राहणीमानाचा खर्च आणि वेतनमानही वाढलेले असताना आलेला ताजा निर्णय लाखो कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा मिळवून देण्यास मदतकारक ठरेल. तरी यातून निवृत्तिपश्चात नियमित लाभ अर्थात ईपीएस-९५ अंतर्गत ‘पेन्शन’मध्ये सन्मानजनक वाढीची आशा धूसरच…
केंद्रीय मंत्रिमंडळाचा ताजा निर्णय काय?
संघटित आणि औपचारिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवणाऱ्या ‘कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटने’कडे (ईपीएफओ) नोंदणीकृत देशातील ८ कोटी पगारदारांच्या भवितव्याच्या दृष्टीने तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या पगारदारांसाठी ‘कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी’ (ईपीएफ) हा सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनाचा एकमेव विश्वासू आधार आहे. यासाठी संपूर्ण सेवाकाळात कर्मचारी आणि कंपनी दोघेही ईपीएफमध्ये नियमित योगदान देतात. या योगदानासाठी निर्धारित वैधानिक वेतनमर्यादा ही १५,००० रुपयांवरून, २५,००० रुपये करण्यात आली आहे. या बदलाची अंमलबजावणी ताबडतोब म्हणजे १७ सप्टेंबरपासून सुरूही झाली आहे, अर्थात ऑक्टोबरच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांच्या हाती पडणाऱ्या मासिक वेतनांत या बदलाचे परिणाम दिसून येतील.
वैधानिक वेतन मर्यादेत वाढीचा अर्थ काय?
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीची (ईपीएफ) मासिक वेतनमर्यादेत तब्बल १२ वर्षानंतर हा बदल झाला आहे. या आधी १ सप्टेंबर २०१४ मध्ये ती मर्यादा ६,५०० रुपयांवरून १५,००० रुपये करण्यात आली होती. ‘ईपीएफओ’च्या कक्षेत येणाऱ्या कंपनीत नोकरीत रुजू होताना कर्मचाऱ्याचे मूळ वेतन अधिक महागाई भत्ता हा १५,००० रुपयांपर्यंत असल्यास अशा कर्मचाऱ्यांना ‘पीएफ’ लागू करणे बंधनकारक होते. आता ही वेतन मर्यादा २५,००० रुपयांवर गेली आहे. त्यामुळे कर्मचारी आणि नियोक्ता (कंपनी) दोघांकडूनही त्या कर्मचाऱ्याच्या वेतनाच्या १२ टक्के रक्कम दरमहा ‘पीएफ’ म्हणून जमा केली जाईल, ज्यावर सरकारकडून दरवर्षी ठरविलेल्या प्रमाणात व्याज दिले जाईल.
नवीन नियमातून काय बदलेल?
वैधानिक वेतमर्यादेचा पूर्वी १५,००० रुपये हा आकडा जाऊन, त्या ठिकाणी आता २५,००० रुपये हा आकडा प्रस्थापित झाला आहे. ही मर्यादा ठरविली जाण्यामागे कायद्यामध्ये तसा कोणताही तार्किक आडाखा अथवा व्यावहारिक निकष नाही. मात्र बदललेले जीवनमान आणि किमान वेतनाचा वाढलेला स्तर गाठण्यासाठी त्यात वाढ झाली आहे. आज अकुशल/रोजंदारी मजुरांचे किमान वेतनही मासिक १५,००० रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे १५,००० रुपयांपेक्षा अधिक वेतनमान असणारे जे कर्मचारी पूर्वी ‘पीएफ’पासून वंचित राहत होते, ते आता अनिवार्य कक्षेत आले आहेत. देशातील ५१ लाखांहून अधिक औपचारिक कामगारांना सामाजिक सुरक्षा छत्र देणे त्यामुळे शक्य बनले आहे. तथापि ‘ईपीएफ ३.०’मधील तरतुदीनुसार २५,००० रुपयांपेक्षा जास्त वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांची ऐच्छिक पीएफ योगदानाची सवलत आता दरमहा १,८०० रुपयांवरून, ३,००० रुपयांवर गेली आहे. अर्थात २५,००० रुपयांपुढील रकमेवर म्हणजेच पूर्ण वेतनावर पीएफ कापायचा की केवळ ३,००० रुपये मर्यादेपर्यंत तो कापला जावा हा पर्याय देखील कायम आहे. याचा निर्णय कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या मर्जीवर अवलंबून राहिल आणि तसा निर्णय ते परस्पर संमतीने घेऊ शकतील.
