Equal Earth projection: शाळेत असताना वर्गाच्या भिंतीवर टांगलेला जगाचा नकाशा आठवतोय? तोच परिचित आकार, तेच खंड, तीच सीमारेषा. वरच्या बाजूला अवाढव्य पसरलेला ग्रीनलँड, भलामोठा युरोप, महाकाय रशिया आणि उत्तर अमेरिका; तर त्यांच्या खाली आकाराने आक्रसून गेलेला विशाल आफ्रिका खंड, दक्षिण अमेरिका आणि भारतासह संपूर्ण दक्षिण आशिया! लहानपणापासून आपल्या मनावर कोरला गेलेला जगाचा हा नकाशा आता मुळापासून बदलणार आहे. याचे कारण असे की, आपण इतकी वर्ष ज्या नकाशाला अंतिम सत्य मनात होतो, तो खरंतर एका जुन्या तांत्रिक गरजेतून निर्माण झालेला एक मोठा दृश्य भ्रम होता. 

ज्येष्ठ भूगोलतज्ज्ञ डॉ. श्रीकांत कार्लेकर सांगतात की,

“हा केवळ नकाशातील तांत्रिक बदल नसून, तो आपला जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातला बदल आहे.” 

चूक नेमकी कुठे होती? (Mercator distortion)

१६व्या शतकापासून रूढ झालेल्या मर्केटर प्रक्षेपणामुळे जगाच्या नकाशात एक मोठी विसंगती निर्माण झाली होती. आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आशिया हे भूखंड प्रत्यक्षात आहेत त्यापेक्षा खूपच लहान दिसतात, तर युरोप आणि उत्तर अमेरिका प्रत्यक्षापेक्षा कितीतरी मोठे भासत होते. डॉ. कार्लेकर यांनी महाराष्ट्र टाइम्ससाठी लिहिलेल्या विशेष लेखात हा विषय मांडताना याकडे आपले लक्ष वेधतात,

“आफ्रिका खंड प्रत्यक्षात ग्रीनलँडपेक्षा तब्बल १४ पट मोठा आहे, मात्र नकाशावर हे दोन्ही भूखंड जवळजवळ सारख्याच आकाराचे दिसतात. ही केवळ तांत्रिक चूक नाही, तर ती एका खंडाचं, तिथल्या लोकांचं आणि त्यांच्या इतिहासाचं महत्त्व कमी लेखणारी बाब आहे.”

याच ऐतिहासिक विसंगतीला छेद देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या (UN) आमसभेत ४ सप्टेंबर २०२६ रोजी ‘नकाशा दुरुस्त करा’ (करेक्ट द मॅप) असा एक अत्यंत महत्त्वपूर्ण ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. १६ व्या शतकापासून जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या पारंपरिक ‘मर्केटर प्रक्षेपणा’ला (Mercator Projection) बाजूला सारून, खंडांचे वास्तव क्षेत्रफळ दाखवणाऱ्या ‘इक्वल अर्थ’ (Equal Earth Projection) या आधुनिक नकाशाचा स्वीकार करण्याचा मार्ग याद्वारे मोकळा झाला आहे. 

नकाशा केवळ एक कागद नसतो (Eurocentric bias)

डॉ. श्रीकांत कार्लेकर यांच्या मते, “नकाशा हे निव्वळ भूप्रदेशांचे मोजमाप दर्शवणारे तांत्रिक साधन नसून ते माणसाच्या जागतिक आकलनाला आकार देणारे एक माध्यम आहे.” मानवी मेंदू दृश्य आकारांची तुलना थेट भौगोलिक सामर्थ्याशी आणि विकासाच्या क्षमतेशी करतो. जेव्हा एखाद्या खंडाचा नकाशा मूळ आकारापेक्षा अनेक पटींनी लहान दाखवला जातो, तेव्हा नकळतपणे जनमानसात त्या भूभागाचे, तिथल्या लोकांचे आणि त्यांच्या समस्यांचे अवमूल्यन होते.     

