हवामान बदलाचे परिणाम जगभर दिसू लागले आहेत. विशेषतः युरोपमध्ये त्याचे वाईट परिणाम आता दिसू लागले आहेत. संपूर्ण युरोपीयन खंड ५०० वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळाकडे वाटचाल करत आहे. इंग्लंडलाही दुष्काळाच्या झळा बसत आहेत. इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंड सरकारने अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला. यापूर्वी, फ्रान्स आणि स्पेन सर्वात धोकादायक दुष्काळी परिस्थितीतून जात असल्याचे तिथल्या नेत्यांनी जाहीर केलं होतं. मात्र, मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असणाऱ्या युरोपमध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती का ओढावली? मागील दशकांच्या तुलनेत या दशकात युरोपीयन देशांमधील दुष्काळी परिस्थिती काय आहे? याशिवाय कोणत्या देशांना आणि उद्योगांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे? जाणून घेऊया. युरोपमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून फारसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे भविष्यात परिस्थिती सुधारण्याची फारशी आशा नाही. इतकेच नाही तर अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. यामध्ये कॅलिफोर्नियापासून हवाईपर्यंतच्या राज्यांचा समावेश आहे. हेही वाचा- विश्लेषण : टोमॅटो फ्लूचे संकट किती गंभीर? लॅन्सेटचा अहवाल काय सांगतो? युरोपमध्ये सर्वात भीषण दुष्काळ कोणत्या देशांमध्ये पडला आहे? जवळजवळ संपूर्ण युरोपमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मात्र फ्रान्स आणि स्पेनमध्ये पावसाअभावी आणि जंगलांना लागलेल्या आगीमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. ब्रिटनमध्ये तापमान सातत्याने वाढत आहे. केवळ गेल्या महिन्यात इंग्लंडमध्ये इतिहासातील सर्वोच्च तापमान (तापमानाची नोंद सुरू झाल्यापासून) नोंदवण्यात आले. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. युरोपीयन कमिशनच्या संयुक्त संशोधन केंद्राने (EC) गेल्या आठवड्यात जाहीर केले की युरोपियन युनियनचा जवळपास अर्धा भाग आणि युनायटेड किंगडमचा संपूर्ण भूभाग दुष्काळाच्या खाईत आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच युरोपमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली. हिवाळा आणि वसंत ऋतु या काळात संपूर्ण खंडातील वातावरणातील पाण्यामध्ये १९ टक्के घट झाली. युरोपमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची ३० वर्षांतील ही पाचवी वेळ आहे. याशिवाय खंडातील उष्णतेसारखी परिस्थितीमुळे पाऊस कमी होण्याचा परिणाम दुप्पट झाला. सध्या, १० टक्के युरोप हाय अलर्टवर आहे. युरोपातील ज्या भागांमध्ये दुष्काळाचे सर्वाधिक वाईट परिणाम होत आहेत त्यात मध्य आणि दक्षिण युरोपचा समावेश आहे. याठिकाणी पाऊस नसल्याने जमिनीतील पाण्याचे प्रमाणही अत्यंत खालावले आहे. परिणामी झाडांना जमिनीतून पाणी मिळत नसल्यामुळे झाडांच्या सुकण्याचे प्रमाण वाढले आहे. पाण्याअभावी मध्य जर्मनी, पूर्व हंगेरी, इटलीचा सखल भाग, दक्षिण-मध्य आणि पश्चिम फ्रान्स, पोर्तुगाल आणि उत्तर स्पेनमध्येही अनेक वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पाण्याच्या वापरावरही निर्बंध देशासाठी पाण्याचा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत मानल्या जाणाऱ्या इटलीच्या पो नदीच्या खोऱ्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पाच भागात दुष्काळी आणीबाणी जाहीर करण्यात आली असून लोकांच्या पाण्याच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. फ्रान्समध्येही अशीच काही पावले उचलण्यात आली आहेत. दुसरीकडे, स्पेनच्या इबेरियन द्वीपकल्पातील पाण्याचे साठे १० वर्षांच्या सरासरीपेक्षा ३१ टक्के कमी आहेत. ऊर्जा उत्पादन क्षमतेवरही परिणाम ब्रिटन आणि युरोपमधील पाण्याच्या कमतरतेचा परिणाम आता या देशांच्या ऊर्जा उत्पादन क्षमतेवरही होत आहे. तज्ज्ञांच्या