मंगल हनवते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षक पात्रता परीक्षा, आरोग्य भरती आणि म्हाडा भरती गैरप्रकार पुन्हा चर्चेत आले आहेत. या गैरप्रकारांची आता पुणे सायबर पोलिसांसह सक्तवसुली अंमलबजावणीने संचनालयाकडून (ईडी) समांतर चौकशी करण्यात येत आहे. पुणे सायबर पोलीस आणि ईडीने चौकशी करत असलेली पहिली, ऑफलाइन आणि परीक्षा होण्यापूर्वीचा घडलेली घटना आहे. म्हाडाने गैरप्रकार उघडकीस आल्यावर टीसीएसच्या माध्यमातून घेतलेल्या ऑनलाइन परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. निवड यादीतील ६३ उमेदवार बोगस असल्याचे समोर आले असून त्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाची सध्या म्हाडा स्तरावर चौकशी सुरू आहे. त्यानंतर या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. भरती परीक्षा गैरप्रकार नेमका आहे तरी काय, त्याचा हा आढावा…

म्हाडात किती रिक्त जागांची भरती?

आतापर्यंत लाखो कुटुंबाच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) व्याप्ती आता खूप वाढली आहे. गृहनिर्माण, पुनर्विकास यापुढे जाऊन इतरही प्रकल्प म्हाडाकडून राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने म्हाडातील कर्मचारी-अधिकारी वर्ग वाढविण्याची गरज लक्षात घेता वेळीवेळी सेवा भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार म्हाडाने ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून १७ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान अर्ज भरून घेतले. या भरतीला चांगला प्रतिसाद मिळाला. ५६५ जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले. या प्रक्रियेअंतर्गत डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्याचे म्हाडाने जाहीर केले.

गैरप्रकार नेमका कसा उघडकीस आला?

म्हाडाने ऑफलाइन परीक्षेची सर्व तयारी पूर्ण केली. त्यातील पहिला पेपर १२ डिसेंबरला होणार होता. मात्र परीक्षेला काही तास शिल्लक असताना अचानक १२ डिसेंबरच्या मध्यरात्री ही परीक्षाच रद्द करण्यात आल्याचे तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून जाहीर केले. या भरती परीक्षेत पेपरफुटीचा डाव आखण्यात आला होता. मात्र पुणे सायबर पोलिसांनी एमपीएस समन्वय समिती या विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या मदतीने हा डाव यशस्वी होण्याआधीच हाणून पाडला. पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तिघांना पुणे सायबर पोलिसांनी ११ डिसेंबरला रात्री ताब्यात घेतले. या घोटाळ्यात म्हाडाच्या भरती परीक्षेची जबाबदारी अर्थात परीक्षा प्रक्रियेची जबाबदारी ज्या कंत्राटदार कंपनीला देण्यात आली होती त्या कंपनीचा एक संचालक होता. त्यानंतर आरोग्य, टीईटी भरती घोटाळ्याप्रमाणे हाही एक मोठा भरती घोटाळा असल्याचे समोर आले. आरोग्य भरतीतील गैरप्रकार ज्या एमपीएससी समितीने उघड केला त्या समितीला १-२ डिसेंबरला म्हाडाचे पेपर फुटणार असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती समितीने तात्काळ पुणे सायबर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत पेपर फुटण्यापूर्वीच आरोपींना अटक करून एक मोठा भरती गैरप्रकार उघडकीस आणला.

ऑनलाइन परीक्षेतही गैरप्रकार?

डिसेंबरमध्ये भरती प्रक्रियेतील घोटाळा उघड झाल्यानंतर कंत्राटदार कंपनीऐवजी म्हाडाने स्वतः ही परीक्षा घ्यावी असे आदेश सरकारने दिले. त्यानुसार म्हाडाने नामांकित टीसीएस कंपनीची नियुक्ती करून जानेवारी-फेब्रुवारीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या. या ऑनलाइन परीक्षेतही दलाल सक्रिय असल्याचा आरोप एमपीएससी समितीकडून सातत्याने केला जात होता. मात्र हा आरोप म्हाडाने फेटाळून लावला होता. मात्र त्यानंतर मराठवाड्यातील परीक्षा केंद्रावर दलालांकरवी अनेक बोगस उमेदवार परीक्षेस बसविण्यात आल्याचे समोर आले. काही जणांना केंद्रावर पकडण्यात आले. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून गैरप्रकार केल्याचेही समोर आले.

टीसीएसच्या तपासानंतर गैरप्रकारावर शिक्कामोर्तब?

टीसीएसने पूर्णतया निर्दोष पद्धतीचा अवलंब न करता परीक्षा घेतल्याचा आरोप झाला. गल्लीबोळातील परीक्षा केंद्रे दिली, त्याचा फायदा दलाल आणि बोगस विद्यार्थ्यांनी घेतल्याचाही आरोप झाला. हे सर्व आरोप खरे ठरले. औरंगाबादमध्ये परीक्षा नसलेल्या दिवशी परीक्षा केंद्रावर जाऊन संगणकीय प्रणालीत काही बदल केल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणातून उघड झाले. याप्रकरणी औरंगाबाद क्रांतीनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे. ऑनलाइन परीक्षेच्या निकालानुसार अव्वल आलेल्या उमेदवारांच्या यादीतील ३६ नावे एमपीएससी समितीला संशयास्पद आढळली. त्यानुसार समितीने या नावांच्या चौकशीची मागणी म्हाडाकडे केली. म्हाडाने टीसीएसला चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या चौकशीनंतर ६३ परीक्षार्थी टीसीएसला संशयित आढळले. त्यामुळे म्हाडाने स्वतः या ६३ उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मे पासून सुरू झालेली ही चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही. ही चौकशी म्हाडाने लवकरात लवकर पूर्ण करावी आणि दोषींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी उमेदावर आणि एमपीएससी समितीकडून केली जात आहे. चौकशी अंतिम टप्प्यात असून लवकरच अहवाल सादर केला जाईल. दोषीविरोधात लवकरच कडक कायदेशीर कारवाई होईल असे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explaiend what is mhada recruitment scam tcx online exam print exp sgy
First published on: 16-08-2022 at 08:14 IST