रेश्मा राईकवार

करोनानंतरचा काळ इतर अनेक उद्योगांप्रमाणे हिंदीसह तमाम इतर प्रादेशिक चित्रपट उद्योगांना ढवळून काढणारा ठरला आहे. अर्थात, बॉलिवुड नावाने ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचा विस्तार हा फक्त देशातील बाजारपेठेपुरता मर्यादित नाही. म्हणूनच सातासमुद्रापार प्रेक्षक आणि कोट्यवधींचा गल्ला गोळा करणाऱ्या ‘स्टार’ कलाकारांच्या प्रत्येक हिट – फ्लॉप चित्रपटाची चर्चा इतर कोणत्याही प्रादेशिक चित्रपटसृष्टीपेक्षा अधिक गांभीर्याने केली जाते. करोना काळात आधीच निर्माते-वितरकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यात गेल्या सहा महिन्यांत मोठमोठ्या कलाकारांनी ओळीने बिग बजेट फ्लॉप चित्रपट दिले असल्याने आता या चित्रपटांच्या अपयशाची जबाबदारी कलाकारांनी घ्यायला हवी, असा सूर चित्रपट वर्तुळातील व्यावसायिकांकडून आळवला जातो आहे.

किती बिगबजेट, मेगास्टार चित्रपट फ्लॉप?

गेल्या सहा महिन्यांत अक्षय कुमार, रणबीर कपूर, रणवीर सिंग, शाहीद कपूर, अजय देवगण, आलिया भट्ट अशा मोठ्या कलाकारांपासून ते आयुषमान खुराणा, राजकुमार राव, आदित्य रॉय कपूर अशा लोकप्रिय कलाकारांपर्यंत छोट्या-मोठ्या बजेटचे जेवढे चित्रपट आले ते सगळे तिकीटबारीवर गारद झाले. वीसहून अधिक प्रदर्शित बिग बजेट चित्रपटांपैकी केवळ ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘भुलभुलैय्या २’ या दोन चित्रपटांनी अनुक्रमे २५१ कोटी आणि १८५ कोटी रुपये कमाई केली आहे.

नामुष्कीचेही विक्रम…

चित्रपटांच्या यश-अपयशाचे गणित निर्माते-वितरकांना नवीन नाही. सुपरिहट होणार या अपेक्षेने खूप पैसे ओतून, मोठमोठे कलाकार घेऊन केलेले चित्रपट सपशेल आपटल्याची कित्येक उदाहरणे आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांत करोनामुळे व्यवसायच ठप्प झाल्याने चित्रपट व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. २०१९मध्ये ५,२०० कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या बॉलिवुडची त्यानंतरच्या दोन वर्षांत अडीच हजार कोटींपर्यंत घसरण झाली आहे. आत्तापर्यंत नव्या-जुन्या ‘स्टार’ चेहऱ्यांच्या चित्रपटांनी शंभर ते तीनशे कोटीपर्यंत कमाई केली असल्याने करोनानंतरही हेच चेहरे प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचून आणतील. किमान १५ ते २० चित्रपट शंभर कोटी रुपये कमाई करतील, अशी चित्रपट व्यावसायिकांची अपेक्षा होती. मात्र यावर्षी कोट्यवधी रुपये या कलाकारांवर खर्च करूनही नामुष्कीचे विक्रम तेवढे त्यांच्या वाट्याला आले. ही यादी लक्षवेधी आहे –

१. ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटासाठी यशराजने ३०० कोटी रुपये खर्च केले, ‘शमशेरा’चा निर्मिती खर्च १५० कोटी रुपये आहे. नोव्हेंबरपासून आत्तापर्यंत ‘शमशेरा’ हा यशराज प्रॉडक्शनचा चौथा बिग बजेट फ्लॉप चित्रपट आहे.

२. रणबीर कपूरचा ‘बेशरम’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘जग्गा जासूस’नंतरचा चौथा मोठा फ्लॉप चित्रपट.

३. अक्षय कुमारचे तीन चित्रपट फ्लॉप.

४. कंगना राणावतच्या ८० कोटी निर्मितीखर्च असलेल्या चित्रपटाचे उत्पन्न जेमते अडीच कोटी

५. नऊ चित्रपटांचा निर्मितीखर्च ९० ते ३०० कोटींच्या घरात असून प्रत्यक्षात खर्चाची किमान रक्कमही भरून निघालेली नाही.

