भक्ती बिसुरे

डेल्टा या करोनाच्या उपप्रकारामुळे उद्भवलेली करोना संसर्गाची महाकाय दुसरी लाट ओसरते म्हणेपर्यंत दक्षिण आफ्रिकेत बहुविध उत्परिवर्तनामुळे आढळलेल्या ओमायक्रॉन उपप्रकाराने जगभर पुन्हा गोंधळ उडवला. ओमायक्रॉनच्या संसर्गाने भारतात लाटेचे स्वरूप धारण करण्याआधीच लाटेचा कर्ताकरविता ओमायक्रॉन नसून त्याचे बीए-१ हे उत्परिवर्तन असल्याचा निष्कर्ष निघाला. बीए-१ मुळे आलेली तिसरी लाट ओसरण्याआधीच आता बीए-२ या ओमायक्रॉनच्या नव्या उत्परिवर्तनाची चर्चा सुरू झाली आहे.

Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?
South Mumbai Redevelopment plans
आमचा प्रश्न दक्षिण मुंबई : नियोजनाअभावी रखडलेल्या ‘झोपु’ योजना

बीए-२ म्हणजे काय?

ओमायक्रॉन विषाणू गटातील हे एक उत्परिवर्तन आहे. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या करोना उत्परिवर्तनांमध्ये बीए-२चा समावेश आहे. सध्या सर्वत्र वाढत असलेल्या रुग्णसंख्येला ओमायक्रॉन कारणीभूत आहे. मात्र, ओमायक्रॉनची बीए-१, बीए-२ आणि बीए-३ ही उत्परिवर्तने या रुग्णवाढीला कारणीभूत आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात वाढलेल्या करोना रुग्णसंख्येला ओमायक्रॉनचे बीए-१ हे उत्परिवर्तन कारणीभूत ठरले. बीए-१ मध्ये ३२ बदल झाले होते. बीए-२ मध्ये तब्बल २८ बदलांची नोंद झाली आहे. वाढीचा वेग या निकषावर करोनाच्या मागील दोन्ही लाटांपेक्षा बीए-१ चा प्रसार. वेगवान, मात्र लक्षणे सौम्य असल्याचे दिसून आले आहे. बीए-२ संसर्गाबाबतही हेच चित्र कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

बीए-२ ची आत्ता चर्चा कशाला?

ओमायक्रॉन किंवा बीए-१ संसर्ग हा डेल्टा उत्परिवर्तनावर मात करत असल्याचे सुरुवातीच्या संशोधनांमधून दिसून येत होते. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये करण्यात येत असलेल्या जनुकीय क्रमनिर्धारणानुसार संसर्गाच्या बाबतीत बीए-२ विषाणू हा बीए-१ला मागे टाकत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्रिटन, जर्मनी, डेन्मार्क या देशांचा समावेश आहे. त्यामुळे संसर्गाचा वेग या निकषावर बीए-२ हा बीए-१ पेक्षा वेगवान असल्याचे चित्र आहे.

नवी लाट येणार?

बीए-२ उत्परिवर्तनामुळे नवी लाट येण्याची शक्यता नाही, मात्र सध्या दिसत असलेली लाट किंवा रुग्णवाढ काही काळापर्यंत लांबण्याची शक्यता आहे. ज्या दक्षिण आफ्रिकेतून ओमायक्रॉन संसर्गाची सुरुवात झाली, तेथेही आता रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. ज्या नागरिकांचे लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही किंवा ज्यांना ओमायक्रॉनच्या लाटेमध्ये संसर्ग झालेला नाही त्यांना संसर्गाचा धोका आहे. बाधित रुग्णांना लक्षणे अत्यंत सौम्य असतील तरी त्यांच्यामुळे इतर अनेकांना संसर्ग होण्याचा धोका आहे. ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, वर्धक मात्रा घेऊन झाली आहे, त्यांना धोका कमी असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काळजीचे कारण किती?

ओमायक्रॉन उपप्रकाराचे निदान झाले त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने त्याला चिंताजनक उपप्रकार (व्हेरियंट ऑफ कन्सर्न) म्हणून तातडीने जाहीर केले होते. बीए-२बाबत असा कोणताही इशारा अद्याप देण्यात आलेला नाही. मात्र, डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन, बीए-१ आणि आता बीए-२ सौम्य असले तरी लसीकरण न झालेले, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्त यांनी त्याबाबत गाफील न राहण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले होते. त्यामुळे बीए-२ बाबतही सारखेच प्रतिबंधात्मक धोरण अवलंबण्याची गरज आहे, हे स्पष्ट आहे.

छुपे किंवा गुप्त उत्परिवर्तन?

बीए-२ हे करोनाचे स्टेल्थ व्हेरियंट – छुपे किंवा गुप्त उत्परिवर्तन म्हणजेच चाचणीतून निदान न होणारे उत्परिवर्तन ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरटी-पीसीआर चाचणीतून करोनाचे निदान करताना तीन क्रमवारी तपासून रुग्ण बाधित असल्याचा अहवाल दिला जातो. त्यांपैकी एक क्रमवारी ही स्पाईक प्रोटिन किंवा एस-जीन ही होय. इतर काही उपप्रकारांप्रमाणे बीए-१मधील क्रमवारीत एस-जीनचे निदान होत नाही. तरी चाचणीचा अहवाल मात्र रुग्ण बाधित असल्याचे दर्शवतो. याला एस-जीन गळती (ड्रॉपआऊट) म्हटले जाते. एस-जीन गळतीद्वारे काही प्रयोगशाळांनी ओमायक्रॉनचे निदान केले आहे. बीए-२ उत्परिवर्तनातून एस-जीन गळती होत नाही. त्यामुळे पीसीआर चाचणीतून त्याला डेल्टापेक्षा वेगळे ओळखणे शक्य नाही. मात्र, बहुतांश भागांतून आता डेल्टा हद्दपार झाल्याने एस-जीन गळतीतील घट बीए-२ संसर्गातील वाढ दर्शवते. त्यामुळे त्याला छुपे किंवा गुप्त उत्परिवर्तन म्हणण्यास संपूर्ण वाव आहे.

Bhakti.bisure@expressindia.com