जगातील सर्वात अचूक, घातक आणि वेगवान सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्र (supersonic cruise missile) अशी ओळख झालेल्या ‘ब्रह्मोस’ची पहिली चाचणी ही १२ जून २००१ ला ओरिसातील चंदीपूर इथे घेण्यात आली. त्यानंतर असंख्य चाचण्या, तंत्रज्ञानात केलेले विविध बदल यानंतर आता देशाच्या लष्कर, नौदल आणि वायू दलात ‘ब्रह्मोस’चा समावेश करण्यात आला आहे. ‘ब्रह्मोस’च्या समावेशामुळे या तिन्ही दलांची ताकद वाढली आहे. ऐरवी शस्त्रास्त्रे आयात करणाऱ्या भारताने आता फिलिपिन्स देशाबरोबर ‘ब्रह्मोस’ निर्यातीचा करार केला आहे, शस्त्रास्त्रांच्या निर्यातीच्या शर्यतीत दमदार पाऊल टाकले आहे. ‘ब्रह्मोस’च्या वाटचालीचा हा आढावा…

पार्श्वभुमी

NASA captures mysterious ‘surfboard-shaped’ object orbiting moon
चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
successfully test fired advanced missile Agni Prime from APJ Abdul Kalam Island
‘अग्नी-प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

१९८० च्या दशकात डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला. यामध्ये पृथ्वी, अग्नी, त्रिशुल, आकाश आणि नाग अशी विविध मारक पल्ला आणि क्षमता असलेली क्षेपणास्त्रे विकसित करायला सुरुवात झाली. १९९० च्या सुमारास या कार्यक्रमाने एक निर्णायक पल्ला गाठला होता. त्याच काळात झालेल्या पहिल्या आखाती युद्धामध्ये ( इराक आणि अमेरिका-कुवेत युद्ध ) क्रुझ क्षेपणास्त्रांनी लक्षणीय कामगिरी केली. त्यामुळे देशाच्या संरक्षण व्यवस्थेला क्रुझ क्षेपणास्त्राची – मार्गदर्शित क्षेपणास्त्राची आवश्यकता भासू लागली. त्यानुसार रशिया आणि भारत देशांमध्ये थेट सरकारच्या माध्यमातून एक करार करण्यात आला. मॉस्को (Moscow) इथे १९९८ ला तत्कालिन भारत संरक्षण आणि विकास संस्था ( Defence Research and Development Organisation – DRDO)चे प्रमुख असलेले डॉ कलाम आणि रशियाचे संरक्षण मंत्री यांनी NPO Mashinostroyenia (NPOM) कंपनीच्या माध्यमातून करार केला.

भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये असलेली Moskva नदी यांची आद्याक्षरे घेत BrahMos Aerospace कंपनीची १९९९ ला स्थापना करण्यात आली आणि या माध्यमातून निर्माण केल्या जाणाऱ्या सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राला BrahMos – ब्रह्मोस असे नाव देण्यात आले. यामध्ये भारताचा हिस्सा ५०.५ टक्के आणि रशियाचा वाटा ४९.५ टक्के एवढा निश्चित करण्यात आला. पहिल्या सुपरसॉनिक ब्रह्मोसची चाचणी १२ जून २००१ ला घेण्यात आली. त्यानंतर विविध सुधारणा करत विकसित झालेले ब्रह्मोस हे संरक्षण दलाच्या तिनही विभागात दाखल झालं आहे.

सुखोई मधून सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची चाचणी

‘ब्रह्मोस’ चे सामरिक महत्त्व

जगात मोजक्या देशांकडे क्रुझ क्षेपणास्त्र – मार्गदर्शित क्षेपणास्त्र आहे, त्यापैकी भारत एक आहे. पण यापेक्षा भारताचे सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ हे जगातील सर्वात वेगवान क्रुझ क्षेपणास्त्र ठरले आहे. जगातील क्रुझ क्षेपणास्त्रांचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा कमी आहे. पण ‘ब्रह्मोस’चा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा तीनपट आहे. प्रवास करतांना कमीत कमी उष्णतेची खूण मागे ठेवत असल्याने क्षेपणास्त्राचा रडारवर ठावठिकाणा लावणे हे अत्यंत अवघड आहे. सुरुवातीला या क्षेपणास्त्राचा पल्ला हा २९० किलोमीटर एवढा होता. आता तो वाढवत ७०० किलोमीटर (extended range of BrahMos) एवढा केला आहे. त्यामुळे सीमेपासून अंतर राखत शत्रू पक्षाच्या नियोजित लक्ष्याचा वेध ‘ब्रह्मोस’ घेऊ शकते. हा पल्ला आणखी वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहेत.

