Elon Musk Slams India Satcom Oligarchs : एलॉन मस्क यांच्या कंपनीची भारतातील इंटरनेट बाजारपेठेत एन्ट्री होण्याआधीच मोठी खळबळ उडाली आहे. भारतात ‘स्टारलिंक’ची सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक परवाने मिळूनही अंतिम मंजुरी अद्याप रखडली आहे. यावरून मस्क यांनी थेट भारतातील काही ‘ओलिगार्क्स’ म्हणजेच प्रभावशाली धनदांडग्यांवर निशाणा साधला आहे. स्टारलिंकला जाणीवपूर्वक रोखून मक्तेदारी टिकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मस्क यांनी केला. तर हा ‘भारताच्या जनतेविरोधातील गुन्हा’ असल्याचेही त्यांनी म्हटले.
मस्क यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहित काही प्रभावशाली उद्योगपती स्टारलिंकचा मार्ग रोखत असल्याचा थेट आरोप केला. भारतीय इंटरनेट बाजारपेठेत मक्तेदारी कायम ठेवण्यासाठी धनदांडग्यांकडून हे अडथळे निर्माण केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, मस्क यांनी या धनदांडग्यांची नावे स्पष्ट केलेली नाहीत. “भारतात ज्यांना सध्याचे इंटरनेटचे दर परवडत नाहीत किंवा ज्यांच्याकडे अजिबात इंटरनेट कनेक्शन नाही, अशा लोकांसाठी स्टारलिंकमुळे उच्च-वेगवान (हाय-स्पीड) आणि परवडणारे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध होऊ शकेल,” असे त्यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले.
मस्क यांच्या या आरोपांवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवांसाठी भारतात निष्पक्ष आणि कोणताही भेदभाव न करणारी नियामक व्यवस्था आहे, असे सरकारने म्हटले. त्यामुळे स्टारलिंकच्या बाजारातील एन्ट्रीला ब्रेक का लागला आणि मस्क यांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरतोय.
केंद्राच्या दूरसंचार मंत्रालयाने मस्क यांच्या आरोपांना उत्तर देताना म्हटले, सॅटेलाइट कम्युनिकेशनसह सर्व दूरसंचार सेवांसाठी भारताने निष्पक्ष आणि भेदभावरहित परवानगी व्यवस्था तयार केली आहे. सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवा सुरू करण्यासाठी सध्या तीन ग्लोबल मोबाईल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट (GMPCA) कंपन्यांना परवाने देण्यात आले आहेत. या कंपन्यांना सेवा सुरू करण्यापूर्वी सुरक्षेशी संबंधित सर्व अटींची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे. वापरकर्त्यांची सुरक्षितता आणि त्यांच्या डेटाचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया ठेवण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.
मंत्रालयाच्या माहितीनुसार, तिन्ही परवानाधारक कंपन्यांची सुरक्षा तपासणी सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अशा कंपन्यांना स्पेक्ट्रम वाटपासाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, तिन्ही कंपन्या सध्या एकाच नियामक टप्प्यावर आहेत, असा दावा मंत्रालयाने केला. त्यामुळे भारतातील नियामक व्यवस्था कोणत्याही कंपनीला लक्ष्य करत नाही, मस्क यांचे आरोप “निराधार आणि गैरसमजावर आधारित” असल्याचे म्हणत मंत्रालयाने ते फेटाळले आहेत.
भारतात इंटरनेट सेवांसाठी लागू असलेल्या नियामक अटींमुळे भारतात स्टारलिंकची सेवा सुरू होण्यास विलंब होत असल्याचे म्हटले जाते. मात्र स्टारलिंकने नमूद केले की, भारताच्या सुरक्षा आणि नियामक गरजा लक्षात घेऊन कंपनीच्या सेवांची रचना केली आहे. याच पार्श्वभूमीवर मस्क यांचे हे वक्तव्य समोर आले.
बुधवारी पार पडलेल्या ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’ मध्ये स्पेसएक्सच्या स्टारलिंक बिझनेस ऑपरेशन्सच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर यांनी सांगितले की, भारतातील सुरक्षा नियम आणि इतर नियामक अटी लक्षात घेऊन स्टारलिंकची संपूर्ण कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. भारतासाठी प्रत्येक स्तरावर आवश्यक सुरक्षा नियंत्रणांची व्यवस्था करण्यात आली असून, भारतीय वापरकर्त्यांचा डेटा भारतातच ठेवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“भारत आम्हाला संधी देण्यासाठी तयार असेल, त्या क्षणापासून आम्हीही सेवा सुरू करण्यासाठी सज्ज आहोत. यासाठी सरकार, दूरसंचार कंपन्या आणि या क्षेत्रातील इतर भागीदारांसोबत काम करण्याची आमची तयारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला १०० टक्के इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही आम्ही मदत करू,” असेही लॉरेन ड्रेयर यांनी नमूद केले.
