-डॉ. देवदत्त पोखरकर
पृथ्वीचा इतिहास हा अनेक अद्भूत प्राण्यांच्या उदय, उत्क्रांती आणि अस्ताची कहाणी आहे. आज आपण ज्या घोड्याला पाहतो, तो एकाच खुराचा (एक बोटाचा) अत्यंत वेगवान प्राणी आहे. परंतु, घोड्यांच्या उत्क्रांतीचा इतिहास पाहिला तर कोट्यवधी वर्षांपूर्वी या पृथ्वीवर तीन खूर असलेले घोडे राज्य करत होते. या तीन खुरांच्या घोड्यांच्या समूहामध्ये सर्वात यशस्वी, चिवट आणि जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणारा वंश म्हणजे ‘हिप्पॅरियन’ (Hipparion). जीवशास्त्र आणि भूगर्भशास्त्रामध्ये हिप्पॅरियनला महान प्रवासी (The Great Traveler) असे म्हटले जाते. प्राचीन ग्रीक भाषेतील ‘Hipparion’ या शब्दाचा अर्थ ‘लहान घोडा’ असा होतो. मायोसीन कालखंडाच्या प्रारंभापासून ते प्लायस्टोसीन काळाच्या प्रारंभापर्यंत या प्राण्याने पृथ्वीवरील स्थलजीव परिसंस्थेवर (Terrestrial Ecosystem) आपले वर्चस्व गाजवले होते.
हिप्पॅरियनच्या उत्क्रांतीची कहाणी उत्तर अमेरिकेत सुरू झाली. सुमारे १५ ते १७ दशलक्ष वर्षांपूर्वी (मायोसीन काळ) उत्तर अमेरिकेच्या विस्तृत गवताळ प्रदेशात या वंशाचा उदय झाला. परंतु, या प्राण्याचे खरे यश त्याच्या एका ऐतिहासिक आणि अभूतपूर्व स्थलांतरात दडलेले आहे. सुमारे ११.४ दशलक्ष वर्षांपूर्वी, पृथ्वीच्या भौगोलिक हालचालींमुळे आणि समुद्रपातळीतील बदलांमुळे उत्तर अमेरिका आणि आशिया खंडाच्या दरम्यान एक तात्पुरता भू-मार्ग तयार झाला, या मार्गाला ‘बेरिंग भू-सांधा’ (Bering Land Bridge) म्हटले जाते. या मार्गाचा वापर करून हिप्पॅरियनच्या समूहाने अलास्कामधून सायबेरियात, म्हणजेच जुन्या जगात (Old World – युरेशिया आणि आफ्रिका) प्रवेश केला.
स्तरशास्त्र (Stratigraphy) आणि जीवाश्मविज्ञानात (Paleontology) या स्थलांतराला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. हिप्पॅरियनचे जुन्या जगात झालेले हे आगमन Cormohipparion Datum या नावाने ओळखले जाते. हे आगमन इतके वेगवान आणि व्यापक होते की, यामुळे निओजीन काळातील संपूर्ण भूगर्भीय कालमापन ठरवण्यास वैज्ञानिकांना मदत होते. अल्पावधीतच या घोड्याने आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडातील बहुतांश भागांवर आपले साम्राज्य प्रस्थापित केले.
आधुनिक घोडा (ज्याला वैज्ञानिक भाषेत Equus म्हटले जाते) आणि हिप्पॅरियन यांच्या शारीरिक रचनेत अनेक महत्त्वाचे फरक होते. हिप्पॅरियन हा आधुनिक घोड्यांपेक्षा आकाराने लहान आणि काहीसा वेगळा दिसत होता.
तीन बोटांची रचना: आधुनिक घोड्याला धावण्यासाठी फक्त एकच मजबूत खूर (बोट) असते. याउलट, हिप्पॅरियनच्या पायाला तीन बोटे होती. धावताना त्याचे मधले बोट जमिनीला टेकून वजनाचा मुख्य भार पेलत असे, तर बाजूची दोन लहान बोटे दलदलीच्या किंवा मऊ जमिनीत चालताना शरीराचा समतोल राखण्यास मदत करत असत. त्यांचे पाय सडपातळ आणि वेगाने धावण्यासाठी अनुकूलित होते.
