Why Europe Does Not Have Air Conditioning: उष्णतेच्या लाटा वाढत असूनही, समृद्ध युरोपमध्ये वातानुकूलन यंत्रणा (एअर कंडिशनर) बसविण्याबाबत अनिच्छा दिसून येते. यामागे आर्थिक, पारंपरिक कारणे तर आहेतच, पण एसी बसविण्यासाठी परवानग्याच दिल्या जात नाहीत. त्यामुळे एसीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे…
युरोप ‘हिट डोम’ च्या तडाख्यात; परिस्थिती काय?
युरोपला सध्या प्रचंड उष्णतेचा तडाखा बसत आहे. फ्रान्समध्ये १९४७ पासून तापमानाची नोंद सुरू झाल्यानंतरचा सर्वाधिक उष्ण दिवस जूनमध्ये नोंदवला गेला आहे. स्पेन, इटली आणि जर्मनीच्या अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. फ्रान्स, बेल्जियम आणि ब्रिटनमधील अनेक शाळा उष्णतेमुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत. तीव्र उष्णतेमुळे वीजवाहिन्या सैल पडणे आणि रेल्वे रुळ वाकण्याचा धोका निर्माण झाल्याने रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या. तसेच काही रुग्णालयांनी स्वतःच्या घरातील उष्णता सहन न होणाऱ्या रुग्णांसाठी चक्क वातानुकूलित प्रतीक्षागृहांना तात्पुरत्या वॉर्डचे स्वरूप दिले आहे. या उष्णतेमुळे शेकडो जणांचा मृत्यू झाल्याचाही संशय आहे, पण मृतांचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
उकाड्यातही एअर कंडिशनरचा वापर कमी का?
गेल्या अनेक वर्षांपासून उष्णतेच्या लाटा वाढत असल्याचे इशारे दिले जात असतानाही, समृद्ध युरोपमध्ये वातानुकूलन यंत्रणा (एअर कंडिशनर) स्वीकारण्याबाबत अनिच्छा दिसून येते. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या (IEA) माहितीनुसार, युरोपमधील पाचपैकी केवळ एका घरात एसी आहे. त्याउलट अमेरिकेत सुमारे ९० टक्के घरांमध्ये एसी आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे युरोपचे पारंपरिक हवामान. अलीकडच्या काळापर्यंत युरोपमधील बहुतांश भागांना एसीची गरजच भासत नव्हती. पूर्वी युरोपमधील शहरांमध्ये तीव्र उष्णता दीर्घ काळ टिकत नव्हती. बहुतेक वेळा हवामान थंडच होते. त्यामुळे इमारतींच्या बांधकामाचे नियम हिवाळ्यात उष्णता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने तयार झाले.
युरोपचे बदलते हवामान वास्तव
आज मात्र हाच सांस्कृतिक वारसा अडचणीचा ठरत आहे. जुन्या इमारती, जाड भिंती आणि लहान खिडक्यांसह बांधल्या गेल्याने त्या हिवाळ्यात उपयुक्त ठरत असल्या, तरी ४० अंश तापमानाच्या उन्हाळ्यात त्या त्रासदायक ठरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, नव्या इमारतींमध्येही नैसर्गिक प्रकाश आणि ऊर्जा बचतीवर भर देताना मोठमोठ्या काचेच्या दर्शनी भागांना प्राधान्य देण्यात आले. मात्र उन्हाळ्यात या काचेच्या इमारती भयंकर तापतात. जागतिक हवामान संघटना (WMO) आणि कोपर्निकस हवामान बदल सेवा यांच्या अहवालानुसार, युरोप हा जगातील सर्वाधिक वेगाने तापणारा खंड असून, जागतिक सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट वेगाने येथे तापमान वाढत आहे.
एसी बसवण्यासाठी परवानग्याच नाहीत?
ज्या कुटुंबांना एसी बसवायचा असतो, त्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. भारतात वापरल्या जाणाऱ्या स्प्लीट एसीसाठी इमारतीच्या बाहेर कंडेन्सर (आऊटडोर युनिट) बसवावा लागतो. मात्र युरोपमधील अनेक शहरांमध्ये वारसा संवर्धन आणि सौंदर्य जपण्यासाठीचे कठोर नियम असल्याने यासाठी सहज परवानगी मिळत नाही.
