केली. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पराभवाच्या भीतीनेच ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस व तृणमूलने केला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादीबाबत हेच झाले ?
एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह सुरतमार्गे गुवाहाटीच्या हॉटेलांत गेल्याने शिवसेनेत तर अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फूट पडली होती. शिवसेनेतील फुटीनंतर दोन महिन्यांतच अंधेरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली, तेव्हा ठाकरे गटाला शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास बंदी घालावी, असा अर्ज शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केला होता. निवडणूक आयोगाने ऑक्टोबर २०२२ मध्ये तात्पुरत्या स्वरूपात शिवसेना हे नाव वापरण्यास बंदी घातली होती. तसेच धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव व मशाल चिन्ह बहाल करण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ढाल तलवार चिन्ह देण्यात आले होते. पुढे फेब्रुवारी २०२३ मध्ये मात्र आयोगानेच शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला दिले, त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आयोगाने घड्याळ हे चिन्ह गोठवले नव्हते. अंतिम निवाडा करताना राष्ट्रवादी हे नाव व घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीलानिवडणूक आयोगाने दिले. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले.
फुटीमुळे अन्य कोणत्या पक्षांचे चिन्ह गोठवण्यात आले होते का ?
रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर त्यांचे भाऊ व पुत्र चिराग यांच्यात पक्षाची सूत्र कोणाकडे यावरून वाद झाला होता. तेव्हा निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले होते. काँग्रेस पक्षात फूट पडल्यावर १९६९ मध्ये ‘बैलजोडी’ तर १९७८ मध्ये ‘गाय वासरू’ ही चिन्हे गोठवण्यात आली होती. जयललिता यांच्या निधनानंतर पक्षात पडलेल्या फुटीच्या वेळी अण्णा द्रमुकचे ‘दोन पाने’ हे चिन्ह गोठवण्यात आले होते.
