E20 Fuel Engine Effect : भारताचे ऊर्जा क्षेत्र मोठ्या प्रमाणात बदलत आहे. पेट्रोल व इथेनॉल यांच्या मिश्रणावरून सध्या चर्चा रंगली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे कंट्री हेड व कार्यकारी उपाध्यक्ष विक्रम गुलाटी यांनी इथेनॉलच्या उपयुक्ततेबाबत ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे संदीप सिंह यांना माहिती दिली आहे. स्वच्छ ऊर्जेशी संबंधित तंत्रज्ञानाला पाठिंबा देणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रदूषण, कार्बन उत्सर्जन तसेच इंधन आयात कमी करणे शक्य होईल, असे विक्रम गुलाटी म्हणाले. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यास त्याचा मायलेजवर व वाहनाच्या इंजिनवर परिणाम होतो का? येत्या काळात वाहन क्षेत्रात कोणते बदल होणार आहेत? पेट्रोल-डिझेल कारपेक्षा ईव्ही किंवा हायब्रीड कार कशी फायदेशीर ठरू शकते? याबाबत गुलाटी यांनी माहिती दिली आहे.

इथेनॉल मिश्रीत इंधनामुळे वाहनाच्या मायलेजवर परिणाम होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यावर गुलाटी म्हणाले, इथेनॉल मिश्रीत इंधन E10 (इथेनॉल १० टक्के, पेट्रोल ९० टक्के यांचे मिश्रण) हून E20 (इथेनॉल २० टक्के, पेट्रोल ८० टक्के यांचे मिश्रण) कडे जाताना खूपच किरकोळ परिणाम इंधनाच्या क्षमतेवर होतो. तो साधारणपणे ३ ते ५ टक्के इतका असतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. दरम्यान, E25 इंधनाकडे वळण्याआधी ते इंधन जुन्या व नव्या वाहनांसाठी योग्य आहे का याची पडताळणी करणे आवश्यक आहे. पेट्रोल व डिझेल कार ऐवजी हायब्रीड कारकडे वळण्यासाठी महत्त्वाचे धोरण आखणे आवश्यक आहे, असेही गुलाटी म्हणाले. वाहन क्षेत्रात बदलत्या इंधनाचा कसा परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रश्न: ईव्ही, हायब्रीड आणि इथेनॉल आधारित फ्लेक्स फ्युएल यांमुळे देशातील दळणवळण कसे बदलेल? याकडे तुम्ही कसे पाहता?

उत्तर: भारतासाठी प्राधान्य असलेल्या गोष्टी अगदी सुस्पष्ट आहेत. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, प्रदूषण कमी करणे, देशाअंतर्गत व्यवसायांना चालना देण आणि आयात केल्या जाणाऱ्या इंधनावरील अवलंबित्व कमी करणे या गोष्टीला देश प्राधान्य देतोय.

सध्याच्या क्षणाला स्वच्छ ऊर्जेशी संबंधित सर्व तंत्रज्ञानाला आपण पाठिंबा देणे आवश्यक आहे. हे ईव्ही विरूद्ध हायब्रीड असे नसून ईव्ही आणि हायब्रीड असे आहे. त्याचबरोबर आपल्याला फ्लेक्स फ्युएल, सीएनजी, कम्प्रेस्ड बायोगॅस, हायड्रोजन आणि इतर पर्यायांचीही आवश्यकता आहे. या सर्वांशी संबंधित तंत्रज्ञान विकसित झाले तरी हे काम खूप मोठे आहे. पण या सगळ्या व्यवस्थेत जीवाश्म इंधनाची आवश्यकता आपल्याला असेलच.

ज्यांना ईव्ही कार खरेदी करायची आहे, ते ईव्ही कार खरेदी करतीलच. त्यात शंका नाही. हायब्रीडमुळे ईव्ही कार खरेदी करणाऱ्या ग्राहकावर काहीही परिणाम होणार नाही. हायब्रीड कार आपल्यासाठी फायदेशीर ठरेल का याचा विचार पेट्रोल व डिझेल कार खरेदी करणाऱ्यांनी दोन वेळा करणे आवश्यक आहे. विकली जाणारी प्रत्येक हायब्रीड कार ही पेट्रोल, डिझेल कारची प्रत्यक्षात जागा घेत आहे. याचा देशाला, शहराला आणि पर्यावरणाला फायदा होतोय. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी वाहने घेणाऱ्या ग्राहकांना टॅक्सचा भार वाटू नये म्हणून धोरण आखणे आवश्यक आहे.

