Ethanol Blending in India and Brazil model strategy: रशिया-युक्रेन आणि आता पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक तेल संकट गडद होत असताना भारतासाठी ‘ब्राझील मॉडेल’ हा आशेचा किरण ठरू शकतो. ब्राझीलने १९७५ पासून इथेनॉलचा वापर करून कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी केले. इथेनॉलचा इंधनात वापर केला. वाहनांमध्येही त्यानुसार बदल करून घेतले. ब्राझीलने तेलासाठी इतर देशांवर असलेले अवलंबित्व निम्म्याहून कमी केले आहे. ब्राझील मॉडेल नेमकं काय आहे? ब्राझीलने तेलसंकटावर कसा उपाय शोधला? भारत इथेनॉलच्या सहाय्याने इंधन क्षेत्रात काय साध्य करू शकतो? त्याबाबतचा हा आढावा.

ब्राझीलचा ‘प्रोएलकुल कार्यक्रम’ काय होता?

१९७३ मध्ये अरब-इस्रायली यांच्यात झालेल्या ‘योम किप्पुर’ या नावने ओळखले जाणारे युद्ध झाले होते. युद्धामुळे जगात तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली होती. जगात तेलाचा तुटवडा झाला होता. त्यावेळी ब्राझीलला मोठ्या प्रमाणात तेल आयात करावे लागत होते. त्यानंतर दोन वर्षांनी नोव्हेंबर १९७५ मध्ये ब्राझीलने ‘प्रोएलकुल कार्यक्रम’ (Proálcool programme) हाती घेतला. ब्राझीलचे तेलाच्या बाबतीत इतर देशांवरील अवलंबित्व कमी व्हावे असा त्यामागे उद्देश होता.

‘प्रोएलकुल कार्यक्रमा’अंतर्गत संपूर्ण ब्राझीलमध्ये पेट्रोलमध्ये ११ टक्के अनहायड्रोस अल्कोहोल किंवा इथेनॉल मिसळण्याचे निर्देश देण्यात आले होते. १९७९ मध्ये इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली होती. त्यावेळी जगावर दुसऱ्यांदा तेल संकट आले. परंतु, त्यावेळी ब्राझीलने शंभर टक्के हायड्रोस अल्कोहोलवर धावणाऱ्या कार लाँच केल्या होत्या. (हायड्रोस अल्कोहोलमध्ये १ टक्क्याहून कमी इथेनॉलच्या प्रमाणात पाच ते सहा टक्के पाणी)

ब्राझीलने कोणत्या दोन इंधनांची निर्मिती केली?

ब्राझीलमध्ये १९८५ मध्ये १२०० कोटी लीटर इथेनॉलची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी ब्राझील मध्ये वाहनांमध्ये इंधन टाकण्यासाठी दोन प्रकारचे पंप होते. इथेनॉल मिश्रीत पेट्रोलसाठी गॅसोलिन-सी या नावाने ओळखला जाणारा पंप होता. तर १०० टक्के हायड्रोस अल्कोहोलवर धावणाऱ्या वाहनांसाठी हायड्रोस अल्कोहोलचा वेगळा पंप होता. तो E100 नावाने ओळखला जात. २००३ मध्ये ब्राझील मध्ये फ्लेक्स फ्युएल वाहने लाँच करण्यात आली. या वाहनांचे इंजिन गॅसोलीन सी व E100 या दोन्ही प्रकारच्या इंधनांवर चालेल असे बनवण्यात आले होते. या वाहनांमध्ये एक इलेक्ट्रॉनिक सेन्सर बसवण्यात आले होते. त्यात मिश्रणाचे प्रमाण किती आहे, याबाबत माहिती मिळायची.

ब्राझीलची खनिज तेल आयात ५० टक्क्यांहून कमी कशी झाली?