…आणि तरीही मोठे मानधन हवे?

अक्षय कुमारने त्याच्या आगामी ‘सिंड्रेला’ या चित्रपटासाठी सर्वाधिक १३० कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जाते. चार चित्रपट अपयशी ठरले असूनही आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटासाठी रणबीरने ७५ कोटी रुपये मानधन घेतले आहे. चित्रपटाच्या एकूण निर्मितीखर्चापैकी जवळपास ८० टक्के कलाकारांच्या मानधनावर खर्च होतात. अनेक लोकप्रिय कलाकार चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी काही प्रमाणात मानधन आणि नफ्यामध्ये काही टक्केवारी घेतात. यात सलमान खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर, रणवीर सिंग, वरूण धवन, अजय देवगण ते आलिया भट्ट, तापसी पन्नू अशा सगळ्याच नव्या-जुन्या कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे चित्रपट यशस्वी झाला तर खूप मोठी रक्कम कलाकार घरी घेऊन जातात आणि अपयशी ठरला तरी किमान त्यांचे मानधन त्यांना मिळते. मात्र वितरकांचे या साखळीत फार मोठे नुकसान होते. या कलाकारांचे नाव-लोकप्रियता यांच्या जोरावर चित्रपटासाठी इतके मानधन दिले जात असेल तर चित्रपट अपयशी ठरल्यानंतर त्याची किमान जबाबदारी कलाकारांनी घ्यायला हवी, अशी मागणी होऊ लागली आहे.

आमिर खानने व्यक्त केली होती चिंता…

कलाकारांचे मानधन आणि नफ्यातील भागीदारीचे प्रमाण याबद्दल आमिर खाननेही काही वर्षांपूर्वी चिंता व्यक्त केली होती. एकूण निर्मितीखर्चापैकी ८० टक्के फक्त कलाकारांकडे जाणार असतील तर वीस टक्के रक्कमेत चांगले चित्रपट कसे बनवायचे, असा प्रश्न त्याने उपस्थित केला होता. त्यावर तोडगा म्हणून खुद्द आमिरने चित्रपटासाठी मानधन घेणे बंद केले. चित्रपटाचा जितका व्यवसाय होतो, त्यातील नफ्यात मात्र तो मोठी टक्केवारी घेतो. त्यामुळे त्याचा एखादा चित्रपट तिकीटबारीवर आपटला तर त्याच्या हाती काही लागत नाही. उलट ‘दंगल’सारखा एखादा चित्रपट सुपरहिट झाला तर नफ्यातील ७० टक्केहून अधिक रक्कम आमिर घेतो. शाहरुखनेही काही वर्षांपासून याच पद्धतीने काम करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले जाते.

कलाकारांनाही पैसे परत करावे लागले…

याआधी सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ चित्रपट फ्लॉप झाला तेव्हा त्याने वितरकांना ३२ कोटी रुपये परत केले होते. शाहरुख खाननेही ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘दिलवाले’ आणि त्याहीआधी ‘पहेली’सारखा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे काही टक्केवारीत पैसे परत केले होते. आताही कलाकार अशा पद्धतीने आपल्या अपयशाची जबाबदारी घेतील का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. या प्रश्नावर अभिनेत्री आलिया भट्टने ‘दि इंडियन एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात, अनेक कलाकार चित्रपट अपयशी ठरल्यास उरलेली मानधनाची रक्कम घेत नाहीत. किंवा त्यांचे मानधन कमी करतात, असे उत्तर दिले. इतकेच नाही तर चित्रपटांचा निर्मितीखर्च पाहून कलाकारांनी मानधन ठरवायला हवे, ही काळाची गरज असल्याचे मतही तिने व्यक्त केले. मात्र प्रत्यक्षात त्या दृष्टीने कलाकार आपले मानधन कमी करतील का किंवा निर्माते यापुढे कलाकारांच्या बाबतीतले आर्थिक धोरण बदलतील का, या प्रश्नांची उत्तरे बॉलिवुडचा चेहरामोहरा बदलणारी ठरू शकतात.