scorecardresearch

लोकसत्ता विश्लेषण : रतन टाटांच्या आवाजात खास संदेश ते उत्तम फूड सर्व्हिस; आता बदलताना दिसणार एअर इंडिया

एअर इंडिया २७ जानेवारी रोजी ६९ वर्षांनंतर संस्थापक टाटा समूहाकडे परतली आहे

Tata Group takes over Air India

एअर इंडियाची मालकी हस्तांतरण प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. आज टाटा समूह आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या शेवटच्या प्रक्रिया फेरीनंतर आता एअर इंडियावर पूर्णपणे टाटांची मालकी प्रस्थापित झाली आहे. एअर इंडिया २७ जानेवारी रोजी ६९ वर्षांनंतर संस्थापक टाटा समूहाकडे परतली आहे. आयर्लंडमधील भाडेकरूंकडून अनिवार्य मंजुरी (एनओसी) वगळता मालकीच्या हस्तांतरणासाठी सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. टाटा समूहाने गुरुवारी मुंबईहून चालवल्या जाणाऱ्या चार फ्लाइट्सवर ‘उत्तम जेवण सेवा’ सुरू करून एअर इंडियामध्ये पहिला प्रवेश केला. याशिवाय, मालकी मिळाल्यानंतर, एअर इंडियामध्ये आणखी बरेच बदल केले जाऊ शकतात. ज्यामध्ये प्रवाशांच्या थेट संपर्कात येणाऱ्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाऊ शकतात अशी माहिती अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली आहे.

एअर इंडिया टाटांकडे सोपवण्याचा औपचारिक अर्थ काय? आता काय होणार?

एकदा आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षरी झाल्यानंतर, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांसह सात संचालकांचा समावेश असलेले एअर इंडियाचे सध्याचे बोर्ड टाटा-नियुक्त मंडळाचा पदभार स्वीकारण्यासाठी त्यांच्या पदांचा राजीनामा देईल. यानंतर, मुख्य निर्णय घेण्याचे अधिकार नवीन मालकांकडे असतील.

हस्तांतरणापूर्वी, कराराच्या अंतिम टप्प्यांपैकी एक म्हणजे एअर इंडियाच्या ताळेबंदाला अंतिम रूप देणे आहे. २० जानेवारीच्या कटऑफ तारखेसह अंतिम ताळेबंद सोमवारी टाटा समूहाला एअरलाइनने दिला.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, सरकारने टाटा समूहाला एअर इंडियाच्या निर्गुंतवणूक प्रक्रियेत विजयी बोली म्हणून घोषित केले. या घोषणेनंतर, सरकारने एअरलाईनमधील १०० टक्के स्टेक टाटा समूहाकडे हस्तांतरित करण्याची इच्छा व्यक्त करणारे एक पत्र जारी केले.

टाटा समूहाने किती बोली लावली?

एअर इंडिया कर्जबाजारी झाल्यानंतर आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना केंद्र सरकारने एअर इंडियामधून १०० टक्के निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला. टाटा सन्सनं यासाठी लावलेली १८ हजार कोटींची बोली अखेर अंतिम करण्यात आली. मात्र, यावेळी एअर इंडियावर तब्बल १५ हजार ३०० कोटींचं कर्ज होतं. या कर्जाची रक्कम वगळता उरलेले २ हजार ७०० कोटी रुपये रोख स्वरूपात केंद्र सरकारला अदा करण्याचं टाटा सन्सनं मान्य केलं होतं. गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, व्यापारमंत्री पीयूष गोयल आणि नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी एअर इंडियाच्या व्यवहारास ४ ऑक्टोबरला मंजुरी दिली होती.

एअर इंडियाचे क्रू मेंबर का नाराज आहेत?

