Explore the latest updates on the Aihole Inscription Gharapuri connection found during the recent Elephanta Caves excavation: मुंबईच्या पूर्वेकडील समुद्रात वसलेले घारापुरी, म्हणजेच एलिफंटा बेट, आतापर्यंत प्रामुख्याने तेथील जागतिक वारसा लाभलेल्या प्राचीन शैव लेणींमुळे ओळखले जात होते. मात्र अलीकडील पुरातत्त्वीय उत्खननांमधून या बेटाच्या इतिहासाचा अधिक व्यापक आणि गंभीर पैलू पुढे आला आहे. घारापुरी हे केवळ धार्मिक किंवा कलात्मक केंद्र नव्हते, तर प्राचीन काळातील सागरी व्यापार, राजकीय घडामोडी आणि सांस्कृतिक देशाणघेवाणीचे महत्त्वाचे केंद्र होते, असे या नव्या पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे.
दीडशे वर्षांनंतर मुंबईत सापडले ताम्रपट
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, पुण्याचे डेक्कन अभिमत विद्यापीठ आणि सोमय्या विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मोराबंदर परिसरात करण्यात आलेल्या उत्खननात दोन महत्त्वाचे ताम्रपट सापडले आहेत. मुंबई परिसरात सुमारे दीडशे वर्षांनंतर अशा स्वरूपाचे ताम्रपट आढळल्याने या शोधाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या ताम्रपटांमुळे घारापुरीच्या प्राचीन ओळखीबाबत दीर्घकाळ मांडल्या जात असलेल्या एका महत्त्वाच्या गृहितकाला नवे बळ मिळाले आहे.
ऐहोळे शिलालेखातील पुरी घारापुरीच!
चालुक्य सम्राट पुलकेशी दुसरा याच्या ऐहोळे शिलालेखात उल्लेख झालेली ‘पुरी’ नेमकी कोणती, याविषयी इतिहास संशोधकांत अनेक वर्षे चर्चा सुरू होती. काही अभ्यासकांनी या पुरीचा संबंध घारापुरीशी जोडला होता. मोराबंदर येथे सापडलेल्या ताम्रपटांतील संदर्भांमुळे हा संबंध अधिक स्पष्ट झाला आहे. त्यामुळे ऐहोळे शिलालेखातील ‘पुरी’ ही घारापुरी असण्याची शक्यता आता अधिक दृढ मानली जात आहे.
सागरी संपर्क, व्यापारमार्ग, धार्मिक आश्रय आणि राजकीय प्रभाव
या उत्खननात ताम्रपटांबरोबरच जलव्यवस्थापनाशी संबंधित प्राचीन रचना, आयात केलेल्या मृद भांड्यांचे अवशेष, काचेचे तुकडे आणि इतर पुरावस्तूही आढळल्या आहेत. या सर्व पुराव्यांचा एकत्रित विचार केल्यास घारापुरी बेटाचा इतिहास केवळ लेणींच्या निर्मितीपुरता मर्यादित राहत नाही. उलट हे बेट पश्चिम भारतातील सागरी संपर्क, व्यापारमार्ग, धार्मिक आश्रय आणि राजकीय प्रभाव यांच्या संगमावर उभे असलेले एक महत्त्वाचे केंद्र होते, असे चित्र समोर येते.
प्रस्तुत लेखात घारापुरीतील नव्या उत्खननातून मिळालेल्या जलव्यवस्थापनाच्या पुराव्यांचा, आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित अवशेषांचा आणि सापडलेल्या दोन्ही ताम्रपटांच्या ऐतिहासिक महत्त्वाचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर ऐहोळे शिलालेखातील ‘पुरी’ आणि घारापुरी यांच्यात खरच संबंध आहे का? यावरही दृष्टिक्षेप टाकला आहे.
