अतिशय वेगवान आणि अखंडित इंटरनेट सुविधा पुरवणारे ‘५ जी’ तंत्रज्ञान हे सातत्याने चर्चेचा आणि उत्कंठेचा विषय बनले आहे. ही सेवा संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्राला आणि पर्यायाने त्याच्याशी निगडित सर्वच क्षेत्रांना नव्या क्रांतीच्या दिशेने नेईल, असे म्हटले जाते. मात्र, अमेरिकेत या सेवेच्या शुभारंभालाच विघ्न उभे ठाकले आहे. अमेरिकेत बुधवारपासून ‘५ जी’ सेवेला सुरुवात होत असतानाच या तंत्रज्ञानामुळे अमेरिकेची विमान वाहतूक सेवा कोलमडून पडण्याची भीती व्यक्त झाली आणि जगभर खळबळ उडाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमके काय घडले?

अमेरिकेत एटी ॲण्ड टी आणि व्हेरीझॉन या कंपन्यांच्या ‘५ जी’ सेवेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. मात्र, ‘५ जी’ कार्यान्वित होताच त्याचा विपरीत परिणाम देशातील हवाई वाहतुकीवर होईल, असा इशारा तेथील विमान वाहतूक कंपन्यांनी दिला. या तंत्रज्ञानामुळे बहुतांश विमाने निकामी होतील आणि सेवा विस्कळीत होऊन लाखो प्रवासी अडकून पडतील, असा इशारा या कंपन्यांनी दिला आहे.

समस्या काय?

अमेरिकेने गेल्या वर्षी ‘५ जी’ लहरींचा लिलाव करत एटी ॲण्ड टी आणि व्हेरीझॉन या कंपन्यांना ‘सी बॅण्ड’वरील ३.७ ते ३.९८ गिगाहर्ट्झ या स्तरावरील लहरी ८० अब्ज डॉलरच्या मोबदल्यात बहाल केल्या. या उच्चस्तरीय लहरी या समस्येचे मूळ कारण आहे. विमान हवेत उडत असताना त्याचे जमिनीपासूनचे अंतर मोजणारे ‘अल्टीमीटर’ हे उपकरण अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. विमानाची दिशा बदलण्यासाठी, ते उतरवण्यासाठी या उपकरणाचा आधार घ्यावा लागतो. हे उपकरण हवेतील ४.२ ते ४.४ गिगाहर्ट्झच्या लहरी श्रेणीत (फ्रिक्वेन्सी) कार्यरत असते.

हवाई वाहतूक प्रशासनाच्या अर्थात ‘फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन’च्या (एफएए) म्हणण्यानुसार, या लहरी आणि ‘५जी’च्या सी बॅण्डच्या लहरी यांतील अंतर फारच कमी असल्यामुळे ५ जी लहरी अल्टीमीटरच्या कार्यात अडथळे निर्माण करू शकतात. तसे झाल्यास विमान वाहतुकीला धोका निर्माण होऊ शकतो. स्वयंचलित पद्धतीने विमान जमिनीवर उतरवण्याच्या प्रक्रियेतही या लहरी अडथळा आणू शकतात. विशेषत: खराब हवामानाची स्थिती असल्यास हा धोका वाढू शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

परिणाम काय?

‘५जी’ सुरू होताच ही समस्या उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक विमान वाहतूक कंपन्यांनी अमेरिकेतील हवाई वाहतूक कमी करण्यास सुरुवात केली आहे. एमिरेट्स, भारताची एअर इंडिया, जपान एअरलाइन्स आदी कंपन्यांनी अमेरिकेतील अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. बोस्टन, शिकागो, ह्यूस्टन, न्यूयॉर्क, सॅन फ्रॅन्सिस्को आदी शहरांतील विमानसेवा यामुळे मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची भीती आहे. एअर इंडियाने तर अमेरिकेतील अनेक उड्डाणे रद्द केल्याचे मंगळवारीच जहीर केले. बोइंगने आपल्या ‘बोइंग ७७७’ विमानांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याचे जाहीर केले आहे.

दूरसंचार कंपन्यांचे म्हणणे काय?

एटी ॲण्ड टी आणि व्हेरीझॉन या दोन्ही कंपन्यांनी मात्र ही भीती निराधार ठरवली आहे. जगभरातील ४० हून अधिक देशांमध्ये ‘५जी’ कार्यान्वित झाली आहे. मात्र, त्याचा विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी सध्याची गोंधळाची स्थिती लक्षात घेऊन या कंपन्यांनी विमानतळांच्या परिसरात ‘५जी’ सेवा कार्यान्वित न करण्याचेही जाहीर केले आहे.

अन्यत्र काय स्थिती?

जगभरातील ४० हून अधिक देशांत ‘५जी’चा हवाई वाहतुकीला अडथळा झाला नसल्याचा दूरसंचार कंपन्यांचा दावा खरा आहे. मात्र, या देशांतील ‘५जी’ लहरींचा स्तर आणि अमेरिकेतील लहरींचा स्तर यांतील फरक हा महत्त्वाचा मुद्दा आहे. युरोपीय महासंघाने २०१९मध्ये ‘५ जी’च्या मध्यम श्रेणीतील लहरींचा स्तर ३.४ ते ३.८ गिगाहर्ट्झवर निश्चित केला आहे. हा स्तर अमेरिकेच्या ‘५जी’ स्तराच्या तुलनेत खाली असून त्यामुळे अल्टीमीटरच्या कार्यप्रणालीत अडथळे येत नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दक्षिण कोरियातही लहरींचा स्तर युरोपीय देशांप्रमाणेच आहे.

लहरींचा स्तर वाढवण्याचे कारण?

लहरींचा स्तर जितका वर असतो तितकी अधिक वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध होते. ‘५ जी’ तंत्रज्ञानाची मुलभूत संकल्पनाच या गृहितकावर आधारित आहे. अन्य देशांनी लहरींचा स्तर मर्यादेत ठेवला असला तरी, अमेरिकेतील दूरसंचार कंपन्यांनी मात्र, उच्च स्तरातील लहरींद्वारे ‘५ जी’ पुरवण्याचा निर्णय घेतला. यामुळे अमेरिकी नागरिकांना अतिशय वेगवान इंटरनेट सेवा मिळेल, असा या कंपन्यांचा दावा आहे. विशेष म्हणजे, सी बॅण्डवरील काही लहरी उपग्रह दूरसंपर्कासाठी वापरण्यात येतात. आता ‘५ जी’ सेवेचाही या बॅण्डमध्ये प्रवेश झाल्याने त्यातही अडथळे येण्याची भीती आहे. याबाबत विरोधी सूर उमटू लागल्यामुळे दोन्ही दूरसंचार कंपन्यांनी नजीकच्या काळात उच्च स्तरीय लहरींचा वापर न करण्याची हमी दिली आहे. मात्र, तरीही प्रश्न कायम आहे.

भारतातील स्थिती काय?

केंद्र सरकारने चालू वर्षात देशातील महत्त्वाच्या शहरांत ‘५ जी’ सेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. यात मुंबई, दिल्ली, बंगळूरू, कोलकाता, पुणे, गुरगाव, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ आदी शहरांचा समावेश आहे. भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी यासाठी तयारीही सुरू केली आहे. मात्र, यासाठीच्या लहरींचा लिलाव अद्याप निश्चित झालेला नाही. तो यावर्षी जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained 5g telecom service airline safety abn 97 print exp 0122
First published on: 19-01-2022 at 19:27 IST