The Viral Video; Kiranotsav at Cave 10: सध्या एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि तो म्हणजे वेरूळच्या लेणी क्रमांक १० मधील बुद्ध मूर्तीवर पडलेल्या सूर्यकिरणांचा अर्थात किरणोत्सवाचा. १० मार्च रोजी झालेल्या किरणोत्सवाचा क्षण टिपण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. काळ्या पाषाणात कोरलेल्या बुद्धांच्या मूर्तीवरील सोनेरी किरणांचा प्रकाश मन भारून टाकणारा होता. अर्धोन्मीलित नेत्र आणि धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेत स्थानपन्न बुद्धांच्या तेजात या सुवर्ण किरणांनी अधिकच भर घातली. त्याच पार्श्वभूमीवर वेरूळ येथील बौद्ध स्थापत्य कलाविष्काराचा घेतलेला हा आढावा.
वेरूळ ३४ कोरीव लेणींचा समूह
वेरूळ म्हणजे भारतीय ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक अद्वितीय नमुनाच आहे. महाराष्ट्रातील बौद्ध लेणी समूहात वेरूळच्या बौद्ध लेणींचे स्वतःचे एक विशिष्ट स्थान आहे. वेरूळ किंवा एलोरा हा ३४ प्रमुख कोरीव लेणींचा समूह आहे. हा लेणीसमूह भारतातील बौद्ध, हिंदू आणि जैन या तीन प्रमुख तत्त्वपरंपरांवर आधारित आहे. याखेरीज येथे २५ ते ३० पेक्षा अधिक उत्कीर्ण लेणीदेखील सापडतात. या स्थळाचे प्राचीन नाव ‘एलपुरा’ असे असून या नावाचा उल्लेख शिलालेखांमध्ये आढळतो. मध्ययुगीन काळात या स्थळाला भेट देणाऱ्या संतांनी आणि प्रवाशांनी या स्थळाचा उल्लेख आपल्या नोंदींमध्ये केलेला आहे. या लेणी समूहातील १६ क्रमांकाचे एकाश्म कैलास मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. या मंदिराचा ज्ञानेश्वरीत मनकेश्वर असा उल्लेख आढळतो. किंबहुना महानुभाव संप्रदायाचे चक्रधर स्वामी काही काळ वेरूळ येथे वास्तव्यास होते. एकूणच वेरूळचे महत्त्व मध्ययुगीन कालखंडाच्या उत्तरार्धापर्यंत अबाधित असल्याचे दिसून येते.
वेरूळ एक धार्मिक केंद्र
लेणी १ ते १२ या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. तर लेणी १३ ते २९ या हिंदू धर्माशी संबंधित आहेत. तर लेणी ३२ ते ३४ या जैन धर्माशी संबंधित आहेत. १७ प्रमुख हिंदू लेणींव्यतिरिक्त गणेश लेणी समूह आणि जोगेश्वरी समूह यामध्ये समाविष्ट होणाऱ्या २५ ते ३० पेक्षा जास्त लहान हिंदू लेणी देखील आहेत. या ठिकाणी प्रथम बौद्ध लेणी खोदली गेली आणि त्यानंतर हिंदू व जैन लेणींचे उत्खनन झाले असे मानले जात होते. परंतु, अलीकडील अभ्यासात काही हिंदू लेणी म्हणजेच लेणी क्रमांक २१ आणि २९ ही सर्वात आधी खोदली गेली आणि त्यानंतर बौद्ध लेणींचे उत्खनन झाले असे मांडण्यात आले आहे. त्यानंतर उर्वरित हिंदू लेणी खोदली गेली आणि शेवटी जैन लेणी समूहाचा विस्तार करण्यात आला. त्यामुळे इ.स. ६ व्या शतकापासून ते १० व्या शतकाच्या शेवटपर्यंत किंवा ११ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत वेरूळ हे एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र होते हे समजण्यास मदत होते.
वेरूळ येथील बौद्ध लेणी
लेणी क्रमांक ६ ही सर्वात प्राचीन मानली जाते. त्यानंतर लेणी क्रमांक ५, २, ३, ४ आणि मग लेणी क्रमांक ११ व १२ यांचे उत्खनन झाले. लेणी क्रमांक ११ आणि १२ तीन मजली असून वेरूळ येथील बौद्ध संकुलातील शेवटच्या टप्प्यातील लेणी म्हणून ती ओळखली जातात. वेरूळ हे तांत्रिक बौद्ध धर्माचे एक महत्त्वाचे केंद्र होते. येथे थेरवाद किंवा हीनयान बौद्ध धर्माच्या अस्तित्वाचा ठोस पुरावा सापडत नाही. अजिंठा येथे आढळणाऱ्या महायान पद्धतीच्या लेणी म्हणजे चैत्य आणि विहार यांचा संयोग वेरूळ येथे आढळत नाहीत. पश्चिम दख्खन प्रदेशातील तांत्रिक बौद्ध धर्माचे मुख्य केंद्र वेरूळ हे होते. याबरोबरच कान्हेरी (बोरिवली) आणि पन्हाळेकाजी (रत्नागिरी) लेणीही या धार्मिक परंपरेला पूरक होत्या. तांत्रिक बौद्ध धर्म इ.स. ७ व्या शतकापासून १० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत विकसित झाला आणि बहरास आला असे वेरूळ येतील शिल्पसंभारातून दृष्टिपथास पडते.