घारापुरी बेटाचा भौगोलिक आणि धोरणात्मक संदर्भ
एलिफंटा बेटाचे महत्त्व समजून घेण्यासाठी त्याचा भूगोल आणि अरबी समुद्रातील स्थान लक्षात घ्यावे लागते. हे बेट कोकण किनारपट्टीवरील प्राचीन जलमार्गांच्या जवळ होते. कल्याण, सोपारा आणि चौल या बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांसाठी घारापुरी हे विश्रांतीस्थान असावे, असे पुरातत्त्वीय पुराव्यांवरून दिसते. लेणी या केवळ धार्मिक कारणांनी निर्माण होत नाहीत. त्यांच्या मागे आर्थिक पाठबळ, व्यापारी संपर्क आणि राजकीय आश्रयही असतो. घारापुरीच्या भौगोलिक स्थितीमुळे बेटाला नैसर्गिक संरक्षण मिळत होते. त्यामुळे येथे राजकीय आणि लष्करी अस्तित्त्व असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मोराबंदर उत्खनन आणि प्राचीन जलव्यवस्थापन
एएसआयचे पुरातत्त्वज्ञ अधीक्षक डॉ. अभिजित आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली मोराबंदर भागात झालेल्या उत्खननातून सुमारे १५०० वर्षांपूर्वीचा जलाशय सापडला. हा जलाशय खडकात कोरलेला नसून दगड आणि विटांनी बांधलेला आहे. त्याची रचना ‘टी’ आकाराची असून त्यात पायऱ्याही आढळल्या आहेत.
वास्तुरचना आणि पुरवठा
या जलाशयाचा १४.७ मीटर लांब, ६.७ ते १०.८ मीटर रुंद आणि ५ मीटर खोल भाग सध्या उघड झाला आहे. त्यात उतरण्यासाठी २० पायऱ्या सापडल्या आहेत. या पायऱ्यांसाठी वापरलेला ट्रकाइट दगड घारापुरी बेटावर आढळत नाही. तो मुख्य भूमीवरून म्हणजेच मुंबईहून आणण्यात आलेला असावा. यावरून त्या काळात बांधकामासाठी नियोजनबद्ध वाहतूक आणि पुरवठा व्यवस्था होती, असे दिसते.

बारव-बावडी स्थापत्याशी साधर्म्य
या जलाशयाचे साधर्म्य महाराष्ट्रातील बारव आणि गुजरात-राजस्थानमधील बावडी स्थापत्याशी दिसते. मात्र घारापुरीतील रचना स्थानिक भौगोलिक गरजांनुसार घडवली गेली असावी. बेटावर पाऊस भरपूर पडत असला तरी खडकाळ जमिनीमुळे पाणी टिकत नाही. त्यामुळे पावसाळ्यानंतरच्या काळात स्थानिक लोक आणि बेटावर येणाऱ्या जहाजांसाठी पाणी साठवण्याच्या उद्देशाने हा जलाशय बांधण्यात आला असावा, असे संशोधकांना वाटते.

आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराचे पुरावे
मोराबंदर उत्खननातून मिळालेल्या वस्तूंमुळे घारापुरीचा प्राचीन सागरी व्यापाराशी असलेला संबंध स्पष्ट होतो. येथे सापडलेली मातीची भांडी, काचेचे अवशेष आणि परदेशी बनावटीची भांडी या बेटाच्या आंतरराष्ट्रीय संपर्काची साक्ष देतात.
टरकॉइज ग्लेझ्ड वेअर : निळसर-हिरव्या रंगाची ही भांडी प्राचीन इराणशी संबंधित आहेत. त्यांचे अवशेष घारापुरीत सापडणे भारत-इराण व्यापारसंबंधांचा महत्त्वाचा पुरावा ठरतो.
टॉरपिडो जार : पर्शियन आखात आणि मेसोपोटेमियाशी संबंधित ही लांबट आकाराची भांडी द्रव पदार्थांच्या वाहतुकीसाठी वापरली जात असत. त्यांचे अवशेष घारापुरीच्या पश्चिम आशियाशी असलेल्या संपर्काकडे निर्देश करतात.