ब्रिटनमधील एका एसी बसवणाऱ्या कंपनीच्या संचालकांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, ऐतिहासिक किंवा वारसा क्षेत्रातील इमारतींचे सौंदर्य बिघडू शकते या कारणावरून बाहेरील युनिट बसविण्याचे अर्ज अनेकदा नाकारले जातात.
पॅरिसमध्येही ऐतिहासिक इमारतींच्या भिंतीना छिद्र करून एसी बसवण्यास साधारणपणे परवानगी दिली जात नाही. त्यामुळे एसीसाठी परवानगी मिळवण्याचे नियम जगातील सर्वाधिक गुंतागुंतीच्या नियमांपैकी मानले जातात. परवानगी मिळाली तरी खर्च मोठा असतो. चीनची सर्वात मोठी एसी उत्पादक कंपनी मिडियाने ‘सीएनएन’ला सांगितले की, युरोपमध्ये एसी बसविण्याचा खर्च १,००० युरोपेक्षा जास्त येऊ शकतो. हा खर्च अनेक कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जातो.
याशिवाय युरोपमध्ये (विशेषतः उद्योगांसाठी) वीजही महाग आहे. एका पोर्टेबल एसी वापरणाऱ्या व्यक्तीने बीबीसीला सांगितले की, एसी चालू ठेवल्यास त्याला तासाला सुमारे २२ पेन्स, म्हणजे दिवसाला जवळपास ५ पौंड खर्च येतो. हिवाळ्यात उष्णता आणि उन्हाळ्यात थंडावा देणारा एअर-टू-एअर हीट पंप हा अधिक पर्यावरणपूरक पर्याय मानला जातो. मात्र सरकारी अनुदान मिळूनही तो बसविण्यास ४,००० ते १०,००० पौंड खर्च येतो. त्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी काही आठवडे उष्णता सहन करणेच अधिक परवडते.
युरोपमध्ये एसीवरून राजकारण?
युरोपमध्ये एसी हा राजकीय वादाचाही विषय बनला आहे. फ्रान्समधील उजव्या विचारसरणीच्या नेत्या मरीन ले पेन यांनी संपूर्ण देशभर एसीची व्यवस्था वाढवण्याची मागणी केली. तर डाव्या विचारसरणीचे नेते जाँ-लुक मेलांशॉं यांनी या कल्पनेला विरोध करत, सर्वत्र एसी बसवल्यास हवामान बदलाचे संकट अधिक गंभीर होईल, असा इशारा दिला. मात्र हा वाद केवळ उजवे विरुद्ध डावे असा नाही. शेड दी यूके या संस्थेनुसार, सर्वसामान्यांना थंडावा मिळावा ही मागणी सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक समानतेच्या दृष्टीने डाव्या विचारसरणीकडूनही केली जाते. दुसरीकडे, उत्पादकता आणि आराम यासाठी पुराणमतवादी गटही एसीला पाठिंबा देतात. त्याचप्रमाणे एसीला विरोध करणाऱ्यांमध्ये ऐतिहासिक इमारती जपण्याची भूमिका घेणारे पुराणमतवादी आणि हरितगृह वायूंची चिंता करणारे पर्यावरणवादी दोघेही आहेत.
युरोपीय नागरिकांचा दृष्टिकोन अनास्थेचा?
राजकारणापलीकडेही युरोपमध्ये एसीबद्दल एक प्रकारची अनास्था आहे. ‘दि अटलांटिक’मधील एका लेखात थॉमस चॅटरटन विल्यम्स यांनी युरोप आणि अमेरिकेतील सांस्कृतिक फरक स्पष्ट केला आहे. त्यांच्या मते, अमेरिकन लोक तापमानामुळे होणाऱ्या त्रासाकडे ‘ती एक सोडवता येण्यासारखी समस्या’ म्हणून पाहतात; तर युरोपियन लोक तो ‘सहन करण्यासारखा अनुभव’ मानतात. अमेरिकेत सर्वत्र असलेला एसी युरोपियन लोकांना अनेकदा चैनीचा आणि अति सुखसोयींचा भाग वाटतो. युद्ध, पारतंत्र्य आणि तीव्र दारिद्र्याच्या आठवणी अजूनही त्यांच्या सामूहिक स्मरणात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पर्यावरणाची चिंता कारणीभूत?
