Elephanta Gharapuri global trade history: Excavation uncovers Turquoise Glazed Ware from ancient Iran: एलिफंटा बेटाचे महत्त्व केवळ तेथील भव्य लेणींपुरते मर्यादित नसून, ते प्राचीन जगातील एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र होते, याचे ठोस पुरावे नुकत्याच झालेल्या उत्खननातून हाती आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्राचीन इराणमधून आलेली वैशिष्ट्यपूर्ण भांड्यांचे अवशेष सापडले आहेत.

प्राचीन इराणमधील भांड्यांचे अवशेष

मुंबईच्या पूर्वेस समुद्रात वसलेल्या जागतिक वारसा स्थळ ‘एलिफंटा’ (घारापुरी) बेटावर सध्या सुरू असलेल्या उत्खननातून एक अतिशय आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची माहिती समोर आली आहे. येथे एका रेखीव आणि बांधीव जलाशयाचा शोध लागला असून, हे अभियांत्रिकी तंत्र सुमारे १५०० वर्षांपूर्वीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे तर सध्या युद्धग्रस्त असलेल्या इराणमधील प्राचीन भांड्यांचे अवशेषही इथे सापडले असून भारत- इराण संबंधांच्या १५०० वर्षांच्या इतिहासाचे ते ढळढळीत पुरावेच आहेत.

प्राचीन जलव्यवस्थापनाचे तंत्र

घारापुरी अर्थात एलिफंटा हे बेट जागतिक वारसा म्हणून युनेस्कोची मान्यता लाभलेल्या भव्य शिल्पकलेसाठी आणि तेथील शैव लेणींसाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र आता त्याबरोबरच सध्या या बेटावर सुरू असलेल्या उत्खननातून एका रेखीव आणि बांधीव जलाशयाचा शोध लागला असून त्यामुळे या बेटाच्या इतिहासात एका नवा अध्याय जोडला गेला आहे. नव्याने सापडलेली दगड आणि विटांनी बांधलेली, ‘टी’ आकाराची पायऱ्यांची जलव्यवस्थापन रचना ही सुमारे १५०० वर्षांपूर्वीची असून केवळ एक वास्तुशास्त्रीय अवशेष म्हणून नव्हे; तर भारतीय जलव्यवस्थापनाचे प्राचीन तंत्र, तत्कालीन पिढीची भूगोला विषयीची उत्तम जाण आणि सागरी व्यापाराशी असलेले जिव्हाळ्याचे नाते या साऱ्याचा हा जलाशय हा महत्त्वाचा पुरावा ठरतो.

Ancient Persian Turquoise Glazed Ware found at Elephanta Caves | India-Iran historical trade links excavation Gharapuri | एलिफंटा लेणी उत्खननात सापडलेले इराणमधील प्राचीन मातीचे भांडे | भारत आणि इराण यांच्यातील १५०० वर्षांपूर्वीचा सागरी व्यापार
एलिफँटाच्या उत्खननात सापडलेले अवशेष (Photo- ASI)

पायऱ्यांचे दगड बेटावरचे नव्हेत

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे (ASI),पुण्याचे डेक्कन अभिमत विद्यापीठ आणि सोमय्या अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमान एलिफंटा बेटावर सुरू असलेल्या उत्खननात या जलाशयाचा शोध घेण्यात आला. एएसआयच्या मुंबई विभागाचे पुरातत्त्वज्ञ अधीक्षक डॉ. अभिजित आंबेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोराबंदर परिसरात केलेल्या उत्खननातून ही रचना प्रकाशात आली. सध्या या जलाशयाच्या १४.७ मीटर लांब, ६.७ ते १०.८ मीटर रुंद भागामध्ये उत्खनन करण्यात आले असून ते ५ मीटर खोल आहे. या उत्खननात जलाशयात उतरणाऱ्या २० पायऱ्याही सापडल्या आहेत. विशेष म्हणजे, या पायऱ्या बेटावरील दगडांऐवजी बाहेरून आणलेल्या दगडांनी बांधलेल्या आहेत. हा दगड ट्रकाइट जातीचा असावा, असा प्राथमिक निष्कर्ष आहे. हा दगड अद्याप एलिफंटा बेटावर सापडलेला नाही. मात्र मुंबईत तो अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या कामासाठी नियोजनबद्ध पुरवठा साखळी (supply chain) अस्तित्वात होती, ज्या साकळी मार्फत तो मुंबईतून एलिफंटाला आणण्यात आला असावा, असा कयास आहे.

