scorecardresearch

लोकसत्ता विश्लेषण: बॅडमिंटनपटू लक्ष्य, सात्विक-चिरागचे जागतिक वर्चस्वाचे संकेत!

भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंनी अलीकडच्या काळात दमदार कामगिरी केली असून जागतिक वर्चस्वाचे संकेत दिले आहेत

Indians Playes, World Badminton, Chirag Shetty, Satwiksairaj Rankireddy, Lakshya Sen
भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंनी अलीकडच्या काळात दमदार कामगिरी केली असून जागतिक वर्चस्वाचे संकेत दिले आहेत (File Photo)

अन्वय सावंत

भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने चमकदार कामगिरी करत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या जेतेपदाला गवसणी घातली. त्याने अंतिम सामन्यात नुकतीच जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेल्या सिंगापूरच्या लोह किन येवला धूळ चारली हे विशेष! तसेच पुरुष दुहेरीत सात्विक साइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या आघाडीच्या भारतीय जोडीने अजिंक्यपदावर नाव कोरण्याची विक्रमी कामगिरी केली.

भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंनी अलीकडच्या काळात दमदार कामगिरी केली असून इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्यांचे यश वाखाणण्याजोगे होते. लक्ष्य आणि सात्विक-चिरागने मायदेशात झालेल्या या स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करत आगामी काळात जागतिक वर्चस्वाचे संकेत दिले आहेत.

भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक यश कसे मिळवले?

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात २० वर्षीय लक्ष्यने विश्वविजेत्या येवला २४-२२, २१-१७ असे पराभूत करताना कारकिर्दीतील पहिले सुपर ५०० दर्जाच्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले. पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत सात्विक-चिरागने तीन वेळा जगज्जेत्या मोहम्मद अहसान आणि हेंद्रा सेतिवान या इंडोनेशियन जोडीवर २१-१६, २६-२४ अशी सरशी साधली. यासह इंडिया खुल्या स्पर्धेतील दुहेरीचे विजेतेपद पटकवणारी पहिली भारतीय जोडी ठरण्याचा मान त्यांनी मिळवला.

लक्ष्यसाठी येवविरुद्धची लढत किती आव्हानात्मक होती?

मागील वर्षी डिसेंबरमध्ये स्पेन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत येवने भारताच्या किदम्बी श्रीकांतवर मात करत सुवर्णपदकाची कमाई केली होती. इंडिया खुल्या स्पर्धेत श्रीकांतला अग्रमानांकन मिळाले होते. परंतु करोनाची बाधा झाल्याने त्याला या स्पर्धेत मध्यातून माघार घ्यावी लागली आणि येवचा जेतेपदाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लक्ष्यने अंतिम फेरीत त्याला पराभवाचा धक्का दिला. ५४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात २२-२२ अशी बरोबरी असताना लक्ष्यने पुढील दोन्ही गुण मिळवत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये येवने लढा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, लक्ष्यने २१-१७ अशी बाजी मारताना पहिल्यांदा इंडिया ओपन स्पर्धा जिंकली.

लक्ष्यच्या कामगिरीचा आलेख कशा प्रकारे उंचावतो आहे?

२०१७ मध्ये कनिष्ठ गटाच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थान पटकावणाऱ्या लक्ष्यला वरिष्ठ गटातही आपली छाप पडण्यास वेळ लागला नाही. त्याने भारतात झालेल्या आंतरराष्ट्रीय सिरीज स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. तसेच कनिष्ठ गटातही दमदार कामगिरी सुरू ठेवताना आशियाई अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. युवा ऑलिम्पिक आणि युवा जागतिक अजिंक्यपद या स्पर्धांमध्ये त्याने अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदके आपल्या नावे केली. त्याने पुढे वरिष्ठ गटात डच खुली स्पर्धा जिंकत आपले पहिले ‘बीडब्ल्यूएफ’ जेतेपद मिळवले. त्याला सारलोरलक्स स्पर्धाही जिंकण्यात यश आले. मागील वर्षाअखेरीस झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्य आणि आता इंडिया खुल्या स्पर्धेत सुवर्ण असा त्याचा चढता आलेख पाहायला मिळत आहे.

सात्विक-चिरागला पुन्हा लय कशी सापडली?

सात्विक आणि चिराग या युवा, पण अनुभवी जोडीला मागील वर्षी संमिश्र यश मिळाले. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. मात्र, राष्ट्रकुल स्पर्धेतील या माजी रौप्यपदक विजेत्या जोडीने नव्या वर्षाची दिमाखात सुरुवात केली. त्यांनी इंडिया ओपन स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अहसान-सेतिवान या जोडीला पराभूत करण्याची किमया साधली. त्यामुळे त्यांनी यंदा होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्ये जेतेपदासाठी आपली दावेदारी स्पष्ट केली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained indians playes may dominate world badminton chirag shetty satwiksairaj rankireddy lakshya sen sgy 87 print expprint exp 0122