Evolution of Indian Cinema: घरातल्या टीव्हीचा रिमोट कोणाच्या हातात असणार, यावरून कधी काळी घराघरांत रंगलेलं ते ‘शीतयुद्ध’ आणि शनिवारच्या ‘नाईट शो’साठी संपूर्ण कुटुंबानं मिळून काढलेलं बाल्कनीचं तिकीट… आठवतोय का तुम्हाला तो काळ?
तेव्हा मनोरंजनाला आजच्यासारखं ‘अल्गोरिदम’ किंवा ‘रेटिंग्स’चे नियम नव्हते. शुक्रवारची संध्याकाळ झाली की, आठवडाभराच्या अभ्यासाचं दप्तर बाजूला सरकवून टीव्हीसमोर ठिय्या मारण्याची जी एक अनामिक ओढ असायची, त्याची मजाच काही और होती. आजीच्या संध्याकाळच्या मालिका सुरू होण्याआधी कार्टून किंवा गाण्यांचे चॅनेल लावण्यासाठी भावंडांमध्ये रिमोटसाठी झालेली ती जुगलबंदी आठवली की, आजही अनेकांच्या चेहऱ्यावर नकळत हसू येते.
या सगळ्या गदारोळावर एकच हमखास तोडगा असायचा आणि तो म्हणजे शनिवारच्या सिनेमाचा कौटुंबिक बेत! त्या काळी थिएटरमध्ये शिरण्यापूर्वी ‘हा चित्रपट नक्की कोणासाठी आहे?’, ‘याचा जॉनर काय?’ किंवा ‘हा मुलांसाठी योग्य आहे की मोठ्यांसाठी?’ असा विचार कोणी स्वप्नातही करीत नसे. तिकीट खिडकीवर गर्दीत उभं राहणं, मध्यांतरात गरमागरम समोसे आणि पॉपकॉर्नवर ताव मारणं आणि अंधारातल्या पडद्यासमोर संपूर्ण कुटुंबानं एकत्र हसणं-रडणं हा केवळ सिनेमा पाहण्याचा अनुभव नव्हता, तर तो एक कौटुंबिक उत्सव असायचा. चित्रपट संपल्यावर बाहेर एखाद्या गाडीवर किंवा साध्या हॉटेलात चहा-नाश्ता करीत घरी परतताना त्या चित्रपटावर रंगणाऱ्या गप्पा त्या संध्याकाळची रंगत आणखी वाढवायच्या.
सिनेमा पाहणं हा आता उत्स्फूर्त आनंद न राहता एक ‘प्रकल्प’ झालाय का?
आज मात्र चित्रपट पाहणं म्हणजे एक प्रकारचा ‘प्रकल्प’ किंवा ‘होमवर्क’ झाला आहे. थिएटरमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी किंवा ओटीटीवर ‘प्ले’ बटण दाबण्यापूर्वी प्रेक्षक अनेक आघाड्यांवर चाचणी घेत असतो. तसेच सिनेमाचा ट्रेलर कसा आहे? समीक्षकांनी त्याला किती स्टार्स दिले आहेत? सोशल मीडियावर पब्लिक रिव्ह्यू काय सांगताहेत? हा चित्रपट कोणत्या फ्रँचायझीचा भाग आहे का? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या खिशातील पैशांचं आणि दोन-अडीच तासांच्या वेळेचं सार्थक होईल का? या सगळ्या गणितांची जुळवाजुळव केल्याशिवाय आज कोणी सहजासहजी थिएटरची वाट धरत नाही.
सिनेमा पाहणं आता उत्स्फूर्त राहिलं नसून, एका अत्यंत विचारपूर्वक घेतलेल्या आर्थिक आणि मानसिक निर्णयासारखं झालं आहे. याचा अर्थ लोकांचं सिनेमावरील प्रेम कमी झालं आहे, असं मुळीच नाही; तर चित्रपटसृष्टीनं आपल्या प्रेक्षकांकडे पाहण्याचा आणि त्यांना समजून घेण्याचा दृष्टिकोनच मुळात बदलला आहे.
