मारुती सुझुकीची “कितना देती है” आणि “पेट्रोल खतम ही नही हुंदा” ही जाहिरातींची घोषवाक्ये प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या वाक्यांनी भारतीय वाहनचालकांचे मायलेजचे वेड अगदी मोजक्या अन् प्रभावी शब्दांत मांडले होते. देशातील या सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीपूर्वी, ‘हिरो होंडा’ने आपल्या जाहिरातीतील ‘फिल इट, शट इट, फॉर्गेट इट’ (इंधन भरा, बंद करा आणि विसरून जा) या घोषवाक्याने अशीच साद ग्राहकांना घातली होती. हिरो होंडाने त्यांच्या फोर-स्ट्रोक इंजिनच्या कार्यक्षमतेबाबत माहिती दिली होती. ‘पेट्रोल पंपांवर पैशांची बचत होत असल्यास त्यावरूनच वाहनाचे खरे मूल्य ठरते’ असा विचार ग्राहकांच्या मनात रूजवण्यात आला होता. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण (E20) बंधनकारक केल्यामुळे आता वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे गाड्यांचे मायलेज तर कमी होतेच, पण जुन्या वाहनांच्या इंजिनचेही नुकसान होण्याचा धोका वाढला आहे.
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने वाहनचालक चिंतीत का आहेत?
सरकारच्या नव्याने हाती घेण्यात आलेल्या इथेनॉल मिश्रण (ब्लेंडिंग) कार्यक्रमामुळे भारतीय वाहनचालक चिंतेत आहेत. मागील वर्षी भारताने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा पूर्णपणे गाठला आहे. हा टप्पा २०३० मध्ये गाठायचा होता, परंतु, पाच वर्षे आधीच गाठण्यात आला. आता ‘E20’ इंधन, ज्यामध्ये ८० टक्के पेट्रोल आणि २० टक्के इथेनॉल असते हा देशभरात उपलब्ध असलेला प्रमाणित पेट्रोलचा प्रकार बनला आहे.
मागील तीन वर्षांत पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाची सरासरी पातळी पूर्वीच्या १० टक्क्यांवरून दुप्पट होऊन २० टक्क्यांवर पोहोचली. वास्तविक पाहता हे बदल आठ वर्षांच्या कालावधीत होणे नियोजित होते. जुन्या वाहनांसाठी आणि ‘E10’ पेट्रोल (९० टक्के पेट्रोल आणि १० टक्के इथेनॉल) प्रमाणित असलेल्या वाहनांसाठी हा बदल अतिशय वेगाने झाला. ग्राहकांना यामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणींची पुरेशी पूर्वकल्पना किंवा चेतावणी देखील दिली गेली नाही. या अनुभवामुळे वाहनचालकांमध्ये, विशेषतः जुन्या कार आणि दुचाकी मालकांमध्ये, आपली काहीशी फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
जास्त प्रमाणात इथेनॉल मिश्रण असलेले पेट्रोल वापरल्याने कोणते नुकसान?
पहिले म्हणजे, गाडीच्या उत्पादन वर्षानुसार (मॅन्युफॅक्चरिंग डेटवर) तिच्या इंधन कार्यक्षमतेत (मायलेजमध्ये) लक्षणीय घट होते.
दुसरे म्हणजे, अंतर्गत ज्वलन इंजिन (Internal Combustion Engine) असलेल्या वाहनांमध्ये, विशेषतः जुन्या वाहनांमध्ये, ‘E20’ इंधन भरल्याने गंज पडून इंजिनच्या भागांचे नुकसान होऊ शकते. कारण इथेनॉलचा स्वभाव हायग्रोस्कोपिक (आर्द्रता शोषून घेणारा) असतो, त्यामुळे ते पाणी शोषून घेते (हायग्रोस्कोपी म्हणजे पदार्थाचा असा गुणधर्म, ज्याद्वारे तो आजूबाजूच्या वातावरणातील पाण्याचे रेणू स्वतःकडे आकर्षित करतो आणि ते शोषून किंवा धरून ठेवतो).
तिसरे म्हणजे, भारतातील वाहन चालकांना सध्या पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या इंधनांची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध नाही. याउलट ब्राझीलमध्ये मात्र ग्राहकांसमोर वेगवेगळ्या किमतींनुसार इंधनाचे पर्याय उपलब्ध असतात आणि ब्राझीलच्या कायद्यानुसार, जास्त इथेनॉल मिश्रण असलेल्या इंधनावर किमतीत सवलत (डिस्काउंट) देणे बंधनकारक आहे.
वाहनांच्या मायलेजवर परिणाम कसा होतो?
भारतीय वाहन चालकांना हे मिश्रित इंधन स्वस्त दरात मिळत नाही. उलट, यामुळे मायलेज कमी मिळणे आणि जुन्या वाहनांचे नुकसान होण्याची चिंता सतावणे, या गोष्टींचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे. हा भुर्दंड जबरदस्तीने लादण्यात आला आहे, अशी भावना वाहनचालकांमध्ये आहे. याशिवाय, जास्त इथेनॉल मिश्रण असलेल्या पेट्रोलवर चालणाऱ्या सामान्य ‘ICE’ (Internal Combustion Engine असलेली कार) कारचे मायलेज तर कमी होतेच, पण हिवाळ्याच्या सकाळी त्या सुरू करणे देखील अधिक कठीण जाते. कारण इथेनॉल जळण्यासाठी पेट्रोलच्या तुलनेत जास्त तापमानाची गरज असते.
पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळलेल्या इंधनामुळे (E10) कारच्या कामगिरीवर फारसा परिणाम होत नाही. तरी त्यापुढील इथेनॉल मिश्रणाचे कोणतेही प्रमाण (१० टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळल्यास) गाडीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, असे म्हटले जाते. तसेच, मिश्रणाची पातळी जसजशी वाढत जाते, तसतशी वाहनाची कार्यक्षमता बिघडते. सरकारची योजना आता E20 पेक्षाही पुढे जाण्याची आहे, आणि E10 वरून E20 च्या संक्रमणादरम्यान आलेला अनुभव पाहता ही बाब ग्राहकांची चिंता वाढवणारी आहे.
इथेनॉल ब्लेडिंगचा फटका ग्राहकांनाच कसा?
सरकारने E20 चा टप्पा पूर्ण केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे वाहनांच्या किमतीही वाढण्याची दाट शक्यता असून, त्याचा बोजा शेवटी ग्राहकावरच पडणार आहे. त्यात कमी मिळणाऱ्या मायलेजचा त्रास वेगळाच, ज्याची प्रचिती अनेक ग्राहकांना E10 वरून E20 वर जाताना आधीच आली आहे आणि त्यांनी तसे स्पष्टपणे बोलूनही दाखवले आहे. सरकारी सूत्रांनुसार, E20 पेक्षा जास्त मिश्रणाकडे जाण्याची ही प्रक्रिया “कोणतीही घाईगडबड न करता केली जात आहे आणि वाहन कंपन्या तसेच तेल कंपन्यांना या बदलासाठी सज्ज होण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल.”
सरकार E20 पेक्षा जास्त मिश्रणासाठी इतका आग्रह का धरत आहे? याचे मुख्य कारण म्हणजे, पश्चिम आशियातील तणावामुळे इंधनाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर, भारताचे परदेशी इंधन आयातीवरील अवलंबित्व आणखी कमी करणे आणि देशांतर्गत इथेनॉल उत्पादनाला चालना देणे, हा सरकारचा ठाम निर्धार आहे.
ऊसाचे अधिक उत्पादन झाल्याने इथेनॉलवर भर?
याला एक राजकीय बाजूही आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी संघटना व नेत्यांनी इथेनॉलचे मिश्रण वाढवण्यासाठी जोरदार दबाव टाकला आहे, कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे सध्या गरजेपेक्षा जास्त अतिरिक्त ऊस उपलब्ध आहे. इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांसमोरही काही आव्हाने आहेत, परंतु त्या प्रामुख्याने सरकारी मालकीच्या असल्याने त्या विरोध करण्याची शक्यता फारच कमी आहे.
२५ टक्के इथेनॉल व ७५ टक्के पेट्रोलमुळे (E25) कोणता धोका?
आता रस्त्यांवरील सध्याच्या वाहनांना E25 नुसार जुळवून घेण्याबाबत कार उत्पादकांनी सांगितले की, या उच्च इथेनॉल मिश्रणाचा जुन्या वाहनांवर काय परिणाम होईल हे पाहण्यासाठी त्यांना नवीन चाचण्या घ्याव्या लागतील. तसेच, यापुढे विकल्या जाणाऱ्या नवीन वाहनांच्या बाबतीत, उत्पादकांना त्यांचे प्रमाणीकरण आणि उत्सर्जनासाठीचे होमोलोगेशन (homologation – सरकारी मानकांचे प्रमाणीकरण) पुन्हा करावे लागेल आणि वाहने नव्याने री-कॅलिब्रेट करावी लागतील. कारण सध्या बाजारात विकली जाणारी सर्व वाहने E20 इंधन वापरून तपासली, प्रमाणित आणि होमोलोगाइज्ड केली गेली आहेत. पूर्वी ज्याप्रमाणे E20 साठी होमोलोगेशन केले गेले होते, आता नवीन E25 इंधनासाठीही ते करावे लागेल. यानंतर, सर्वात मोठा प्रश्न उरतो तो म्हणजे: मायलेजवर होणारा परिणाम. यात मोठी समस्या अशी आहे की, E10 वरून E20 वर जाताना इंधन कार्यक्षमतेत झालेल्या घसरणीचा फटका वाहनचालकांनाच सहन करावा लागला होता.
“या नवीन बदलाच्या बाबतीतही इंधन कार्यक्षमतेत (मायलेजमध्ये) होणाऱ्या कोणत्याही घसरणीचा अंतिम फटका ग्राहकालाच सोसावा लागण्याची शक्यता आहे. जुन्या वाहनांच्या बाबतीत, जास्त इथेनॉल मिश्रणामुळे वाहनाचे नुकसान होण्याचा अतिरिक्त धोकाही आहे. ती चिंता देखील ग्राहकावरच सोडण्यात आली आहे,” असे एका वाहन उत्पादक संघटनेच्या प्रतिनिधीने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
