Europe heatwave: पश्चिम आणि मध्य युरोपच्या मोठ्या भागाला तीव्र आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या उष्णतेच्या लाटेने वेढले आहे. तापमान जूनमधील विक्रम मोडण्याच्या मार्गावर असल्याने हवामानतज्ज्ञांनी उच्चस्तरीय उष्णतेचे इशारे जारी केले आहेत.
तापमान किती वाढू शकते?
अँडोरा, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, लक्झेंबर्ग, स्लोव्हेनिया, स्पेन आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये सर्वोच्च स्तरावरील उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रिटन, फ्रान्स आणि स्पेनच्या काही भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सियस (१०४ अंश फॅरेनहाइट) किंवा त्याहून अधिक होण्याचा अंदाज आहे. फ्रान्समध्ये देशाच्या निम्म्याहून अधिक भागात उष्णतेसाठी सर्वाधिक स्तराचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, या आठवड्यात पॅरिसमध्ये तापमान ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचू शकते. जून महिन्यात इतके तापमान यापूर्वी कधीही नोंदले गेलेले नाही.
फ्रान्समध्ये रेड अलर्ट!
फ्रान्सच्या हवामान विभागाने (मीटीओ फ्रान्स) २३ जून रोजी सांगितले की, १९४७ पासून नोंदी ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून देशाने सर्वाधिक उष्ण रात्र अनुभवली आहे. दिवस आणि रात्र दोन्ही वेळचे तापमान अपवादात्मकरित्या जास्त राहण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती काही दिवस कायम राहू शकते. मध्य आणि पश्चिम फ्रान्सच्या काही भागांत तापमान ४३ अंश सेल्सियस (सुमारे १०९ अंश फॅरेनहाइट) पर्यंत जाण्याची शक्यता आहे. उघड्यावर मद्यपान करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
स्पेनमध्ये पारा चाळीसपार…
स्पेनच्या हवामान विभागाने (AEMET) सांगितले की देशाच्या विस्तीर्ण भागांत तापमान ४० अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. सोमवारी २२ जून रोजी किमान सहा ठिकाणी तापमान ४० अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. दक्षिण स्पेनमधील अँदुहार येथे ४५.१ अंश सेल्सियस (११३.२ अंश फॅरेनहाइट) तापमानाची नोंद झाली.
ब्रिटनमध्ये इंग्लंड आणि वेल्सच्या बहुतांश भागांसाठी दुसऱ्या क्रमांकाचा ‘अंबर’ (ऑरेंज अलर्ट) उष्णता इशारा लागू आहे. ब्रिटनच्या हवामान विभागाने मंगळवारी २३ जून रोजी सांगितले की तापमान ३६ अंश सेल्सियस (सुमारे ९७ अंश फॅरेनहाइट) पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे १९७६ मध्ये नोंदवलेल्या जून महिन्यातील ३५.६ अंश सेल्सियस या सर्वोच्च तापमानाच्या विक्रमाला आव्हान मिळू शकते.
ब्रिटनमध्येही काहिली
२४ जूनपासून वेल्स तसेच मध्य आणि दक्षिण इंग्लंडमधील काही भागांसाठी, लंडनसह, अत्यंत उष्णतेची दुर्मीळ ‘रेड वॉर्निंग’ लागू होणार आहे. येथे तापमान ३८ ते ४० अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते. जर तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले, तर वर्षाच्या इतक्या सुरुवातीच्या काळात नोंदवला गेलेला तो सर्वाधिक उष्ण दिवस ठरेल. १८८४ पासून नोंदी ठेवण्यास सुरुवात झाल्यानंतर ब्रिटनमध्ये फक्त एकदाच ४० अंशांहून अधिक तापमान नोंदवले गेले आहे. जुलै २०२२ मध्ये पूर्व इंग्लंडमधील लिंकनशायर येथे ४०.३ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते.
‘हीट डोम’मुळे सगळे हवालदिल?