पारंपरिक मर्केटर नकाशामुळे आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि भारतासह संपूर्ण दक्षिण आशिया प्रत्यक्षात आहेत त्यापेक्षा खूपच लहान भासतात. यामुळे जगाच्या इतिहासात उत्तर गोलार्धातील युरोपिय आणि पाश्चात्त्य देशांना नैसर्गिकरित्या ‘भव्य, शक्तिशाली आणि केंद्रस्थानी’ मानण्याची एक सुप्त मानसिक सवय मानवी समाजात रुजली. विषुववृत्ताजवळ राहणाऱ्या कोट्यवधी लोकांचे प्रश्न आणि त्यांचे अस्तित्व नेहमीच दुर्लक्षित राहिले. संयुक्त राष्ट्रांच्या नव्या निर्णयामुळे या मानसिक व बौद्धिक विषमतेला थेट आव्हान मिळाले आहे. 

त्रिमितीय पृथ्वी आणि द्विमितीय कागदाचा संघर्ष (3D to 2D projection)

नकाशाशास्त्र हे प्राचीन काळापासून मानवी कुतूहलाचा भाग राहिले आहे. इसवी सन पूर्व काळात प्राचीन ग्रीक विचारवंत ॲनेक्झिमँडर यांनी मानवी इतिहासातील पहिल्या नकाशाची पायाभरणी केली, तर दुसऱ्या शतकात टॉलेमी यांनी ‘जिओग्राफिया’ ग्रंथात अक्षांश (latitude) आणि रेखांश वृत्तांची (longitude) संकल्पना मांडून विविध दिशांची ओळख करून दिली. पुढे मार्को पोलोच्या सागरी सफरी आणि रेशीम मार्गावरील व्यापाराने नकाशांची गरज वाढवली. १६व्या शतकात त्रिकोणीकरणाद्वारे (Triangulation) जमिनीचे सर्वेक्षण सुरू झाले आणि आज आपण उपग्रह, जीआयएस (GIS) व गूगल मॅप्सच्या युगात येऊन पोहोचलो आहोत.

मात्र, या संपूर्ण प्रवासात नकाशाकारांसमोर एक गणिती आव्हान कायम राहिले, ते म्हणजे त्रिमितीय (3D) गोल पृथ्वीला द्विमितीय (2D) सपाट कागदावर त्रुटींशिवाय कसे मांडावे? याला काही वैज्ञानिक मर्यादा होत्या. 

डॉ. श्रीकांत कार्लेकर हे कोडे एका सोप्या उदाहरणाने समजावून सांगतात: एखाद्या अखंड संत्र्याची साल सोलून ती जमिनीवर किंवा टेबलावर न पाडता एकदम सपाट पसरवून दाखवणे जसे अशक्य आहे, अगदी तसेच गोल पृथ्वीच्या बाबतीत घडते. गोल पृष्ठभाग सपाट कागदावर आणण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर केला जातो, त्याला ‘नकाशा प्रक्षेपण’ (Map Projection) म्हणतात. प्रक्षेपणांचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात:

  • खमध्य प्रक्षेपण (Zenithal)
  • शंकूकृती प्रक्षेपण (Conical)
  • दंडगोलीय प्रक्षेपण (Cylindrical)

मर्केटर हे दंडगोलीय प्रक्षेपणाचा प्रकार आहे. या प्रक्षेपणात कागदाचा दंडगोल पृथ्वीभोवती विषुववृत्तावर (equator) गुंडाळला जातो, त्यामुळे विषुववृत्ताजवळ अचूकता राहते, पण जसजसे ध्रुवांकडे (poles) जाऊ, तसतसे जमिनीचा आकार फुगवला जातो आणि ताणला जातो.

दर्यावर्दींची सोय ते शाळेच्या भिंतींवरील चूक (Gerardus Mercator)

१५६९ मध्ये फ्लेमिश (बेल्जियन) भूगोलतज्ज्ञ गेरार्डस मर्केटर यांनी हे प्रक्षेपण तयार केले. त्यावेळी त्यांचा उद्देश जगाला भौगोलिक ज्ञान शिकवणे हा नव्हता, तर अथांग समुद्रात जहाजे चालवणाऱ्या खलाशांचा प्रवास सुकर करणे हा होता. मर्केटर प्रक्षेपणात होकायंत्राची (compass) दिशा सरळ रेषेत (Loxodrome किंवा Rhumb Line) दाखवता येत असे. दिशा न बदलता सलग प्रवास करण्यासाठी हे तंत्र दर्यावर्दींसाठी (seafarers) वरदान ठरले.