पर्यावरणाची काळजीही यामागे महत्त्वाची आहे. एएफपीने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, फ्रान्समधील १० पैकी ८ जणांना एसी पर्यावरणासाठी हानिकारक वाटतो. ही चिंता निराधार नाही. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या अंदाजानुसार, जगातील एकूण वीज वापरापैकी सुमारे ७ टक्के वीज थंडावा निर्माण करण्यासाठी वापरली जाते. युरोस्टॅटच्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये युरोपियन संघातील इमारती थंड ठेवण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा वापर मागील वर्षाच्या तुलनेत १५ टक्क्यांहून अधिक वाढला, तर उष्णता निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचा वापर कमी झाला. तथापि, एसीचा पर्यावरणावर होणारा परिणाम तो कोणत्या प्रकारच्या विजेवर चालतो यावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, फ्रान्समध्ये जवळपास ७० टक्के वीज अणुऊर्जा प्रकल्पांमधून मिळते. त्यामुळे तेथील एसीचा पर्यावरणावर परिणाम जीवाश्म इंधनावर आधारित वीज वापरणाऱ्या भागांच्या तुलनेत कमी असतो.
किती एसींची खरेदी?
जसजसा उष्णतेचा कहर वाढत आहे, तसतशी युरोपमध्ये एसीबाबतची अनास्था झपाट्याने कमी होत आहे. कॅरफूर या सुपरमार्केट साखळीने सांगितले की, अलीकडेच एके दिवशी ३० हजार कूलिंग युनिट्सची विक्री झाली. हे प्रमाण नेहमीच्या दिवसापेक्षा सुमारे हजारपट अधिक होते. अॅमेझॉनवर एसीची विक्रीही गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाली. सॅमसंग, मिडिया आणि मित्सुबिशी इलेक्ट्रिक या कंपन्यांनी फ्रान्स, स्पेन, ब्रिटन आणि जर्मनीमध्ये विक्रीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले. विशेषतः यंदाच्या मे महिन्यात स्पेन आणि फ्रान्सला झालेली एसीची निर्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत १०८ टक्क्यांनी वाढली. आयईएच्या अंदाजानुसार, युरोपियन संघात २०१९ च्या तुलनेत २०५० पर्यंत एसीची संख्या दुप्पट होऊन सुमारे २७.५ कोटी होऊ शकते. फ्रान्सने शाळा आणि बालसंगोपन केंद्रांमध्ये वातानुकूलन व्यवस्था उभारण्यासाठी ८ कोटी युरो देण्याची घोषणा केली आहे. तर जर्मनीतील बर्लिन राज्याने गेल्या नोव्हेंबरमध्ये पहिला हीट अॅक्शन प्लॅन मंजूर केला.
एसीचा वापर वाढल्याचा परिणाम काय?
संशोधकांनी इशारा दिला आहे की, युरोपच्या वाढत्या उष्णतेवर केवळ एसी हा एकमेव उपाय ठरू शकत नाही. एसी वापराचे प्रमाण वाढले तर इमारतींबाहेर रस्त्यावरील तापमान आणखी वाढू शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. २०२० मध्ये एन्व्हायर्नमेंटल रिसर्च लेटर्स या नियतकालिकात फ्रेंच संशोधन संस्था CIREDचे संशोधक व्हिन्सेंट विगीए यांच्या नेतृत्वाखालील एका अभ्यासात असे म्हटले आहे की एसीमुळे इमारतीबाहेरील रस्त्यांवरील तापमान आणखी वाढू शकते. पॅरिसमधील एका भागाच्या संगणकीय मॉडेलमध्ये असे दिसून आले की, एसीमुळे रस्त्यावर तीव्र उष्णतेचा सामना करण्याचा कालावधी दररोज सरासरी २० मिनिटांनी वाढतो.
CIREDच्या आणखी एका अलीकडील अभ्यासात, ल्योन शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात इमारतींच्या बाहेर बसवलेल्या एसी युनिट्समुळे स्थानिक बाह्य तापमान १.७५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते, असे आढळले. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, शहरांनी सर्वसमावेशक उपाययोजना करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी एसीची गरज असेलच; मात्र त्याचबरोबर शहरांमध्ये हरित क्षेत्र वाढवणे, पायाभूत सुविधांसाठी आधुनिक अभियांत्रिकी उपाय वापरणे, तसेच सूर्यप्रकाश अडवण्यासाठी खिडक्या-दरवाजांवर झडपा बसवणे, इमारतींमध्ये उष्णतारोधक व्यवस्था करणे आणि योग्य वायुवीजन राखणे अशा पारंपरिक उपायांचाही नियोजनात समावेश करणे तितकेच आवश्यक आहे.
manisha.devne@expressindia.com