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एअर इंडिया सध्या केबिन क्रू मेंबर्सच्या बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) बाबतच्या निर्णयावरून वादात सापडली आहे. याला क्रू मेंबर्सनी आक्षेप घेतला आहे. हे मानवी संवेदनांच्या पलीकडचे असल्याचे क्रू मेंबर्सनी म्हटले आहे. २० जानेवारी रोजी जारी केलेला आदेश एअर इंडियाच्या कार्यकारी संचालकांनी जारी केला होता. आदेशात ग्रूमिंग असोसिएट्सना फ्लाइट किंवा स्टँडबाय ड्युटीसाठी अहवाल देताना केबिन क्रूचे बॉडी मास इंडेक्स व्यवस्थापन/ग्रूमिंग/युनिफॉर्म इत्यादी तपासण्याचे काम सोपवण्यात आले आहे. या संदर्भात जारी केलेल्या आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे क्रू मेंबर्सने पालन केले आहे याची खात्री करणे ही केबिन पर्यवेक्षकाची जबाबदारी असेल, असे या आदेशात म्हटले आहे.

रतन टाटांचा आवाज ऐकू येणार?

एअरलाइनला पुन्हा रुळावर आणण्यासाठी टाटाचा भर देखील एक वेळेबाबतच्या कामगिरीवर आहे. एअर इंडियाच्या विमानांचे उड्डाण दिलेल्या वेळेत होईल याची काळजी घेण्याला टाटा समूहाचे प्राधान्य असणार आहे. विमानाचे दरवाजे उड्डाणाच्या वेळेच्या १० मिनिटे आधी बंद केले जातील, असे अहवालात म्हटले आहे. टाटा समूहाचे संदीप वर्मा आणि मेघा सिंघानिया हे इनफ्लाइट सेवेचे काम पाहतील. त्यांची जबाबदारी केबिन क्रूवर असणार आहे. संदीप वर्मा आणि मेघा सिंघानिया यांनी काही मुद्दे निश्चित केल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यांच्या मते, विमानाच्या आत केल्या जाणाऱ्या घोषणेमध्ये प्रवाशांना पाहुणे म्हणून संबोधले जाईल. जर सर्वकाही योजनेनुसार झाले तर एअर इंडियाच्या इन-फ्लाइट घोषणांमध्ये बदल केले जातील. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचा आवाज प्रवाशांना ऐकू येईल. उद्योगपती रतन टाटा यांचे विशेष भाषण फ्लाइटमध्ये ऐकू येऊ शकते. तसेच कॉकपिट क्रूसाठी एअर इंडियाच्या नवीन परिपत्रकानुसार स्वागत घोषणेत आता बदल करण्यात आला आहे. “प्रिय पाहुण्यांनो, या ऐतिहासिक फ्लाइटमध्ये आपले स्वागत आहे. आज सात दशकांनंतर, एअर इंडिया अधिकृतपणे पुन्हा टाटा समूहाचा भाग बनली आहे. एअर इंडियाच्या भविष्यात आपले स्वागत आहे,” अशी घोषणा आता ऐकू येणार आहे.

उत्तम फूड सर्व्हिस

दरम्यान, विमानातील खाद्यपदार्थांची सेवाही सुधारली जाणार आहे. अहवालानुसार, केटरर्सना माहिती देण्यात आली आहे आणि ते हळूहळू टाटांच्या विमान सेवेसाठी अन्न आणि उपकरणे पुरवतील. दिल्ली-मुंबई आणि प्रमुख आखाती मार्गांवर अमेरिका आणि ब्रिटनला जाणार्‍या विमानांमध्ये या सेवा प्रथम चालवल्या जातील. प्रवाशांना एआय फ्लाइट्सवर उत्तम खाद्य सेवा आणि क्रू आणि ग्राउंड स्टाफसोबत एअरलाइन इंटरफेस पाहण्यास मिळेल. फ्लीट आणि केबिन अपग्रेड यासारखे मोठे बदल होण्यास अजून वेळ लागणार आहे. दरम्यानस टाटा जर एअर इंडियाला फायदेशीर एअरलाइन बनवण्यास सक्षम असेल, तर ते जागतिक स्तरावर सर्वात मोठ्या विमान वाहतूक परिवर्तनांपैकी एक असणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained air india handover new air india flight upgraded meals rattan tata special voice message abn

ताज्या बातम्या