scorecardresearch

विश्लेषण : ‘आशा’वादी जागतिक सन्मान

करोनाकाळात ग्रामीण आणि शहरी भागांत आरोग्याची धुरा खंबीरपणे पेलणाऱ्या आशा सेविकांना यंदा जागतिक आरोग्य संघटनेने ‘ग्लोबल हेल्थ लीडर्स’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

vishleshan asha worker
अ‍ॅक्रिडिएटेड सोशल हेल्थ अ‍ॅक्टिव्हिस्ट’ या इंग्रजी शब्दांचे आद्याक्षरांनुसार लघुरूप म्हणजे ‘आशा’.

शैलजा तिवले

करोनाकाळात ग्रामीण आणि शहरी भागांत आरोग्याची धुरा खंबीरपणे पेलणाऱ्या आशा सेविकांना यंदा जागतिक आरोग्य संघटनेने ‘ग्लोबल हेल्थ लीडर्स’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. देशभर कार्यरत असलेल्या १० लाख ४० हजार आशा सेविकांचा हा गौरव आहे. अफगाणिस्तानातील पोलिओ-निर्मूलन कार्यकर्ते, इंग्लंमधील डॉ. अहमद हंकीर, आफ्रिकेतील काबो वेर्दे मधील लुडमिला सोफिया ऑलिव्हेरिया व्हरेला आणि जपानच्या योहेही सासाकावा यांचाही विजेत्यांमध्ये समावेश असून रवांडातील डॉ. पॉल हार्मर यांना या पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार आहे.

आशा म्हणजे काय?

‘अ‍ॅक्रिडिएटेड सोशल हेल्थ अ‍ॅक्टिव्हिस्ट’ या इंग्रजी शब्दांचे आद्याक्षरांनुसार लघुरूप म्हणजे ‘आशा’. सन २००५ मध्ये सुरू झालेल्या ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान’ (नॅशनल रुरल हेल्थ मिशन- एनआरएचएम) या उपक्रमाने प्रत्येक गावात सामाजिक आरोग्य कार्यकर्ती निर्माण करणे हे उद्दिष्ट ठेवले, त्यानुसार दहा वर्षांत या कार्यकर्तीची संख्या सात लाखांवर गेली व ती वाढतेच आहे.

महिलांनाच ‘आशा’ होण्याची संधी का?

गावामध्ये प्राथमिक आरोग्याशी निगडित मोठा वर्ग महिला, मुली आणि मुले हा असतो. महिला आरोग्यसेविकांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे असून गावातील महिलादेखील त्यांच्या अडचणी, प्रश्न महिला आरोग्यसेविकेकडे सहजपणे मांडू शकतात. गावातील कौटुंबिक आरोग्याशी निगडित अनेक प्रश्न, समस्यांवर आरोग्यसेविका चांगल्या रीतीने काम करू शकतात. त्यामुळे आशा म्हणून गावातील महिलेची निवड केली जाते.

आशा काय काम करतात?

गावपातळीवर आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे, आरोग्य सुविधा मिळत आहे का याचा पाठपुरावा करणे आणि ती मिळवून देण्यासाठी मदत करणे असा तीन टप्प्यांमध्ये आशांचा सहभाग आहे. गावांमध्ये गरोदर महिला, माता आणि नवजात बालकांच्या आरोग्याचा पाठपुरावा करण्याची प्रमुख जबाबदारी आशा सेविकांची असते. गरोदर महिलांच्या नियोजित तपासण्या करून घेणे, रुग्णालयीन प्रसूतीसाठी मदत करणे, प्रसूती झालेल्या महिलांना नवजात बालकाची काळजी घेण्याबाबत माहिती देणे, बालकांचे लसीकरण पूर्ण करणे इत्यादी कामे आशा करतात. याव्यतिरिक्त गरोदर आणि प्रसूती झालेल्या महिलांसाठी असलेल्या सरकारच्या विविध योजनांची माहिती देणे, त्यांचा लाभ मिळवून देणे यामध्येही आशांचा सहभाग असतो. याव्यतिरिक्त हिवताप, सिकल सेल, कुष्ठरोग, क्षयरोग, पोलिओ इत्यादी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांबाबत जनजागृती आणि नियंत्रणासाठी कार्यक्रम राबविण्यात आशांचा महत्त्वाचा वाटा आहे. कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करणे, गर्भनिरोधक साधनांचे वाटप करण्याचे कामही आशा करतात. किशोरवयीन मुलींचे आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारीही आशांवर आहे. विविध सर्वेक्षणांतर्गत गावातील आरोग्याची माहिती गोळा करण्याचे कामही आशा करतात.

