मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीत सलग दोन दिवस आंदोलने झाली. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेकांची धरपकड करून त्यांना ताब्यात घेतले. देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मात्र, अलीकडच्या काळात या स्वायत्त संस्थेच्या कामकाजावर आणि निर्णयांवर अनेकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची स्थापना कधी आणि कशी झाली? आतापर्यंत त्याच्या रचनेत कोणते बदल झाले? तसेच आयोगाला निधी कुठून मिळतो? त्याविषयीचा हा आढावा…

निवडणूक आयोगाची स्थापना कशी झाली?

भारतीय लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोग ही एक अत्यंत महत्त्वाची स्वायत्त संस्था आहे. २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेनुसार आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर लोकसभा आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभा निवडणुका तसेच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी आयोगाकडे सोपवण्यात आली. सुरुवातीला निवडणूक आयोगाच्या कारभाराची सूत्रे केवळ एकाच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हातात होती; पण कालांतराने या स्वायत्त संस्थेत वेळेवेळी बदल करण्यात आले. सध्या निवडणूक आयोगाचे कामकाज एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्तांच्या माध्यमातून चालते. या तिन्ही आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते आणि त्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.

निवडणूक आयुक्तांना कोणकोणत्या सुविधा?

लोकशाहीचा पाया मजबूत ठेवण्यासाठी मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पाडणे हे आयोगाचे घटनात्मक कर्तव्य आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे दर्जा, वेतन आणि इतर सुविधा मिळतात. तसेच त्यांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच आहे. त्यासाठी संसदेतील महाभियोगाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. राज्यघटनेतील अनुच्छेद ३२४ मध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकारांबाबत तरतूद करण्यात आली आहे. मात्र, आयोगात किती सदस्य असावेत, याची निश्चित संख्या त्यात नमूद केलेली नाही.

एकसदस्यीय आयोगाचे तीन सदस्य कसे झाले?

स्थापनेनंतर जवळपास चार दशके भारतीय निवडणूक आयोगाचे कामकाज एकाच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या माध्यमातून चालत होते; परंतु १९८९ मधील नवव्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आयोगाच्या रचनेत पहिल्यांदाच मोठा बदल करण्यात आला. निवडणूक आयोगात ५३ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणारे ज्येष्ठ विधि सल्लागार एस. के. मेंदीरत्ता यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना यामागील राजकीय पार्श्वभूमी स्पष्ट केली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार आणि तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त आर. व्ही. एस. पेरी शास्त्री यांच्यातील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला होता. १९८७ मधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून हे मतभेद सुरू झाले होते. तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग आणि राजीव गांधी यांच्यातील संबंध तणावपूर्ण होते. झैलसिंग यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवता येऊ नये, अशा प्रकारे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया निश्चित करण्याची केंद्र सरकारची इच्छा होती.

७ ऑक्टोबर १९८९ रोजी निवडणूक आयोगात बदल

मेंदीरत्ता यांच्या मते, मुख्य निवडणूक आयुक्त पेरी शास्त्री यांनी सरकारच्या इच्छेनुसार काम करण्यास नकार दिला होता. त्यानंतर दोन वर्षांनी लोकसभा निवडणुका जवळ आल्या तेव्हा मुख्य निवडणूक आयुक्तांची भूमिका काय असेल, याबाबत सरकारला सांशकता होती. त्यामुळेच त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांचे अधिकार मर्यादित करण्यासाठी आयोगाचे बहुसदस्यीय संस्थेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता ७ ऑक्टोबर १९८९ रोजी अधिसूचना काढून निवडणूक आयोगात दोन अतिरिक्त पदे निर्माण करण्यात आली. त्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी एस. एस. धनुआ आणि व्ही. एस. सेगेल यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीला तीनही निवडणूक आयुक्तांमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद होते. तसेच, आयोगाचे कामकाज कसे चालवावे, यासाठी त्या वेळी निश्चित नियमही नव्हते. असे असतानाही १९८९ मधील लोकसभा निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्या, असेही मेंदीरत्ता यांनी नमूद केले.

