दी इंडियन एक्स्प्रेसच्या शोधपत्रकारितेतून निवडणूक आयोगातील धक्कादायक बाब समोर आली. आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनी गेल्या १० महिन्यांत तब्बल १४ वेळा काही निर्णय आणि आदेशांवर लेखी आक्षेप नोंदवले आहेत. या आक्षेपांना डावलून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निर्णय घेतल्याने आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. खुद्द निवडणूक आयोगानेही या नोंदी असल्याचे मान्य केले. मात्र, आयोगात सर्व निर्णय एकमताने घेतले जात असून आक्षेप नोंदवणे हा निर्णय प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्टीकरण आयोगाने दिले.

मग आयोगाची निर्णय प्रक्रिया नेमकी कशी काम करते? जाणून घेऊया सविस्तर

निवडणूक आयोग निर्णय कसे घेतो?

भारतीय संविधानातील कलम ३२४ (Article 324) हे भारत निवडणूक आयोगाला त्याचे सर्व मुख्य घटनात्मक अधिकार प्रदान करते. या कलमानुसार, संसद (लोकसभा व राज्यसभा), सर्व राज्यांच्या विधानसभा, तसेच देशाच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणे, त्यांचे निरीक्षण करणे, दिशा-निर्देश देणे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे ही निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी आहे. आयोगाच्या रचनेबद्दल सांगायचे, तर यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती वेळोवेळी निश्चित करतील तितके इतर निवडणूक आयुक्त असतात, ज्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त हे आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य पाहतात.

निवडणूक आयोगाची प्रत्यक्ष निर्णय प्रक्रिया कशी असावी, याचे स्पष्ट नियम ‘मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवाशर्ती आणि कार्यकाळ) कायदा, २०२३’ मध्ये मांडण्यात आले आहेत. या कायद्यानुसार आयोगातील सर्व महत्त्वाचे निर्णय सर्वसंमतीने घेतले जाणे अपेक्षित असते; मात्र मुख्य आयुक्त आणि इतर आयुक्तांमध्ये एखाद्या विषयावर मतभेद झाल्यास बहुमताच्या आधारावर निर्णय घेतला जातो.

कायद्याच्या कलम १७ नुसार निवडणूक आयोगाचे सर्व कामकाज या कायद्यातील तरतुदींनुसारच पार पडणे बंधनकारक आहे. पुढे कलम १८ मध्ये स्पष्ट करण्यात आले की, आयोगाचे कामकाज चालवणे आणि मुख्य निवडणूक आयुक्त व इतर आयुक्तांमध्ये कामाचे वाटप करण्याचे नियम स्वतः आयोग सर्वसंमतीने ठरवू शकतो. आयोगातील सर्व निर्णय शक्यतो एकमतानेच घेतले जाणे अपेक्षित असते; परंतु एखाद्या मुद्द्यावर मतभेद झाल्यास तो निर्णय बहुमताने घेतला जातो.

सध्या निवडणूक आयोगात मुख्य आयुक्तांसह एकूण तीन सदस्य आहेत, त्यामुळे सर्वसंमती न झाल्यास तीनपैकी दोघांचे बहुमत असणारा निर्णय अंतिम मानला जातो. मुख्य निवडणूक आयुक्त या समितीचे अध्यक्ष असले तरी मतदानाचा विचार करता तिनही सदस्यांना मताचा समान अधिकार असतो.

निवडणूक आयोगातील मतभेद आणि असंतोषाचा इतिहास

१९९३ मध्ये निवडणूक आयोगाची ‘एकसदस्यीय’ रचना कायमस्वरूपी ‘त्रिसदस्यीय’ करण्यात आली. आयोगाच्या या पदांवर बसलेल्या आयुक्तांमध्ये अनेकदा मतभेद निर्माण झाले आहेत.

तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन आणि इतर दोन निवडणूक आयुक्त एम. एस. गिल व जी. व्ही. जी. कृष्णमूर्ती यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. खरं तर टी. एन. शेषन यांनी इतर दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, १९९५ मधील ‘टी. एन. शेषन विरुद्ध भारत सरकार’ या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरकारची नियुक्ती वैध ठरवली आणि तिन्ही सदस्यांना निर्णयात समान अधिकार आणि स्थान असल्याचे स्पष्ट केले.

याव्यतिरिक्त, जानेवारी २००९ मध्ये तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी निवडणूक आयुक्त नवीन चावला यांच्या राजकीय तटस्थतेवर प्रश्न उपस्थित करत, त्यांना पदावरून हटवण्यासाठी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले होते. मात्र, राष्ट्रपती भवनाकडून अशी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि पुढे जाऊन नवीन चावला हेच देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त बनले.

