– विजया जांगळे

न्यूयॉर्कमधील कृष्णवर्णीयबहुल बफेलो भागातील एक सुपर मार्केट. १४ मे रोजी एका १८ वर्षांच्या मुलाने या भागात गोळीबार केला. या घटनेत १० जण मृत्यूमुखी पडले. या घटनेनंतर छद्म पर्यावरणवाद (इको फॅसिझम) ही संज्ञा चर्चेत आली आहे. पर्यावरण रक्षणाची झूल पांघरूण करण्यात आलेला हा नरसंहार म्हणजे निव्वळ वांशिकद्वेषाची अभिव्यक्ती तर नाही ना, याचा वेध घेण्याचा प्रयत्न…

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Loksatta explained Is Apple ReALM better than ChatGPT
ॲपलचे ReALM चॅटजीपीटीपेक्षा सरस? येत्या जूनपासून ‘एआय’ क्षेत्रात धुमाकूळ?
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

इको फॅसिझम म्हणजे काय?

सोप्या शब्दांत मांडायचे झाल्यास, इको फॅसिझम म्हणजे पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली राबवला जाणारा वांशिक विद्वेष. खरे तर यात पर्यावरणवाद असा काही नसतोच पण त्याचे खोटे निमित्त करून कारवाया केल्या जातात.  या विचारसरणीच्या व्यक्तींच्या मते हवामानबदल, जागतिक तापमानवाढ इत्यादींचे मूळ कारण आहे  स्थलांतर आणि त्यातून होणारी लोकसंख्यावाढ. यावर एकमेव उपाय म्हणजे स्थलांतर थांबवणे आणि त्याचे अधिक अतिरेकी रूप म्हणजे, स्थलांतरितांचा किंवा एखाद्या विशिष्ट वंशाच्या लोकांची ठरवून हत्या करणे.

या विचारांची मूळे कधी आणि कुठे रुजली?

इको फॅसिझमची पाळेमुळे नाझींच्या फॅसिस्ट विचारसरणीतच रुजल्याचे दिसते. त्यांचे राष्ट्रीय घोषवाक्य होते- ‘ब्लड ॲण्ड सॉइल’. वंश आणि प्रदेशाची शुद्धता टिकवणे, त्यात ‘इतरांना’ शिरकाव करू न देणे, हे त्यांचे ध्येय्य होते. आपल्या देशात इतर वंशाच्या व्यक्ती आल्यामुळेच पर्यावरणाचे नुकसान झाले आहे, असे मानणारा इको- फॅसिझम याच विचारांशी नाते सांगतो.  नाझींनी जसे वांशिक शुद्धतेच्या नावाखाली ज्यूंचे शिरकाण केले, त्याच धर्तीवर पर्यावरण रक्षणाचे गोंडस नाव देऊन केला जाणारा हा विशिष्ट वंशाचा, विशेषतः श्वेतवर्णीय वगळता अन्य वर्णांच्या व्यक्तींचा नरसंहार आहे. ग्रीसमध्ये जन्म झालेल्या सावित्री देवी या फ्रेन्च महिला या विचारसरणीच्या प्रणेत्यांपैकी एक होत्या. हिंदू धर्माविषयी आत्मियता असलेल्या सावित्री देवी हिटलरच्या कट्टर समर्थक होत्या आणि प्राण्यांच्या हक्कांसाठी आग्रही होत्या.

हल्लेखोराचे म्हणणे काय?

बफेलो येथील हल्लेखोराने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात जास्तीत जास्त कृष्णवर्णीयांची हत्या करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. ‘तुम्ही मला वांशिक राष्ट्रवादी किंवा इको फॅसिस्ट म्हणून संबोधलेत तरी माझी काहीही हरकत नाही. मी स्वतःला लोकनेता मानतो. डाव्यांनी बराच काळ स्वतःचे हेतू साध्य करण्यासाठी पर्यावरणवादी चळवळीवर नियंत्रण ठेवले. आम्हीही त्यांना तसे करू दिले. पण त्यांनी स्थलांतर आणि अनियंत्रित शहरीकरणाला मोकळे रान देऊन निसर्गाची प्रचंड हानी केली आहे.’ असे त्याने म्हटले आहे.

याआधीचे हल्ले…

इको फॅसिझमचे नाव देऊन करण्यात आलेला हा काही पहिलाच हल्ला नाही. याआधीही २०१९मध्ये न्यूझिलंडमध्ये आणि त्याच वर्षी टेक्सासमध्ये अशा प्रकारचे हल्ले करण्यात आले होते आणि त्यात अनेकांनी जीव गमावले होते. आपण अतिरिक्त असणारी लोकसंख्या हत्याकांडाच्या माध्यमातून कमी केली, तर शाश्वत जीवनशैली अंगिकारणे शक्य होईल, असा खोटाच दावा या हल्लेखोरांनी केला होता. नुकताच झालेला हल्लाही याच हल्ल्यांतून प्रेरणा घेऊन करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पर्यावरणवाद्यांचा मात्र ठाम विरोध..

इको फॅसिझमचा पर्यावरणवादी चळवळीशी काडीमात्र संबंध नसून ही विचारसरणी वांशिक शुद्धता आणि श्वेतवर्णीयांच्या वर्चस्ववादावर आधारित आहे, असे पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचे म्हणणे आहे. पर्यावरणाच्या नावाखाली नरसंहाराचे समर्थन होऊच शकत नाही, असे मत पर्यावरण कार्यकर्ते व्यक्त करतात.

भारतीयांवर काय परिणाम होऊ शकतो?

वंशवादाच्या समर्थकांच्या मते श्वेतवर्णीय वगळता सारेच कनिष्ठ ठरतात. त्यामुळे परदेशांत नोकरी किंवा शिक्षणानिमित्त गेलेल्या आशियाई व्यक्ती अनेकदा तेथील स्थानिकांच्या रोषाला बळी पडतात. इको फॅसिझमचा फटका अशा व्यक्तींना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.