ब्लॅक टायगर अथवा काळा पट्टेरी वाघ हा बंगाल टायगर प्रजातीचाच एक दुर्मीळ आणि रहस्यमय असा प्रकार आहे. या प्रकारचा वाघ हा फक्त भारतातील ओडिशा राज्यामधील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पामध्येच आढळतो. मात्र, त्याचे अस्तित्व इतरत्र कुठेच नसून फक्त याच व्याघ्र प्रकल्पात का आहे, याबाबत शास्त्रज्ञ आणि वन्यजीवप्रेमींना खूपच कुतूहल आहे. सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प हा ओडिशामधील मयूरभंज जिल्ह्यामध्ये असून, तो २,७५० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. हा व्याघ्र प्रकल्प मोठ्या सिमिलीपाल बायोस्फीअर रिझर्व्हचा एक भाग आहे. या परिसरामध्ये मुबलक प्रमाणात सिमुल वृक्ष आढळून येतात. याच सिमुल वृक्षाच्या नावावरून या राखीव व्याघ्र प्रकल्पाला सिमिलीपाल, असे नाव देण्यात आले आहे. बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस (NCBS)च्या संशोधकांनी या भागातच काळ्या रंगाचे वाघ का आढळून येतात, याबाबत बारकाईने अभ्यास केला आहे. त्यांना असे आढळून आले आहे की, ट्रान्समेम्ब्रेन एमिनोपेप्टिडेस क्यू (टाकपेप) या जनुकातील एकाच बदलामधून (उत्परिवर्तन) वेगळा रंग अथवा एखादा वेगळा नमुना तयार होतो. हेही वाचा : उडत्या कबुतराचा वेध घेणे, ते पाण्यात स्थिर राहणे; ऑलिम्पिकमधील खेळप्रकार जे आता झालेत इतिहासजमा अशा प्रकारे त्वचेवर काळा रंग जमा होण्याच्या प्रक्रियेला 'मेलानिझम', असे म्हणतात. मात्र, इथे वाघाचा रंग पूर्णत: काळा नसून पट्टेरी काळा वाघ दिसून येतो. यालाच स्युडो-मेलानिझम म्हणजेच मेलानिझमसदृश प्रक्रिया घडलेली दिसून येते. त्यामुळे वाघाच्या शरीरावरील पट्टे दाट आणि एकमेकांच्या जवळ असल्याचे दिसून येते. त्यामुळे लांबून हा वाघ पूर्णपणे काळ्या रंगामध्ये अथवा एखाद्या आवरणामध्ये दिसतो. त्यामुळेच वाघाचा हा प्रकार अत्यंत दुर्मीळ आहे आणि असे काही दुर्मीळ वाघ सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पामध्येच आढळून येतात. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस सिमिलीपालमध्ये काळा वाघ सर्वांत आधी आढळून आला होता. तेव्हापासून या प्रकारचे अनेक वाघ सिमिलीपालमध्ये दिसून आले आहेत. मात्र, या व्याघ्र प्रकल्पामध्ये अशा दुर्मीळ काळ्या रंगाच्या वाघाची संख्या किती आहे, याबाबतची अधिकृत आकडेवारी अद्याप तरी उपलब्ध नाही. २०२२ पासून सांगायचे झाले, तर अंदाजे १६ वाघांचा अधिवास या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे आणि त्यातील साधारण १० वाघ हे या दुर्मीळ प्रकारात मोडणारे असून, त्यांचा रंग काळा आहे. या व्याघ्र प्रकल्पातील घनदाट वनराईच्या पार्श्वभूमीवर या वाघांचा रंग चटकन ओळखता न येण्याजोगा आहे. त्यामुळे या वाघांची संख्या नेमकी किती आहे, याची गणना करणे अद्याप शक्य झालेले नाही. सिमिलीपालमध्ये अशा प्रकारचे दुर्मीळ काळे वाघ का आहेत, याचा शोध घेतला असता, तिथली अद्वितीय अशी परिसंस्थाच या काळ्या वाघांच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत ठरली असल्याचे प्रथमदर्शनी समोर येते. कारण- या