कवटीचे वैशिष्ट्य (Preorbital Fossa): हिप्पॅरियनच्या कवटीचा अभ्यास केला असता, त्यांच्या डोळ्यांच्या सॉकेटच्या अगदी समोर एक वैशिष्ट्यपूर्ण खड्डा किंवा रचना आढळते, या रचनेला ‘प्रीऑर्बिटल फोसा’ म्हणतात. या रचनेचा उपयोग नेमका कशासाठी होत होता (उदा. विशिष्ट ग्रंथींसाठी की स्नायूंच्या मजबुतीसाठी), यावर आजही शास्त्रज्ञांमध्ये संशोधन सुरू आहे.
दातांची जटिल रचना (Hypsodonty): हिप्पॅरियनच्या उत्क्रांतीचे सर्वात मोठे रहस्य त्यांच्या दातांमध्ये दडलेले होते. त्यांचे दात उंच मुकुट असलेले (Hypsodont) होते आणि त्यांच्या गालदाढांवर इनॅमलचे अत्यंत गुंतागुंतीचे नमुने (Prismatic cheek teeth) होते. ही रचना कडक, खरखरीत आणि तंतुमय वनस्पती व गवत सहजपणे दळण्यासाठी अत्यंत उपयुक्त होती.
आकारमान: विविध प्रजातींनुसार हिप्पॅरियनची उंची साधारणपणे खांद्यापर्यंत १.४ मीटर (सुमारे ४.५ फूट) होती आणि त्यांचे वजन १३५ ते ३०० किलोग्रॅम दरम्यान भरत असे. (Bernor et al. 2021)
हिप्पॅरियनचा हा अफाट जागतिक प्रवास त्यांच्या शारीरिक आणि पर्यावरणीय अनुकूलतेवर (Ecological Adaptation) अवलंबून होता. मायोसीन काळात पृथ्वीचे हवामान वेगाने बदलत होते. आर्द्र आणि दाट जंगलांचे रूपांतर हळूहळू कोरड्या, उघड्या गवताळ प्रदेशात (Savanna and Steppes) होत होते.
सुरुवातीच्या काळातील हिप्पॅरियन हे प्रामुख्याने जंगलात राहणारे आणि झाडांची मऊ पाने खाणारे (Browsers) होते. परंतु, जसा जंगलांचा विस्तार कमी झाला, तशी त्यांनी स्वतःमध्ये उत्क्रांती घडवून आणली. त्यांच्या नंतरच्या वंशांनी गवताळ प्रदेशात राहणे आणि केवळ गवत खाणे (Grazers) पसंत केले. विशेषतः युरेशियन स्टेपी प्रदेशात आढळणाऱ्या C4 प्रकारच्या खरखरीत (rough) गवताला पचवण्याची आणि आपल्या आहारात समाविष्ट करण्याची क्षमता त्यांनी विकसित केली. हा आहारातील बदल त्यांच्या दीर्घकालीन उत्क्रांतीसाठी आणि अस्तित्वासाठी संजीवनी ठरला. ते एकाच वेळी वनस्पतीची पाने आणि गवत दोन्ही खाण्यासाठी सक्षम असल्यामुळे वेगवेगळ्या हवामानांत सहज जगू शकले. आशिया खंडात, विशेषतः भारतीय उपखंडात हिप्पॅरियनचे अत्यंत समृद्ध जीवाश्म सापडले आहेत. भारत, पाकिस्तान आणि नेपाळच्या सीमेवर पसरलेल्या शिवालिक टेकड्यांच्या समूहात (Siwalik Group) हिप्पॅरियनच्या जीवाश्माचे मोठ्या प्रमाणावर संचय (Deposits) आढळतात.
शिवालिक पर्वतात सापडलेल्या जीवाष्मातून प्रामुख्याने खालील प्रजातींची नोंद झाली आहे:
१. Hipparion antelopinum
२. Hipparion nagriensis
३. Hipparion theobaldi
हे जीवाश्म मायोसीन काळाच्या उत्तरार्धातील तसेच प्लायोसीन काळातील असून, त्या काळातील भारतीय उपखंडातील हवामान आर्द्र (humid) ते कोरडे कसे होत गेले, याचा स्पष्ट पुरावा आढळतो. नेपाळमधील शिवालिक गाळातील याचे जीवाष्म दर्शवतात की हिमालयाच्या पायथ्याशी या प्राण्यांची मोठी संख्या होती.
