scorecardresearch

विश्लेषण : तृतीयपंथी खेळाडूंना न्याय मिळेल?

फिना’च्या सदस्यांनी रविवारी (१९ जून) झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्या ‘लिंगविषयक धोरणा’वर सदस्यांचे रीतसर मतदान घेण्यात आले.

(संग्रहित छायाचित्र)

संदीप कदम

जागतिक जलतरण संस्थेने (फिना) तृतीयपंथी खेळाडूंसाठी नवे धोरण स्वीकारले आहे. ‘फिना’च्या नवीन धोरणांतर्गत वयाच्या १२व्या वर्षीपर्यंत लिंगबदल केलेल्या जलतरणपटूंनाच महिलांच्या स्पर्धामध्ये सहभागाची परवानगी असेल. ‘फिना’च्या सदस्यांनी रविवारी (१९ जून) झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्या ‘लिंगविषयक धोरणा’वर सदस्यांचे रीतसर मतदान घेण्यात आले. त्यात हे धोरण मंजूर झाल्यामुळे सोमवारपासून सर्व स्पर्धासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. हे धोरण स्वीकारण्यामागे कारणे काय, ‘पुरुष ते महिला’ असाच लिंगबदल केलेल्यांपैकी काही जण महिला गटात तर काही जण नव्या गटात असे का, याचा हा घेतलेला आढावा.

या धोरणात एवढे काय नवीन? एवढी का चर्चा?

लैंगिक भिन्नतेचा आदर करणारे आणि सर्वाना स्पर्धेची समान संधी देणारे नियम, म्हणून या धोरणाचे महत्त्व. यापूर्वीचे नियम हे संधी नाकारायची कुणाला, याकडे कल असलेले होते. टेस्टोस्टेरॉन या पुरुषी संप्रेरकाची पातळी पाहून महिला गटात प्रवेश द्यायचा की नाही हे ठरत असे. तो नियम ‘पुरुष ते महिला’ असे लिंगसंक्रमण (लिंगबदल) केलेल्यांनाच नव्हे तर काही स्पर्धासाठी इतरांनाही (काहीशा पुरुषी दिसणाऱ्या महिलांनाही) लागू होता. ज्या महिलांमध्ये हे संप्रेरक अधिक आढळे, त्या स्पर्धेतून बाद होत. त्या नियमांचा मनस्तापदायी फटका भारताची धावपटू द्युती चंद हिला बसला होता. जलतरण संघटनेने मात्र साकल्याने, आपापल्या गटात स्पर्धेची संधी देणारे धोरणच ठरवले. त्यामुळे ते अन्य खेळांसाठीही अनुकरणीय ठरेल.

फिनाचे नवीन धोरण कसे ठरवण्यात आले?

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) गेल्या नोव्हेंबरमध्ये केलेल्या शिफारशींनंतर धोरण तयार करण्यासाठी एकत्र काम करत असलेल्या तीन गटांच्या (खेळाडू गट, विज्ञान व औषध गट, कायदेशीर व मानवाधिकार गट) सदस्यांच्या सादरीकरणानंतर ‘फिना’च्या सर्वसाधारण सभेत मतदान करण्यात आले. या प्रक्रियेत ७१.५ टक्के जणांनी सकारात्मक मतदान केले. तसेच ‘फिना’च्या या २४ पानी धोरणात नव्या ‘खुल्या स्पर्धा’ श्रेणीच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. ‘‘या जलतरणपटूंवर अन्याय होऊ नये यासाठी एक नवीन गट स्थापन करण्यात येणार असून पुढील सहा महिने ही नवीन श्रेणी कशा पद्धतीने योग्यपणे तयार करता येईल याबाबतचा आढावा घेईल,’’ असे ‘फिना’कडून सांगण्यात आले.

नवे धोरण तयार करण्याची गरज का भासली?

पुरुष आणि महिलांच्या शारीरिक क्षमतेमध्ये, तसेच स्नायूंचे सामर्थ्य यामध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे पुरुषाचे महिलेमध्ये संक्रमण झाले तरीही तृतीयपंथी व्यक्ती महिलांच्या स्पर्धेत सहभागी झाल्यास त्यांना फायदा होत असल्याची तक्रार केली जाते. त्यामुळे ‘फिना’कडून हे नवे धोरण तयार करण्यात आले आहे. 

तृतीयपंथी पुरुषांसाठी काय धोरण आहे?