निवडणूक प्रक्रियेत आक्षेप नोंदवता येतो का?

निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांच्या मते, निवडणुकांचे आयोजन असो वा प्रशासकीय बाबी, आयोगासमोर येणाऱ्या विविध विषयांवर सदस्यांमध्ये भिन्न मते असणे ही कामकाजातील सामान्य बाब आहे. मात्र, अंतिम निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा आयोग सर्वसंमतीने किंवा बहुमताच्या आधारेच निर्णय घेतो. प्रलंबित विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी आयोगाची आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बैठक पार पडते.
जर एखाद्या विषयावर किंवा निर्णयावर असहमती असेल, तर त्यांना फाइलवर अधिकृतपणे आक्षेप नोंदवण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार असतो.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान तत्कालीन निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी असहमती (Dissent) दर्शवली होती. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या विविध तक्रारींवरून तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारावर ‘क्लीन चिट’ दिली होती; ज्याला लवासा यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. इतकेच नाही तर आपली असहमती आयोगाच्या अंतिम आदेशात नोंदवली जात नसल्याचा गंभीर आक्षेपही त्यांनी केला होता. ज्येष्ठतेच्या आधारावर अशोक लवासा हे देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) बनणार होते; मात्र या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी २०२० मध्ये आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.

दरम्यान, २५ जून २०२५ पासून सुरू झालेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर) प्रक्रियेबाबतही असाच एक कायदेशीर मुद्दा समोर आला होता. हा आदेश अधिकृतपणे जारी करण्यापूर्वी, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू यांनी या मसुद्यावर आपले स्पष्ट मत नोंदवले होते. या संपूर्ण प्रक्रियेमुळे सामान्य मतदार आणि नागरिकांना नाहक त्रास होऊ नये, असे मत त्यांनी नोंदवले होते.

निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू यांनी नमूद केले होते की, “विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, दिव्यांग (PwD), गरीब आणि वंचित घटकांना कोणताही त्रास होणार नाही आणि त्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळतील याची पूर्ण काळजी घेतली गेली पाहिजे.” मात्र, हे केवळ एक निरीक्षण होते आणि अंतिम आदेश सर्वसंमतीनेच जारी करण्यात आला होता, असे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले होते. तेव्हापासून इंडियन एक्स्प्रेसने निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेतील बाबींचा आढावा घेतला.

दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या घटनेनंतरही आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी आयोगाच्या आयटी पायाभूत सुविधांचे कामकाज असो वा नवीन मतदार नोंदणी फॉर्म-६ मधील बदल, अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर आपले आक्षेप अधिकृतपणे नोंदवले आहेत.

या सर्व प्रकरणांवर निवडणूक आयोगाने काय म्हटले?

बुधवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, ‘मसुदा तयार करण्याच्या टप्प्यात आयुक्तांनी उपस्थित केलेले प्रश्न किंवा सूचना ही मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी राबवली जाणारी एक प्रशासकीय पद्धत आहे. निवडणूक प्रक्रियेत अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठीच आयुक्तांकडून अशा सूचना दिल्या जातात.

आयोगाने पुढे नमूद केले की, “कोणत्याही संस्थेत निर्णय घेण्यापूर्वी भिन्न मते आणि निरीक्षणे मांडणे ही एक अत्यंत स्वाभाविक आणि सामान्य प्रक्रिया आहे. अंतिम निर्णय होण्यापूर्वी या सर्व चर्चा त्याचा महत्त्वाचा भाग असतात. केवळ तीन आयुक्तच नव्हे, तर निवडणूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आयोगाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला आवश्यक त्या सूचना देण्याचा पूर्ण अधिकार आहे.”

याशिवाय, निवडणूक आयोगाने असेही अधोरेखित केले की, गेल्या वर्षभरात घेतलेले सर्व अंतिम निर्णय हे तिन्ही आयुक्तांच्या ‘सर्वसंमतीने’ घेण्यात आले आहेत. आयोगाने उदाहरणादाखल बिहार, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, आसाम आणि पश्चिम बंगालमधील अलीकडच्या विधानसभा निवडणुकांचा उल्लेख केला. या सर्व मोठ्या निवडणुकांसाठी अत्यंत व्यापक प्रशासकीय यंत्रणा, हजारो मंजुऱ्या आणि निर्देशांची आवश्यकता होती आणि हे सर्व निर्णय संपूर्ण आयोगाने एकमताने घेतले आहेत, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे.