राष्ट्रवादीचे शिरुरमधील खासदार अमोल कोल्हे सध्या राष्ट्रपिता महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसे याच्यामुळे चर्चेत आहेत. यामागचं कारण म्हणजे गुरुवारी अमोल कोल्हे यांच्या एका जुन्या चित्रपटाचा ट्रेलर अचानक प्रदर्शित करण्यात आला. २०१७ मध्ये चित्रित करण्यात आलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर पाच वर्षांनी प्रदर्शित झाला आणि त्यानंतर एकच वाद सुरु झाला. याचं कारण म्हणजे या चित्रपटात अमोल कोल्हो नथुराम गोडसेच्या भूमिकेत आहेत. यामुळे अमोल कोल्हे नथुराम गोडसेच्या विचारांशी सहमत आहेत का? अशी चर्चा सुरु झाली. महत्वाचं म्हणजे या चित्रपटाला राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनीही विरोध दर्शवला आहे. जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण प्रकरण…
अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन हा सर्व वाद सुरु आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. २०१७ मध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं. पण दिग्दर्शक आणि निर्मात्यांमधील वादामुळे हा चित्रपट रखडला होता. पण त्यांच्यातील वाद समन्वयाने मिटल्यामुळे हा चित्रपट आता पाच वर्षांनी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पण मग विरोधाचं कारण काय?
अभिनेता असणारे अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. पण २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. २०१९ लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव अढळराव पाटील यांचा पराभव केला आणि पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.
राष्ट्रवादी पक्षाची विचारसरणी नेहमीच नथुराम गोडसेला विरोध करत आली आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका करणं हे पक्षाच्या विचारसरणीविरोधात आहे. एकाप्रकारे हे नथुराम गोडसेचं उदात्तीकरण असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच अभिनेता आणि सोबतच खासदार असलेल्या अमोल कोल्हेंच्या या चित्रपटाला विरोध होत आहे. अमोल कोल्हे यांनी मात्र हा चित्रपट केला तेव्हा सक्रीय राजकारणात नव्हतो असं स्पष्टीकरण दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांचाही विरोध
राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासह राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अमोल कोल्हेंच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. “अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही,” अशा शब्दांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.
तसेच पुढे बोलताना, “विनय आपटे, शरद पोंक्षे यांना या भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेने प्रचंड विरोध केला त्यामुळे त्याच भूमिकेबरोबर राहून या गांधी विरोधी चित्रपटाला विरोध करणार,” असंही आव्हाड यांनी सांगितलं आहे.
“कलाकार आणि माणूस दोन वेगळ्या भूमिका नाहीत. पण जेव्हा गांधी साकारता भूमिका बदलत नाही कारण ती वैचारिक भूमिका आहे. नथुराम महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. कलाकार म्हणून अमोल कोल्हे महान आहेत, पण त्यांनी केलेल्या अभियानाचा विरोध आहे,” असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटलांकडून पाठराखण
“छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा जीवनपट आणि त्यांचं कर्तृत्व घराघऱात पोहोचवण्याचं कामही अमोल कोल्हे यांनीच केलं आहे. शेवटी कलाकार म्हणून त्यांनी ती भूमिका पार पाडली आहे. २०१९ मध्ये आम्ही त्यांना पक्षात घेतलं आणि लोकसभेला उभं केलं. लोकांनीदेखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत निवडून आणलं. लोकसभेतही ते अतिशय चांगलं काम करत आहेत. बैलगाड्या शर्यत तसंच अनेक मुद्द्यांवर त्यांनी शाहू, फुले, आंबेडकरांचेच विचार सभागृहात मांडले आहेत. त्यामुळे एक कलाकार म्हणून त्यांनी आधी काही भूमिका केली असेल तर आज त्यासंबंधी दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत.
अमोल कोल्हेंनी काय बाजू मांडली आहे?
“२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत,” असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
शरद पवारांना याची माहिती आहे का?
अमोल कोल्हे यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शरद पवार तसंच सुप्रिया सुळे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करत यासंबंधी माहिती दिली आहे. अमोल कोल्हे शरद पवारांची प्रत्यक्ष भेट घेऊनही याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.
भाजपाने काय भूमिका घेतली आहे?
दरम्यान भाजपाकडूनही यावर प्रतिक्रिया आली असून यामध्ये काही चुकीचं नसल्याचं म्हटलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीव्ही ९ शी बोलताना सांगितलं की, “एक अभिनेता म्हणून त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका करणं यात मला काही चुकीचं वाटत नाही. ते नथुराम गोडसेच्या विचाराच्या बाबतीत समंत आहेत का हे त्यांनी एकदा जाहीर करावी. ती विरोधाची भूमिका मावळली का हा मुद्दा आहे”.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो. नथुराम गोडसेची करु शकतो…अफझल खानाचीही करु शकतो. त्याला काय होतं. म्हणजे मला नथुराम गोडसे अफझल खान आहे असं म्हणायचं नाही. सध्या संवदेनशील वातावरण असल्याने कशावरुनही वाद निर्माण होऊ शकतो त्यामुळे अफझल खान बाजूला ठेवू. पण एक अभिनेता कोणाचीही भूमिका करु शकतो”.
तुषार गांधींनी मांडलं स्पष्ट मत
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी म्हणाले, “अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली ती अभिनेता म्हणून केलीय. त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे. मी तर असं म्हणेन की त्यांना नथुराम आवडत असेल, त्यांचा आदर्श असेल तर तेही त्यांना स्वातंत्र्य आहे. जसं मला बापूंना मानायचं, भक्ती करायचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कलावंत म्हणून अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली त्याला माझा कोणताही आक्षेप नाही. मात्र, एका खुन्याचं उदात्तीकरण करण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याचा निषेध करायला हवा. तो आमचा अधिकार आहे.”
“आपल्या संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपल्याला कितीही न आवडणारं मत असलं तरी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपूनच ठेवावं लागेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचा मी समर्थक नाही. नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाच्या या प्रयत्नांची मला भीती वाटत नाही, कारण याने बापूंचं काही नुकसान होईल असं वाटत नाही. बापूंना बदनाम करण्याचे आणि नथुरामचं उदात्तीकरण करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ७० वर्षांनंतरही बापूंच्या कामाचं महत्त्व कायम आहे हे आपण पाहतोय. त्यांना शेवटी नथुराम हत्यारा होता हे मान्यच करावं लागतं,” असं मत तुषार गांधी यांनी व्यक्त केलं.
“जसा मशिनरी सोल्जर असतो, तो पैसे मिळतात म्हणून जाऊन लढतो, तसेच हे मशिनरी अॅक्टर आहेत. त्यांनी गोडसेचं उदात्तीकरण सुरू केलं तर मग ते त्यांच्या पक्षाचं मत आहे की स्वतःचं हे विचारावं लागेल,” असंही तुषार गांधींनी नमूद केलं.
कधी प्रदर्शित होणार हा चित्रपट?
‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.