होळी हा प्रसिद्ध भारतीय लोकोत्सव आहे. भारताच्या विविध भागांत होळी हा सण साजरा करण्याची परंपरा व पद्धती निरनिराळी आहे. म्हणूनच हा सण कधी होरी, हुताशनी, शिमगा, कामदहन, दोलोत्सव म्हणून ओळखला जातो. भारताच्या काही भागांत होळी ‘वसंतोत्सव’ या नावानेदेखील प्रसिद्ध आहे. वसंत ऋतूच्या आगमनार्थ ऋतुबदलाचा सोहळा होळी म्हणून साजरा केला जातो. प्राचीन ऐतिहासिक साहित्यात होळीचे अनेक संदर्भ सापडतात. १२ व्या शतकातील कवी हेमचंद्राने या सणाचा उल्लेख ‘सुगिम्हस’ (म्हणजेच सुग्रीष्मक) असा केलेला आहे. कोकण व गोव्यात प्रसिद्ध असणारा शिमगा किंवा शिग्मा हा या ‘सुगिम्हस’ शब्दाचाच अपभ्रंश मानला जातो.

आणखी वाचा : Holi 2024: गोऱ्यांनाही पडली होती भारतीय रंगांची भुरळ; युरोपियन पाहुण्यांनी होळीचे दस्तऐवजीकरण कसे केले?

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

होळीचा संबंध भारतीय तत्त्वज्ञानाशी आहे काय? कसा?

मुख्यतः होळी साजरी करण्याच्या विविध परंपरांचा आढावा घेतला असता या परंपरा दोन भागांत विभागल्या गेल्याचे लक्षात येते. एक म्हणजे उत्तरेकडील तर दुसरी दक्षिणेकडील. होळीचा इतिहास सांगताना नेहमीच श्रीकृष्णाच्या कथांचा व मदनदहनाचा दाखला दिला जातो. परंतु ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या कथांच्या दाखल्यामागेही प्रांतभेद प्रकर्षाने जाणवणारा आहे. इथे लक्षात घेण्याची बाब म्हणजे, हा प्रांतिक भेद कुठल्याही द्वेषातून नसून भारतीय तत्त्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर उत्पन्न झालेला आहे. भारतीय सांस्कृतिक तसेच धार्मिक परंपरांमध्ये नेहमीच शैव व वैष्णव या संप्रदायांचे प्राबल्य होते. या संप्रदायांतील परस्पर तात्त्विक वादातून मध्ययुगीन काळात वैष्णवांचे आधिपत्य उत्तर भारतात तर शैवांचे दक्षिण भारतात अधिक होते. व हाच भेद होळीच्या उत्पत्तिकथांमध्येही आढळून येतो हे येथे विशेष ध्यानात घेण्यासारखे आहे. उत्तरेकडील होळी-कथांना श्रीकृष्णाचा तर दक्षिणेकडील कथांना शिवाचा वारसा आहे.

आणखी वाचा : Holi 2024: ४०० वर्षांपूर्वी होळी कशी साजरी केली जात होती? काय आहे गुलाल गोटा परंपरा?

दक्षिणेतील होळी अर्थात मदनदहन

दक्षिणेकडे होळी ‘मदनदहन’ म्हणून प्रसिद्ध असून फाल्गुन शुद्ध पौर्णिमेपासून कधी पंचमीपर्यंत, तर कधी अमावास्येपर्यंत शिवमंदिरासमोर साजरी केली जाते. या उत्सवातून मदनदहन म्हणजेच कामवासनेचे दहन करून भोगाकडून योगाकडे जाण्याचा मार्ग निहित केला जातो. तसेच भविष्यपुराणात ढुंढुंला राक्षसिणीचा संदर्भ सापडतो. या संदर्भानुसार ढुंढुंला राक्षसिणीने शिव-पार्वती यांना प्रसन्न करून वर मागून घेतला होता. या वरानुसार देव, मानव कोणाचेही लहान बाळ तिला खाण्याची मुभा होती. परंतु शिवाने हे वर देताना घातलेल्या अटीनुसार शिवीगाळ करणारे, निर्लज्ज, जाळपोळ करणारे मूल तिला खाता येणार नव्हते. म्हणूनच होळीच्या दिवशी विशेष करून कोकणात शिव्या-आरोळ्या देण्याची पद्धत आहे असे मानले जाते.