इंडो-मेडिटेरियन अॅम्फोरा : अॅम्फोरा भांड्यांचा वापर वाइन, ऑलिव्ह तेल किंवा इतर द्रव पदार्थ साठवण्यासाठी होत असे. अशा भांड्यांचे तुकडे सापडणे भूमध्य प्रदेशाशी असलेल्या व्यापारी संबंधांचे निदर्शक आहे.
हच्ड ग्रफिटो : पश्चिम आशियाई शैलीतील या भांड्यांवरून घारापुरी हे केवळ धार्मिक केंद्र नव्हते, तर व्यापारमार्गावरील सक्रिय केंद्र होते, हे स्पष्ट होते.

नाणी आणि आर्थिक संरचना
उत्खननात आतापर्यंत ६० गंजलेली नाणी सापडली आहेत. त्यापैकी १८ नाणी रासायनिक प्रक्रियेनंतर वाचण्यायोग्य झाली. यातील काही तांब्याची नाणी कलचुरी राजा कृष्णराजाच्या काळातील असल्याचे दिसते. या नाण्यांवर बैल आणि मंदिरसदृश चिन्हे आहेत. त्यामुळे घारापुरीवरील राजकीय प्रभाव, धार्मिक प्रतिमा आणि आर्थिक व्यवहार यांचा अंदाज येतो.

दीडशे वर्षांनंतर सापडलेले दोन ताम्रपट
मुंबई परिसरात सुमारे दीडशे वर्षांनंतर उत्खननातून संदर्भासह ताम्रपट सापडण्याची ही दुर्मीळ घटना आहे. मोराबंदर येथील ELP 1 स्तरात एका मोठ्या मातीच्या भांड्यात हे दोन्ही ताम्रपट सुरक्षित ठेवलेले आढळले. यावरून ते जाणीवपूर्वक जतन करण्यात आले असावेत, असे दिसते. राजकीय अस्थिरता किंवा संकटाच्या काळात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीने हे दस्तऐवज लपवून ठेवले असावेत, असा तर्क मांडला जात आहे.
त्रैकूटक राजवंश आणि इंद्रसेन यांचा ताम्रपट
सापडलेल्या दोन ताम्रपटांपैकी एक त्रैकूटक राजवंशाशी संबंधित आहे. सातवाहनांच्या ऱ्हासानंतर पश्चिम भारतात उदयास आलेल्या राजघराण्यांमध्ये त्रैकूटकांचे स्थान महत्त्वाचे होते. त्यांचा प्रभाव गुजरात, नाशिक आणि उत्तर कोकणापर्यंत पसरलेला असावा. हा ताम्रपट इंद्रसेन या आरंभीच्या त्रैकूटक राजाशी संबंधित असल्याने त्यांच्या इतिहासावर नवा प्रकाश टाकतो.
त्रैकूटक ताम्रपटाची वैशिष्ट्ये
त्रैकूटक राजवंशाशी संबंधित हा ताम्रपट दोन पत्रांचा संच आहे. दोन्ही ताम्रपत्रे दोन तांब्यांच्या कड्यांनी जोडलेली आहेत. प्रत्येक ताम्रपत्राची लांबी २३.१० सेंमी आणि रुंदी १२.२ सेंमी असून संपूर्ण संचाचे वजन १.१६० किलो आहे.
या ताम्रपटावर एकूण २५ ओळी आहेत. पहिल्या पत्रावर १२ आणि दुसऱ्या पत्रावर १३ ओळी कोरलेल्या आहेत. प्रत्येक ओळीत सरासरी ३० अक्षरे आहेत. हा ताम्रपट विजयी अनिरुद्धपूर येथून जारी करण्यात आला होता. त्यावरील तारीख वर्ष १७६, कार्तिक कृष्ण पंचमी अशी नोंदवली आहे.