कंपन्यांचा वेतन-खर्च खरेच वाढेल?
पात्र वेतनमर्यादा २५,००० रुपयांपर्यंत वाढल्याने, त्यानुरूप पीएफ अंशदानही वाढणे अपेक्षित आहे. यातून कंपन्यांचे (नियोक्ते) आर्थिक दायित्व अर्थात वेतनखर्च जवळपास ५ ते ८ टक्के वाढण्याचा अंदाज आहे. पूर्वीच्या १५ हजारांवर कंपनीचे १२ टक्के या दराने योगदान १,८०० रुपये होते, ते आता २५ हजारांपर्यंत वाढलेल्या मर्यादेत ३,००० रुपयांवर जाईल. म्हणजे प्रति कर्मचारी कंपनीचा पीएफ/पेन्शन खर्च दरमहा १,२०० रुपयांनी (वार्षिक १४,४०० रुपये) वाढेल. श्रम-केंद्रित आणि ज्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कामगार १५,००० ते २५,००० रुपयांच्या वेतनश्रेणीत आहेत अशा वस्त्रोद्योग, छोटे-मध्यम उत्पादन, सुरक्षा सेवा, लॉजिस्टिक वगैरे मुख्यत्वे ‘एमएसएमई’ श्रेणीतील कंपन्यांना याचा अधिक फटका बसेल. तथापि, बहुतांश बड्या कंपन्यांमध्ये कंपनीचा पीएफ हिस्सा कर्मचाऱ्याच्या ‘कॉस्ट टू कंपनी’ (सीटीसी) वेतन कराराचाच भाग असतो. अशा ठिकाणी कंपन्यांचा स्वतःचा खर्च वाढणार नाही, तर ते कर्मचाऱ्याच्या ‘सीटीसी’मधील इतर भत्ते कमी करून हा १,२०० रुपयांचा भार कर्मचाऱ्याच्या ‘टेक-होम’ अर्थात दरमहा हाती पडणाऱ्या वेतनावरच टाकतील. याचा अर्थ कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनाला तूर्त कात्री बसलेली दिसेल, जी अर्थातच दरमहा १,२०० रुपये वा अधिक असेल. मात्र भविष्याच्या दृष्टीने त्यांची तजवीज मात्र निश्चितच वाढेल.
सरकारचा खर्च किती व कसा वाढेल?
नव्या बदललेल्या नियमानुसार, केंद्राचा वार्षिक अंदाजपत्रकीय खर्च ११,३३९ कोटी रुपये इतका होईल. पूर्वीच्या १०,२५० कोटी रुपयांच्या तरतुदीच्या तुलनेत सरकारवर दरवर्षी सुमारे १,०८९ कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक भार पडेल. हे कसे, तर सरकार समर्थित ‘ईपीएस-९५’ या कर्मचारी निवृत्तिवेतन योजनेत केंद्राच्या तिजोरीतून प्रति कर्मचारी १.१६ टक्के अनुदान थेट जमा होत असते. पूर्वीच्या १५,००० रुपयांच्या मर्यादेवर १.१६ टक्के म्हणजे प्रति कर्मचारी दरमहा जास्तीत जास्त १७४ रुपये सरकार भरत होते. आता २५,००० च्या मर्यादेवर ही रक्कम दरमहा कमाल २९० रुपये होईल. म्हणजेच प्रति कर्मचारी सरकारचा खर्च दरमहा ११६ रुपयांनी वाढेल.