लयन स्थापत्यापलीकडचे अभियांत्रिकी तंत्र

घारापुरी बेटावर जागतिक वारसा लाभलेल्या शैव लेणी आहेत. असे असले तरी हा जलाशय मात्र खडकात किंवा कातळात खोदलेला नाही, तर तो बांधीव आहे. त्यासाठी दगड व विटांचा वापर करण्यात आला आहे. पर्यावरणाशी सुसंगत अशी जलव्यवस्थाही उभारण्याचे तंत्र तत्कालीन कालखंडात वापरात होते, हेच यावरून लक्षात येते. या बेटावर भरपूर पाऊस पडतो, परंतु बेटाचा बहुतांश भाग खडकाळ असल्याने पाणी जमिनीत मुरत नाही तर ते थेट समुद्रात वाहून जाते. त्यामुळेच पावसाळ्यानंतरच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या जलाशयाची निर्मिती करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

Ancient Persian Turquoise Glazed Ware found at Elephanta Caves | India-Iran historical trade links excavation Gharapuri | एलिफंटा लेणी उत्खननात सापडलेले इराणमधील प्राचीन मातीचे भांडे | भारत आणि इराण यांच्यातील १५०० वर्षांपूर्वीचा सागरी व्यापार
एलिफंटाच्या उत्खननात सापडलेले अवशेष (Photo-ASI)

बारव आणि बावडी स्थापत्याशी तुलना

महाराष्ट्रामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या भागात खास करून मराठवाड्यामध्ये बारव स्थापत्य आकारास आलेले दिसते. त्याचप्रमाणे गुजरात आणि राजस्थानमध्ये बावडी स्थापत्य (राणी की वाव आदी) आकारास आले. प्रामुख्याने त्या त्या भूभागातील जलस्तर गाठण्यासाठी खोलवर उतरणाऱ्या अशा या रचना आहेत. तज्ज्ञांच्या मतानुसार साधारणपणे सातव्या शतकामध्ये अशा प्रकारच्या रचना अस्तित्वात आलेल्या दिसतात. घारापुरीच्या बेटावर सध्या सापडलेला हा जलाशय याच रचनांचे महाराष्ट्रातील स्थानिक (localised) रूप ठरावा, असे प्राथमिक मत आहे. सध्या या जलाशयाचा एक छोटेकानी भागच उत्खननात उघड झाला आहे. कदाचित संपूर्ण उत्खनन झाले की, लक्षात येऊ शकते की, इथे खालच्या बाजूस झरे होते की, केवळ हा पाण्याचा साठा असलेला जलाशय होता. यातील कोणतीही बाब लक्षात आली तरी एक नक्की की, भारतीय जलव्यवस्थापनाच्या इतिहासात या शोधाला एक वेगळे स्थान प्राप्त होते, असे डेक्कन अभिमत विद्यापीठातील पुरातत्त्वज्ञ डॉ. अभिजित दांडेकर सांगतात.

एलिफंटाचे भौगोलिक महत्त्व आणि सागरीमार्ग

एलिफंटा बेटाचे खरे महत्त्व समजून घेण्यासाठी त्याचा भूगोल लक्षात घ्यावा लागतो. मुंबईच्या पूर्वेस वसलेले हे बेट, प्राचीन काळी ‘घारापुरी’ या नावाने ओळखले जात होते. हे बेट अरबी समुद्रातील महत्त्वाच्या समुद्रमार्गांच्या संगमावर आहे. प्राचीन काळी भारत, पश्चिम आशिया आणि भूमध्य प्रदेश यांमधील व्यापार प्रामुख्याने समुद्रमार्गाने होत असे. त्यावेळेस एलिफंटासारखी बेटे ही केवळ विश्रांतीस्थळे नव्हती, तर ती ‘ट्रान्झिट हब्स’ होती. हा दावा बळकट करणारे पुरावे प्रस्तुत उत्खननात सापडले आहेत, अशी माहिती अधीक्षक डॉ. अभिजित आंबेकर यांनी दिली.