व्याघ्र प्रकल्पामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी आढळून येतात. तिथे वनस्पतींच्या जवळपास १०७६ आणि सस्तन प्राण्यांच्या ५५ प्रजाती आहेत. त्याबरोबरच पक्ष्यांच्या ३०४ प्रजाती आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ६० प्रजाती आहेत. हा वन प्रदेश अत्यंत घनदाट असल्याने वाघांसाठी तो उत्तम अधिवास ठरतो. या व्याघ्र प्रकल्पाचा प्रदेश अत्यंत डोंगराळ असून, ठिकठिकाणी जलसाठेही आहेत. त्यामुळेही हा अधिवास वाघांसाठी उत्तम आणि अनुकूल ठरतो. या व्याघ्र प्रकल्पामध्ये हरीण, रानडुक्कर व गवे यांचे प्रमाणही भरपूर असल्याने वाघांसाठी येथे मुबलक प्रमाणात शिकार उपलब्ध आहे. विशेषत: 'इनब्रीडिंग'मुळे होणाऱ्या आनुवंशिक बदलांमुळेच काळ्या वाघांची निर्मिती होते. इनब्रीडिंग म्हणजे जवळच्या नात्यातील प्राण्यापासून होणारी प्रजोत्पत्ती होय. भारतातील इतर व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत सिमिलीपालमधील वाघांची संख्या कमी आहे आणि या कमी लोकसंख्येमध्येच वाघांची प्रजोत्पत्ती होत असल्याने इनब्रीडिंग मोठ्या प्रमाणावर घडताना दिसते. इनब्रीडिंगच्या प्रक्रियेमुळेच जनुकांमध्ये 'स्युडो-मेलनिझम' अर्थात मेलनिझमसदृश दुर्मीळ बदल (उत्परिवर्तन) घडताना दिसतात. मात्र, पर्यावरणवादी लोकांना या दुर्मीळ वाघांचे अस्तित्व टिकून राहण्याविषयी फारच चिंता वाटते. कारण- अशा प्रकारच्या इनब्रीडिंग प्रजननामुळे जनुकीय विविधता कमी होऊ शकते आणि त्यामुळे विविध प्रकारच्या आजारांचा धोकाही वाढू शकतो. हेही वाचा : तब्बल ४० वर्षांनी पुन्हा गगनभरारी घेणार भारतीय व्यक्ती; कोण आहेत शुभांशू शुक्ला? ओडिशाच्या वन विभागाने सिमिलीपालमधील वाघांच्या संरक्षणासाठी अनेक पावले उचलली आहेत. संरक्षणासाठीच्या या प्रयत्नांमध्ये ते स्थानिक समुदायांनाही सहभागी करून घेत आहेत. वाघांचा अधिवास पुन्हा निर्माण करणे, वाघांची शिकार होऊ नये यासाठी गस्त घालणे इत्यादी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. सध्या ओडिशा सरकारने या व्याघ्र प्रकल्पामध्ये नव्या सफारीचीही घोषणा केली आहे. ही जगातील पहिली मेलॅनिस्टिक (ब्लॅक) टायगर सफारी असेल. ही व्याघ्र सफारी मयूरभंज जिल्ह्यातील बारीपाडाजवळ सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पाजवळ असेल. या सफारीमधून २०० हेक्टरचा परिसर फिरवून दाखवला जाईल. २०२४ च्या अखेरीपासून ही सफारी सुरू होण्याची शक्यता आहे. वन्यजीव पर्यटनाला चालना देणे हे या सफारीचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून पर्यटकांना या दुर्मीळ काळ्या वाघांना जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे. सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पातील काळ्या वाघाचा अधिवास हे समृद्ध जैवविविधतेचे प्रतीक आहे. शास्त्रज्ञ या दुर्मीळ वाघांचा अभ्यास करीत आहेत. त्यांच्या अशा अद्वितीय दिसण्यामागे आणखी कोणते आनुवंंशिक घटक कारणीभूत आहेत का, याचा शोध ते घेत आहेत. या वाघांच्या संरक्षणासाठी अधिकाधिक प्रयत्न करण्यासाठी ते सातत्याने धडपड करीत आहेत.