२०१४ पर्यंत पेट्रोलमध्ये कमाल २५ टक्के इथेनॉल मिसळता येत होते. त्यानंतर त्याचे प्रमाण १६ मार्च २०१५ पासून २७ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. त्यानंतर १ ऑगस्ट २०१५ पासून गॅसोलिन सी (पेट्रोल-इथेनॉलचे मिश्रण) मध्ये इथेनॉलचे प्रमाण ३० टक्के करण्यात आले. २०२४ मध्ये ब्राझीलने वाहनांमध्ये इंधन म्हणून ३४९२.४ कोटी लीटर इथेनॉलचा वापर करण्यात आला होता. त्यापैकी २२८९.६ कोटी लीटर इथेनॉल E100 इंधनात, तर १२०२.८ कोटी लीटर इथेनॉल गॅसोलिन-सी इंधनासाठी वापरण्यात आले होते. ब्राझीलच्या एकूण इंधन वापरात ५१.८ टक्के इथेनॉलचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे ब्राझीलची जवळपास अर्ध्याहून अधिक इंधन आयात टळली. ब्राझीलचे इंधनासाठी इतर देशांवरील अवलंबित्व तसेच तेलावर होणार महाकाय खर्च कमी झाला.

जगावर तेल संकट का आले?

पश्चिम आशियातील यु्द्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत सोमवारी (२३ मार्च) भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी भारत मागील दशकभरापासून इथेनॉलच्या निर्मितीसाठी करत असलेल्या प्रयत्नांवर भर दिला. भारताला ऊर्जा आयात करावी लागते. इथेनॉलमुळे भारताचे इतर देशांवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. दरम्यान, १९७९ पासून जगावर तीनदा तेल संकट आले. ११ जुलै २००८ रोजी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत १४७.५ डॉलर प्रतिबॅरल झाली होती, त्यानंतर ७ मार्च २०२२ रोजी रशिया युक्रेन युद्धामुळे एका बॅरलची किंमत १३९.१३ डॉलर झाली होती.

फ्लेक्स फ्यूएल वाहन उत्पादनाला प्रोत्साहन का गरजेचे?

सध्या पश्चिम आशियात युद्ध सुरू असल्याने पु्न्हा एकदा तेल संकट आले आहे. भारताने ब्राझील मोडेलचा विचार करायला हवा, असे ग्रेन इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सीके जैन यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, “सरकारने ऑटो इंडस्ट्री आणि ऑइल मार्केटिंग कंपन्यांबरोबर काम करायला हवे. इथेनॉलचे मिश्रणाचे प्रमाण २० ते ३० टक्के वाढवण्यावर भर द्यायला हवा. तसेच १०० टक्के हायड्रोस अल्कोहोलवर धावणाऱ्या फ्लेक्स फ्युएल वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन द्यायला हवे. आपल्याकडे E30 व E100 इंधनासाठी स्वतंत्र पंप असायला हवे.”

२०१३-१४ मध्ये डिस्टिलरीज मधून ३८ कोटी लीटर इथेनॉल इंधनात मिश्रणासाठी ऑइल मार्केटिंग कंपन्यांना पाठवण्यात आले होते. २०२४-२५ मध्ये १०३९ कोटी लीटर इथेनॉल ऑइल मार्केटिंग कंपन्यांना देण्यात आले. इथेनॉलची निर्मिती साखर कारखाने, मका, तांदूळ व शेतातील टाकाऊ मालापासून केली जाते.

“९० टक्के तेल आपल्याला आयात करावे लागते”

“आपल्याकडे पुरेसे खनिज तेल नाही. ९० टक्के तेल आपल्याला आयात करावे लागते, हे सर्वात आधी आपण लक्षात घ्यायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे इंटर्नल कम्बशन इंजिन बदलण्यावर मर्यादा आहेत. किती इलेक्ट्रिक वाहनांत आपण बदल करू शकतो त्यावर मर्यादा आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे ऊस, तांदूळ आणि मका उत्पादनात आपण अग्रेसर आहोत. E30 आणि E-100 इंधन निर्मिती आपण वाढवू शकतो”, असे त्रिवेणी इंजिनियरिंग अँड इंडस्ट्रिज लिमिटेडचे उपसंचालक आणि कार्यकारी संचालक तरूण साहनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला म्हणाले. नवीन वाहने फ्लेक्स फ्युएलवर चालतील अशी तयार केली पाहिजे. सरकारने वाहनांमध्ये बदल करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. इथेनॉल मिश्रित इंधनाचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल यावर सरकारने भर द्यायला हवा, असे साहनी म्हणाले.