आणखी वाचा : विश्लेषण : पाच हजार वर्षांपूर्वीची स्मार्ट शहरे नक्की होती तरी कशी? राखीगढीत मिळाले उत्तर…!

उत्तरेतील होरी

उत्तरेकडे होळीला ‘होरी’ म्हटले जाते व त्याच सोबत ‘फाग’ हा पारंपरिक शब्दप्रयोगदेखील केला जातो. होळी हा सण येथे फाल्गुन महिन्यात साजरा केला जात असून फाल्गुन महिन्याचा उल्लेख उत्तर भारतात ‘फागुन’ असा होतो. ‘फाग’ म्हणजे ‘फल्गु’ व ‘फल्गु’ म्हणजे गुलाल. म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत गुलाल उधळून जो सण साजरा केला जातो तो म्हणजे ‘फाग’ किंवा ‘होरी’. उत्तरेकडील होळी ही श्रीकृष्णकथांशी निगडित आहे. श्रीकृष्ण व होळी यांचा निकटचा संबंध समजून घेण्यासाठी बंगाल व ओरिसा येथील ‘फल्गुत्सव’ किंवा ‘दोलोत्सव’ अनुभवणे गरजेचे ठरते.

भागवत परंपरेतील होरी

बंगालमध्ये भागवत परंपरेतील चैतन्य महाप्रभू यांच्या प्रभावामुळे ‘होरी’ किंवा ‘दोलोत्सव’ हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी सकाळी श्रीकृष्णाची तर सायंकाळी अग्नीची पूजा केली जाते. होळीच्या दिवशी सकाळी बाळकृष्णाला पाळण्यात झुलवण्यात येते. ‘डोला’ किंवा ‘दोला’ म्हणजे झोका. या वेळी झोके देऊन पाळण्यातल्या बाळकृष्णला गुलाल लावण्यात येतो. तर सायंकाळी गवताची मानवाकृती करून तिचे दहन केले जाते.

होळी आणि मधुराभक्ती

बंगाल व ओरिसा या भागात होळीच्या सकाळी कृष्णासभोवती गोपनृत्य सादर होते. या पारंपरिक खेळात कृष्ण, गवळणी, कृष्णाचे सवंगडी फेर धरतात. विशेष म्हणजे पुरुष भक्त हे गवळणीच्या रूपात ‘रास’ खेळताना दिसतात. हे भक्तिसंप्रदायातील भक्तीचे उच्चतम उदाहरण मानले जाते. साक्षात ईश्वराला ‘पती’ किंवा ‘प्रेमी’ मानून आपल्या प्रेमातून भक्ती प्रकट केली जाते. अशा स्वरूपाच्या भक्तीला मधुरा किंवा उज्ज्वलाभक्ती असेही म्हटले जाते. अशा स्वरूपाच्या भक्तीत श्रीकृष्ण हा एकमेव पुरुष असून इतर जीव आपला लिंगभेद विसरून पत्नी किंवा प्रेयसीप्रमाणे त्याची आराधना करतात. या मधुराभक्तीची पाळेमुळे बंगालमध्ये उत्पन्न झालेल्या वैष्णव ‘सहजिया पंथात’ असल्याचे काही अभ्यासक मानतात.

तळकोकणात उत्तर – दक्षिण भारताचा सांस्कृतिक संगम

विशेष म्हणजे कमी-अधिक फरकाने अशा स्वरूपाची होळी तळकोकणातही अनुभवास मिळते. तळकोकणात काही ठिकाणी होळीला ‘फाग’ असे नामाभिधान आहे. श्रीकृष्ण, गवळण नाचविणे हे खेळ कोकणातील शिमगोत्सवाचा अविभाज्य भाग आहेत. विशेष म्हणजे शिमगोत्सवातील गवळण ही स्त्री-रूपातील पुरुष असून होळीच्या दिवशी गायल्या जाणाऱ्या लोकगीतांना येथे फागगीते असेही म्हटले जाते. तर दाक्षिणात्य परंपरेनुसार शिमगोत्सवात मारल्या जाणाऱ्या आरोळ्या या दक्षिणी परंपरांचा प्रभाव सांगतात. होळीच्या रूपाने बंगाल व कोकण किनारपट्टी तसेच उत्तर व दक्षिण यांचा महाराष्ट्राच्या भूमीत साधणारा हा सांस्कृतिक बंध नक्कीच भारतीय संस्कृतीतील विविधतेत एकता दर्शविणारा आहे.