सॅटेलाइट कम्युनिकेशन नेमकं कसं काम करतं?
सॅटेलाइट कम्युनिकेशनमध्ये पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अनेक उपग्रहांच्या माध्यमातून जमिनीवरील लोकांपर्यंत आणि व्यवसायांपर्यंत इंटरनेट कनेक्टिव्हिटी पोहोचवली जाते. केबल, फायबर किंवा डिजिटल सब्स्क्रायबर लाइनसारख्या जमिनीवरील संचार प्रणाली म्हणजेच ‘टेरिस्ट्रियल’ नेटवर्कपेक्षा ही वेगळी व्यवस्था आहे. सॅटेलाईट कम्युनिकेशन मध्ये डेटा पोहोचवण्यासाठी थेट वायरची गरज नसते.
स्टारलिंक ही जगातील सर्वात मोठी उपग्रह प्रणाली (सॅटेलाइट कॉन्स्टलेशन) चालवते; सध्या पृथ्वीच्या कक्षेत त्यांचे तब्बल ७,००० हून अधिक उपग्रह कार्यरत आहेत. त्यामुळे दुर्गम किंवा नेटवर्क पोहोचणे कठीण असलेल्या भागांमध्येही इंटरनेट सेवा देण्याची क्षमता स्टारलिंककडे आहे.
स्टारलिंकच्या भारतातील लॉन्चला विलंब का होतोय?
भारतात सॅटेलाइट कम्युनिकेशन सेवा सुरू करण्यासाठी स्टारलिंकला आवश्यक असलेल्या GMPCS (ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट) परवान्यासह इतर नियामक मंजुरी मिळाल्या आहेत. या क्षेत्रात स्टारलिंकसोबत भारती समूहाचा पाठिंबा असणारी यूटेलसॅट वनवेब आणि जिओ सॅटेलाइट कम्युनिकेशन्स लिमिटेड या कंपन्यांनाही परवाने मिळाले आहेत. अमेझॉनचे जेफ बेझोस यांच्या मालकीची अमेझॉन लिओ कंपनीही भारतात परवाना मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.
स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यासाठी गेल्या वर्षी जुलैमध्ये आणखी एक नियामक मंजुरी मिळाली. इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायझेशन सेंटरने (IN-SPACe) स्टारलिंकच्या सॅटेलाइट समूहाला ही परवानगी दिली होती. उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या मते, केंद्राने स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली प्रमुख नियामक मंजुरी दिली होती. त्याआधी दूरसंचार विभागाने (DoT) कंपनीला ऑपरेटर परवानाही दिला होता. विशेष म्हणजे, स्टारलिंकने या परवान्यासाठी पहिल्यांदा अर्ज केल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी हा परवाना मिळाला होता.
अंतिम मंजुरी का रखडली?
नियामक पातळीवरील महत्त्वाच्या मंजुरी मिळाल्यानंतरही स्टारलिंकला भारतात प्रत्यक्ष सेवा सुरू करण्यासाठी सरकारने हिरवा कंदील दिलेला नाही. सुरक्षेच्या कारणास्तव ही मंजुरी रखडल्याचे सांगितले जाते. परदेशी कंपन्या भारतातील अधिकृत गेटवे यंत्रणेला डावलून थेट इंटरनेट सेवा पुरवतील आणि सरकारचे यावर नियंत्रण राहणार नाही, अशी भीती प्रशासनाला वाटत आहे.
सॅटेलाइट कम्युनिकेशनच्या भाषेत ‘इंडियन गेटवे’ म्हणजे भारतातील जमिनीवर उभारलेली उपग्रह भू-केंद्रे (अर्थ स्टेशन), जी अंतराळातील उपग्रह आणि देशातील टेलिफोन-इंटरनेट नेटवर्क यांना जोडण्याचे काम करतात. नियमानुसार, भारतातील सर्व इंटरनेट आणि फोन डेटा या स्थानिक भू-केंद्रांमधूनच पुढे पाठवला जातो.
रिलायन्स जिओ भारतात स्वतःचे १,६०० ते १,६५० उपग्रहांचे नेटवर्क उभारण्याच्या तयारीत असून, यासाठी तब्बल १० ते १५ अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे स्टारलिंकला अंतिम मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जाते.