‘बनवा बनवी’ ते ‘लगान’: एकाच पडद्यावर सर्वांच्या भावना
वीस-पंचवीस वर्षांपूर्वीचा विचार केला, तर त्या काळात तयार होणारा सिनेमा हा कोणत्याही एका चौकटीत अडकलेला नव्हता. तो सर्वांचाच वाटावा अशा धाटणीचा असायचा. मराठी चित्रपटसृष्टीचं उदाहरण घेतलं, तर ‘अशी ही बनवा बनवी’मधील निखळ विनोदावर अख्खा महाराष्ट्र खळखळून हसला, ‘माहेरची साडी’ या चित्रपटामुळे सगळ्यांच्या डोळ्यांत अश्रू वाहिले आणि ‘सिंहासन’ व ‘सामना’सारख्या टोकदार राजकीय चित्रपटांनी समाजातील प्रत्येक घटकाला विचार करायला भाग पाडलं. त्यानंतरच्या काळात आलेल्या ‘फँड्री’, ‘सैराट’सारख्या चित्रपटांनी जात, वर्ग आणि प्रेमाची वास्तवता मांडली, तर ‘दुनियादारी’नं कॉलेजच्या दिवसांची मैत्री आणि आठवणी पुन्हा ताज्या केल्या.
हिंदी सिनेसृष्टीचा विचार केला तरी एकाच कालखंडात ‘लगान’, ‘दिल चाहता है’, ‘नायक’ व ‘कभी खुशी कभी गम’ यांसारखे चित्रपट आले. हे चारही चित्रपट विषय, मांडणी आणि जॉनर अशा सर्व दृष्टिकोनांतून एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे होते. ‘लगान’मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील संघर्ष आणि क्रिकेट यांची कथा होती, ‘दिल चाहता है’मध्ये आधुनिक तरुणाईची मैत्री आणि नातेसंबंधांचे नवे परिमाण होते, ‘नायक’ने राजकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि एका दिवसाच्या मुख्यमंत्र्याचा रोष मांडला होता, तर ‘कभी खुशी कभी गम’ने कौटुंबिक भावना, परंपरा व सामाजिक स्तर यांच्यातील गुंफण दाखवून दिली.
हे सर्व चित्रपट आपापल्या परीने राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ होते; पण त्यांच्यातील कोणताही विषय प्रेक्षकांना विभागणारा नव्हता. चित्रपटामध्ये मांडलेली परिस्थिती किंवा भूमिका कितीही विशिष्ट असली तरी त्यातील भावना वैश्विक होत्या. म्हणूनच प्रत्येक वयोगटातील, प्रत्येक विचारसरणीचा प्रेक्षक थिएटरमध्ये एकत्र बसून या चित्रपटांचा आनंद घेऊ शकत होता.
प्रेक्षकांचे विभाजन करून अस्मिता विकणं हाच नवा व्यापारी फॉर्म्युला बनलाय का?
आज मात्र भारतीय चित्रपटसृष्टीच्या रचनेत एक मूलभूत बदल झाला आहे. चित्रपट आता ‘सर्वसमावेशक’ राहिले नसून, विशिष्ट अस्मिता, विचारसरणी किंवा ठरावीक प्रेक्षकवर्गाला डोळ्यांसमोर ठेवून त्यांची निर्मिती केली जाते. पूर्वी चित्रपटाची निर्मिती करताना विचार केला जायचा की, हा चित्रपट संपूर्ण समाजाला, आबालवृद्धांना कसा आवडेल? आजचा व्यावसायिक प्रश्न मात्र पूर्णपणे बदलला आहे. आज निर्माते स्वतःला विचारतात, “हा चित्रपट कोणाला जास्त प्रमाणात पाहायला आवडेल की, जो इतर कशाचीही पर्वा न करता थेट तिकीट काढून थिएटरमध्ये धावून येईल?”