१९८९ मध्ये पुन्हा एकसदस्यीय आयोगाची स्थापना

मेंदीरत्ता पुढे सांगतात की, निवडणूक आयोगातील तीन आयुक्तांची ही रचना पुढे फार काळ टिकली नाही. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर ७ ऑक्टोबर १९८९ रोजी काढण्यात आलेली राष्ट्रपतींची अधिसूचना रद्द करण्यात आली. त्यामुळे निवडणूक आयोगाची सूत्रे पुन्हा एकाच मुख्य आयुक्तांच्या हातात गेली. त्यानंतर निवडणूक आयुक्तपदावरून हटवण्यात आलेले एस. एस. धनुआ यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. तरीही आयोगात अनेक सदस्य असणे अधिक योग्य ठरू शकते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. भविष्यात आयोग पुन्हा बहुसदस्यीय झाल्यास त्याचे कामकाज कसे चालवायचे यासाठी स्पष्ट तरतुदी असाव्यात, असेही न्यायालयाने सुचवले होते.

१९९१ मध्ये निवडणूक पुन्हा आयोगात बदल

१९९१ मध्ये केंद्र सरकारने ‘मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त (सेवाशर्ती) कायदा, १९९१’ संमत केला. या कायद्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा दर्जा देण्यात आला आणि त्यांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे निश्चित करण्यात आले. इतर दोन निवडणूक आयुक्तांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा दर्जा देऊन त्यांचे निवृत्तीचे वय ६२ वर्षे ठेवण्यात आले. मात्र, आयोगाच्या दैनंदिन कामकाजाचे नियम ठरवणारी कोणतीही तरतूद या कायद्यात नव्हती. पुढील काही काळ निवडणूक आयोगाने एकसदस्यीय संस्थेच्या स्वरूपातच काम केले. त्यानंतर १२ डिसेंबर १९९० रोजी टी. एन. शेषन यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. मेंदीरत्ता यांच्या मते, निवडणूक आयोगाची स्वायत्तता आणि अधिकार याबाबत शेषन यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे नाराज झालेल्या पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने पुन्हा आयोगाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला.

टी. एन. शेषन यांनी घेतली होती न्यायालयात धाव

१ ऑक्टोबर १९९३ मध्ये एम. एस. गिल आणि जी. व्ही. जी. कृष्णमूर्ती यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचवेळी १९९१ च्या कायद्यात अध्यादेशाद्वारे दुरुस्तीही करण्यात आली. त्याद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्तांना समान दर्जा देण्यात आला. त्याशिवाय तिन्ही आयुक्तांना निर्णय घेण्याचे समान अधिकार देण्यात आले. या कायद्यानुसार, एखाद्या मुद्द्यावर तिन्ही निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद झाल्यास बहुमताने घेतलेला निर्णय अंतिम मानला जाणार होता. या तरतुदींमुळे आपले अधिकार मर्यादित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत टी. एन. शेषन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तत्कालीन सरन्यायाधीश ए. एम. अहमदी यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने १४ जुलै १९९५ रोजी त्यांची याचिका फेटाळली. तेव्हापासून निवडणूक आयोगाचे कामकाज एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्या इतर दोन सहकारी आयुक्तांमार्फत चालत आहे.

निवडणूक आयोगाला निधी कुठून मिळतो?

निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, आयोगाच्या सचिवालयासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असतो. हा अर्थसंकल्प आयोग आणि केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या थेट चर्चेतून अंतिम केला जातो. आयोगाने अर्थसंकल्पासाठी केलेल्या शिफारशी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून स्वीकारल्या जातात. निवडणुका घेण्याबरोबरच निवडणूक आयोगाला विद्यमान खासदार आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणांमध्ये सल्ला देण्याचे अधिकार आहेत. निवडणुकीत भ्रष्ट मार्गांचा अवलंब केल्याबद्दल दोषी ठरलेल्या व्यक्तींची प्रकरणे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाकडून आयोगाकडे अभिप्रायासाठी पाठवली जातात. अशा व्यक्तीला निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावे का आणि ठरवल्यास किती कालावधीसाठी, याबाबत आयोग आपले मत मांडतो, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.