Volcano Erupts After 12000 Years इथिओपियामध्ये एका मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. जवळपास १२ हजार वर्षांत सुप्तावस्थेत असलेला हा ज्वालामुखी पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांची चिंता वाढली आहे. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर राख आणि सल्फर डाय-ऑक्साइडचा मोठा लोट १४ किलोमीटरपर्यंत आकाशात पसरला. रविवारी अनेक तास या ज्वालामुखीचा उद्रेक सुरू होता.
सध्या या ज्वालामुखीचा उद्रेक थांबला आहे. पण त्यामुळे भारत, पाकिस्तान, तसेच इतर अनेक देशांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र, या उद्रेकातून बाहेर पडलेल्या राखेचे दाट ढग वेगवेगळ्या देशांच्या दिशेने जात आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकामागील कारण काय? या उद्रेकाने भारताची चिंता का वाढवली? त्याविषयी सविस्तर समजून घेऊयात…
ज्वालामुखीच्या उद्रेकाने वाढवली चिंता
हवामानविषयक उपग्रह या राखेच्या ढगावर लक्ष ठेवून आहेत. कारण- ते ‘हॉर्न ऑफ आफ्रिका’ ओलांडून पुढे सरकत आहेत. ज्वालामुखीचा हा धूर सामान्य वाटू शकतो; परंतु प्रत्यक्षात ही ज्वालामुखीची राख आहे, ज्यामध्ये काचसदृश लहान कण असतात. टूलूझ येथील ‘Toulouse Volcanic Ash Advisory Centre – VAAC’ने सांगितले की, ज्वालामुखीमुळे निर्माण झालेले हे राखेचे ढग येमेन, ओमान, भारत व उत्तर पाकिस्तानच्या दिशेने वेगाने सरकत आहेत.
इथिओपिया आणि भारत यांच्यातील हवाई प्रवासाचे अंतर सुमारे ४,३०० किलोमीटर आहे. हा ‘हायली गुब्बी’ ज्वालामुखी इथिओपियाच्या अफार प्रांतात राजधानी अदिस अबाबापासून सुमारे ८०० किलोमीटर (५०० मैल) ईशान्येस, एरिट्रियाच्या सीमेजवळ आहे. हा उद्रेक भारतापासून हजारो किलोमीटर दूर झाला असला तरी भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना इशारा दिला आहे की, त्यांनी या मार्गापासून आणि प्रभावित उंचीपासून दूर राहावे.
इथिओपियातील ज्वालामुखीची राख भारतातील विमानांना कशी प्रभावित करू शकते?
असा मोठा ज्वालामुखी उद्रेक झाल्यावर केवळ धूर बाहेर पडत नाही. तर त्यातून काच आणि खडकाचे कणदेखील बाहेर पडतात. हे कण अनेक दिवस हवेत तरंगू शकतात आणि वातावरणाच्या वरच्या थरातून दूरवरपर्यंत पसरू शकतात. व्यावसायिक विमाने ज्या उंचीवरून उडतात, त्याच उंचीवर हे कण तरंगत असतात. हे कण एखादी वस्तू कापली जाईल इतके तीक्ष्ण असतात आणि वैमानिकांना ते जवळजवळ दिसत नाहीत.
जेव्हा जेट इंजिन हे कण आत शोषून घेते, तेव्हा इंजिनाच्या आतील भागावर त्यांचा थर जमतो आणि काही वेळानंतर हे कण काचेसारखे घट्ट होतात. त्यामुळे हवेत असतानाच इंजिन बंद पडू शकते. मागील काही घटनांनी ही बाब किती धोकादायक असू शकते हे दाखवून दिले आहे. अशा काही घटना घडल्या आहेत की, राखेच्या न दिसणाऱ्या ढगातून प्रवास केल्याने विमानाची सर्व इंजिने काही सेकंदात बंद पडली आहेत. त्यामुळेच जागतिक विमान वाहतूक संस्था ज्वालामुखीच्या राखेला आकाशातील ‘माइनफील्ड’ मानतात.
भारतासाठी या उद्रेकाचा अर्थ काय?
मोसमी वाऱ्याच्या पद्धतींमुळे हा उद्रेक भारतासाठी महत्त्वाचा ठरतो. ३० ते ४० हजार फूट उंचीवर वारे राखेला पुढे ढकलू शकतात. हे वारे राखेला अरबी समुद्रावरून पूर्वेकडे वळवतात. मुंबई, दिल्ली, कोची, हैदराबाद व बंगळुरू येथून दुबई, दोहा, अबू धाबी, इस्तंबूल, नैरोबी आणि युरोपीय राजधान्यांना जोडणाऱ्या ठिकाणांकडे जाणाऱ्या विमानांकडून दररोज या मार्गांचा वापर केला जातो. या मार्गांवर राखेचा अगदी पातळ पट्टा जरी आला तरी विमान कंपन्यांना त्यांचा मार्ग बदलावा लागू शकतो, जो खर्चीक आणि वेळखाऊ असू शकतो.
