गेल्या काही वर्षांत गडद निळ्या रंगाच्या साड्या व त्यावर सफेद रंगाची नक्षी हे समीकरण महिला वर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय ठरले आहे. केवळ साड्याच नाही तर या समीकरणातील दुपट्टे, कुर्तीज यांची भलतीच क्रेझ फॅशन क्षेत्रात दिसून येते. मोठे डिझायनर आपली कल्पकता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी याच रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतात. हा गडद निळ्या रंगाचा फॅशन ट्रेण्ड ‘इंडिगो’ या नावाने प्रसिद्ध आहे, त्याविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : शूर्पणखा स्वतंत्र स्त्री ते राक्षसी… खरंच कोण होती …

इंडिगो ब्लू अर्थात निळ्या रंगाचे एवढे आकर्षण का?
प्रत्येक रंगाचा स्वतःचा स्वभाव असतो. तो रंग प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या आपल्यावर परिणाम करतो. रंगाचे मानसशास्त्र त्या रंगाचे सकारात्मक व नकारात्मक असे दोन्ही परिणाम सांगते. म्हणूनच मानसशास्त्रज्ञ या रंगाच्या माध्यमातून मानवी मनाच्या पटलावरील चित्राचा उलगडा करण्याचा प्रयत्न करते. तसाच प्रभाव या गडद निळ्या रंगाचाही आहे. हा रंग बौद्धिकता, कल्पकता वाढविणारा तसेच शांतता निर्माण करणारा आहे. आणि त्याच वेळी एकलकोंडेपणा, भावभावनांचा अभाव हे दोष निर्माण करणाराही आहे. रंगांच्या परिणामाची तीव्रता ही व्यक्तीसापेक्ष बदलते. असे असले तरी मानवी मन, बुद्धी हे नेहमीच वेगवेगळ्या रंगांच्या माध्यमातून व्यक्त होत राहते. इंडिगो रंगाची क्रेझ आज मोठ्या प्रमाणात आपण अनुभवत असलो तरी या रंगाच्या आकर्षणाची परंपरा हजारो वर्षांची आहे.

आणखी वाचा : विश्लेषण: एअर इंडियाच्या विमानातील बॉम्बस्फोट ते …

या रंगाचे नाव व मूळ नेमके कुठले?
गडद निळा रंग म्हणजे इंडिगो, या रंगाचे आकर्षण संपूर्ण जगभरात गेल्या ३००० वर्षांपासून असल्याचे ऐतिहासिक पुरावे आज उपलब्ध आहे. हा रंग निळी किंवा नीली या वनस्पतीच्या पानांपासून तयार केला जातो. तयार केलेला रंग डायच्या स्वरुपात वापरला व निर्यात केला जातो. निळी या वनस्पतीमुळे या रंगाला निळा किंवा नील म्हणून ओळखले जाते. शास्त्रीय परिभाषेत हा रंग ‘इंडिगोफेरा टिंक्टोरिया’ म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु जगाच्या पटलावर हा रंग ‘इंडिगो ब्लू’ या नावाने प्रसिद्ध आहे. इंडिगो या नावामागे या रंगाचे मूळ दर्शवणारा इतिहासही आहे.

आणखी वाचा : विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध …

इंडिगो ब्लूचा भारताशी काय संबंध?
साधारण २३०० वर्षांपूर्वी भारत व ग्रीस यांच्यात समुद्रमार्गे व्यापार भरभराटीस आला होता. भारतात तयार होणारा निळ्या रंगाची डाय ही समुद्रमार्गे ग्रीस मध्ये पोहचली. या रंगाचे ग्रीकांना प्रचंड आकर्षण होते. हा रंग भारतातून आला म्हणून ग्रीस मध्ये या रंगाला ‘ईंडीकॉन’ म्हटले गेले. हा ईंडीकॉन पुढे ‘इंडिगो ब्लू’ या नावाने प्रसिद्ध झाला. किंबहुना इजिप्त येथिल ममींच्या कपड्यावर निळ्या रंगाची किनार आढळते; त्यामुळे हा रंग तेथे भारतातून व्यापारामार्फत पोहचला असावा असा अभ्यासकांचा कयास आहे. म्हणून जगाच्या इतिहासात निळीचे मूलस्थान हे भारत मानले जाते. हे जरी सत्य असले तरी भारता शिवाय चीन व इतर आशियाई देशांमधून पारंपारिकरित्या निळीच्या डायची निर्यात युरोपियन देशांमध्ये होत होती.