वेरूळ येथील तांत्रिक बौद्ध
वेरूळ येथे आढळणारी तांत्रिक बौद्ध धर्माशी संबंधित शिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कारण त्यापैकी काही मूर्ती तांत्रिक बौद्ध ग्रंथांमध्ये दिलेल्या वर्णनांशी जुळत नाहीत. त्यामुळे येथील तांत्रिक बौद्ध मूर्तींचे उत्खनन, तांत्रिक बौद्ध धर्माच्या मानक ग्रंथांची संहिता तयार होण्याआधीच किंवा ते व्यापक प्रमाणात प्रचलित होण्याआधी झाले असावे असा तर्क अभ्यासक मांडतात. पूर्व भारतातील तांत्रिक बौद्ध धर्म पश्चिम दख्खनमध्ये विशेषतः वेरूळमध्ये आणण्याचे श्रेय महासिद्ध सारहापाद यांना दिले जाते. वेरूळ येथील अष्टबोधिसत्त्व मंडल प्रसिद्ध आहे. या मंडलात एका बुद्धाच्या प्रतिमेसभोवती आठ बोधिसत्त्व असतात. यात अवलोकितेश्वर, वज्रपाणि, मंजुश्री, मैत्रेय, आकाशगर्भ, क्षितिगर्भ आणि इतरांचा समावेश असतो. बोधिसत्त्वांना विशिष्ट क्रमाने मांडण्याची ही योजना वेरूळ येथील बौद्ध लेणींचे एक विशेष वैशिष्ट्य आहे. तांत्रिक बौद्ध धर्मात बुद्ध आणि बोधिसत्त्वांचे विशिष्ट आकृतिबंध किंवा मंडलांद्वारे पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. यावरून हे स्पष्ट होते की, सातव्या शतकाच्या मध्य किंवा उत्तरार्धात तांत्रिक बौद्ध धर्मातील विधी अधिकृतपणे प्रस्थापित झाले होते आणि हे प्रथमच वेरूळ येथे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे वेरूळ येथील अष्टबोधिसत्त्व मंडल किंवा बौद्ध प्रतिमाशास्त्र भारतातील प्रारंभीच्या तांत्रिक बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे. तांत्रिक बौद्ध धर्मात स्त्री शक्ती किंवा शक्तीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. म्हणूनच लेणी क्रमांक १२ मध्ये आढळणाऱ्या बारा धारिणी महत्त्वाच्या मानल्या जातात. या धारिणींपैकी काहींची ओळख जंगुली, चुंडा, तारा आणि भ्रिकुटी म्हणून झाली आहे. यावरून असे दिसून येते की, सातव्या शतकाच्या अखेरीस स्त्री देवींनी बौद्ध धार्मिक विधींमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले होते आणि बोधिसत्त्वांबरोबर त्यांचीही पूजा केली जात होती. वेरूळ येथे स्त्री बौद्ध देवतांची मांडणी आणि त्यांची शिल्पे किती विकसित झाली याचे सर्वात प्राचीन पुरावे सापडतात. तांत्रिक बौद्ध धर्माच्या विधींच्या विकासाची संपूर्ण प्रक्रिया वेरूळ येथे योग्य संदर्भात पाहता येते.