विशेष म्हणजे या क्षेपणास्त्राची ५ मीटर एवढी अचूकता आहे. तर जमिनीपासून १० मीटर ते १५ किलोमीटर उंची राखत हे क्षेपणास्त्र प्रवास करु शकते. दोन टप्प्यांमध्ये हे क्षेपणास्त्र काम करते. पहिला टप्प्यामुळे क्षेपणास्त्राला ध्वनीचा वेग प्राप्त होतो तर दुसऱ्या टप्प्यामुळे क्षेपणास्त्राचा वेग हा ध्वनीच्या तीनपट होतो.

या सर्व वैशिष्ट्यांमुळे ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र हे जगातील एक घातक क्षेपणास्त्र आणि सर्वात प्रभावी क्रुझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते. ‘ब्रह्मोस’ मुळे पाकिस्तान आणि चीनला युद्धनितीमध्ये बदल करणे भाग पाडले गेले आहे हे विशेष.

‘ब्रह्मोस’चा वापर

देशाच्या संरक्षण दलाच्या तिनही प्रमुख विभागात ‘ब्रह्मोस’ कार्यरत आहे.

लष्करात ‘ब्रह्मोस’ हे २१ जून २००७ ला दाखल झाले. लष्कराकडे तीन ‘ब्रह्मोस’ रेजिमेंट कार्यरत आहे. लष्कराची गरज लक्षात घेता brahmos block 1-2-3 अशा विविध आवृत्त्या या विकसित करण्यात आल्या आहे. यामुळे भर वस्तीत एखाद्या इमारतीचा वेध घेण्याची, डोंगराळ भागात विशिष्ट ठिकाणी हल्ला करण्याची क्षमता ‘ब्रह्मोस’मुळे लष्कराला प्राप्त झाली आहे.

‘ब्रह्मोस’ची नौदलाची आवृत्ती ही ए्प्रिल २०१३ ला दाखल झाली. नौदलात आता सर्व प्रमुख युद्धनौकांवर हे ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. पाणबुडीमधून पाण्याखालून ‘ब्रह्मोस’ डागण्याच्या चाचण्या अजून सुरु असून लवकरच ते पाणबुडीच्या सेवेत दाखल होईल अशी अपेक्षा आहे.

तर २०२० मध्ये भारतीय वायू दलाला साजेशी अशी ‘ब्रह्मोस’ आवृत्ती दाखल झाली. वायू दलाचे प्रमुख लढाऊ विमान असलेल्या सुखोई -३० एमकेआय मधून ‘ब्रह्मोस’ डागता येऊ शकते. ‘ब्रह्मोस’च्या समावेशामुळे वायू दलाच्या प्रहार क्षमतेत मोलाची भर पडली आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये ‘ब्रह्मोस’क्षेपणास्त्र निर्यात करण्याबाबत फिलिपिन्स देशासी प्राथमिक करार करण्यात आला आहे. यानिमित्ताने प्रमुख शस्त्रास्त्र निर्यातीबाबत भारताने श्रीगणेशा केला आहे. भारतीय संरक्षण दलाचे सामर्थ्य वाढणाऱ्या ‘ब्रह्मोस’ची आणखी नवी आवृत्ती येत्या पाच-सहा वर्षात विकसित होणार असल्याची घोषणा BrahMos Aerospace चे व्यवस्थापकीय संचालक अतुल राणे यांनी केली आहे. म्हणजेच आत्ताच्या वेगाच्या दुप्पट – ध्वनीच्या सहा पट वेगाने प्रवास करणारे ‘ब्रह्मोस’ hypersonic missile लवकरच सज्ज होणार आहे.

( याबाबतचा मुळ लेख हा इंडियन एक्सप्रेसमध्ये सुशांत कुलकर्णी यांचा आहे )