बहुतांशांना १,५०० रुपये निवृत्तिवेतन नसावे?
केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारच्या स्वतंत्र निवृत्तिवेतन योजना आहेत. मात्र खासगी क्षेत्रातील संघटित कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरच्या जीवनाचा ‘ईपीएस-९५’ योजनाच एक महत्त्वपूर्ण आधार आहे. मात्र या सरकार समर्थित योजनेचे वास्तव असे की, बहुतांश सेवानिवृत्त (वयाची ५८ वर्षे पूर्ण करणारे) त्यायोगे दरमहा १,५०० रुपयांहून कमी पेन्शन मिळवत आहे. मंत्र्यांनीच संसदेपुढे मांडलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२५ पर्यंत योजनेअंतर्गत येणाऱ्या एकूण ८२ लाख निवृत्तिधारकांपैकी केवळ ०.६५ टक्के लोकांना ६,००० रुपयांपेक्षा अधिक मासिक पेन्शन मिळत आहे. तर ६० टक्क्यांहून अधिक ज्येष्ठांना १,५०० रुपयांपेक्षा कमी मासिक पेन्शन मिळत आहे. ‘ईपीएस-९५’ अंतर्गत किमान देय पेन्शनचे प्रमाण अवघे १,००० रुपये आहे. ही किमान पातळी हजार रुपयांपर्यंत गेली, त्यालाही १२ वर्षे लोटली आहेत. ती ७,५०० रुपये अशा सन्मानजनक पातळीपर्यंत वाढावी यासाठी गेली अनेक वर्षे निवृत्तधारकांच्या संघटना, कामगार संघटनांचा निष्फळ झगडा सुरू आहे. नव्या निर्णयानंतर पेन्शन योगदान वाढले तरी पूर्ण सेवा काळ पूर्ण करून (आजपासून अडीच-तीन दशकांनंतर) निवृत्तीपर्यंत ते जास्तीत जास्त ७,५०० रुपयांवरून, १२,५०० रुपयांपर्यंत वाढेल. प्रत्यक्षात पेन्शनची गणना करण्यासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या प्रमाणशीर पद्धतीऐवजी, निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या ६० महिन्यांच्या सरासरी मासिक वेतनावर आधारित पद्धत लागू करण्याच्या मागणीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या मुद्द्यांशी संबंधित अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. प्रत्यक्षात सरकारला ईपीएफ हा एक मोठा आर्थिक बोजा, त्या उप्पर ‘ईपीएस ९५’ अंतर्गत निवृत्तिवेतनाचा अतिरिक्त ताण नकोसा झाला आहे, हेच वास्तव आहे. सामाजिक सुरक्षेचे अन्य कोणतीही साधने जवळ नसतानाही सरकारचाच असा दृष्टिकोन म्हणजे वार्धक्य धोक्यात असल्याचेच सांगणारे आहे.
कंपन्यांना प्रोत्साहनपर सवलती आवश्यक?
कामगार संघटनांच्या रेट्यानंतरही वेतनमर्यादेत वाढीला सरकारने १२ वर्षे घेतली. वेतनमर्यादा वाढवल्यास कंपन्यांना वेतनखर्च वाढेल, विशेषतः लघू आणि मध्यम उद्योगांवरील आर्थिक ताण वाढेल, अशी भीती उद्योग संघटना व्यक्त करत आल्या आहेत. सीआयआय आणि फिक्की या उद्योगांचे प्रतिनिधी असलेल्या दोन्ही मोठ्या संघटनांचा याला जाहीर विरोध हे सरकारची पावले थबकण्याचे कारण ठरले. आता निर्णय घेतला गेलाच आहे, तर त्याची अंमलबजावणी इमानाने होईल हेही पाहिले पाहिजे. प्रसंगी त्यासाठी सरकारने कंपन्यांसाठी प्रोत्साहनपर कर अथवा अन्य सवलती जाहीर करणेही इष्ट ठरेल.
sachin.rohekar@expressindia.com