Ancient Persian Turquoise Glazed Ware found at Elephanta Caves | India-Iran historical trade links excavation Gharapuri | एलिफंटा लेणी उत्खननात सापडलेले इराणमधील प्राचीन मातीचे भांडे | भारत आणि इराण यांच्यातील १५०० वर्षांपूर्वीचा सागरी व्यापार
एलिफंटा इथे सुरू असलेले उत्खनन (Photo- ASI)

लेणीः इन्स्टिट्यूशनल नोड्स

पश्चिम भारतात मोठ्या प्रमाणावर सापडणारे लयन स्थापत्यही आपल्याला हेच सांगते. या लेणी केवळ धार्मिक केंद्रे नव्हत्या. तर त्या व्यापाऱ्यांसाठीची विश्रांतीची ठिकाणे, श्रद्धास्थाने आणि व्यापारी भाषेत नेटवर्किंग आणि आर्थिक व्यवहारांची केंद्रे होती. म्हणजेच त्या काळातील ‘इन्स्टिट्यूशनल नोड्स’ याचाच अर्थ जिथे धर्म आणि व्यापार यांचा संगम घडत असे.

सागरी व्यापाराचे पुरावे: मातीची भांडी, काच आणि जार

प्रस्तुत उत्खननातून सापडलेल्या वस्तूंमुळे एलिफंटा बेटाचे जागतिक व्यापाराशी असलेले नाते स्पष्ट होते. इंडो-मेडिटेरियन (रोमन) अॅम्फोरा भांड्यांचे तुकडे, पश्चिम आशियातील ‘टॉरपीडो जार’, तसेच आयात केलेल्या काचेच्या भांड्याचे अवशेष याकडे निर्देश करतात की हे बेट आंतरराष्ट्रीय संपर्काचे ठिकाण होते. अॅम्फोराचा वापर वाइन, ऑलिव्ह तेल किंवा ‘फिश सॉस’ सारख्या वस्तूंची ने-आण करण्यासाठी केला जात असे. तर टॉरपीडो जार हे विशेषतः पर्शियन आखातातून (सध्याचे इराण) येणाऱ्या व्यापारासाठी वापरले जात. त्यांचा लांबट आकार आणि हॅण्डल नसणे या रचनेमुळे मोठ्या प्रमाणावर साठवण आणि वाहतुकीसाठी ते उपयुक्त होते. प्राचीन इराण म्हणून आलेले टरकॉइज्ड ग्लेझ्ड वेअर आणि हच्ड ग्रफियाटोचे अवशेषही इथे सापडले आहेत, असेही डॉ. दांडेकर सांगतात. या सर्व वस्तूंचे एलिफंटा बेटावरील अस्तित्व हे स्पष्ट करते की, एलिफंटा हे अगदी एका टोकास असलेले ‘केवळ एक श्रद्धास्थान’ नव्हते, तर ते प्राचीन जागतिक व्यापारी जाळ्याचा सक्रिय भाग होते.

Ancient Persian Turquoise Glazed Ware found at Elephanta Caves | India-Iran historical trade links excavation Gharapuri | एलिफंटा लेणी उत्खननात सापडलेले इराणमधील प्राचीन मातीचे भांडे | भारत आणि इराण यांच्यातील १५०० वर्षांपूर्वीचा सागरी व्यापार
एलिफंटा इथे सुरू असलेले उत्खनन (Photo- ASI)

नाणी आणि राजसत्ता

उत्खननात आतापर्यंत एकूण ६० गंजलेले नाणी सापडल्याचे सांगून डॉ. अभिजित दांडेकर म्हणाले की, रासायनिक प्रक्रिया करून त्यातील १८ नाणी स्वच्छ करण्यात आली. काही तांब्याची नाणी ही कृष्णराज या कलचुरी वंशातील राजाच्या कारकिर्दीतील असल्याचेही आढळले आहे. या नाण्यांवर बैलाचे चित्र आणि मंदिरसदृश अंकन करण्यात आले आहे. यावरून त्या काळातील धार्मिक आणि राजकीय संरचना यांची एकत्रित झलक पाहायला मिळते. नाणे हे केवळ आर्थिक व्यवहाराचे साधन नसते तर ते राजसत्तेचे प्रतीकही असते. या नाण्यांमुळेच एलिफंटा परिसरावर कोणत्या राजसत्तांचा प्रभाव होता, याचा मागोवा घेणे शक्य होणार आहे, असेही डॉ. दांडेकर सांगतात.