तारा
तारा ही सर्वात महत्त्वाची बोधिशक्ती मानली जाते आणि ती बोधिसत्त्व अवलोकितेश्वराची स्त्री समकक्ष आहे. वेरूळ येथील बौद्ध लेणींमध्ये तिला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ती वेरूळ येथील सर्व बौद्ध स्त्री देवतांमध्ये सर्वात प्रमुख आहे. सातव्या शतकाच्या मध्यापासून ताऱेला बौद्ध देवतांच्या समूहात एक महत्त्वाचे स्थान मिळाले आणि तिला करुणेची देवी किंवा दयाळूपणाची देवी म्हणून अवलोकितेश्वराबरोबर पूजले जाऊ लागले. व्यापारी, भिक्षू, व्यापारीवर्ग आणि सामान्य लोक तिची भक्ती करत असत. संपूर्ण पश्चिमी दक्खनमध्ये अष्टमहाभय तारेची केवळ एकच मूर्ती सापडते आणि ती वेरूळ लेणी क्रमांक ९ मध्ये आहे. अवलोकितेश्वराप्रमाणेच तारा देखील व्यापाऱ्यांना विविध संकटांपासून जहाज बुडणे, आग, हिंस्र प्राणी, साप, कैद होणे इत्यादी पासून वाचवताना दाखवली आहे. विशेष म्हणजे भक्तांना आठ संकटांपासून (अष्टमहाभय) वाचवणाऱ्या ताराच्या प्रतिमा भारताच्या पूर्व भागातील बौद्ध कलामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. ओडिशातील रत्नागिरी आणि इतर बौद्ध स्थळांवरही अशा काही मूर्ती सापडल्या आहेत.
अवलोकितेश्वर
बुद्धानंतर वेरूळमधील धार्मिक प्रतिमाशास्त्रात सर्वात महत्त्वाची बौद्ध देवता अवलोकितेश्वर आहे. वेरूळ येथील बौद्ध लेण्यांमध्ये १०० हून अधिक अवलोकितेश्वराच्या प्रतिमा आढळल्या आहेत. विशेष म्हणजे येथे अवलोकितेश्वराच्या अष्टमहाभय अवलोकितेश्वर, रक्त-लोकेश्वर, षडक्षरी लोकेश्वर इत्यादी विविध प्रतिमा सापडतात. वेरूळ येथील रक्त-लोकेश्वराचे अस्तित्व अत्यंत मनोरंजक आहे. प्राचीन भारतातील बौद्ध मूर्तीशास्त्रात रक्त-लोकेश्वराच्या प्रतिमा फारशा आढळत नाहीत. रक्त-लोकेश्वर हा प्रामुख्याने शृंगार रसाशी संबंधित आहे. बौद्ध लेणींमध्ये तारा आणि भ्रिकुटी यांच्या बरोबर तो दर्शवला जातो. बौद्ध ग्रंथांनुसार विशेषतः साधनामाला आणि इतर ग्रंथांमध्ये तो लाल रंगाशी संबंधित आहे आणि त्याच्या प्रतिमांना लाल रंगाने रंगवण्याचा उल्लेख आहे. दुर्दैवाने वेरुळमधील रक्त-लोकेश्वराच्या मूर्तींवर आता कोणताही रंग शिल्लक नाही.
षडाक्षरी लोकेश्वर हा शिक्षणाशी संबंधित आहे. अवलोकितेश्वराचे हे रूप ‘ॐ मणि पद्मे हुं’ या मंत्राचे मूर्त स्वरूप मानले जाते. हा मंत्र सहा अक्षरी (षडाक्षरी) आहे. विशेष म्हणजे षडाक्षरी लोकेश्वराच्या प्रतिमा पूर्व भारतातील बौद्ध स्थळांवरही आढळतात. सामान्यतः षडाक्षरी लोकेश्वराबरोबर षडाक्षरी महाविद्या असते, जी त्याच्या मंत्राची स्त्री मूर्ती आहे आणि ती ज्ञानाचे प्रतीक मानली जाते. तसेच मणिधर नावाची देवता त्याच्याबरोबर असते, जी अक्षमाला (जपमाळ) धारण करते, ही सततच्या कार्यशीलतेचे किंवा जीवनचक्राचे प्रतीक मानली जाते. वेरूळमध्ये रक्त-लोकेश्वर आणि षडाक्षरी लोकेश्वराच्या प्रतिमा आढळणे महत्त्वाचे आहे. कारण एका प्रतिमेत शृंगार रस आणि दुसऱ्या प्रतिमेत गूढ तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व आहे. यावरून वेरूळमध्ये अत्यंत विकसित आणि जटिल धार्मिक प्रतिमाशास्त्र अस्तित्वात होते, हे स्पष्ट होते.
