भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस रणवीर’ या रजपूत वर्गातील विनाशिकेवर मंगळवारी झालेल्या स्फोटामध्ये तीन नौसैनिकांना प्राण गमवावे लागले. अलीकडे भारतीय नौदलामध्ये अशा अपघातांचे प्रमाण वाढले आहे, त्याविषयी…

गेल्या काही वर्षांत भारतीय नौदलातील अपघातांमध्ये वाढ झाली आहे का?

Namo Maharojgar Melava
धक्कादायक : नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाखाली ३० हजार ‘ट्रेनीं’ची पदे
India economy grew by 8.4 percent
Good News : भारताच्या अर्थव्यवस्थेची तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्क्यांनी वाढ
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
How did Indian young man go to fight in Russia-Ukraine war Will they be rescued
विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धात लढण्यासाठी भारतीय तरुण कसे गेले? त्यांची सुटका होणार का?

केंद्र सरकारच्या वतीने संरक्षण मंत्रालयाने राज्यसभेमध्ये २०१६ साली दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी- २०११ ते नोव्हेंबर २०१४ या काळात भारतीय नौदलामध्ये एकूण २४ लहान-मोठे अपघात झाले. हे अपघात झालेल्या युद्धनौकांमध्ये आयएनएस काल्पेनी, आयएनएस विंध्यगिरी, आयएनएस दीपक, आयएनएस शंकुश, आयएनएस तरसा, आयएनएस बेतवा, आयएनएस सिंधुरक्षक, आयएनएस विराट, आयएनएस दिल्ली, आयएनएस सिंधुघोष, आयएनएस ऐरावत, आयएनएस सिंधुरत्न आदी युद्धनौका आणि पाणबुड्यांचा समावेश होता.

आयएनएस विंध्यगिरीला मिळालेली जलसमाधी…

३० जानेवारी २०११ रोजी आयएनएस विंध्यगिरीची दुपारच्या वेळेस मुंबई बंदरात शिरताना जेएनपीटीहून निघालेल्या एमव्ही नॉर्डलेक या नॉर्वेच्या मालवाहू जहाजाशी संकरॉक दीपगृहाजवळ टक्कर झाली. या दुर्घटनेत विंध्यगिरीवरील बॉयलर रूममध्ये आग लागली. या युद्धनौकेवरून सफरीवर निघालेले सुमारे ४०० नौसैनिक व त्यांचे कुटुंबीय सहीसलामत परतले खरे; पण दुर्घटनेनंतर वेगात पाणी आत शिरले आणि विंध्यगिरीला जलसमाधी मिळाली.

आयएनएस सिंधुरक्षकचा अपघात की घातपात?

२०१३ साली १३-१४ ऑगस्टच्या मध्यरात्री मुंबईच्या नौदल गोदीत उभ्या असलेल्या आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडीवर एका पाठोपाठ एक स्फोटांची मालिकाच झाली आणि त्यावर कार्यरत १८ नौसैनिक व अधिकाऱ्यांना प्राण गमवावे लागले. हे स्फोट एवढे भीषण होते की, त्यामध्ये अतिउच्च क्षमतेचे पोलादही विरघळले, त्यामुळे अनेकांचे मृतदेहही हाताला लागले नाहीत. जिथे पोलाद विरघळले तिथे मानवी देहाचे ते काय, अशी स्थिती होती.

अपघातांची चौकशी होते, अहवाल येतात पण मग उपाययोजना होत नाहीत का?

अपघातांची रीतसर चौकशी होऊन अहवालही येतात. कधी त्यात तांत्रिक कारणे अथवा त्रुटी असतात तर अनेकदा मानवी त्रुटी किंवा चुका अपघाताचे कारण म्हणून नोंदविल्या जातात. आयएनएस सिंधुरक्षकवरील स्फोट, तिला मिळालेल्या जलसमाधीच्या चौकशीत शस्त्रास्त्रांच्या हाताळणीतील चूक व मानवी त्रुटी असे कारण सांगण्यात आले. तत्कालीन नौदलप्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी यांनी तर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामाही दिला.

पण मग अपघात पुनःपुन्हा का होतात ?