Ancient Persian Turquoise Glazed Ware found at Elephanta Caves | India-Iran historical trade links excavation Gharapuri | एलिफंटा लेणी उत्खननात सापडलेले इराणमधील प्राचीन मातीचे भांडे | भारत आणि इराण यांच्यातील १५०० वर्षांपूर्वीचा सागरी व्यापार
एलिफंटा येथील उत्खननात सापडलेले नाणे (Photo- ASI)

एलिफंटा लेणी: धर्म, कला आणि समुद्र

एलिफंटा लेणींमधील सर्वात प्रसिद्ध म्हणजे शिवाच्या सदाशिव रूपाचे दर्शन घडवणारी भव्य त्रिमूर्ती. या शिल्पकलेत केवळ धार्मिकता नाही, तर त्यामागे राजकीय आश्रय, आर्थिक संपन्नता आणि कलात्मक उत्कटता यांचे मिश्रण आहे. लेणींचे खोदकाम हे उपलब्ध स्रोत, मनुष्यबळ आणि उपलब्ध काळ-वेळ यांचे गणित आपल्या लक्षात आणून देणारे असते. हे सर्व केवळ समुद्रमार्गावरील व्यापारातूनच शक्य झाले असावे, असे तज्ज्ञांना वाटते. याचाच अर्थ लेणी आणि व्यापार यांचा परस्परसंबंध अत्यंत निकटचा आहे. याशिवाय, व्यापाऱ्यांसाठी ही ठिकाणे सुरक्षित आणि धार्मिकदृष्ट्या पवित्र मानली जात. सागरी प्रवासातील अनिश्चिततेसाठी श्रद्धास्थानांचा आधार हा मानसिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो, हेही इतिहासात अनेकदा पुरते सिद्ध झाले आहे.

जलाशयाचा व्यापक अर्थ

नव्या जलाशयाच्या शोधाकडे केवळ एक ‘आर्किऑलॉजिकल फाइंड’ अर्थात पुरातत्त्वीय शोध म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही तर तो त्या काळातील समाजाच्या पर्यावरणीय जाणिवेचा, अभियांत्रिकी कौशल्याचा आणि दीर्घकालीन नियोजनाचा पुरावा म्हणून पाहावे लागते. समुद्रात असलेले खडाकळ बेट आणि पावसावरचे अवलंबित्व यामुळे या बेटावर टिकून राहण्यासाठी जलव्यवस्थापन अत्यावश्यक होते. हा जलाशय म्हणजे त्या आव्हानाला दिलेले उत्तर आहे, असे तज्ज्ञांना वाटते.

इतिहासाचा बहुआयामी पट

एलिफंटा बेट हे केवळ जागतिक वारसा स्थळ असलेल्या लेणींचे ठिकाण नाही; तर ते बेटच एक जिवंत इतिहास आहे, जिथे धर्म, व्यापार, भूगोल आणि तंत्रज्ञान यांचा आगळा संगम या जलाशयाच्या रूपाने पाहायला मिळतो. अलीकडच्या या उत्खननातून समोर आलेला जलाशय हा केवळ एलिफंटाच्याच नव्हे तर मुंबईच्याही इतिहासातील एक महत्त्वाचा दुवा ठरेल, अशी चिन्हे आहेत.

या शोधामुळे एलिफंटाच्या अभ्यासाला नवे परिमाण मिळाले आहे. भविष्यातील संशोधनातून या बेटाचे आणखी अनेक पैलू उलगडतील, अशी अपेक्षा आहे.

संदर्भ सूची (References):

  • Archaeological Survey of India (ASI). (2025–26). Preliminary Excavation Report: Morabandhar Area, Elephanta Island, Mumbai. Mumbai Circle, ASI (Unpublished Field Report).
  • Ambekar, Abhijit. (2026). Field Observations on Structural Water Reservoir at Elephanta Island. Archaeological Survey of India – Internal Documentation & Media Briefings.
  • Dandekar, Abhijit. (2024). Numismatic Evidence from Western India: A Study of Kalachuri Coinage. Pune: Deccan College Post-Graduate Research Institute.
  • Spink, Walter M. (1977). Ajanta to Ellora: The Evolution of Rock-Cut
    Architecture in India. New Delhi: Munshiram Manoharlal.
  • Ray, Himanshu Prabha. (2003). The Archaeology of Seafaring in Ancient South Asia. Cambridge: Cambridge University Press.
  • Tomber, Roberta. (2008). Indo-Roman Trade: From Pots to Pepper. London: Duckworth Publishing.
  • Seland, Eivind Heldaas. (2014). Ships of the Desert and Ships of the Sea: Trade Networks in the Indian Ocean. Journal of Indian Ocean Archaeology, Vol. 10, pp. 45–62.
  • UNESCO World Heritage Centre. (1987, updated). Elephanta Caves – Nomination Dossier and Site Evaluation Reports. Paris: UNESCO World Heritage Centre.