-डॉ. प्राची मोघे
भारतीय संस्कृती आणि परंपरेचा पाया ज्या ग्रंथांवर उभा राहिला, त्यात ‘उपनिषदां’चे स्थान सर्वोच्च आहे. विश्वाच्या रहस्याचा आणि सत्याच्या शोधाचा एक अद्भुत प्रवास आहे. स्व, विश्व आणि विश्वनियंता यांतील परस्पर संबंध यांचा धांडोळा उपनिषदात घेण्यात आला आहे. तीन हजार वर्षांपूर्वी रचलेल्या या उपनिषदांचा आजच्या जगात काही उपयोग आहे का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. आज आपण भौतिक, बाह्य प्रगती केलेली असली तरी आंतरिक सुख आणि शांती गमावून बसलो आहोत. उपनिषदे आपल्याला ‘स्व’कडे वळायला शिकवतात. आजच्या व्यवस्थापन युगातील मार्गदर्शक तत्त्वे आपण पाश्चात्त्य विचारप्रणालीनुसार शिकतो, परंतु उपनिषदातही व्यवस्थापनशास्त्रातील मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि ती भारतीय ज्ञान प्रणालीच्या एकात्म विचारप्रणालीवर आधारित आहेत. सर्वात्मका विश्वेश्वराकडे सर्वभूतहिताची प्रार्थना उपनिषदात आहे, जी आपल्याला ज्ञानेश्वरांच्या पसायदानातही दिसते. उपनिषदांतील व्यवस्थापनशास्त्रातील तत्त्वे ‘सर्वांचे कल्याण’ या सूत्रावर यावर आधारित आहेत.

१. ईशावास्योपनिषद: संसाधनांचे व्यवस्थापन’

‘शाश्वत उपभोग आणि त्याग’ (Sustainable Management)

हे उपनिषद आकाराने खूप लहान (केवळ १८ मंत्र) असले तरी व्यवस्थापनाच्या दृष्टीने ते अत्यंत प्रभावी आहे. हे उपनिषद पहिल्याच श्लोकातून व्यवस्थापनाचे एक उत्तम मॉडेल मांडते: “तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्यस्विद्धनम्” ; अर्थ: त्याचा (जगताचा) त्यागपूर्वक उपभोग घे, कोणाच्याही धनाच्या लोभात पडू नकोस.

व्यवस्थापन सूत्र

  • Detached Attachment: कुठल्याही गोष्टीत न गुंतणे, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा हा दृष्टीकोन असला पाहिजे.
  • Resource Management: संसाधने आपली नसून ती आपण फक्त वापरण्यासाठी घेतली आहेत, असा भाव ठेवल्यास ‘Sustainability’ (शाश्वतता) येते.
  • Ethics: लोभ न धरता काम केल्याने भ्रष्टाचाराला आळा बसतो. व्यवस्थापकाने ‘ट्रस्टी’ (विश्वस्त) म्हणून काम करावे, मालक म्हणून नाही. कंपन्यांमध्ये किंवा संस्थांमध्ये संसाधने (Resources) मर्यादित असतात. हा मंत्र शाश्वतता (‘Sustainability’ ) शिकवतो. व्यवस्थापकाने स्वार्थासाठी संसाधनांचा अतिवापर न करता सर्वांच्या हितासाठी त्यांचा वापर करावा.

२. कठोपनिषद: ‘निर्णयक्षमता आणि निवड’

कठोपनिषदात नचिकेत आणि यमराज यांच्यातील संवाद हा ‘Management Choice’ बद्दल खूप काही सांगून जातो: “अन्यच्छ्रेयोऽन्यदुतैव प्रेयस्ते…” – यात यमराज दोन मार्गांबद्दल सांगतात: श्रेय आणि प्रेय.

मार्ग उपयोगस्वरूपव्यवस्थापनात उपयोग
प्रेयजे तात्काळ आनंद देते, दिसायला सोपे असतेशॉर्ट- कट शोधणे, अल्पकालीन नफा पाहणे (Short- term gain).
श्रेयजे कल्याणकारी आहे पण सुरुवातीला कठीण वाटतेदीर्घकालीन धोरणे, ब्रँड व्हॅल्यू , आणि नैतिक नफा

एक उत्तम व्यवस्थापक तोच असतो जो ‘प्रेय’च्या मोहात न पडता ‘श्रेय’ची निवड करतो.

३. तैत्तिरीय उपनिषद: ‘प्रभावी संवाद’ (Effective Communication)

संवादाच्या प्रक्रियेला उपनिषदांनी ‘संधी’ म्हटले आहे. यात पाच घटक महत्त्वाचे मानले आहेत:
१. पूर्वरूप : वक्ता (Speaker)
२. उत्तररूप: श्रोता (Listener)
३. संधी:विषय (Message)
४. संधानम् : बोलण्याची पद्धत (Medium)
५. विद्य : समज (Understanding)
व्यवस्थापन सूत्र : जोपर्यंत वक्ता आणि श्रोता यांच्यात ‘विद्य’ (समान समज) निर्माण होत नाही, तोपर्यंत संवाद अपूर्ण आहे. कॉर्पोरेट जगात चुकीचा संवाद (Miscommunication) टाळण्यासाठी हे सूत्र अत्यंत उपयुक्त आहे.

