‘ईपीएफओ’ मधील योगदानासाठी वेतनमर्यादा १५ हजारांवरून २५ हजार रु. करण्याचे स्वागत होत असले तरी, संबंधित कर्मचार्यांचा पुढला काळ कसा असेल?
केंद्रीय मंत्रिमंडळाचा ताजा निर्णय काय?
संघटित आणि औपचारिक क्षेत्रातील कर्मचार्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवणार्या ‘कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)’कडे नोंदणीकृत देशातील आठ कोटी पगारदारांच्या भवितव्याच्या दृष्टीने तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या पगारदारांसाठी ‘कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (ईपीएफ)’ हा सेवानिवृत्तीनंतरच्या एकमेव विश्वासू आधार आहे. यासाठी संपूर्ण सेवाकाळात कर्मचारी व कंपनी ईपीएफमध्ये नियमित योगदान देतात. या योगदानासाठी निर्धारित वैधानिक वेतनमर्यादा ही १५ हजार रुपयांवरून, २५ हजार रुपये करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी ताबडतोब म्हणजे १७ सप्टेंबरपासून सुरूही झाल्याने, ऑक्टोबरच्या सुरुवातीस कर्मचार्यांहाती पडणार्या मासिक वेतनांत या बदलाचे परिणाम दिसून येतील.
वैधानिक वेतन मर्यादेत वाढीचा अर्थ काय?
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीच्या (ईपीएफ) मासिक वेतनमर्यादेत तब्बल १२ वर्षानंतर हा बदल झाला आहे. या आधी १ सप्टेंबर २०१४ मध्ये ती मर्यादा ६,५०० रु.वरून १५ हजार रु. करण्यात आली होती. ‘ईपीएफओ’च्या कक्षेत येणार्या कंपनीत नोकरीत रुजू होताना कर्मचार्याचे मूळ वेतन अधिक महागाई भत्ता हा १५ हजार रुपयांपर्यंत असल्यास अशा कर्मचार्यांना ‘पीएफ’ लागू करणे बंधनकारक होते. आता ही वेतन मर्यादा २५ हजार रुपयांवर गेली आहे. त्यामुळे कर्मचारी आणि नियोक्ता (कंपनी) दोघांकडूनही त्या कर्मचार्याच्या वेतनाच्या १२ टक्के रक्कम दरमहा ‘पीएफ’ म्हणून जमा केली जाईल, त्यावर सरकारकडून दरवर्षी ठरावीक प्रमाणात व्याज दिले जाईल.
नवीन नियमातून काय बदलेल?
वैधानिक वेतमर्यादेचा आकडा २५ हजार रुपये ठरविला जाण्यामागे कोणताही तार्किक आडाखा अथवा व्यावहारिक निकष नाही. मात्र बदललेले जीवनमान आणि किमान वेतनाचा वाढलेला स्तर गाठण्यासाठी त्यात वाढ झाली आहे. आज अकुशल/रोजंदारी मजुरांचे किमान वेतनही मासिक १५ हजार रु.पेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे १५ हजार रु.पेक्षा अधिक वेतन घेणारे जे कर्मचारी पूर्वी ‘पीएफ’पासून वंचित होते, ते आता अनिवार्य कक्षेत येणार. देशातील ५१ लाखांहून अधिक औपचारिक कामगारांना सामाजिक सुरक्षा छत्र देणे त्यामुळे शक्य बनले आहे. तथापि ‘ईपीएफ ३.०’मधील तरतुदीनुसार २५ हजार रु.पेक्षा जास्त वेतन असणार्या कर्मचार्यांची ऐच्छिक पीएफ योगदानाची सवलत आता दरमहा १,८०० रु. वरून, तीन हजार रु.वर गेली आहे. अर्थात २५ हजार रुपयांपुढील रकमेवर म्हणजेच पूर्ण वेतनावर पीएफ कापायचा की केवळ तीन हजार रुपये मर्यादेपर्यंत हा पर्यायही कायम आहे. तो निर्णय कर्मचारी आणि नियोक्ता परस्पर संमतीने घेऊ शकतील.
कंपन्यांचा वेतन-खर्च खरेच वाढेल?
