इंग्लंडमधील जगप्रसिद्ध असे ‘सिकामोअर गॅप’ हे झाड कापण्यात आले आहे. हे झाड साधारण ३०० वर्षे जुने होते. एका अल्पवयीन मुलाने ते कापले असून त्याने हे कृत्य नेमके का केले? हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. या झाडासोबत जगातील लाखो लोकांच्या आठवणी आहेत. मात्र एका रात्रीत हे झाड कापण्यात आल्यामुळे जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर या झाडाला एवढे महत्त्व का होते? हे जाणून घेऊ या..
दोन डोंगरांमध्ये होते ऐतिहासिक झाड
सिकामोअर गॅप हे झाड कापल्याप्रकरणी इंग्लंडच्या पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला २८ सप्टेंबर रोजी अटक केली आहे. सिकामोअर गॅप नावाने ओळखले जाणारे हे झाड दोन डोंगरांच्या माध्ये होते. उत्तर इंग्लंडमधील नॉर्थम्बरलँडमध्ये इंग्लंड आणि स्कॉटलंड या दोन देशांदरम्यान सीमेजवळ एक दगडी ऐतिहासिक भिंत आहे. या भिंतीला ‘हॅड्रियन वॉल’ असे म्हणतात. याच हॅड्रियन वॉलजवळ दोन डोंगरांच्या मध्ये हे झाड होते. इंग्लंडमध्ये ऐतिहासिक आणि नैसर्गिक महत्त्व असलेल्या वास्तूंचे सरंक्षण करण्याची जबाबदारी ‘द नॅशनल ट्रस्ट’ या संस्थेवर आहे. या संस्थेने झाड तोडल्याचे वृत्त खरे असल्याचे सांगितले.




नॉर्थ ऑफ टायनच्या मेयरने व्यक्त केले दु:ख
या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नॉर्थ ऑफ टायन या प्रदेशाचे मेयर असलेल्या जेमी ड्रिस्कॉल यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “या झाडासोबत अनेक लोकांच्या आठवणी होत्या. याच झाडाजवळ आतापर्यंत अनेकांनी आपल्या प्रियकर, प्रेयसीला प्रपोज केलेले आहे. अनेकांनी आपल्या परिवारासोबत येथे क्षण घालवलेले होते. मीदेखील माझी पत्नी, मुलांसोबत येथे फिरायला आलो होतो. हे झाड तोडणाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे,” अशा भावना जेमी यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) व्यक्त केल्या आहेत.
सर्वाधिक लोकांनी फोटो काढलेले ठिकाण
हॅड्रियन वॉलजवळ असलेल्या सिकामोअर गॅप या झाडाजवळ आतापर्यंत अनेकांनी फोटो काढलेले आहेत. हे झाड नॉर्थम्बरलँड नॅशनल पार्कमधील सर्वाधिक लोकांनी फोटो काढलेले ठिकाण म्हणून ओळखले जाते. हे झाड १९९१ सालच्या प्रसिद्ध अशा ‘रॉबिन हूड: प्रिन्स ऑफ थिव्स’ या चित्रपटातही दाखवण्यात आले होते. हे झाड तोडल्यामुळे इंग्लंडचे सांस्कृतिक नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सिकामोअर झाडाचा उगम काय?
सिकामोअर झाड हे साधारण ३५ मीटर उंचीपर्यंत वाढू शकते. विशेष म्हणजे हे झाड ४०० वर्षांपर्यंत जगू शकते. हे झाड विशेषत: ब्रिटनमध्ये आढळते. त्याची पाने मॅलप झाडासारखीच दिसतात. साधारण १५०० साली सिकामोअर जातीची ही झाडे मूळच्या रोमन लोकांनी ब्रिटनमध्ये लावल्याचे म्हटले जाते. पुढे ही झाडे ब्रिटनच्या अनेक भागांत लावण्यात आली. परिणामी १८०० सालाच्या माध्यमापर्यंत झाडाची सिकामोअर ही प्रजाती ब्रिटनमध्ये सामान्य बाब बनली. या झाडाच्या प्रजननाची क्षमता खूप आहे. याच कारणामुळे ती लवकर वाढतात.
कोरीव काम करण्यासाठी झाडाच्या लाकडाचा वापर
या झाडामुळे इतर झाडांच्या वाढीवरही परिणाम झाला होता. सिकामोअर झाडाचे खोड हे टणक आणि मजबूत असते. याच कारणामुळे लाकडावर कोरीव काम करण्यासठी या झाडापासून मिळणाऱ्या लाकडाचा उपयोग केला जातो. वेल्समध्ये आकर्षक चमचे तयार करण्यासाठीही या झाडाच्या लाकडाचाच वापर केला जातो. अशा प्रकारच्या चमचांना ‘लव्ह स्पुन’ म्हटले जाते.
हॅड्रियन वॉलच्या अगदी जवळ होते झाड
‘फ्रंटियर्स ऑफ द रोमन एम्पायर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या भिंतीचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश केलेला आहे. हॅड्रियन वॉल याच फ्रंटियर्स ऑफ द रोमन एम्पायरचा एक भाग आहे. सिकामोअर गॅप हे झाड हॅड्रियन वॉलच्या अगदी जवळ होते. फ्रंटियर्स ऑफ द रोमन एम्पायर हे वारसास्थळ ब्रिटनपासून ते जर्मनीपर्यंत विस्तारलेले आहे.
पोलिसांचे मत काय?
या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. हे झाड मुद्दामहून कोणीतरी तोडले आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी या परिसरातील लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. या घटनेसंदर्भात तुम्ही काही पाहिले असेल, तुम्हाला काही माहिती असेल तर तत्काळ आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन येथील पोलिसांनी केले आहे. अटक केलेल्या अल्पवयीन मुलाची सध्या चौकशी सुरू आहे.