इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने थेट इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांना एका सिक्रेट ऑपरेशनमध्ये सहभागी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकेकाळी इराणचे कट्टरपंथीय असलेले नेते व माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनाच ‘मोसाद’ने सिक्रेट एजंट बनवण्याचा प्रयत्न केला होता. इराणमधील अयातुल्ला अली खामेनी यांची राजवट उलथवून टाकल्यानंतर अहमदीनेजाद यांच्याकडे इराणचे नेतृत्व इस्रायलला सोपवायचे होते. दरम्यान, ‘मोसाद’चे हे नियोजन अयशस्वी झाले, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले आहे.
दरम्यान, अहमदीनेजाद यांनी सोमवारी (१३ जुलै) या वृत्तावर तीव्र आक्षेप घेत हे ‘हॉलिवूड स्टाईल’ खोटे वृत्त असल्याचे म्हटले. तसेच आपण मोसादच्या कोणत्याही कटकारस्थानाचा भाग नव्हतो, असे स्पष्ट केले आहे. तर त्यांच्या कार्यालयाने ‘न्यूयॉर्क टाइम्स’ हे “फेक न्यूज आणि खोटे रंगवून सांगण्यासाठी ओळखले जाते”, असे म्हटले आहे. मोसादचे नियोजन नेमके काय होते, त्यात अहमदीनेजाद यांना कसे सामावून घेण्यात आले याबाबत जाणून घेऊ.
२०२४ मध्ये हंगेरी झालेल्या गुप्त बैठकीत काय झाले?
इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद यांना सिक्रेट ऑपरेशनमध्ये सहभागी करण्याचा अध्याय हंगेरी या देशात सुरू झाला. हंगेरीमध्ये हवामानाबाबतची एक परिषद बोलावण्यात आली. परंतु, या परिषदेआड मोसादने अहमदीनेजाद यांच्याशी संधान साधले. मोसादची त्यांच्याबरोबर एक गुप्त बैठक झाली.
हंगेरीतील ‘लुडोविका युनिव्हर्सिटी ऑफ पब्लिक सर्व्हिस’ या विद्यापीठातील प्रमुख असलेल्या रेक्टर (विद्यापीठातील प्रमुखाचे हे पद आहे) गेर्गेली डेली यांच्याशी हंगेरी सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संपर्क साधला. विद्यापीठाकडून एक हवामानाशी संबंधित परिषद आयोजित करा व त्यात अहमदीनेजाद यांना प्रमुख पाहूणे म्हणून बोलवा, असे रेक्टर डेली यांना सांगण्यात आले.
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे होणाऱ्या या परिषदेत इस्रायली गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी आणि अहमदीनेजाद यांच्यात एक सिक्रेट बैठक होईल, असेही रेक्टर डेली यांना सांगण्यात आले होते. वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रेक्टर डेली म्हणाले, अहमदीनेजाद यांना आमंत्रण देणे मला चिंताजनक वाटत होते. पण, या बैठकीमुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी होईल व अनेकांचे जीव वाचतील असा विश्वास वाटत होता. त्यामुळे अहमदीनेजाद यांना आमंत्रण देण्यासाठी आपण राजी झालो, असे रेक्टर डेली ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला म्हणाले.
अमेरिकेच्या एका माजी अधिकाऱ्याने ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेचे तत्कालीन प्रमुख डेव्हिड बार्निया यांनी २०२४ मध्ये बुडापेस्टला जाऊन अहमदीनेजाद यांची वैयक्तिक भेट घेतली होती. त्यानंतर इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने संपर्क स्थापित झाल्याची माहिती अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’ला दिली.
२०२४ नंतर पुढील वर्षी अहमदीनेजाद हे पुन्हा एकदा बुडापेस्टमधील विद्यापीठाला भेट देण्यासाठी आले होते. या भेटीत ‘मोसाद’ने त्यांना एका सिक्रेट ऑपरेशनसाठी प्रशिक्षण दिले होते. हा इस्रायलच्या दीर्घकालीन नियोजनाचा एक भाग होता. योग्य वेळ येताच अहमदीनेजाद यांच्याकडे इराणचे नेतृत्व सोपवण्यासाठी ‘मोसाद’चे एजंट्स तयारी करत होते, अशी माहिती या घडामोडींशी संबंधित असलेल्या अमेरिकी व इराणी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला दिली.
अहमदीनेजाद यांचे पूनर्वसन करण्यासाठी इस्रायलचे धाडसी ‘मिशन’?
इराण मधील राजवट बदलण्याच्या इस्रायली मोहिमेने याच वर्षी २८ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च बिंदू गाठला होता. अमेरिका व इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निधन झाले.
इराणमधील सर्वोच्च नेतृत्वाला संपवल्यानंतर त्यांच्या जागी इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांना तात्काळ नियुक्त करावे, असे नियोजन इस्रायलने केले होते. परंतु, नियोजनाप्रमाणे गोष्टी घडल्या नाही. त्याच दिवशी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात अहमदीनेजाद यांच्या घराच्या संरक्षण भिंतीचे नुकसान झाले. या हल्ल्यानंतर ‘प्युजो’ (Peugeot) कंपनीची एक काळ्या रंगाची कार अहमदीनेजाद यांच्या घरासमोर आली. या कारमधून माजी राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद यांना एका सुरक्षितस्थळी हलवण्यात आले, अशी माहिती इराणच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कारमध्ये मोसादचे एजंट होते. त्यांनी अहमदीनेजाद यांना एका सुरक्षित व गुप्त ठिकाणी नेले, असे या ऑपरेशनशी संबंधित अमेरिका व इराणच्या अधिकाऱ्यांनी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले.
इस्रायलची गुप्त मोहीम कशी फसली?
इराणमधील राजवट बदलण्याचा इस्रायलचा डाव अयशस्वी झाला. त्यामुळे अहमदीनेजाद हे मोसादवर नाराज झाले. तसेच मोसादच्या एजंट्सनी त्यांना सुखरूप हलवले, हेही त्यांना पटले नव्हते. त्यानंतर त्यांनी मोसादच्या एजंट्सने जिथे नेले होते ती जागा सोडली. तिथून ते बाहेर पडले. ते कोणत्या परिस्थितीत बाहेर पडले याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
फेब्रुवारीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर अहमदीनेजाद यांनी कोणत्याच सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावली नाही. दरम्यान, अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीवेळी ते मागील आठवड्यात दिसून आले. अहमदीनेजाद हे सध्या इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सच्या नजरकैदेत असल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलशी त्यांचे असलेले संबंध पाहून इराणने खबरदारी बाळगली आहे, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले. दरम्यान, इराण मधील वरिष्ठ नेत्यांपैकी कोणीही यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