पात्र वेतनमर्यादा २५ हजार रुपयांपर्यंत वाढल्याने, त्यानुरूप पीएफ अंशदानही वाढणे अपेक्षित आहे. यातून कंपन्यांचे आर्थिक दायित्व अर्थात वेतनखर्च जवळपास ५ ते ८ टक्के वाढण्याचा अंदाज आहे. पूर्वीच्या १५ हजारांवर कंपनीचे १२ टक्के या दराने योगदान १,८०० रुपये होते, ते आता २५ हजारांपर्यंत वाढलेल्या मर्यादेत तीन हजार रु.वर जाईल. म्हणजे प्रति कर्मचारी कंपनीचा पीएफ/ पेन्शन खर्च दरमहा १,२०० रुपयांनी (वार्षिक १४,४०० रुपये) वाढेल. श्रम-केंद्रित आणि ज्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार १५ हजार ते २५ हजार रुपयांच्या वेतनश्रेणीत आहेत अशा वस्त्रोद्योग, छोटे-मध्यम उत्पादन, सुरक्षा सेवा, लॉजिस्टिक वगैरे मुख्यत्वे ‘एमएसएमई’ श्रेणीतील कंपन्यांना याचा अधिक फटका बसेल. तथापि, बहुतांश बड्या कंपन्यांमध्ये कंपनीचा पीएफ हिस्सा कर्मचार्याच्या ‘कॉस्ट टू कंपनी’ (सीटीसी) वेतन कराराचाच भाग असतो. अशा ठिकाणी कंपन्यांचा खर्च वाढणार नाही, तर ते कर्मचार्याच्या ‘सीटीसी’मधील इतर भत्ते कमी करून हा १,२०० रुपयांचा भार कर्मचार्याच्या वेतनावरच टाकतील. याचा अर्थ कर्मचार्यांच्या मासिक वेतनाला तूर्त कात्री लागलेली दिसेल, जी अर्थातच दरमहा १,२०० रुपये वा अधिक असेल. मात्र भविष्याच्या दृष्टीने त्यांची तजवीज मात्र निश्चितच वाढेल.
सरकारचा खर्च किती व कसा वाढेल?
नव्या नियमानुसार, केंद्राचा वार्षिक अंदाजपत्रकीय खर्च ११,३३९ कोटी रु. इतका होईल. पूर्वीच्या १०,२५० कोटी रु.च्या तरतुदीच्या तुलनेत सरकारवर दरवर्षी सुमारे १,०८९ कोटी रु.चा अतिरिक्त वार्षिक भार पडेल. हे कसे, तर सरकार समर्थित ‘ईपीएस-९५’ या कर्मचारी निवृत्तिवेतन योजनेत केंद्राच्या तिजोरीतून प्रति कर्मचारी १.१६ टक्के अनुदान थेट जमा होत असते. पूर्वीच्या १५ हजार रु.च्या मर्यादेवर १.१६ टक्के म्हणजे प्रति कर्मचारी दरमहा जास्तीत जास्त १७४ रुपये सरकार भरत होते. आता २५ हजारच्या मर्यादेवर ही रक्कम दरमहा कमाल २९० रु. होईल. म्हणजेच प्रति कर्मचारी सरकारचा खर्च दरमहा ११६ रुपयांनी वाढेल.
बहुतांशांना १,५०० रु. निवृत्तिवेतन नसावे?
केंद्र व राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी सरकारच्या स्वतंत्र निवृत्तिवेतन योजना आहेत. मात्र खासगी क्षेत्रातील संघटित कर्मचार्यांसाठी ‘ईपीएस-९५’ हाच निवृत्तीनंतरच्या महत्त्वपूर्ण आधार आहे. या योजनेचे वास्तव असे की, बहुतांश सेवानिवृत्त त्यायोगे दरमहा १,५०० रुपयांहून कमी पेन्शन मिळवत आहे. मंत्र्यांनीच संसदेपुढे मांडलेल्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२५ पर्यंत योजनेअंतर्गत येणार्या एकूण ८२ लाख निवृत्तिधारकांपैकी केवळ ०.६५ टक्के लोकांना सहा हजार रुपयांपेक्षा अधिक मासिक पेन्शन मिळत आहे. तर ६० टक्क्यांहून अधिक ज्येष्ठांना १,५०० रुपयांपेक्षा कमी मासिक पेन्शन मिळत आहे. ‘ईपीएस-९५’ अंतर्गत किमान देय पेन्शनचे प्रमाण अवघे एक हजार रुपये आहे. ही किमान पातळी हजार रुपयांपर्यंत गेली, त्यालाही १२ वर्षे लोटली आहेत. ती ७,५०० रुपये अशा सन्मानजनक पातळीपर्यंत वाढावी यासाठी अनेक वर्षे निवृत्तधारकांच्या, कामगारांच्या संघटनांचा संघर्ष सुरू आहे. नव्या निर्णयानंतर पेन्शन योगदान वाढले तरी सेवा काळ पूर्ण करून (आजपासून अडीच-तीन दशकांनंतर) निवृत्तीपर्यंत ते जास्तीत जास्त ७,५०० रुपयांवरून, १२,५०० रुपयांपर्यंत वाढेल. प्रत्यक्षात पेन्शनची गणना करण्यासाठी सध्या वापरल्या जाणार्या प्रमाणशीर पद्धतीऐवजी, निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या ६० महिन्यांच्या सरासरी मासिक वेतनावर आधारित पद्धत लागू करण्याच्या मागणीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या मुद्द्यांशी संबंधित अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. प्रत्यक्षात सरकारला ईपीएफ हा एक मोठा आर्थिक बोजा, त्याउप्पर ‘ईपीएस ९५’ अंतर्गत निवृत्तिवेतनाचा अतिरिक्त ताण नकोसा झाला आहे, हेच वास्तव आहे. सामाजिक सुरक्षेची अन्य कोणतीही साधने जवळ नसतानाही सरकारचाच असा दृष्टिकोन म्हणजे वार्धक्य धोक्यात असल्याचाच इशारा.