वेरूळमधील बौद्ध देवता समूह
वेरूळमधील बौद्ध लेणी विविध देवतांच्या मूर्तींनी समृद्ध आहेत. ज्यात पुरुष आणि स्त्री दोन्ही प्रकारच्या देवतांचा समावेश आहे. बुद्धाच्या प्रतिमांबरोबर बोधिसत्त्व, बोधिशक्ती आणि इतर देवतांच्या मूर्ती येथे आढळतात. मैत्रेय, वज्रपाणि आणि मंजुश्री हे तीन महत्त्वाचे बोधिसत्त्व येथे कोरलेले आहेत. वज्रपाणिच्या प्रतिमेच्या मागील तत्त्वज्ञान आणि प्रतिकात्मक अर्थ अत्यंत रोचक आहे. तांत्रिक बौद्ध धर्मात वज्रपाणिला विशेष महत्त्व आहे. तांत्रिक बौद्ध धर्माला मंत्रयान असेही म्हणतात. मंत्रांचा म्हणजेच विशिष्ट देवतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गूढ सूत्रांचा वापर हा मंत्रयान पद्धतीतील महत्त्वाचा पूजाविधी मानला जातो. यालाच वज्रयान असेही म्हणतात. वज्र म्हणजे वज्रास्त्र ज्याचा नाश होऊ शकत नाही, जे जळू शकत नाही किंवा तुटू शकत नाही. त्यामुळे वज्र हे बौद्ध धर्माच्या नाश न होणाऱ्या अस्तित्वाचे प्रतीक मानले जाते. या संदर्भात वेरूळ मधील बौद्ध लेणींमध्ये वज्रपाणिच्या उपस्थितीला विशेष महत्त्व आहे. तो बुद्धाच्या त्रिमूर्ती गटांमध्ये आणि अष्टबोधिसत्त्व मंडळांमध्ये दाखवला गेला आहे, तसेच स्वतंत्र मूर्ती म्हणूनही कोरलेली आहे. मंजुश्री हा आणखी एक महत्त्वाचा बोधिसत्त्व असून वेरूळमध्ये त्याच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणात सापडतात. येथे मंजुश्रीच्या दोन प्रमुख रूपांचे दर्शन घडते. स्थिरचक्र मंजुश्री आणि सिद्धैकवीर मंजुश्री तांत्रिक किंवा गूढ बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. वेरूळमध्ये एक विशेष मंदीर किंवा खोली आढळते. जिथे हरिती आणि पंचिकाची मूर्ती आहे. याशिवाय येथे संपत्तीचा बौद्ध देव जांभालाच्या सहा ते सातपेक्षा अधिक मूर्ती आढळतात.
हरिती आणि जांभाल
हरिती ही राजगृहातील एक यक्षिणी होती. जी लहान मुलांना भक्ष्य करत असे. नंतर भगवान बुद्धांनी तिला परावृत्त करून तिचे रूपांतर आपल्या शिष्येमध्ये केले. बुद्धांनी तिला वचन दिले की, रोज भिक्षू आणि सामान्य लोक तिला अन्न अर्पण करतील. फक्त वास्तुशिल्पीय मठांमध्ये नव्हे, तर खोदकाम केलेल्या मठांमध्येही हरिती आणि पंचिकासाठी एक वेगळी खोली दिलेली आढळते. जी बुद्धाच्या काळातील या घटनेची आठवण करून देते. या लेणींमध्ये हरिती आणि पंचिकाच्या प्रतिमा असणे आणि त्यांच्या पूजा प्रचलित असणे, हे दाखवते की सातव्या शतकात बौद्ध धर्म स्थानिक लोकसंस्कृतींना स्वीकारून पुढे मार्गक्रमण करता झाला. सातव्या शतकाच्या उत्तरार्धातही बौद्ध धर्माने स्थानिक आणि लोकधर्माशी संबंधित देवतांना मुख्य प्रवाहात सामावून घेतले. वेरूळमध्ये याच प्रवृत्तीचे एक विलक्षण उदाहरण दिसून येते, कारण हा प्रभाव खूप उशिरापर्यंत टिकून राहिला होता. वेरूळमधील बौद्ध लेणींमध्ये जांभालाची उपस्थिती ही एक महत्त्वाची बाब आहे, कारण यावरून हे स्पष्ट होते की बौद्ध धर्माला व्यापारी वर्गाचा तोपर्यंत आश्रय मिळत होता.
वेरूळ- बौद्ध शिक्षणाचे केंद्र
लेणी क्रमांक ५, ११ आणि १२ या ठिकाणी बौद्ध शिक्षणाचे मोठे केंद्र अस्तित्वात असावे, असे संकेत मिळतात. विशेषतः इ.स. ६ व्या ते ७ व्या शतकाच्या दरम्यान वेरूळ हे बौद्ध शिक्षणाचे एक महत्त्वाचे ठिकाण होते. इतर उर्वरित लेणी मुख्यतः बुद्ध आणि अन्य बौद्ध देवतांच्या पूजेसाठी समर्पित होती. काही लेणी प्रारंभीच्या तांत्रिक बौद्ध कालखंडातील विहारातच चैत्य असलेल्या लेणींप्रमाणे आहेत. आठव्या शतकाच्या सुरुवातीस वेरूळमधील बौद्ध लेणीचे खोदकाम थांबले.