ऐतिहासिक महत्त्व आणि कालनिश्चिती
त्रैकूटक राजवंशातील दहरसेन, व्याघ्रसेन, मध्यमसेन आणि विक्रमसेन यांचे ताम्रपट यापूर्वी ज्ञात होते. मात्र या वंशातील आरंभीचा राजा मानल्या जाणाऱ्या इंद्रदत्त किंवा इंद्रसेन याचा स्वतंत्र ताम्रपट आतापर्यंत उपलब्ध नव्हता. त्याचा उल्लेख प्रामुख्याने त्याच्या पुत्राच्या नाण्यांवरूनच ज्ञात होता. घारापुरीत सापडलेला हा ताम्रपट त्यामुळे विशेष महत्त्वाचा ठरतो. या ताम्रपटावर वर्ष १७६ अशी नोंद आहे. हे वर्ष कोणत्या संवतावर आधारित आहे, यावर मतभेद आहेत. शक संवत मानल्यास हा ताम्रपट इ.स. २५४ चा ठरतो. कलचुरी-चेदी संवत मानल्यास तो इ.स. ४२६ चा ठरतो. संवताचा प्रश्न खुला असला, तरी हा त्रैकूटक इतिहासातील अत्यंत प्राचीन अभिलेख ठरतो.
नन्न-मल्लदास आणि दानाची नोंद
हा ताम्रपट इंद्रसेनाने आपल्या वडिलांच्या, महाराज नन्न-मल्लदास यांच्या पुण्यवृद्धीसाठी जारी केला होता. यावरून त्रैकूटकांच्या आरंभीच्या वंशावळीबाबत नवे संकेत मिळतात. ताम्रपटात भगवान शंकरनारायण यांच्या नित्यपूजेसाठी तलावाजवळील जमीन दान दिल्याची नोंद आहे. नन्न-मल्लदास यांनी या देवतेसाठी मंडप बांधल्याचाही उल्लेख येतो. हे दान अम्बष्ठ विषयातील केतकीग्राम येथे राहणाऱ्या सहा व्यक्तींना देण्यात आले होते. त्यांची नावे द्रंबिक, चंद्रक, धावृक, रुद्रक, भागिस्वामी आणि द्रोणस्वामी अशी दिली आहेत.
भौगोलिक सीमांकन
ताम्रपटात दान दिलेल्या जमिनीच्या सीमा स्पष्टपणे नोंदवल्या आहेत. पूर्वेस जमलिवर, दक्षिणेस आंबा, औदुंबर आणि वडाची झाडे, ओसाड जमीन, खडक आणि उंचवटा असे खूणबिंदू दिले आहेत. वायव्येस समुद्र असल्याचा उल्लेख विशेष महत्त्वाचा आहे. हा संदर्भ घारापुरीच्या बेटरचनेशी जुळणारा आहे. या ताम्रपटाचा लेखक मोमिक होता. तो महासांधिविग्रहिक, म्हणजे युद्ध आणि तहविषयक व्यवहार पाहणारा उच्चाधिकारी होता. त्यामुळे या दानपत्राला प्रशासकीय मान्यता आणि राजकीय महत्त्व प्राप्त होते.
नवसारिका चालुक्य आणि जयाश्रय मंगळरसाचा ताम्रपट
मातीच्या मोठ्या भांड्यात सापडलेला दुसरा ताम्रपट नवसारिका चालुक्य घराण्याशी संबंधित आहे. हा ताम्रपट सातव्या शतकाच्या उत्तरार्धातील मानला जातो. नवसारिका चालुक्य हे बदामी चालुक्यांची गुजरातमधील उपशाखा होते. हा ताम्रपट दोन पत्रांचा संच आहे. तो राजमुद्रा असलेल्या एका कड्याने जोडलेला आहे. मुद्रेवर ‘जयाश्रय’ हे नाव कोरलेले असून वर अर्धचंद्र आणि खाली कमळाचे चिन्ह आहे. ताम्रपत्रांची लांबी २६.९ सेंमी, रुंदी १६.७ सेंमी आणि एकत्रित वजन १.८५० किलो आहे.
