देशातील बेरोजगारीचा दर सरलेल्या नोव्हेंबर आणि ऑक्टोबर २०२१ मधील ७ टक्के आणि ७.७५ टक्क्यांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये ७.९१ टक्के असे चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे, असे सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या आघाडीच्या माहिती आणि विश्लेषण संस्थेच्या आकडेवारीने सोमवारी स्पष्ट केले. आश्चर्याची बाब म्हणजे करोनाच्या नवीन लाटेच्या भीतीमुळे आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या नवीन निर्णयांअंतर्गत कोणत्याही राज्यामधील निर्बंध लागू करण्याच्याआधीच रोजगार कमी झाल्याचं चित्र दिसत असल्याने चिंता व्यक्त केली जातेय.
काय आहे बेरोजगारीचा दर?
चालू आर्थिक वर्षामध्ये ऑगस्ट महिन्यात नोंदविण्यात आलेल्या ८.३ टक्क्यांच्या दरानंतर, सरलेल्या डिसेंबरमध्ये बेरोजगारी सर्वोच्च दरावर पोहोचल्याचे सीएमआयईची आकडेवारी दर्शविते. उल्लेखनीय म्हणजे डिसेंबरमध्ये शहरी बेरोजगारीचा दर ९.३० टक्क्यांपर्यंत वाढला आहे तर ग्रामीण रोजगारहीनतेचे प्रमाण ७.२८ टक्के इतकं आहे. मागील महिन्यात शहरी आणि ग्रामीण दोन्ही प्रकारच्या बेरोजगारीचे प्रमाण अनुक्रमे ८.२१ टक्के आणि ६.४४ टक्के असे होते, त्या पातळीवरून ते महिनाभरात लक्षणीय वाढले आहे.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: ‘या’ देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही; यादीतील शेवटचे दोन देश पाहून आश्चर्य वाटेल
शहरामधील बेरोजगारी दुहेरी आकड्यांमध्ये…
डिसेंबर महिन्याच्या मध्यामध्ये शहरी भागातील बेरोजगारीचं प्रमाण हे दोन आकड्यांमध्ये गेलं होतं. डिसेंबरच्या मध्यमावर देशातील शहरांमधील बेरोजगारीचं प्रमाण (आठवडाभराच्या आकडेवारीनुसार) १०.०९ टक्के इतकं होतं.
नक्की वाचा >> लोकसत्ता विश्लेषण: करोनाविरुद्धच्या लढ्यात केंद्राने मंजूरी दिलेल्या Molnupiravir गोळीबद्दल जाणून घ्या
शहरांमधील बेरोजगारी वाढली याचा अर्थ काय?
शहरांमधील रोजगार निर्मिती ही चांगल्या पगारांच्या नोकऱ्या उपलब्ध असल्याचं संकेत देते. तर शहरी भागांमधील बेरोजगारी वाढणं हे मोठ्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याचं दर्शवतं. जगभरात ओमायक्रॉन या करोना साथीच्या नवीन अवताराच्या रूपात पुन्हा साथीच्या लाटेने डोके वर काढल्यामुळे मंदावेलेले आर्थिक क्रियाकलाप आणि ग्राहकांच्या उपभोग आणि मागणीसंबंधी बळावलेल्या नकारात्मकतेची दृश्य परिणती ही बेरोजगारीच्या आकडेवारीत प्रतिबिंबीत झाला असल्याचे सर्वेक्षणाने स्पष्ट केले आहे. याच निर्बंधांमुळे भविष्यामध्ये अर्थचक्राची गती आणखी मंदावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नक्की वाचा >> Omicron चा संसर्गच ठरतोय नैसर्गिक लस?; साथरोग तज्ज्ञ, संशोधक म्हणतात, “एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर…”
करोनाचा प्रादुर्भाव वाढला
देशामध्ये सोमवारी करोनाचे ३३ हजार ७५० नवे रुग्ण आढळून आले असून १२३ जणांचा मृत्यू झालाय. सोमवारी १० हजार ८४६ जणांनी करोनावर मात केली असून देशातील सक्रीय रुग्णांची संख्या एक लाख ४५ हजार ५८२ इतकी आहे.