हवामानतज्ज्ञांच्या मते, युरोपच्या मुख्य भूभागावर स्थिरावलेल्या उच्च-दाबाच्या हवामान प्रणालीमुळे किंवा ‘हीट डोम’मुळे ही उष्णता निर्माण झाली आहे. हीट डोम ही एक तीव्र हवामानाची स्थिती आहे. या स्थितीत वातावरणात उच्च-दाबाचे क्षेत्र तयार होते. हे क्षेत्र एखाद्या झाकणासारखे किंवा घुमटासारखे काम करते आणि उष्ण हवेला वर जाण्यापासून रोखते. यामुळे ती गरम हवा खालीच अडकून राहते आणि भूप्रदेशावरील तापमान प्रचंड वाढते. या परिस्थितीमुळे उत्तर आफ्रिकेतील गरम हवा युरोपभर पसरत आहे. दीर्घकाळ टिकणारा प्रखर सूर्यप्रकाश आणि या प्रणालीखाली दाबली जाऊन अधिक तापलेली हवा यामुळे तापमान हंगामी सरासरीपेक्षा सुमारे १० अंश सेल्सियस (१८ अंश फॅरेनहाइट) अधिक झाले आहे.
गेल्या आठवड्याच्या मध्यात ही उष्णतेची लाट सुरू झाली. त्याआधी मे महिन्यातही अशीच उष्णतेची लाट आली होती आणि त्या काळातील अनेक विक्रम मोडले गेले होते. बदलत्या हवामानामुळे अशा उष्णतेच्या लाटा अधिक वारंवार येत असल्याचे मीटीओ फ्रान्सने नमूद केले आहे.
युरोप झपाट्याने का तापत आहे?
एखाद्या विशिष्ट उष्णतेच्या लाटेचा थेट संबंध हवामान बदलाशी जोडण्यासाठी सखोल अभ्यास आवश्यक असतो. मात्र जगभरातील उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र, अधिक वारंवार आणि अधिक काळ टिकणाऱ्या असल्याबाबत शास्त्रज्ञांमध्ये कोणतेही दुमत नाही. युरोप हा जगातील सर्वाधिक वेगाने तापणारा खंड आहे. २०२५ मध्ये जवळपास संपूर्ण युरोपमध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. संशोधकांच्या अंदाजानुसार, गेल्या काही वर्षांत युरोपमध्ये दरवर्षी उष्णतेशी संबंधित कारणांमुळे हजारो नव्हे तर दहा हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपमधील अनेक घरे, शाळा आणि व्यावसायिक इमारती पूर्वीच्या थंड हवामानाचा विचार करून बांधण्यात आल्या आहेत. ब्रिटनमधील अनेक घरे तर उष्णता टिकवून ठेवण्यासाठीच बांधली गेली असल्याने उष्णतेच्या लाटेदरम्यान घर थंड ठेवणे अधिक कठीण होते. वातानुकूलन (एअर कंडिशनिंग) हादेखील सोपा उपाय नाही.
फ्रान्समध्ये एसी बसवण्याचा विषय राजकीय वादाचा मुद्दा बनला आहे, तर ब्रिटनमध्ये वीजदर जास्त असल्याने अनेक लोक एसी वापरणे टाळतात. भूमध्य समुद्र किनाऱ्यावरील उष्ण शहरांमध्येही पारंपरिक अंगणे, जाड खिडकीपट आणि पांढऱ्या दगडी भिंती घरे थंड ठेवण्यास मदत करतात. मात्र अनेक नव्या इमारती अशा पद्धतीने बांधल्या गेल्या आहेत की त्यामध्ये उष्णता अडकून राहते.
उष्णतेपासून बचाव कसा करावा?
उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी शरीर थंड ठेवणे आणि पुरेसे पाणी पिणे या दोन सर्वांत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याशिवाय पुढील उपाय उपयुक्त ठरू शकतात : घरातील, विशेषतः दुपारचे ऊन येणाऱ्या खिडक्यांवर दिवसाच्या वेळी चादर किंवा गडद रंगाचे कापड लावून उष्णता आत येण्यापासून रोखणे. रात्री खिडक्या उघड्या ठेवणे आणि हवा खेळती राहण्यासाठी पंखे चालू ठेवणे. त्वचेवर थंड किंवा खोलीच्या तापमानाचे पाणी फवारणे. थंड पाण्याने अंघोळ केल्यानेही शरीराला गारवा मिळतो. बाहेर जाताना पाण्याच्या बाटलीत बर्फाचे तुकडे ठेवणे आणि थंड पेये पिणे. व्यायाम करताना डोक्यावर थंड पाणी ओतणे. पोहणे हा व्यायाम करण्यासोबतच शरीर थंड ठेवण्याचाही उत्तम मार्ग आहे. फिरायला किंवा पर्यटनासाठी जाताना संग्रहालये, कॅथेड्रल्स किंवा भूमिगत प्रदर्शनांसारखी थंड ठिकाणे निवडणे हा एक पर्याय आहे.
manisha.devne@expressindia.com