जयाश्रय, म्हणजेच विनयादित्य मंगळरस, हा दक्षिण गुजरातेत बदामी चालुक्यांचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होता. त्याचा प्रभाव उत्तर कोकण आणि मुंबई परिसरापर्यंत पोहोचला असावा, याचा संकेत या ताम्रपटाच्या घारापुरीतील अस्तित्वातून मिळतो. हा ताम्रपट अजून पूर्णपणे वाचता आलेला नाही. गंज आणि मातीचे थर दूर करण्यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया सुरू आहे. त्याचे पूर्ण वाचन झाल्यानंतर घारापुरी आणि चालुक्य सत्तासंबंधांवर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
ऐहोळे शिलालेख, ‘पुरी’ची स्वारी आणि घारापुरी
या शोधामुळे प्राचीन ‘पुरी’च्या ओळखीवरील दीर्घकाळ चालत आलेल्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. बदामी चालुक्य सम्राट पुलकेशी दुसरा याच्या ऐहोळे शिलालेखात कोकणातील मौर्यांची राजधानी असलेल्या ‘पुरी’वर केलेल्या सागरी स्वारीचा उल्लेख येतो. कवी रविकीर्तीने या मोहिमेचे वर्णन अत्यंत प्रभावी शब्दांत केले आहे.
अपरजलधेर्लक्ष्मीं यस्मिन्पुरीं पुरभित्प्रभे ।
मदगजघटाकारैर्नावां शतैरवमृद्नती ॥
याचा आशय असा की, पुलकेशीच्या सैन्याने शेकडो नौकांच्या साहाय्याने ‘पुरी’वर आक्रमण केले. समुद्रात उभ्या असलेल्या त्या नौका मदोन्मत्त हत्तींच्या समूहासारख्या भासत होत्या. या मोहिमेत पुलकेशीने पश्चिम समुद्राची लक्ष्मी मानली गेलेली पुरी जिंकली.
पुरीच्या ओळख पटली!
इतिहासकारांमध्ये ही ‘पुरी’ रायगड जिल्ह्यातील राजापुरी होती की मुंबईजवळील घारापुरी, यावर दीर्घकाळ चर्चा होती. वा. वि. मिराशी, डॉ. भाऊ दाजी लाड आणि हरिहर ठोसर यांसारख्या अभ्यासकांनी पुरी किंवा अनिरुद्धपूरची ओळख घारापुरीशी जोडली होती. घारापुरीत सापडलेल्या नव्या ताम्रपटांमुळे या मताला अधिक भक्कम आधार मिळतो. त्रैकूटक ताम्रपटात ‘विजयी अनिरुद्धपूर’चा उल्लेख आहे, तर चालुक्य ताम्रपटात ‘पुरी’शी संबंधित संदर्भ आढळतात. हे दोन्ही ताम्रपट मोराबंदर परिसरातच सापडल्याने त्यांचे महत्त्व वाढते.
ताम्रपटांचा संदर्भ, बेटावरील जलव्यवस्थापन रचना, आयात भांड्यांचे अवशेष आणि प्राचीन बंदराचे संकेत यांचा एकत्रित विचार करता, ऐहोळे शिलालेखातील ‘पुरी’ ही घारापुरी असावी, हे मत आता अधिक ठोसपणे पुढे येते.
मुंबई- चालुक्य संबंध
घारापुरी येथील मोराबंदर परिसरातील हे नवसंशोधन भारतीय पुरातत्त्वाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरले आहे. केवळ लयन स्थापत्यापुरते मर्यादित राहिलेले घारापुरीचे वैभव आता राजकीय राजधानी, लष्करीदृष्ट्या सुरक्षित सागरी दुर्ग आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र म्हणून समोर आले आहे. इराण आणि रोमन साम्राज्याशी असलेले व्यापारी संबंध, १५०० वर्षांपूर्वीचे प्रगत जलव्यवस्थापन आणि त्रैकूटक व चालुक्य राजांचे जुने ताम्रपट महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची पुनर्रचना करण्यास भाग पाडतात. ‘पुरी’ म्हणजेच ‘घारापुरी’ यावर झालेला हा ऐतिहासिक खुलासा मुंबई शहराचा इतिहास थेट सातवाहनांनंतरच्या आणि चालुक्य कालखंडाशी अधिक घट्टपणे जोडतो.