परंतु, समुद्रातील जहाजांसाठी तयार केलेला हा तांत्रिक नकाशा कालांतराने प्रत्येक शाळेमध्ये, विद्यापीठांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये वापरला जात होता; इथेच खरी मानवी गफलत झाली. मर्केटरच्या नकाशात उत्तर गोलार्ध प्रचंड मोठा दिसतो.

  • प्रत्यक्षात आफ्रिका खंड हा ग्रीनलँडपेक्षा तब्बल १४ पट मोठा आहे. मात्र, मर्केटर नकाशावर ग्रीनलँड आणि आफ्रिका एकाच आकाराचे भासतात.
  • संपूर्ण अमेरिका, चीन, भारत आणि युरोप हे सर्व भूभाग एकत्र केले तरी ते एकट्या आफ्रिका खंडात सहज सामावून जाऊ शकतात
  • रशिया आणि कॅनडाचे आकार मूळ क्षेत्रफळापेक्षा (area) कितीतरी पटीने मोठे दाखवले गेले, तर भारतासारखा उपखंड आकाराने लहान भासवला गेला.

याचा थेट परिणाम जागतिक मानसिकतेवर झाला. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेसारख्या खंडांकडे ‘दरिद्री, छोटे आणि परावलंबी प्रदेश’ म्हणून पाहण्याची युरोपकेंद्री सवय या चुकीच्या आकारमानाने जगभरातील पिढ्यांच्या मनात नकळत बिंबवली.

‘इक्वल अर्थ’ प्रक्षेपण : पृथ्वीचे खरे वास्तव (Equal Earth projection)

या ऐतिहासिक अन्यायाला उत्तर म्हणून २०१८ मध्ये बोजन शावरिच, बर्नहार्ड जेनी आणि टॉम पॅटरसन या तज्ज्ञांनी ‘इक्वल अर्थ’ (Equal Earth) हे नवीन प्रक्षेपण विकसित केले. हे एक ‘समान-क्षेत्रफळ दर्शक’ (Equal-area pseudo-cylindrical) प्रक्षेपण आहे.

डॉ. कार्लेकर नमूद करतात की,

“नकाशाशास्त्रात जेव्हा तुम्ही क्षेत्रफळाची अचूकता जपण्याचा प्रयत्न करता, तेव्हा किनाऱ्यांच्या मूळ आकारात थोडाफार संकोच किंवा विकृती स्वीकारणे भाग पडते. इक्वल अर्थ प्रक्षेपणाने ही तडजोड अत्यंत देखण्या पद्धतीने साधली आहे.”

इक्वल अर्थ नकाशावर खंडांचे मूळ सापेक्ष आकार तंतोतंत प्रमाणात राहतात. इथे आफ्रिका आपल्या १४ पट भव्यतेसह उठून दिसतो, दक्षिण अमेरिकेचे अथांग विस्तार स्पष्ट जाणवते आणि युरोप व उत्तर अमेरिकेचा आकार निसर्गाने त्यांना जेवढा दिला आहे, तेवढाच मर्यादित दिसतो. हा नकाशा पाहताना पहिल्यांदाच सामान्य माणसाला पृथ्वीवरील जमिनीचे आणि मानवी वस्तीचे खरेखुरे प्रमाण समजते.

जागतिक मंचावरील राजकीय संघर्ष आणि ‘बौद्धिक न्याय’ (UN resolution correct the map)

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हा ठराव मांडला गेला, तेव्हा त्यामागे केवळ भूगोलाचा अभ्यास नव्हता, तर मानवी अस्मितेचा लढा होता. आफ्रिकेतील लहान ‘टोगो’ या देशाने आफ्रिकन युनियनच्या वतीने हा प्रस्ताव मांडला. टोगोचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रॉबर्ट दुसे यांनी जागतिक मंचावर मांडलेले विचार अत्यंत भेदक होते. ते म्हणाले, “एक निष्पक्ष नकाशा जगाचा भूगोल बदलत नाही, तर तो जगाकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन बदलतो.”

