scorecardresearch

विश्लेषण : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले हार्दिक पटेल गुजरात विधानसभा निवडणुकीत किती प्रभावी ठरु शकतात ?

१८२ पैकी १६ ते २० जागांवर ( सौराष्ट्र – उत्तर गुजरात ) पाटीदार समाजाचा थेट प्रभाव आहे.

गुजरातमधील राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीवर प्रभाव टाकणार समाज म्हणून पाटीदार समाजाची ओळख आहे. या समाजाचा एक प्रमुख चेहरा, नेता म्हणून ओळख असलेल्या हार्दिक पटेल यांनी अखेर बुधवारी गुजरात प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गुजरातमध्ये या वर्षांअखेर विधानसभा निवडणुका होत असतांना हा काँग्रेसला मोठा धक्का समजला जात आहे. पक्ष सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये हार्दिक पटेल यांनी काँग्रेस हा ‘सर्वात मोठा जातीयवादी पक्ष’ आहे अशी जळजळीत टीका केली आहे. तेव्हा आता हार्दिक पटेल पुढे काय करणार, भाजपामध्ये जाणार का ? याची चर्चा रंगू लागली आहे.

हार्दिक पटेल यांची वाटचाल

ओबीसी आरक्षण मिळावे या प्रमुख मुद्द्यावरुन २०१५ च्या सुमारास गुजरातमधील पाटीदार समाजाने तेव्हाच्या भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन उभे केले. सरकारी नोकरीमध्ये उच्च पदांसाठी पाटीदार समाजाला आरक्षण ही प्रमुख मागणी तेव्हा करण्यात आली. यानिमित्ताने अवघ्या २२ वर्षाच्या हार्दिक पटेल यांचे नेतृत्व पुढे आले. वाणिज्य पदवीधर असलेल्या हार्दिक यांची भाषणशैली, मुद्दे मांडण्याची हातोटी यामुळे अल्पावधितच पाटीदार समाजाने उभारलेल्या आंदोलनाचे नेतृत्व हार्दिक पटेल यांच्याकडे आले. या आंदोलनाला आणि हार्दिक यांना काँग्रेसने उघडपणे पाठिंबा दिला. पाटीदार समाजाने २०१७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान केले. त्यावेळी काँग्रेस जरी सत्तेपासून दूर राहीली असली तरी ९०च्या पार काँग्रेस आमदारांची संख्या पोहचली. २०१९ मध्ये हार्दिक पटेल यांनी रितसर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०२० मध्ये हार्दिक पटेल यांना वयाच्या २६ व्या वर्षी गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षही बनवण्यात आले. मात्र पक्षात निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार दिला न जाणे, स्थानिक नेतृत्वाने दुर्लक्ष करणे, विरोधात विविध गुन्हे दाखल केले असताना काँग्रेसमधून पुरेशी साथ न मिळणे यामुळे अखेर हार्दिक यांनी पक्षाला रामराम ठोकला.

आता हार्दिक पटेल कुठे जाणार ?

काँग्रेसमधून बाहेर पडलेले हार्दिक पटेल कोणत्या पक्षात जाणार, भाजपात जाणार, का आपली स्वतःची जागा तयार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘आप’बरोबर जाणार याबाबत एकच चर्चा सध्या गुजरातमध्ये सुरु आहे. का या सर्व चर्चेला पूर्णविराम देत पाटीदार समाजाचे प्रतिनिधीत्व करणारा राजकीय पक्ष काढणार याकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे.

पाटीदार समाजाचाा गुजरातमध्ये प्रभाव आणि या पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल असं समीकरण अजुनही काही प्रमाणात का होईना गुजरातमध्ये कायम आहे. १८२ पैकी १६ ते २० जागांवर ( सौराष्ट्र – उत्तर गुजरात ) पाटीदार समाजाचा थेट प्रभाव आहे. जमीन मालक अशी एक ओळख असलेल्या पाटीदार समाजाचा गुजरात राज्यात अनेक ठिकाणी कमी अधिक प्रमाणात प्रभाव आहे. तेव्हा गुजरात विधानसभा निवडणुक जवळ आली असतांना हार्दिक पटेल काय पावलं उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained hardik patel who left congress how will effective in gujarat assembly elections asj

ताज्या बातम्या