तृतीयपंथी पुरुष (महिला ते पुरुष’ असा लिंगबदल झालेल्या) जलतरणपटूंना इतरांच्या तुलनेत कोणताही शारीरिक फायदा मिळत नसल्यास त्यांना पुरुषांच्या स्पर्धेत भाग घेण्याची मुभा आहे. परंतु, जे जलतरणपटू टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाबाबत उपचार घेत आहेत किंवा संप्रेरकांच्या उपचाराचा भाग म्हणून स्नायूंच्या बळकटीसाठी इतर औषधे घेत आहेत, त्यांना त्यांच्या वापरासाठी उत्तेजक द्रव्यविरोधी नियमांनुसार उपचारात्मक सूट मिळवणे आवश्यक आहे. तृतीयपंथी पुरुष जे एक्सोजेनस एंड्रोजेनचा वापर करत नाहीत, ते महिला गटात सहभागी होऊ शकतात.

जलतरणात तृतीयपंथी खेळाडूचे प्रमाणपत्र कसे मिळते?

‘फिना’ स्पर्धासाठी पात्र होण्याकरिता सर्व खेळाडूंनी त्यांचे गुणसूत्रीय (क्रोमोसोमल) िलग त्यांच्या राष्ट्रीय जलतरण महासंघासह प्रमाणित करणे आवश्यक आहे. तृतीयपंथी जलतरणपटूंनी ‘फिना’ला सर्वसमावेशक वैद्यकीय इतिहास आणि इतर पुरावे सादर करणे आवश्यक आहे. या आधारे ते ‘फिना’च्या स्पर्धासाठी पात्र आहेत आणि शारीरिक तपासणीसाठी तयार असल्याचे स्पष्ट होते. एक स्वतंत्र तज्ज्ञ सादर केलेल्या पुराव्यांची शहानिशा करतो आणि पात्रतेबाबत निर्णय घेतो. ‘फिना’ खेळाडूंच्या टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकांच्या पातळीचे चाचणीद्वारेदेखील निरीक्षण करू शकते. तृतीयपंथी खेळाडू असल्याची माहिती न दिलेल्यांचीही तपासणी ‘फिना’ करू शकते. जलतरणपटू क्रीडा लवादाकडे कोणत्याही निर्णयाला आव्हान देऊ शकतात.

जागतिक सायकलिंग संघटनेचेही नियम बदलले, ते कसे आहेत?

जलतरण संघटनेच्या धोरणाशी या नियमांचा संबंध नाही, असेच म्हणावे लागेल. गेल्या गुरुवारी सायकलिंगच्या जागतिक संस्थेने तृतीयपंथी खेळाडूंसाठीचे नियम अधिक कठोर करताना पात्रता नियमांत बदल केले. त्यामुळे तृतीयपंथी सायकलपटूंना स्पर्धामध्ये सहभागी होण्यापूर्वी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय सायकल संघटनेने (यूसीआय) टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाच्या किमान पातळीचा संक्रमणाचा काळ दोन वर्षांपर्यंत वाढवला असून कमाल स्वीकृती पातळी कमी केली आहे. मागील संक्रमण कालावधी हा १२ महिन्यांचा होता, असे ‘यूसीआय’कडून सांगण्यात आले. अलीकडे झालेल्या शास्त्रीय अभ्यासानुसार, पुरुषाचे महिलेमध्ये संक्रमण होताना स्नायूंचे वस्तुमान आणि स्नायूंची ताकद/ सहनशक्ती यामधील प्रलंबित रूपांतरणासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागत असल्याचे स्पष्ट झाले होते.

तृतीयपंथी जलतरणपटूंनी आधीच पदके मिळवली, त्याचे काय?

कॅनडाची फुटबॉल खेळाडू क्विनने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कॅनडाच्या फुटबॉल संघाकडून खेळताना सुवर्णपदकाची कमाई केली होती. हे पदक मिळवणारी ती पहिली तृतीयपंथी खेळाडू ठरली होती. या वर्षी मार्चमध्ये लिया थॉमसने अमेरिकेतील ‘एनसीएए’ अजिंक्यपद जलतरण स्पर्धेच्या ५०० यार्ड फ्री-स्टाइल प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते. ही कामगिरी करणारी ती पहिली तृतीयपंथी महिला जलतरणपटू ठरली होती.  तिची ही पदके काढून घेतली जाणार नाहीत, मात्र यापुढल्या ऑलिम्पिक किंवा अन्य आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये तिला, ‘महिला’ म्हणून सहभागी होता येणार नाही. sandip.kadam@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained fina adopts new policy for transgender athletes print exp 0622 zws

ताज्या बातम्या