या प्रस्तावात मर्केटर नकाशांच्या प्रभावाला वसाहतवादाचा वारसा मानले गेले आणि विकसनशील देशांसाठी हा ‘बौद्धिक न्याय’ असल्याचे स्पष्ट केले गेले. जगातील १६४ देशांनी या ऐतिहासिक बदलाच्या बाजूने मतदान केले. मात्र, अमेरिकेने या ठरावाला विरोध केला. संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय सुरक्षेसारख्या गंभीर समस्या सोडून शाळांच्या भिंतींवरील नकाशांवर वेळ वाया घालवू नये असा युक्तिवाद अमेरिकेने केला. दुसरीकडे ब्रिटनसारख्या देशांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सीमारेषांच्या संभाव्य विकृतीबाबत चिंता व्यक्त केली. एस्टोनिया, जॉर्जिया, युक्रेनसह सहा देश मतदानापासून दूर राहिले. नकाशाची निवड ही केवळ विज्ञानाची गोष्ट नसून ती जागतिक राजकारणाच्या आखाड्यातील सत्तासंघर्ष कसा ठरते, हेच यावरून दिसून आले.

भारताची ठाम भूमिका आणि सार्वभौमत्व (India territorial sovereignty)

या जागतिक घडामोडीत भारताने अतिशय परिपक्व आणि कणखर भूमिका घेतली. भारताने भूभागाचे अचूक, समान-क्षेत्रफळ दर्शवणाऱ्या प्रक्षेपणाला पाठिंबा देत ठरावाच्या बाजूने मतदान केले. परंतु, त्याच वेळी देशाच्या सार्वभौमत्वावर कसलीही तडजोड केली जाणार नाही हेही स्पष्ट केले.

परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी भारताची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,

“या ठरावाला पाठिंबा देणे म्हणजे कोणत्याही त्रुटीयुक्त आंतरराष्ट्रीय सीमांचे समर्थन करणे नव्हे. संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्याही प्रस्तावित नकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांसह भारताचा संपूर्ण भूभाग हा देशाच्या अधिकृत नकाशांनुसारच चित्रित केला गेला पाहिजे. भारताच्या सीमारेषांचे कोणतेही चुकीचे किंवा भ्रामक सादरीकरण कदापि स्वीकारले जाणार नाही.”

आपल्या दैनंदिन जगण्यावर याचा काय परिणाम होणार? (Global South empowerment)

हा बदल केवळ सरकारी कागदपत्रांपुरता मर्यादित नाही; त्याचा थेट संबंध आपल्या दैनंदिन जाणिवांशी आणि भावी पिढीच्या जडणघडणीशी आहे.

शालेय शिक्षण आणि मुलांची कल्पकता : उद्याच्या पिढीला जेव्हा वर्गात खरा नकाशा शिकवला जाईल, तेव्हा त्यांच्या मनात कोणत्याही खंडाबद्दल किंवा संस्कृतीबद्दल न्यूनगंड किंवा श्रेष्ठत्वगंड तयार होणार नाही. आफ्रिका आणि आशियातील मानवी क्षमतेचे खरे भौगोलिक वजन त्यांच्या लक्षात येईल.

हवामान बदल आणि जागतिक धोरणे : हवामान बदलाचा सर्वाधिक फटका विषुववृत्ताजवळील देशांना आणि बेटांना बसत आहे. जेव्हा नकाशावर हे देश आपल्या विशाल लोकसंख्येसह आणि खऱ्या आकारमानासह दिसतील, तेव्हा जागतिक पर्यावरण परिषदांमध्ये त्यांच्या मागण्यांकडे पाहण्याचा विकसित देशांचा दृष्टिकोन अधिक संवेदनशील बनेल.

आंतरराष्ट्रीय व्यापार आणि मानवी सहकार्य : ‘ग्लोबल साउथ’ (Global South) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकसनशील जगाला स्वतःच्या अथांग नैसर्गिक संपत्तीचे आणि विस्ताराचे वास्तविक भान येईल, ज्यामुळे व्यापार वाटाघाटींमध्ये समानतेची भावना निर्माण होईल.

डॉ. श्रीकांत कार्लेकर सांगतात,

“जगाचा नकाशा बदलणे म्हणजे केवळ रेषांची पुनर्रचना नव्हे, तर मानवी चेतनेचे आणि जागतिक समतोलाचे नव्याने केलेले रेखाटन आहे.”

शतकानुशतके आपण ज्या विकृत चित्राच्या आधारे जगाचे मूल्यमापन करत होतो, त्यापासून मुक्त होऊन सत्याकडे टाकलेले हे पाऊल खऱ्या अर्थाने मानवी इतिहासाला अधिक न्याय्य आणि वास्तववादी बनवणारे ठरेल.