पावलस मुगुटमल  pavlas.mugutmal@expressindia.com
सध्या नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल जोमाने सुरू आहे. मोसमी वाऱ्यांनी नुकताच केरळमधून भारतात प्रवेश केला. आता त्याच्या महाराष्ट्रातील प्रवेशाचे वेध लागले आहेत. लवकरच तो तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर हा कालावधी मोसमी पावसाचा असतो. इतर वेळेला पडणारा पाऊस हा अवकाळी किंवा पूर्वमोसमी म्हणून संबोधला जातो. हवामानशास्त्रानुसार मार्च ते मे या कालावधीत पडणारा पाऊस पूर्वमोसमी पाऊस असतो. जलसाठे भरून जलसमृद्धी येण्यासाठी आणि शेतीसाठी मोसमी पाऊस महत्त्वाचा असतो. मग, पूर्वमोसमी पावसाचा फायदा काय, असा प्रश्न निर्माण होतो. उन्हाळय़ाचा हंगाम सुरू झाल्यापासून एक महिन्यानंतर पूर्वमोसमी पाऊस सुरू होतो. उन्हाळा कडक असल्यास पाण्याचा वापर वाढतो. त्याचप्रमाणे जलसाठय़ांमधून पाण्याचे बाष्पीभवनही मोठय़ा प्रमाणावर होत असते. त्यामुळे पाणी झपाटय़ाने कमी होते. हक्काचा मोसमी पाऊस होण्यासाठी तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी असतो. अशा काळात जलसाठय़ात काही प्रमाणात का होईना पूर्वमोसमी पाऊस भर घालतो. हाच त्याचा सर्वात मोठा फायदा समजला जातो.

पूर्वमोसमी पावसाने जलसाठय़ांत किती भर पडते?

water supply through tankers
दुष्काळ ; ५,००० गावे टँकरग्रस्त
Nashik heats up temperature at 40.4 degree Celsius but sprinkles of rain in some areas
नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?

मोसमी पावसाचा भारतातील एकूण पावसाचा वाटा हा ७० टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे पाण्याच्या दृष्टीने आपण मोसमी पावसावर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून असतो, हे वास्तव असले तरी पूर्वमोसमी पावसामुळेही काही प्रमाणात दिलासा मिळत असल्याचे वास्तव आहे. पूर्वमोसमी पाऊस सरासरीच्या प्रमाणात बरसल्यास उन्हाच्या झळांमध्ये धरणांतून झपाटय़ाने कमी होणाऱ्या पाणीसाठय़ात दोन-तीन टक्क्यांची तरी भर पडू शकते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी कुठे कमी?

गेल्या वर्षी महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या धरणसाठय़ामध्ये यंदाच्या तुलनेत गेल्या वर्षी तीन ते चार टक्क्यांनी पाणीसाठा अधिक होता. सध्या जूनच्या सुरुवातीला राज्यातील एकूण पाणीसाठा गेल्या वर्षीप्रमाणेच असला, तरी विभागानुसार पाणीसाठय़ाचे आकडे पाहिल्यास पूर्वमोसमी पाऊस कमी झालेल्या विभागांतील धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी कमी असल्याचे दिसून येते. पुणे, नाशिक, कोकण आदी विभागांत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे. नाशिक विभागात तो गतवर्षीपेक्षा पाच टक्क्यांनी कमी आहे.

पूर्वमोसमीचा फटका कशाला?

उन्हाच्या झळांमध्ये पूर्वमोसमी पावसाने पाणीसाठय़ात काही प्रमाणात भर पडत असली, तरी या पावसाने रौद्ररूप धारण केल्यास त्याचा फटकाही बसतो. पूर्वमोसमी पाऊस हा सर्वसाधारणपणे दुपारनंतर पडतो. समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि स्थानिक परिस्थितीनुसार हा पाऊस मर्यादित विभागात होत असतो. मात्र, या कालावधीत चक्रीवादळे निर्माण झाल्यास त्याचा तोटाही सहन करावा लागतो. गेल्या काही वर्षांत पूर्वमोसमी पावसाच्या काळात वादळी वारे आणि गारपीटही होत असते. त्यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे काही प्रमाणात लाभकारक असलेला हा पाऊस कधी-कधी त्रासदायकही ठरू शकतो.

यंदा राज्यात नेमके काय घडले?

उन्हाच्या झळांमध्ये पाणीसाठय़ात काही प्रमाणात भर घालणाऱ्या पूर्वमोसमी पावसाने यंदा महाराष्ट्राकडे पाठ फिरविली. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये एकही टक्का पाऊस झाला नाही. २० जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची नोंद झाली असून, उर्वरित सर्व जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत पाऊस उणाच ठरला. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ६६ टक्के पाऊस उणा ठरला. त्यामुळे मोसमी पावसाचे आगमन लांबल्यास किंवा जूनमध्ये तो पुरेसा न बरसल्यास पाणीसाठय़ाबाबत गंभीर स्थिती निर्माण होण्याची परिस्थिती सध्या आहे. सध्या राज्यातील धरणांत केवळ ३५ टक्के पाणीसाठा आहे. नंदूरबार, बीड, हिंगोली, जालना, भंडारा, बुलढाणा, वाशिम या सात जिल्ह्यांमध्ये संपूर्ण हंगामात एक टक्काही पूर्वमोसमी पाऊस होऊ शकला नाही. मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, नगर, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, लातूर, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण अत्यल्प ठरले. येथे ७० ते ९० टक्क्यांपर्यंत पाऊस उणा ठरला.

गेल्या वर्षी काय झाले होते?

राज्यात २०२१ या वर्षांत पूर्वमोसमी पाऊस सरासरीच्या तुलनेत अधिक झाला होता. या वर्षांत मार्चपूर्वी होणारा अवकाळी पाऊसही जोरदार होता. पण, पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण अधिक होते. एकटय़ा मे महिन्यात त्यातील सर्वाधिक पावसाची नोंद राज्यात झाली होती. सर्वाधिक पूर्वमोसमी पाऊस कोकणात झाला होता. मुंबई आणि पालघर जिल्ह्याने त्यात आघाडी घेतली होती. या दोन्ही भागांत सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पूर्वमोसमी पाऊस बरसला. पालघरमध्ये सरासरीच्या तुलनेत पूर्वमोसमीची टक्केवारी १९२०, तर मुंबईत ती १३७६ होती. ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी भागांत सरासरीच्या तुलनेत १० ते १५ पटीने अधिक पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव आदी भागांत दुप्पट ते चारपट पूर्वमोसमी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र या विभागांसह इतर भागांतही पूर्वमोसमी पावसाने पाठ फिरविली.