संतोष प्रधान
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पक्षादेश (व्हिप) लागू करता येत नाही. गुप्त मतदान पद्धतीने मतदान असल्याने कोणी विरोधात मतदान केले याचा अंदाज येत नाही. राज्यसभा निवडणुकीत राजकीय पक्षांच्या आमदारांना मतपत्रिका दाखविण्याचे बंधन असते. विधान परिषद निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पक्षाचे आमदार मतदान करणार याची नेतृत्वाला माहिती असते. यामुळे मते फुटल्यास कोणाची मते फुटली याचा थोडा तरी अंदाज येतो. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तसा काही अंदाजही बांधता येत नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मध्य प्रदेश, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, आसाम या राज्यांमध्ये काँग्रेसची मते फुटली. मते फुटल्याचे स्पष्ट झाले तरीही काँग्रेस नेतृत्वाकडून आमदारांच्या विरोधात काहीच कारवाई केली जाणार नाही. सर्वच राजकीय पक्षांना मतांच्या फुटीचा फटका बसला. अगदी त्रिपुरामध्ये सत्ताधारी भाजपची मते फुटली.

काँग्रेस आमदारांची मते कोणत्या राज्यांमध्ये फुटली आहेत?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत खासदारांची एकत्रित मतांची मोजणी केली जाते. यामुळे कोणत्या राज्यातील खासदारांची मते फुटली याचा काहीच अंदाज येत नाही. आमदारांची मते राज्यनिहाय मोजली जातात. त्यातून कोणत्या राज्यांमध्ये कोणाला किती मते मिळाली याची आकडेवारी लगेचच समोर येते. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या संख्याबळापेक्षा १७ मते कमी मिळाली. काँग्रेसच्या १७ आमदारांनी भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे स्पष्ट झाले. मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये आदिवासी आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यातूनच काही आदिवासी आमदारांची मते मुर्मू यांना मिळाली असावीत, अशी शक्यता वर्तविली जाते. गुजरातमध्ये सात, झारखंडमध्ये सात आमदारांची मते विरोधी उमेदवाराला मिळाली. काँग्रेसची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्येही दोन मते कमी मिळाली. आसाममध्ये तर विरोधकांची २२ मते फुटली. मात्र काँग्रेसची सात ते आठच मते फुटली असावीत, असा पक्षाचा दावा आहे. कोणत्या आमदारांची मते फुटली याचा अंदाज बांधणे कठीण आहे. काँग्रेसची अवस्था सध्या तशीही नाजूकच आहे. त्यातच कोणावर संशय घेतला तरीही पक्षाचे नुकसान. महाराष्ट्रात अलीकडेच विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नऊ काँग्रेस आमदार गैरहजर होते. पण नोटिशीच्या पलीकडे पक्षाने काहीच केले नाही. गुजरात काँग्रेस अध्यक्षांनी आम्ही कोणावरही काहीही कारवाई करणार नाही, असे स्पष्ट केले. झारखंडमध्ये पक्षाने फक्त दखल घेतली आहे.

Sanjay Raut on Congress Sangli
“तुमची नौटंकी…”, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यानाच संजय राऊंताचा इशारा
Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप
Rahul Gandhi
पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी इच्छुक?
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

महाराष्ट्रात मते फुटली का ?

अन्य राज्यांमध्ये विरोधकांची मते फुटली असताना महाराष्ट्रात मात्र विरोधकांची मते विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मिळाली. राज्यात २८३ मतदान झाले होते त्यापैकी मुर्मू यांना १८१ तर सिन्हा यांना ९८ मते मिळाली. चार मते बाद झाली. एखाद दुसरे मत इकडे-तिकडे झाले असावे. पण अन्य राज्यांप्रमाणे राज्यात काँग्रेस वा राष्ट्रवादीची मते फुटलेली नाहीत. काँग्रेस व राष्ट्रवादीतील नाराजीमुळे भाजप उमेदावाराला २००च्या आसपास मते मिळतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता, पण तो फोल ठरला.

काँग्रेस नेतृत्वाची पकड कमी होत आहे का?

देशपातळीवरच काँग्रेस पक्ष कमकुवत होत आहे. पुन्हा निवडून येण्याची खात्री नसल्याने अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. भाजपची चलती असल्याने अनेकांना भाजपचे आकर्षण वाटते. याशिवाय केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी काही काँग्रेसचे लोकप्रतिनिधी भाजपचा मार्ग पत्करत आहेत. काँग्रेस नेतृत्वाचा खासदार-आमदार किंवा अन्य नेत्यांवर धाक असायचा. आता हा धाक राहिलेला नाही. पक्षाने कारवाईचे पाऊल उचलल्यास आहे तेपण पक्ष सोडून जाण्याची भीती. यातूनच सध्या काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पूर्वीप्रमाणे धाक राहिलेला नाही. राष्ट्रपती निवडणूक त्याला अपवाद नाही.