संतोष प्रधान

देशाच्या १६व्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे. लोकसभा व राज्यसभेच्या एकूण ७८८ खासदारांमधून उपराष्ट्रपतींची निवड होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक स्वबळावर जिंकण्याऐवढी भाजपकडे मते नसल्याने प्रादेशिक पक्षांची मदत घेण्यात येत आहे. पण उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने मित्र पक्षांवर अवलंबून राहावे लागणार नाही. तरीही भाजपचे नेते मित्र पक्षांची मदत घेण्याची शक्यता आहे.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक कशी होते?

राष्ट्रपतीपदासाठी देशातील खासदार व विधानसभेचे आमदार मतदान करतात. उपराष्ट्रपतीपदासाठी फक्त खासदारच मतदान करतात. लोकसभेचे ५४३, राज्यसभेचे विविध राज्यांमधून निवडून आलेले २३३ खासदार आणि १२ नामनियुक्त अशा एकूण ७८८ खासदारांमधून उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. राष्ट्रपती निवडणुकीत प्रत्येक खासदार व आमदारांच्या मतांचे मूल्य हे लोकसंख्येच्या आधारे ठरलेले असते. उपराष्ट्रपती निवडणुकीत प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य हे एक असते.

भाजपकडे किती संख्याबळ आहे?

एकूण ७८८ मतदार असल्याने विजयासाठी पहिल्या पसंतीची ३९५ मते मिळणे आवश्यक आहे. लोकसभेत भाजपचे ३०३ खासदार निवडून आले होते. गेल्याच आठवड्यात उत्तर प्रदेशातील आझमगड आणि रामपूर या दोन मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने विजय संपादन केला. राज्यसभेत भाजपच्या खासदारांची संख्या ९५ झाली. त्यामुळे लोकसभेचे ३०५ व राज्यसभेत भाजपच्या ९५ खासदारांची संख्या ४०० झाली. विजयासाठी आवश्यक ३९५ पेक्षा भाजपच्या खासदारांची संख्या ही जास्त आहे. यामुळेच भाजपचा उमेदवार स्वबळावर ही निवडणूक जिंकू शकतो. याबरोबरच १२ नामनियुक्त सदस्य हे साधारणपणे सत्ताधारी पक्षाने नियुक्त केलेले असल्याने सत्ताधारी पक्षाला साथ देतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयासाठी आवश्यक असे संख्याबळ स्वबळावर भाजपकडे नाही. यातूनच बिजू जनता दल, वायएसआर काँग्रेस, बसप, अकाली दल अशा विविध प्रादेशिक पक्षांची मदत भाजपने घेतली आहे. महाराष्ट्रातील ५० आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिल्याने आठ हजारांपेक्षा अधिक मतांचा भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना फायदा होणार आहे.

आतापर्यंतच्या उपराष्ट्रपतीपद निवडणुका कशा पद्धतीने पार पडल्या ?

पहिले आणि दुसरे उपराष्ट्रपती डॉ. सर्वापल्ली राधाष्कृष्णन यांची दोन्ही वेळा बिनविरोध निवड झाली होती. तिसरे उपराष्ट्रती डॉ. झाकीर हुसेन हे निवडून आले होते. चौथे उपराष्ट्रपती म्हणून व्ही. व्ही. गिरी हे २९० मतांनी निवडून आले होते. राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या निधनाने गिरी यांची हंगामी राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्याकरिता गिरी यांनी राजीनामा दिला होता. यामुळेच दोनच वर्षांत पाचव्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक झाली. त्यात गोपाळ स्वरूप पाठक यांची निवड झाली. सहाव्या उपराष्ट्रपतीपदी बी. जी. जत्ती हे ३८० मतांनी निवडून आले होते. सातव्या उपराष्ट्रपतीपदी मोहमद हिदायतउल्ला यांची बिनविरोध निवड झाली होती. आठव्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आर. व्यंकटरामन हे ३०१ मतांनी निवडून आले होते. नवव्या उपराष्ट्रपतीपदी डॉ. शंकर दयाळ शर्मा यांची बिनविरोध निवड झाली होती. दहाव्या उपराष्ट्रपतीपदी के. आर. नारायणन यांची निवड झाली होती. त्यांना ७०१ पैकी ७०० मते मिळाली होती. विरोधी उमेदवाराला फक्त एकच मत मिळाले. अकराव्या उपराष्ट्रपतीपदी कृष्णकांत हे १६९ मतांनी विजयी झाले होते. बाराव्या उपराष्ट्रपतीपदासाठी भैरोसिंह शेखावत आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यात लढत झाली होती. तेव्हा शेखावत यांना ४५४ तर शिंदे यांना ३०५ मते मिळाली होती. १३व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. उपराष्ट्रपतीपदी निवडून आलेल्या हमीद अन्सारी यांना ४५५, भाजपच्या नजमा हेपतुल्ला यांना २२२ तर रशिद मसुद यांना ७५ मते मिळाली होती. १४वे उपराष्ट्रपती म्हणून हमीद अन्सारी यांचे फेरनिवड झाली होती. तेव्हा अन्सारी यांना ४९० तर जसवंत सिंह यांना २३८ मते मिळाली होती. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे २७२ मतांनी निवडून आले होते. नायडू यांची मुदत १०ऑगस्टला संपुष्टात येत आहे.