scorecardresearch

विश्लेषण : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला इजिप्तच्या अध्यक्षांना निमंत्रण; प्रमुख पाहुण्यांची निवड नेमकी कशी केली जाते? जाणून घ्या

करोनानंतर पहिल्यांदाच देशात प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे अध्यक्ष अल-सिसी उपस्थित असतील.

विश्लेषण : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला इजिप्तच्या अध्यक्षांना निमंत्रण; प्रमुख पाहुण्यांची निवड नेमकी कशी केली जाते? जाणून घ्या
फोटो सौजन्य – द इंडियन एक्सप्रेस

करोनानंतर पहिल्यांदाच देशात प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे अध्यक्ष अल-सिसी उपस्थित असतील. दरवर्षी या सोहळ्याला एखाद्या देशाचे पंतप्रधान किंवा अध्यक्ष यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात येतं. मात्र, यासाठी कोणाची निवड करायची हे कसं ठरवतात? याबाबत आज आपण जाणून घेऊया.

हेही वाचा – विश्लेषण: तीन घुमट, एक बस-स्टॉप आणि राजकीय खडाजंगी; म्हैसूरमधील बस स्थानकामुळे निर्माण झालेला वाद नेमका काय?

कोण आहेत अल-सिसी?

यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे, अब्देह फतेह अल-सिसी हे इजिप्तचे माजी लष्कर प्रमुख आणि संरक्षण मंत्री राहिले आहेत. इजिप्तमध्ये २०१३ साली झालेल्या बंडानंतर त्यांनी लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या मोहम्मद मोर्सी यांच्या हातातून देशाची सत्ता काढून घेतली. त्यानंतर पुढील वर्षी झालेल्या निवडणुकीत आर्थिक विकासाच्या मुद्द्यावर ते निवडून आले. अध्यक्षपद मिळवण्याच्या त्यांच्या पद्धतीवर जगभरातील टीकाकार संमिश्र प्रतिक्रिया देतात. इजिप्तमधील सध्याचे आर्थिक संकट आणि विरोधकांची गळचेपी या कारणांमुळे अनेकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. अल-सिसी हे इजिप्तचे पहिलेच अध्यक्ष आहेत, ज्यांना भारताने प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी निमंत्रित केले आहे.

प्रमुख पाहुण्यांना दिला जातो ‘गार्ड ऑफ ऑनर’

भारतात येणार्‍या कोणत्याही परदेशी उच्च प्रतिष्ठित व्यक्तीला भारत सरकारतर्फे सन्मान दिला जातो. मात्र, प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे महत्त्व आणि भव्यता पाहता, या सोहळ्याच्या अध्यक्षपदाचे निमंत्रण हा भारताकडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान समजला जातो. प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त निमंत्रित केलेल्या प्रमुख पाहुण्यांना राष्ट्रपती भवन येथे ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिले जाते. तसेच सायंकाळी राष्ट्रपती भवन येथे स्वागत समारंभ आयोजित केला जातो. याचबरोबर प्रमुख पाहुणे राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहतात. याशिवाय, प्रमुख पाहुण्यांना पंतप्रधानांकडूनही जेवणासाठी निमंत्रित केले जाते.

हेही वाचा – विश्लेषण : ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट व्हल्गर? IFFI मधील विधानांमुळे पुन्हा फुटलं वादाला तोंड; नेमकं झालं तरी काय?

प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते?

वर्ष १९९९ ते २००२ दरम्यान चीफ ऑफ प्रोटोकॉल म्हणून काम केलेले भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी मनबीर सिंग म्हणतात, “प्रजासत्ताक दिनानिमित्त निमंत्रीत संबंधित देशाचे प्रमुख हे भारताच्या आनंदात सहभागी असतात. तसेच, भारताचे राष्ट्रपती आणि संबंधित देशाचे प्रमुख यांच्यातील मैत्री यातून प्रतिबिंबित होते. या मैत्रीचे राजकीय महत्त्वदेखील असते. भारताचे इतर देशांशी असलेले संबंध अधिक दृढ करण्यासाठी संबंधित देशातील प्रमुखांना निमंत्रित केले जाते. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुण्यांची निवड करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. ही प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वी सुरू होते. भारत आणि संबंधित देशातील संबंधांचा प्रामुख्याने विचार केला जातो. तसेच भारताचे राजकीय, व्यावसायिक, लष्करी आणि आर्थिक हितसंबंधांचाही विचार केला जातो. त्यानुसारच प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला दरवर्षी नवीन पाहुण्यांना निमंत्रित केले जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 19:26 IST

संबंधित बातम्या