करोनाकाळात आशांनी कोणती जबाबदारी निभावली?

करोनाकाळात आरोग्य यंत्रणा करोनाकेंद्री होत्या. या काळात करोनाव्यतिरिक्त इतर आजारांसाठी गावातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या आरोग्य सेवा मिळवून देण्यात, त्यांचा पाठपुरावा करण्यात आशाची भूमिका महत्त्वाची होती. गावामध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांच्या नोंदी करणे, संशयित रुग्णांच्या प्राथमिक तपासण्या करणे, बाधित आढळल्यास सरकारला माहिती देणे, बाधितांना पुढील उपचारासाठी दाखल करणे अशा विविध टप्प्यांवर आशा कार्यरत होत्या. याव्यतिरिक्त राज्यभरात या काळात राबविलेल्या ‘आमचे कुटुंब आमची जबाबदारी’ या अभियानाअंतर्गत विविध असंसर्गजन्य आजार असलेल्या व्यक्तींची माहिती गोळा करण्याचेही कामही आशांनीच केले.

यासाठी काही मानधन मिळते का?

आशा सेविकांना कामानुसार मानधन दिले जाते. प्रत्येक कामाला काही मोबदला ठरलेला आहे. कामानुसार मोबदला ठरल्यामुळे आशा सेविका अधिक चांगल्या रीतीने काम करतील, अशी यामागची संकल्पना आहे. मात्र, हा मोबदला तुटपुंजा असल्याने तो वाढविण्याची मागणी आशांमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन महिन्याला ठोस मानधनाची मागणीही आशांच्या संघटनांमार्फत केली जात आहे.

आशांची निवड कशी केली जाते?

स्थानिक महिलेची आशा म्हणून ग्रामसभेमार्फत निवड केली जाते. २५ ते ४५ वयोगटातील महिला यासाठी पात्र असते. आदिवासी भागात कमीत कमी आठवी पास तर बिगरआदिवासी भागात आठवी ते दहावी पास महिलेला आशा म्हणून काम करता येते. राज्यभरात सध्या सुमारे ७० हजार आशा कार्यरत आहेत. आदिवासी भागात १००० लोकसंख्येमागे, तर बिगरआदिवासी भागामध्ये १५०० लोकसंख्येमागे एक आशा काम करते. शहरी झोपडपट्टी भागांमध्येही आरोग्य सेवेशी जोडून घेण्यासाठी आशा कार्यरत आहेत. आशांच्या कामावर देखरेख करण्यासाठी आणि आवश्यक मदत करण्यासाठी आशा गटप्रवर्तक कार्यरत असतात.

आशांची भूमिका महत्त्वाची कशी?

आशांची योजना यशस्वी झाली असून ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये मातामृत्यू, बालमृत्यू रोखणे, लसीकरण वेळेत पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणे शक्य झाले आहे. तसेच इतर राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणीही ग्रामीण स्तरावर करण्यास आशांमुळे मदत होत आहे. परंतु एका आशा सेविकेवर विविध आरोग्य योजना, सर्वेक्षण यांची जबाबदारीही टाकली जाते. याचा परिणाम त्यांच्या इतर नियोजित इतर कामांवर होतो. आशा सेविका या गावातील आरोग्यासाठी आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यां असतील अशीही या कार्यक्रमामागे भूमिका होती. परंतु मागील काही वर्षांत आशांची ही भूमिका मागे पडत चालली आहे. आशा आता सरकारी यंत्रणेचाच भाग झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेतील त्रुटींवर भाष्य करण्याची आशांची जबाबदारीही या कार्यक्रमातून दुर्लक्षित होते आहे, अशी खंत आरोग्य विभागातील निवृत्त उच्चपदस्थ व्यक्त करतात.

    shailaja.tiwale@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-05-2022 at 00:02 IST
ताज्या बातम्या