‘संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य’ (जेईई-मेन) काय आहे?

देशातील आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी अशा केंद्रीय संस्थांतील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई मुख्य परीक्षा घेतली जाते. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणामार्फत या परीक्षेचे जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रांमध्ये आयोजन केले जाते. दोन्ही सत्रांतील परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्याही एका सत्रातील परीक्षेतील सर्वाधिक गुण ग्राह्य धरले जातात. जेईई मुख्य परीक्षेतील निवडक विद्यार्थी ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ या परीक्षेसाठी पात्र ठरवले जातात. तसेच देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील अखिल भारतीय १५ टक्के कोट्यातील जागांसाठीही जेईई मुख्य परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी होतो.

‘जेईई मुख्य’ परीक्षेची नोंदणी कशी वाढली?

२०१७ ते २०२६ या काळातील ‘जेईई मुख्य’ परीक्षेच्या दोन्ही सत्रांतील नोंदणीची आकडेवारी पाहता करोनानंतरच्या काळात नोंदणीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येते. २०१७ मध्ये ९.५६ लाख, २०१८ मध्ये १०.४३ लाख, २०१९ मध्ये ११.४७ लाख, २०२० मध्ये १०.२३ लाख, तर २०२१ मध्ये ९.३९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र, महासाथीनंतरच्या काळात २०२२ मध्ये १०.२६ लाख, २०२३ मध्ये ११.६२ लाख, २०२४ मध्ये १४.७६ लाख, २०२५ मध्ये १५.३९ लाख, तर यंदा २०२६ मध्ये १६.०४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर ‘जेईई ॲडव्हान्स्ड’साठी पात्र विद्यार्थ्यांची संख्या सुमारे एक लाख ६० हजार ते एक लाख ९० हजार या दरम्यान राहिल्याचे दिसून येते.

अभियांत्रिकी पदवीकडे ओढा कायम का आहे?

‘पूर्वी बारावीला जे महत्त्व होते, तेच आता अभियांत्रिकी पदवीला आले आहे. ही पदवी मिळवल्यावर एमबीए, स्पर्धा परीक्षा किंवा अन्य काहीही करता येते, असा विचार विद्यार्थी, पालक करतात. करिअरचे वेगळे पर्याय विद्यार्थी, पालकांना सांगूनही ते त्यांना पटत नाहीत. त्यामुळे बहुसंख्याकांचा ओढा अभियांत्रिकीकडेच असल्याचे दिसते,’ असे करिअर समुपदेशक डॉ. भूषण केळकर सांगतात. ‘जेईई-मुख्य परीक्षेची वाढती नोंदणी ही सूज आहे. एक तर अभियांत्रिकी पदवीचे आता सुमारीकरण झाले आहे. त्यातून ‘एआय’चा सर्वच क्षेत्रांवर किती व्यापक परिणाम होणार आहे, याचा अंदाज विद्यार्थी, पालकांना आलेला नाही,’ असेही त्यांचे म्हणणे आहे. अभियांत्रिकी शाखेच्या स्पर्धा परीक्षांचे तज्ज्ञ मार्गदर्शक दुर्गेश मंगेशकर सांगतात, ‘माहिती तंत्रज्ञानातील नोकर्‍या ‘एआय’मुळे कमी होत असल्या, तरी रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, मेकॅनिकल, इले्ट्रिरकलची मागणी वाढत आहे. तसेच, आयआयटीच्या वाढलेल्या जागा, एनआयटी, आयआयआयटीमध्ये असलेल्या संधी हीसुद्धा काही कारणे आहेत. शिवाय, ‘जेईई मुख्य परीक्षेची तयारी अन्य प्रवेश परीक्षांसाठीही उपयोगी ठरते. अस्थिर जागतिक परिस्थिती, व्हिसा निर्बंधांसारख्या कारणांनी परदेशात जाण्याचेही प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे जेईई मुख्य परीक्षेची नोंदणी वाढत असल्याचे दिसते.

कॅम्पस प्लेसमेंटची स्थिती काय काय?

उच्च शिक्षणातील अन्य शाखांच्या तुलनेत अभियांत्रिकी पदवीधरांना अधिक संधी आहे. एआयमुळे काही नोकर्‍या कमी होत असल्या, तरी नव्या नोकर्‍याही निर्माण होत आहेत. नोकर्‍या कमी होण्यामागे कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा गेल्या काही वर्षांतील बदलती भूराजकीय स्थिती, युद्ध अशा घटकांचा जास्त परिणाम आहे, असे निरीक्षण महाराष्ट्र ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी नोंदवले. याआधी प्लेसमेंटचे प्रमाण सरासरी ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत होते. ते सध्या ७०-७५ टक्क्यांपर्यंत आले आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्लेसमेंट सरासरी ५० ते ६० टक्के आहे, नामांकित महाविद्यालयांत ती ८०-८५ टक्क्यांपर्यंतही आहे. शिकतानाच कौशल्ये विकसित करणार्‍या विद्यार्थ्यांना जास्त पटकन नोकरीच्या संधी मिळतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हा कल भविष्यातही कायम राहणार?

अभियांत्रिकीचे वलय लोप पावण्याची सध्या तरी शक्यता नाही, असे तज्ज्ञ सांगतात. मेकॅनिकल, इले्ट्रिरकलसारख्या मूलभूत शाखांचे महत्त्व टिकून आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातील उपविषय निवडण्याच्या तरतुदींमुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीच्या काळातच अर्थशास्त्र, मानसशास्त्र असे विषय शिकता येत आहेत. त्यामुळे येत्या काळात अभियांत्रिकी शिक्षणाचे स्वरूपच बदलू शकते. झटपट पैसा मिळवण्यासाठी अभियांत्रिकीशिवाय दुसरे क्षेत्र नाही, असे विद्यार्थ्यांना वाटते. मात्र, ‘एआय’मुळे परिस्थिती झपाट्याने बदलते आहे. नोकर भरतीची नेमकी आकडेवारी जाहीर होत नाही. कोट्यवधींचे पॅकेज मोजक्यांना मिळते. त्यामुळे बदलत्या परिस्थितीची पालक, विद्यार्थ्यांना जाणीव व्हायला दोन ते तीन वर्षे लागतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.