राखेच्या ढगातील विमानांबाबतच्या दुर्घटना
- १९८२ मध्ये ब्रिटिश एअरवेजचे फ्लाईट ९ (बोईंग ७४७) इंडोनेशियातील माउंट गालुंगगुंगच्या (Mount Galunggung) राखेच्या ढगात शिरले. विमानाची चारही इंजिने तात्पुरती निकामी झाली आणि कॉकपिटची विंडशिल्ड खराब झाली; पण वैमानिकांनी इंजिने पुन्हा सुरू करून, सुरक्षित लँडिंग केले.
- त्यानंतर काही वर्षांनी १९८९ मध्ये अलास्काजवळील माउंट रेडआऊटच्या राखेच्या ढगात प्रवेश केल्यामुळे केएलएम फ्लाईट ८६७ चेदेखील असेच झाले. वैमानिकांनी विमानावर यशस्वीरीत्या नियंत्रण मिळवले आणि आपत्कालीन लँडिंग केले.
- १९९६ मध्ये कामचटकाच्या क्ल्युचेव्हस्कॉय ज्वालामुखीजवळ उड्डाण करणाऱ्या एअरोफ्लोट तू-१५४ (Aeroflot Tu-154) विमानाच्या इंजिनांना राखेच्या ढगात शिरल्यामुळे मोठे झटके बसले आणि विमानाची उपकरणे खराब झाली; परंतु तरीही विमान सुरक्षितपणे उतरले.
- २०१० मध्ये आईसलँडमधील अय्याफ्याल्लाजोकुल्ल ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे युरोपमधील हजारो उड्डाणे अनेक आठवड्यांसाठी विस्कळित झाली. त्यामुळे मोठा विलंब झाला; परंतु कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
ज्वालामुखीची राख भारतात पोहोचल्यास काय होईल?
भारताचे विमान वाहतूक अधिकारी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय या राखेवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जर राख भारतीय-व्यवस्थापित हवाई क्षेत्रात आली, तर अलर्ट जारी केले जाऊ शकतात, ज्यामुळे विमानांच्या मार्गात बदल, उंचीत बदल केले जाऊ शकतात किंवा विमाने रद्दही केली जाऊ शकतात. परिणामी, विमान कंपन्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी अरबी समुद्रावरून जाणारे लांबचे मार्ग निवडावे लागू शकतात, ज्यामुळे इंधन खर्च आणि प्रवासाचा वेळ अशा दोन्हींमध्ये वाढ होऊ शकते.
ज्वालामुखीच्या राखेमुळे विमान वाहतुकीत बदल केल्यास लांब पल्ल्याच्या विमानांना तांत्रिक थांबे घ्यावे लागतील किंवा प्रवासी / मालाचे वजन कमी करावे लागेल. विमाने उशिरा परतल्यास, कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे तास वाढल्यास देशांतर्गत वेळापत्रकांवरही याचा परिणाम होऊ शकतो. त्याचा आर्थिक दुष्परिणामदेखील होईल. जरी राख थेट भारतापर्यंत पोहोचली नाही, तरी तिचा दुष्परिणाम भारतीय प्रवाशांवर होऊ शकतो. दुबई किंवा दोहासारख्या मोठ्या विमानतळांच्या मार्गात राख वाहत आल्यास, तेथील कामकाज मंदावते. त्यामुळे तिकिटांचे दर वाढू शकतात आणि विमान कंपन्या अडथळे टाळण्यासाठी वेळापत्रकात बदल करू शकतात.
याचा परिणाम किती काळ राहू शकतो?
ज्वालामुखीचा हा उद्रेक दीर्घकाळ चालणाऱ्या उद्रेकाच्या टप्प्याची सुरुवात आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राखेच्या ढगाची उंची, कणांची घनता आणि वरच्या स्तरातील वाऱ्यांमध्ये होणारे बदल यांमुळे गोष्टी बदलू शकतात. उद्रेकात अचानक वाढ झाल्यास, राख ‘जेट-स्ट्रीम’ क्षेत्रापर्यंत अधिक उंच ढकलली जाऊ शकते. दुसरीकडे या भागात मोठा पाऊस पडल्यास, राख लवकर खाली बसू शकते आणि धोका टळू शकतो. या ज्वालामुखीच्या राखेमुळे आकासा एअर, इंडिगो व केएलएम रॉयल डच एअरलाइन्स यांसारख्या अनेक विमान कंपन्यांना विमानांच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