मते, अक्षय स्रोतांपासून वीज निर्मितीवर अवलंबून असलेल्या अनेक युरोपीय देशांना वीज टंचाईचा सामना करावा लागणार आहे. सध्या जलविद्युत क्षेत्रातील ऊर्जा उत्पादनात २० टक्क्यांनी घट झाली आहे. दुसरीकडे, अणुऊर्जा उत्पादनातही लक्षणीय घट झाली आहे, कारण या अणुऊर्जा प्रकल्पांमधील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी नदीचे पाणी आवश्यक आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात, एकीकडे ब्रिटन-युरोप ऊर्जा उत्पादन वाढवून स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे पाण्याच्या कमतरतेमुळे या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे. हेही वाचा- विश्लेषण : गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे काँग्रेसची धुरा? गेहलोत यांचे नाव आघाडीवर? पिकांच्या उत्पादनेत घट युरोपमध्ये पडणाऱ्या या उष्णतेचा परिणाम तेथील अन्न पुरवठ्यावरही होण्याची शक्यता आहे. खरे तर, खंडातील अनेक मोठ्या देशांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कृषी क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आहे. रोमानिया, पोलंड, स्लोव्हेनिया आणि क्रोएशियामध्ये सर्वात वाईट स्थिती आहे. येथे पाणीटंचाई असल्याने यावेळी पीक उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. संयुक्त संशोधन केंद्राच्या म्हणण्यानुसार, या देशांमध्ये पाणी आणि ऊर्जा वाचवण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. युरोपातील दुष्काळ निरीक्षण करणाऱ्या युरोपियन ड्रॉट ऑब्झर्व्हेटरीच्या म्हणण्यानुसार, गेल्या दशकाच्या तुलनेत यंदा दुष्काळ जास्त भागात पसरला आहे. याशिवाय जुलै २०१२, २०१५, २०१८ च्या तुलनेत यावर्षी झाडे सुकणे आणि जमिनीतील ओलावा कमी होण्याचे प्रमाणही खूप जास्त आहे. तर दुसरीकडे, स्कॅन्डिनेव्हियन देशांची (डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलँड आणि आइसलँड) स्थिती गेल्या दशकाच्या तुलनेत यावेळी फारशी बिघडलेली नाही. तर २०१८ मध्ये या भागात सात दशकांतील सर्वात मोठा दुष्काळ पडला होता. तज्ञांच्या मते, जर आपण २०१८ मधील युरोपमधील काही प्रदेशातील दुष्काळी परिस्थितीची २०२२ च्या स्थितीशी तुलना केली तर हे वर्ष सर्वात भीषण दुष्काळातून जाणार आहे. युरोप आणि अमेरिकेचे मोठे नुकसान हवामान बदलामुळे देशांच्या अर्थव्यवस्थेचे किती नुकसान होते याचे उदाहरण २०२२ च्या पर्यावरण संशोधन पत्रांच्या अहवालात आढळते. विशेषत: उष्णतेमुळे पिकांचे नुकसान आणि दुष्काळाचा विचार केला तर गेल्या ५० वर्षांत त्यात तिप्पट वाढ झाली आहे. १९९८ ते २०१७ दरम्यान, युरोप आणि अमेरिकेला दुष्काळ आणि पीक अपयशामुळे १२४ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, युरोप आणि ब्रिटनचे सध्या उष्णतेमुळे दरवर्षी ९ अब्ज डॉलरहून अधिक नुकसान होत आहे. येत्या १० वर्षात तापमान १.५ डिग्री सेल्सिअसने वाढले, तर युरोप-यूकेला दरवर्षी सुमारे १० अब्ज डॉलर्सचे नुकसान होईल. एवढेच नाही तर हवामानातील बदल रोखण्यासाठी पावले उचलली नाहीत आणि २१०० पर्यंत तापमान ४ अंशांनी वाढले, तर युरोप-ब्रिटनचे दर महिन्याला ६५.५ बिलियन डॉलर्सचे नुकसान होईल. हेही वाचा- विश्लेषण : बेनामी व्यवहार विरोधातील कारवाईला चाप… सर्वोच्च न्यायालयाचा ताजा निकाल काय सांगतो? दुष्काळामुळे कोणत्या देशाचे किती नुकसान युरोपमधील दुष्काळाचा सर्वाधिक फटका स्पेनला बसण्याची शक्यता आहे. या देशाला उष्णतेमुळे दरवर्षी १.५२ अब्ज डॉलर्सपर्यंत नुकसान सहन करावे लागत आहे. इटली आणि फ्रान्स अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. दुष्काळामुळे इटलीचे १.४३ अब्ज डॉलरचे नुकसान होत असून फ्रान्सचे दरवर्षी १.२४ अब्ज डॉलरचे नुकसान होत आहे. याशिवाय जर्मनीला दरवर्षी १.२२ अब्ज डॉलरचे नुकसान होत आहे. ब्रिटन पाचव्या स्थानावर असून दरवर्षी या देशाचे ७०४ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होत आहे.