आणखी वाचा : विश्लेषण पुरावस्तू कायद्याचे महत्त्व काय | explained …

अल् नील ते अनील… नावाचा प्रवास
निळी ही वनस्पती उष्णकटिबंधातील असल्याने तिचे मूलस्थान हे आशिया आहे. परंतु त्याशिवाय आता आफ्रिका व अमेरिका या देशांमध्ये या वनस्पतीची लागवड करण्यात येते. मध्ययुगीन काळात आशियातून वेगवेगळ्या जातीच्या निळीच्या बिया घेवून अमेरिकेत लावण्यात आल्या. या शेतीसाठी आफ्रिकेतील मुजूर गुलाम म्हणून अमेरिकेत नेण्यात आले होते. याच काळात भारतातून होणाऱ्या व्यापारावर अरब व्यापारांची सत्ता होती. त्यामुळे अरेबिक या भाषेत निळीला ‘अल् नील’ म्हटले गेले. स्पेन मध्ये या अरब व्यापारांनी नीळ डाय पोहचवल्यामुळे स्पनिश भाषेत या रंगला ‘अनील’ संबोधले गेले. भारताचा नील हा रंग अनील म्हणून प्रसिद्ध झाला.

इंडिगो ब्ल्यू , भारत आणि निळे सोने
भारतीय किंवा आशियायी गडद निळ्या रंगाचे युरोपात प्रचंड आकर्षण होते. म्हणूनच वसाहतवादाच्या काळात आशियाई देशांमधून चालणाऱ्या निळीच्या व्यापारावर युरोपियांची मक्तेदारी निर्माण झाल्याचे चित्र दिसते. आंतरराष्ट्रीय व्यापारात निळीला मौल्यवान समजले जात होते. किंबहुना निळीला या काळात ‘निळे सोने’ ही संज्ञा देण्यात आली होती. म्हणूनच भारतातही इंग्रज, डच, फ्रेंच यांनी या व्यापारावर नियंत्रण मिळविण्याकरिता शेतकऱ्यांना वेठीस ठरले. यात इंग्रज अग्रेसर होते. म्हणूनच १७ व्या शतकातील भारतीय नीळ उत्पादनाचे श्रेय इंग्रजांना दिले जाते

सिंधू संस्कृती, निळा रंग आणि पुरावे
निळी पासून तयार होणाऱ्या गडद निळ्या रंगाच्या वापराची परंपरा ही सिंधू संस्कृती (५००० वर्षे) इतकी मागे जाते हे विसरून चालणार नाही. गुजरात येथील रोजडी या पुरातत्वीय स्थळावर निळीच्या चार वेगवेगळ्या जातीच्या बियांची नोंद पुरातत्व अभ्यासकांनी केली आहे. तसेच सध्या पाकिस्तान येथे असणाऱ्या मोहेंजोदारो या स्थळावरून निळीच्या रंगाच्या कपड्याचे पुरावाशेष सापडले आहेत. यावरून भारतीयांना गेल्या ५५०० वर्षांपासून निळीच्या वनस्पतीपासून रंग निर्मितीचे व वापराचे तंत्रज्ञान अवगत असल्याचे स्पष्ट होते.

इंडिगो ब्ल्यू व जीन्स
इंडिगो ब्ल्यू या रंगाचे जन्मस्थान आशिया असले तरी या रंगाची खरी क्रेझ युरोपीय देशात असल्याचे लक्षात येते. मध्ययुगात निर्माण झालेली जीन्सची फॅशन गेल्या काही पिढ्यांपासून आधुनिक संपूर्ण जगात पाहायला मिळते आहे. जीन्स ही युरोपाची असली तरी त्या वर जो रंग चढला आहे तो आशियाचा आहे. प्राथमिक काळात जीन्सला रंग देण्याच्या प्रक्रियेत उष्णतेच्या उच्चांकामुळे इतर कोणतेही नैसर्गिक रंग कपड्याच्या धाग्यांमध्ये (फॅब्रिकमध्ये) झिरपत असत, ज्यामुळे रंग चिकट होत होता. तर या उलट नैसर्गिक इंडिगो डाय फक्त धाग्याच्या बाहेरील बाजूस चिकटत असे. त्यामुळेच बहुतांशी जीन्सचा (डेनिम) रंग हा निळा सुरुवातीस निळा होता. आज तंत्रज्ञानात अधिक प्रगती झाल्याने वेगवेगळ्या रंगाच्या जीन्स बाजारात उपलब्ध आहेत तरी देखील जीन्स प्रेमींमध्ये इंडिगो रंग वापरून तयार केलेल्या जीन्स पँटला अधिक प्राधान्य दिले जाते. असा हा गडद निळा रंग गेल्या ५५०० वर्षांपासून मानवी इतिहासावर आपली अधिसत्ता गाजवत आहे. इतकेच नव्हे तर आधुनिक जगही त्याच्या आकर्षणापासून वंचित राहू शकले नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained from where has come indigo blue colour color in latest fashion trends trending jeans pants svs
First published on: 26-03-2023 at 12:41 IST