दुसरीकडे इथेनॉल हे भारतासाठी महत्त्वाचे आहे. कारण ते भारतातच तयार होऊ शकते. कृषीशी संबंधित अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे जीवाश्म इंधनावरील आपले अवलंबित्व कमी होऊ शकते. तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत मिळू शकते. भारतात वाहनांची संख्या वाढत आहे. तसेच अर्थव्यवस्था विकसित होत आहे. त्यामुळे येत्या काळात भारतात जीवाश्म इंधनाची मागणी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत वीज व इथेनॉलमुळे आपल्याला मदत मिळू शकते.

प्रश्न: भारत ‘इथेनॉल ब्लेंडिंग’ (पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे) च्या दिशेने आक्रमकपणे वाटचाल करतोय. इथेनॉलला प्राधान्य देण्यासाठी ही योग्य वेळ आहे, असे तुम्हाला वाटते का?

उत्तर: अर्थातच हो, जर तुम्ही इथेनॉल उद्योगाकडे पाहिले तर तिथे भरपूर क्षमता असल्याचे तुम्हाला दिसून येते. इथेनॉल प्लांट्स हे त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात कार्यरत आहेत. त्यामुळे इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी वाव आहे. यामुळे भारताची पेट्रोलची गरज कमी होऊ शकते. तसेच जीवाश्म इंधनावरील अवलंबित्वही कमी होऊ शकते. त्यामुळे त्या दिशेने वाटचाल करण्याची ही योग्य वेळ आहे.

प्रश्न: पेट्रोल मध्ये इथेनॉल मिसळल्याने त्याचा इंधन क्षमतेवर व इंजिनवर परिणाम होतो, याबाबत चिंता व्यक्त केली जातेय. त्याकडे तुम्ही कसे पाहता?

उत्तर: वेगवेगळ्या ‘ब्लेंड्स’ (इथेनॉल व पेट्रोल मिश्रणाचे वेगवेगळे प्रमाण) मध्ये आपल्याला फरक करण्याची आवश्यकता आहे. E85 (८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोलचे मिश्रण) इंधन फक्त ‘फ्लेक्स फ्युएल’ वाहनांमध्येच वापरता येऊ शकते. ही वाहने इथेनॉलचे मोठ्या प्रमाणात किंवा कोणत्याही प्रमाणात पेट्रोलमध्ये मिश्रण असल्यास वापरता येतील अशा प्रकारे डिझाइन केलेली असतात. सध्याच्या वाहनांमध्ये E20 इंधनाऐवजी E25 इंधनाचा वापर केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. परंतु, त्याआधी त्याची काळजीपूर्वक पडताळणी होणे आवश्यक आहे. E25 इंधन सध्याच्या नव्या व जुन्या वाहनांमध्ये वापरता येऊ शकते का? याची तपासणी होणे आवश्यक आहे. अशी तपासणी E20 इंधनाची करण्यात आली होती.

जेव्हा भारताने E10 (१० टक्के इथेनॉल, ९० टक्के पेट्रोल) हून E20 (२० टक्के इथेनॉल, ८० टक्के पेट्रोल) कडे प्रवास केला त्यावेळी सखोल अभ्यास करण्यात आला. वेगवेगळ्या वाहन उत्पादकांच्या जुन्या वाहनांमध्ये हे इंधन टाकून त्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी त्याचा खूपच नगण्य परिणाम होत असल्याचे दिसून आले. इंधनाच्या क्षमतेवरही खूपच कमी परिणाम झाल्याचे दिसून आले. इंधनाची क्षमतेवर जवळपास ३ ते ५ टक्केच परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सोशल मीडियावर E10 व E20 इंधनाबाबत जी चिंता व्यक्त केली जातेय, त्याला वैज्ञानिक आधार नाही. पण, E25 इंधनाबाबत तशी टेस्टिंग आतापर्यंत झालेली नाही. E25 इंधनाकडे वळण्यापूर्वी जुन्या व नव्या वाहनांवर त्याचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. दरम्यान, या सगळ्यावर ‘फ्लेक्स फ्युएल व्हेईकल’ (FFV) हा दीर्घकालीन पर्याय असल्याचे आम्हाला वाटते. कारण ही वाहने इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मोठ्या प्रमाणात किंवा कोणत्याही प्रमाणात मिश्रण असल्यास वापरता येतात.