चीनमधील Baode आणि Linxia ही खोरी प्रागैतिहासिक जीवाश्मांसाठी जगप्रसिद्ध आहेत. येथे हिप्पॅरियनचे शेकडो सांगाडे आणि दात सापडले आहेत, जे त्या काळातील विस्तीर्ण गवताळ परिसंस्थेची साक्ष देतात. मंगोलियाच्या कोरड्या स्टेप्स प्रदेशात सापडलेले अवशेष सिद्ध करतात की, हा प्राणी पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या कोरड्या सवाना ( गवताळ) वातावरणातही अत्यंत कार्यक्षमतेने जगू शकत होता.
सुमारे ६.५ दशलक्ष वर्षांपूर्वी, पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर जागतिक तापमान घट (Global Cooling) होण्यास सुरुवात झाली. हवामान कमालीचे थंड आणि शुष्क झाले. या हवामान बदलामुळे वनस्पतींच्या रचनेत पुन्हा बदल झाले आणि हिप्पॅरियनच्या हक्काच्या अधिवासाला धोका निर्माण झाला.
याच काळात, घोड्यांच्या उत्क्रांतीच्या शाखेतून एक अधिक प्रगत वंश समोर आला. या वंशाचे नाव Equus (आधुनिक घोड्यांचा थेट वंश) होते. Equus कडे हिप्पॅरियनच्या तुलनेत एकच खूर होता, ज्यामुळे तो खुल्या मैदानावर हिप्पॅरियनपेक्षा कितीतरी पटीने वेगाने धावू शकत होता. तसेच, बदलत्या वनस्पतींशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता अधिक चांगली होती. परिणामी, संसाधनांसाठी झालेल्या परिसंस्थात्मक स्पर्धेत (Ecological Competition) हिप्पॅरियन मागे पडू लागला. अखेर, प्लायस्टोसीन युगाच्या सुरुवातीला साधारण २.५ दशलक्ष ते १ दशलक्ष वर्षांपूर्वी या ‘महान प्रवाशाचा’ पृथ्वीवरून कायमचा अस्त झाला. येथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, हिप्पॅरियन हा आधुनिक घोड्यांचा थेट पूर्वज नव्हता. ते घोड्यांच्या वंशावळीतील दोन वेगवेगळ्या शाखांचे प्रतिनिधित्व करत होते, त्यांचे पूर्वज एकच होते (समान उत्क्रांतीशील वंश).
१८३२ साली फ्रेंच जीवाश्म वैज्ञानिक ज्युल्स डी क्रिस्टोल (Jules de Christol) यांनी हिप्पॅरियनचे पहिले वैज्ञानिक वर्णन केले. आज जगातील ३० हून अधिक देशांमध्ये (फ्रान्स, स्पेन, जर्मनी, इराण, तुर्की, ग्रीस, केनिया, अल्जेरिया आणि अमेरिका इत्यादी) त्याचे अवशेष सापडले आहेत.
यामुळेच भूगर्भशास्त्रज्ञांसाठी हिप्पॅरियन हा एक उत्तम जैव-स्तरवैज्ञानिक निर्देशक (Biostratigraphic Marker) ठरला आहे. म्हणजेच, ज्या खडकांमध्ये किंवा गाळात हिप्पॅरियनचे दात सापडतात, त्या खडकांचा काळ मायोसीनचा उत्तरार्ध असावा, हे वैज्ञानिक सहजपणे ठरवू शकतात.
हिप्पॅरियनची कहाणी ही केवळ एका प्राण्याच्या विलुप्तीची कथा नाही, तर ती निसर्गाच्या बदलत्या नियमांशी जुळवून घेण्याच्या पराकोटीच्या प्रयत्नांची गाथा आहे. उत्तर अमेरिकेच्या मैदानात जन्म घेऊन संपूर्ण जगभरात प्रवास करणारा हा तीन बोटांचा घोडा, पृथ्वीवरील जैविक उत्क्रांती आणि प्राचीन पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी आजही विज्ञानाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो.
