Elon Musk Covid Vaccine Death Post Fact Check : सहा वर्षांपूर्वी आलेल्या करोना महामारीने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. या विषाणूमुळे लाखो लोकांना आपले प्राण गमावावे लागले होते. करोनाचा सामना करण्यासाठी अनेक देशांनी टाळेबंदीची घोषणाही केली होती, त्यामध्ये कित्येकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले होते. या महामारीचा नायनाट करण्यासाठी बहुतांश देशांनी लसीकरण मोहीम राबवली. यादरम्यान करोनाच्या लसीकरणामुळे तब्बल ६० हजार लोकांना आपले प्राण गमावावे लागल्याचा दावा टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

करोनाची लस पुन्हा चर्चेत कशी आली?

करोनाची लस घेतल्याने फायदा होतो की नुकसान, असा प्रश्न नागरिकांकडून वारंवार विचारला जातो. प्रत्यक्षात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यापूर्वीच या लसीबाबत अनेक कटकारस्थानाच्या अफवा पसरू लागल्या होत्या. त्यावेळी काही जणांनी असा दावा केला होता की, करोनाच्या लसींमुळे मानवी डीएनएमध्ये बदल होऊ शकतो; तर काहींच्या मते या लसीमध्ये मायक्रोचिप बसवण्यात आली होती, जी बिल गेट्स यांच्याशी संबंधित असून 5G तंत्रज्ञानाद्वारे लोकांवर नजर ठेवण्यासाठी वापरली जाऊ शकते. मात्र, समाजमाध्यमांवर व्हायरल होणारे हे दावे तज्ज्ञांनी फेटाळून लावले होते. अशा बिनबुडांच्या दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसून हे सर्व गैरसमज आणि अफवा असल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. करोनाचे लसीकरण होऊन काही वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर रविवारी हा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यावर त्यांना आलेल्या अनुभवाबद्दलची पोस्ट समाजमाध्यमांवर शेअर केली.

आणखी वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी धोक्याची घंटा? कट्टर समर्थकाचा निवडणुकीत पराभव; हंगेरीत सत्तांतर कशामुळे?

एलॉन मस्क यांचा नेमका दावा काय?

मस्क यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, करोनाची लस उपलब्ध होण्यापूर्वी त्यांना वुहान व्हायरसचा संसर्ग झाला होता. त्याची लक्षणे साधारण खोकला आणि सर्दी-तापासारखी होती. लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर प्रकृती प्रचंड खालावल्याने मला तातडीने रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते, त्यावेळी माझा जीव जातो की काय असे मला वाटत होते. इतका गंभीर दावा समोर येऊनही मुख्य प्रवाहातील बातम्यांमध्ये याला स्थान का दिले गेले नाही, याबद्दल मस्क यांनी आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, करोनाच्या लसींबाबत शंका व्यक्त करण्याची मस्क यांची ही काही पहिलीच वेळ नाही. २०२० मध्ये करोनाचा प्रसार रोखण्यासाठी विविध देशांनी लावलेल्या टाळेबंदीला मस्क यांनी विरोध केला होता. २०२३ मध्ये प्रसिद्ध बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स यांच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मस्क यांनी कोणताही पुरावा नसताना त्याचा संबंध करोना लसीशी जोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी करोनाच्या लसीकरणाला जबाबदार धरू शकत नाही; पण याचा अर्थ असा नाही की, त्यात लसीचा कोणताही वाटा नाही, अशी पोस्ट मस्क यांनी केली होती. त्याच वर्षी मस्क यांनी पुन्हा दावा केला की, लसीचा डोस घेतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. मला प्रवासासाठी लसीचे तीन डोस घ्यावे लागले आणि तिसऱ्या डोसनंतर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली होती, असे ते म्हणाले होते.

माजी वैज्ञानिकाच्या दाव्यामुळे खळबळ का उडाली?

जर्मनीमध्ये संसदीय चौकशीदरम्यान एका माजी औषधतज्ज्ञाने करोना लसींशी संबंधित मृत्यूंबाबत गंभीर दावे केले. १९ मार्च २०२६ रोजी ‘फायझर’ या अमेरिकन कंपनीच्या युरोपियन केंद्राचे माजी अधिकारी डॉ. हेल्मुट स्टर्झ यांनी जर्मन संसदेच्या करोनाच्या चौकशी आयोगासमोर साक्ष दिली. त्यांच्या मते, करोना काळात राबवण्यात आलेल्या लसीकरणाचा वेग अवाजवी होती. मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू करण्यापूर्वी कर्करोग निर्माण होण्याच्या संभाव्यतेसारख्या दीर्घकालीन जोखीम चाचण्या पूर्ण केल्या गेल्या नव्हत्या. त्याशिवाय करोनाची लस बाजारात आणण्यापूर्वी १० आवश्यक ‘प्री-क्लिनिकल’ सुरक्षा चाचण्या करण्यात आल्या नव्हत्या, असा दावाही डॉ. हेल्मुट स्टर्झ यांनी केला. त्याचवेळी जर्मनीतील मृत्यूंच्या आकड्यांबाबतही त्यांनी भाष्य केले. करोनामुळे दोन हजार १३३ लोकांचा मृत्यू झाल्याचे जर्मन सरकारच्या आकडेवारीत नमूद आहे. मात्र, डॉ. हेल्मुट यांनी हा आकडा तब्बल ६३ हजार ९९० इतका असण्याचा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे, जर्मनीचे आरोग्य मंत्री कार्ल लाउटरबॅच यांनी डॉ. स्टर्झ यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. या प्रकरणामुळे समाजमाध्यमांवर करोनाच्या लसींच्या पारदर्शकतेबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : नेतान्याहूंच्या एका फोनमुळे अमेरिका-इराणमधील चर्चा फिसकटली? पाकिस्तानमधील बैठकीत काय घडलं?

६० हजार मृत्यूंच्या दाव्यात कितपत तथ्य?

जर्मनीत करोना लसीमुळे ६३ हजार ९९० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा डॉ. हेल्मुट स्टर्झ यांनी केला. मात्र, संशोधकांनी या दाव्याची सखोल पडताळणी केल्यानंतर हे आकडे वैयक्तिक तर्कावर आधारित असल्याचे समोर आले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या रिपोर्टिंग सिस्टीमसाठी काढण्यात आलेले निकष थेट जर्मनीवर लागू करणे चुकीचे आहे. जर्मनीची आरोग्य रचना आणि माहिती नोंदवण्याची पद्धत अमेरिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, त्यामुळे करोनाच्या लसीकरणामुळे ६०,००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा मस्क यांचा दावा खोटा असून त्याला कोणत्याही अधिकृत वैज्ञानिक संशोधनाचा आधार नाही. द लॅन्सेटच्या आकडेवारीनुसार, पश्चिम युरोपमध्ये करोनाच्या लसीकरणाचे प्रमाण जास्त असल्याने तिथे मृत्यूदरही कमी असल्याचे दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही करोनाची लस सुरक्षित असल्याचे सांगत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.