४. मुंडक उपनिषद : ‘कौशल्य आणि ज्ञान’ (Skill vs. Knowledge)

मुंडक उपनिषदात दोन प्रकारच्या विद्या सांगितल्या आहेत : ‘अपरा विद्या’ आणि ‘परा विद्या’.
अपरा विद्या : तांत्रिक कौशल्य, माहिती, डेटा आणि साधने.
परा विद्या : आत्मज्ञान, विवेक आणि मूल्यांची जाण.
आजच्या भाषेत याला Hard Skills आणि Soft Skills म्हणता येईल. केवळ तांत्रिक ज्ञान (Hard Skills) असून चालत नाही, तर माणसांना हाताळण्याचे कौशल्य आणि विवेक (Soft Skills) असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

या प्रमुख उपनिदाबरोबरच इतर उपनिषदांतील काही वाक्ये /सूत्रे )पुढीलप्रमाणे-

१. आत्मानं विद्धि – स्व-व्यवस्थापन (Self-Management)

कोणत्याही संस्थेचे नेतृत्व करण्यापूर्वी स्वतःचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. उपनिषदे ‘स्व’ला (Self) ओळखण्यावर भर देतात. जोपर्यंत व्यवस्थापकाला स्वतःच्या बलस्थानांची (Strengths) आणि कमतरतांची जाणीव नसते, तोपर्यंत तो इतरांना प्रभावीपणे मार्गदर्शन करू शकत नाही.

२. संघशक्ती आणि सहकार्य (Teamwork)

‘सह नाववतु | सह नौ भुनक्तु |’ या शांतीपाठातून टीमवर्कचा सर्वात मोठा संदेश मिळतो.
अर्थ: आपण सोबत संरक्षण मिळवूया, सोबत उपभोग घेऊया आणि सोबत पराक्रम करूया. आपल्यात कधीही द्वेष नसावा. आधुनिक भाषेत याला ‘Win-Win’ संस्कृती म्हणतात, जिथे संपूर्ण टीम एकाच ध्येयासाठी एकत्र काम करते.

३. दृष्टी आणि ध्येय (Vision and Goal)

उपनिषदांमध्ये ‘उत्तिष्ठ, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत’- उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका . हा संदेश दिला आहे. याचा अर्थ असा आहे की स्पष्ट ध्येय निश्चिती आणि ते साध्य करण्यासाठी सततचा प्रयत्न.
व्यवस्थापनात ‘Vision Statement’ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जे कर्मचाऱ्यांना दिशा दाखवते.

४. नैतिक नेतृत्व (Ethical Leadership)

सत्यं वद | धर्मं चर |'(तैत्तिरीय उपनिषद)
याचा अर्थ असा की नेहमी सत्य बोला आणि कर्तव्याचे (धर्माचे) पालन करा.
‘Corporate Governance’ मध्ये पारदर्शकता आणि नीतिमत्ता (Ethics) पाळणे हे दीर्घकालीन यशासाठी अनिवार्य आहे.

उपनिषदांनुसार ‘मानवी संसाधने’-Human Resources

उपनिषदांनी मानवी मनाचे विश्लेषण करण्यासाठी ‘रुपक’ वापरले आहे, जे ‘Decision Making’ समजून घेण्यासाठी उत्तम आहे:

घटकउपनिषदातील प्रतीकव्यवस्थापकीय भूमिका
आत्मारथाचा मालककंपनीचे व्हिजन/ मालक
बुद्धीसारथीव्यवस्थापक (Manager)
मनलगामनियंत्रण यंत्रणा (Manager)
इंद्रियेघोडेकर्मचारी/ संसाधने
शरीररथसंस्था(Organization)

उपनिषदांमधील व्यवस्थापन हे केवळ नफ्यावर आधारित नसून ते सर्वेऽपि सुखिनः सन्तु’ (सर्वांचे कल्याण व्हावे) या कल्पनेवर आधारित आहे. जेव्हा एखादी संस्था लोककल्याणाचा विचार करते, तेव्हा ती नैसर्गिकरित्या प्रगती करते. उपनिषदांमधील सर्वभूतहितरत व्यवस्थापनशास्त्रातील तत्त्वे शाश्वत आहेत.

आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि परिणामकेंद्रित युगात व्यवस्थापन म्हणजे केवळ नफा, कार्यक्षमता किंवा यश इतक्यावर मर्यादित राहू नये, हीच उपनिषदांची मूलभूत शिकवण आहे. उपनिषदांमधील व्यवस्थापन आणि नेतृत्व संकल्पना या मूल्याधिष्ठित, मानवकेंद्रित आणि दीर्घकालीन कल्याणावर आधारलेल्या आहेत. ‘स्व’चे भान, विवेकपूर्ण निर्णय, नैतिकता, सहकार्य आणि सर्वभूतहिताचा विचार हे घटक आजच्या नेतृत्वासाठी अधिकच आवश्यक झाले आहेत. म्हणूनच उपनिषदांतील विचार हे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित न राहता, आधुनिक व्यवस्थापन, कॉर्पोरेट संस्कृती आणि सार्वजनिक जीवनासाठीही मार्गदर्शक ठरतात. भारतीय ज्ञानपरंपरेतून प्रेरणा घेतलेले असे नैतिक आणि संवेदनशील नेतृत्वच भविष्यात शाश्वत, समतोल आणि मानवी समाज घडवू शकते.