या बदलामुळे प्रेक्षकवर्गाचे विभाजन (Audience Fragmentation) होणं हा चित्रपट उद्योगासाठी एक फायदेशीर ‘व्यापारी फॉर्म्युला’ बनला आहे. प्रख्यात माध्यम अभ्यासक डेव्हिड एल. स्वान्सन यांनी त्यांच्या ‘युजेस अँड ग्रॅटिफिकेशन्स’ सिद्धांतात मांडल्याप्रमाणे प्रेक्षक हे माध्यमांचे केवळ मूक ग्राहक नसतात; ते स्वतःच्या विशिष्ट मानसिक, भावनिक आणि सामाजिक गरजांची पूर्तता करण्यासाठी आशयाची जाणीवपूर्वक निवड करतात. आजचा चित्रपट ‘उद्योग’ या सिद्धांताचा अगदी पुरेपूर वापर करताना दिसतो. एक विशिष्ट विचारसरणी, राजकीय भूमिका किंवा देशभक्तीची अस्मिता यांना साद घालणारा चित्रपट एका ठरावीक समूहासाठी जणू अनिवार्य अजेंडा बनतो आणि त्यातूनच कोट्यवधींची गल्लाभरणी साध्य होते.
एकाच घरात चार स्क्रीन: अल्गोरिदमचा वैयक्तिक पिंजरा
या प्रेक्षक विभाजनाला आजची डिजिटल क्रांती आणि पर्यायांची अफाट उपलब्धता यांनी आणखी खतपाणी घातलं आहे. पूर्वी घरामध्ये एकच टीव्ही असायचा आणि शहरात मोजकी चित्रपटगृहं असायची. त्यामुळे संपूर्ण समाज एकाच वेळी एकाच सांस्कृतिक अनुभवातून जात असे. आजचं चित्र वेगळं आहे. एकाच घरात, एकाच दिवाणखान्यात चार जण बसलेले असतात; पण चौघांच्याही हातात चार वेगवेगळ्या स्क्रीन सुरू असतात. कोणाला नेटफ्लिक्सवर आंतरराष्ट्रीय क्राईम थ्रिलर पाहायचा असतो, कोणाला इन्स्टाग्राम रील्स आणि युट्यूबच्या शॉर्टसमध्ये वेळ घालवायचा असतो, तर कोणाला जिओ-हॉटस्टारवर लाइव्ह क्रिकेट किंवा झी५ वर प्रादेशिक वेब सीरिज बघायची असते.
डिजिटल अल्गोरिदम प्रत्येकाला त्याच्या आवडीच्या आणि पूर्वग्रहांच्या चौकटीत अलगद बंदिस्त करून ठेवतो. त्यामुळे मुख्य प्रवाहातील प्रेक्षकवर्ग संपलेला नाही, तर त्याचे अनेक लहान-लहान स्वतंत्र गट तयार झाले आहेत. राजकीय गट, नॉस्टॅल्जियामध्ये रमणारा गट, विशिष्ट स्टार्सचे फँडम, प्रादेशिक आशयाचे चाहते, असे अनेक स्वतंत्र समूह आज अस्तित्वात आहेत.
ओटीपी शेअरिंग आणि एआयच्या युगात ‘सर्वांचा सिनेमा’ खरंच हरवून गेलाय का?
भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे हे प्रेक्षक विभाजन आणखी तीव्र होणार आहे. प्रेक्षकांच्या आवडीनुसार भाषांतर, मार्केटिंग आणि थेट आशयाची निर्मिती अधिक सोपी आणि अचूक होईल. त्यामुळे व्यवसाय अधिक वेगाने वाढेल यात शंका नाही; पण या संपूर्ण प्रक्रियेत चित्रपट पाहण्याचा तो जुना, सामूहिक आनंद कुठेतरी मागे पडत चालला आहे.
आज एकाच घरात राहूनही आपण कौटुंबिक सिनेमा नाईटऐवजी एकमेकांना फक्त ओटीटीचे पासवर्ड किंवा ओटीपी शेअर करतो. एकत्र बसून एकाच संवादावर मनमोकळेपणाने हसणं, अंधाऱ्या थिएटरमध्ये शेजारी बसलेल्या अनोळखी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी अनुभवणं आणि थिएटरमधून बाहेर पडताना वाटेत चित्रपटावर तावातावानं चर्चा करणं हे अनुभव आता दुर्मीळ होत चालले आहेत. चित्रपटसृष्टी आजही कोट्यवधींचे ब्लॉकबस्टर बनवेल, नवे सुपरस्टार्स निर्माण करील; मात्र समाजातील प्रत्येक घटकाला एकाच धाग्यात बांधणारा, सर्वांना मनापासून आपला वाटणारा तो ‘सर्वांचा सिनेमा’ आज कुठेतरी हरवून गेला आहे, हे कटू वास्तव नाकारता येत नाही.