उपाययोजनांमध्ये केवळ उल्लेख असतो तो एसओपीचा. म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. सुरक्षेमध्ये एसओपींना अनन्यसाधारण महत्त्व असते. एखादी गोष्ट करताना ती कोणकोणत्या पायऱ्यांनी करत जावी, त्याची आखणी म्हणजे एसओपी. हे नियम पाळले तर अपघात होणार नाहीत.

एसओपी असतानाही मग अपघात का होतात?

आपल्याला हे लक्षात घ्यावे लागते की, काम करणारी सारी माणसेच असतात. नौदलातून निवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानुसार, गेल्या काही वर्षांत भारतीय नौदलात कार्यरत नौसैनिक आणि अधिकाऱ्यांवरचा कामाचा भार वाढला आहे. सागरावर असतानाही कागदावरचे तास ८ असले तरी नौसैनिकांना १२ तास किंवा अधिकच्या कामाशिवाय पर्याय नसतो. काही वेळेस युद्धनौका किंवा पाणबुड्या या बंदरात किंवा गोदीत असल्या तरी त्यावेळेस त्यांचे रंगकाम किंवा मग देखभाल- दुरुस्तीचे अतिरिक्त काम हे असतेच. ते कामही नसते त्यावेळेस त्यांना इतर कामांना जुंपले जाते जी कामे नागरी अधिकारीही करू शकतात. त्यामुळे कामाचा रगाडा सतत मागे असतो आणि अनेकदा त्यांची झोप अपुरी झालेली असते किंवा काम वगळता इतरत्र घालवण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. कुटुंबियांसोबतही तसा कमीच वेळ मिळतो. त्यांची झोप पूर्ण न होणे आणि त्यांना विरंगुळ्यासाठी वेळ न मिळणे यामुळेच ताणाखाली त्यांच्या हातून चुका होतात. अहवालात केवळ चुकांचाच उल्लेख असतो पण त्या का होतात, याचा उल्लेख येत नाही. त्यामुळे केवळ लक्षणे सांगितली जातात आणि विकाराचे मूळ बाजूलाच राहाते.

झोप आणि विरंगुळा ही क्षुल्लक कारणे नाहीत…

एखाद्या युद्धनौकेवर किंवा पाणबुडीवर अपघात होतो, त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर वित्त, मालमत्ता हानी होत असते. युद्धनौका आणि पाणबुड्यांची किंमत काही हजार कोटींमध्ये असते. शिवाय मानवी जीवन अमूल्य  आहे, असे आपण म्हणतो. अनेक नौसैनिक व अधिकाऱ्यांच्या प्राणांवर बेतते. त्यामुळेच झोप व विरंगुळा ही क्षुल्लक कारण नाहीत, हे ध्यानात घेऊन कामाच्या तासांबरोबरच विरंगुळ्याच्या तासांचेही नियोजन व्हायला हवे. तर अपघातांच्या मूळावर उपचार केल्यासारखे होईल.

अपघातासंदर्भात तांत्रिक कारण असाही उल्लेख केला जातो. ही तांत्रिक कारणे नेमकी कोणती असतात?

तांत्रिक कारणे ही यंत्र किंवा विजेशी संबंधित उपकरणे यांच्याशी संबंधित असतात. ती नादुरुस्त झाली किंवा त्यांच्यामध्ये काही बिघाड झाला तर तो अपघातास कारण ठरू शकतो. काही वरिष्ठ निवृत्त अधिकाऱ्यांच्या निरीक्षणानुसार, आपल्या बहुतांश पाणबुड्या आणि युद्धनौका त्यांचे आयुर्मान उलटून गेलेल्या आहेत. साधारणपणे युद्धनौकांचे आयुर्मान १५ वर्षे आणि उत्तम डागडुजी करून २५ पर्यंत वाढवता येते. मात्र भारत हा असा देश आहे की, जिथे नौदलात नव्या युद्धनौका आणि पाणबुड्या समाविष्ट होण्यास दीर्घकाळ लागतो. त्यामुळेच आयुर्मान उलटलेल्या युद्धनौका आणि पाणबुड्या आपण डागडुजी करून दीर्घकाळ वापरत राहातो. यंत्रांना मर्यादा असतात. त्यामुळेही अपघातांची शक्यता वाढते.