-अनिकेत साठे

स्वदेशी बनावटीची ४४ हजार टन वजनाची आयएनएस विक्रांत ही कोरी करकरीत विमानवाहू नौका कोचीन शिपयार्डने नुकतीच भारतीय नौदलाकडे सुपूर्त केली. नौकेत ७६ टक्के स्वदेशी सामग्री आणि उपकरणांचा अंतर्भाव ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे फलित असल्याचे नौदलाने म्हटले आहे. दशकभरात अनेक आव्हानांवर मात करीत ही नौका आकारास आली. आयएनएस विक्रांतने विमानवाहू जहाजांची रचना आणि बांधणीची क्षमता असणाऱ्या जगातील काही मोजक्याच देशांच्या गटात भारताला स्थान मिळवून दिले. भारतीय नौदलाचे प्रभाव क्षेत्र विस्तारण्यासोबत ही नौका शक्ती संतुलनाचे काम करणार आहे. त्याचाच हा आढावा…

Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

सद्यःस्थिती आणि गरज काय?

नौदलाकडे सध्या रशियन बनावटीची आयएनएस विक्रमादित्य ही एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे. देशाला लाभलेली पूर्व आणि पश्चिम विस्तीर्ण किनारपट्टी, सागरी सामरिक क्षेत्रातील बदलती आव्हाने, चीन आणि पाकिस्तानकडून निर्माण होणारे धोके, व्यापारी मार्गांची सुरक्षा अशा अनेक कारणांनी नौदलाच्या दोन्ही विभागांकडे (पूर्व व पश्चिम) प्रत्येकी एक आणि पर्यायी स्वरूपातील एक अशा तीन विमानवाहू नौकांची गरज वारंवार मांडली जाते. आयएनएस विक्रांतच्या समावेशाने दोन्ही विभागांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने एक विमानवाहू नौका तैनातीची निकड पूर्ण होईल. विमानवाहू नौकेसोबत क्षेपणास्त्र आणि इतर आयुधांनी सुसज्ज विविध युद्धनौका, पाणबुडी, इंधन पुरविणारे जहाज आदींचा ताफा असतो. समुद्रातील धोक्यांपासून युद्धनौकेचे संरक्षण करत असतानाच त्या ताफ्याचा युद्धात प्रभावीपणे वापर होतो. लढाऊ विमानांमुळे तिची मारक क्षमता लक्षणीय वाढते. एकाच वेळी दोन आधुनिक नौका पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहणार असल्याने भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढणार आहे. आयएनएस विक्रांत सुरुवातीला नौदलाच्या पश्चिम मुख्यालयाकडे राहणार आहे.

नक्की वाचा >> INS Vikrant : स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल

आयएनएस विक्रांतची रचना कशी?

४४ हजार टन वजनाची ही नौका वायू तंत्रज्ञानावर आधारित आहे. संयुक्त गॅस टर्बाईन प्रणालीतून ८० मेगावॉट वीज मिळते. त्यायोगे ती ताशी २८ सागरी मैल वेगात मार्गक्रमण करू शकते. सामान्य स्थितीत १८ सागरी मैल वेगाने ती प्रवास करेल, ज्यामुळे साडेसात ते आठ हजार सागरी मैलाचे अंतर पार करता येईल. २६२ मीटर लांब, ६२ मीटर रुंद आणि ५९ मीटर उंच असे तिचे अवाढव्य रूप आहे. तळभागाचे क्षेत्रफळ दोन फुटबॉल मैदानांइतके भरेल. १४ मजली नौकेच्या पायावर डोलारा सांभाळणारी पाच विशेष स्वरूपाची बांधकामे (सुपर स्ट्रक्चर्स) आहेत. १७०० जणांच्या चालक दलास डोळ्यासमोर ठेऊन २३०० निरनिराळे कप्पे तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. यंत्रणा संचलन, दिशादर्शन, विमानासाठी खास वर्गीकृत केलेल्या जागा आहेत.

शस्त्रसज्जता, लढाऊ विमाने कोणती?

या विमानवाहू नौकेसाठी खास लढाऊ व्यवस्थापन प्रणालीही देशातच विकसित करण्यात आली. त्याद्वारे जहाजाचे संवेदक, शस्त्रे, माहितीच्या जोडण्या एकत्रित होऊन लढाऊ विभागाची जबाबदारी सांभाळणारे प्रभावीपणे कामगिरी करू शकतील. पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे बराक हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र, एकाच मिनिटांत १२० गोळ्या डागणारी बंदूक, त्रिमितीय रडार यंत्रणा आदींनी सुसज्ज आहे. यातील काही आयुधांनी तिला जहाजविरोधी क्षेपणास्त्र आणि विमानांपासून स्वत:चे संरक्षण करता येईल. हवाई हल्ल्यांपासून पूर्वसूचना देणारी यंत्रणा, दिशा दर्शनासाठी बहुपर्यायी व्यवस्था अशा अनेक यंत्रणांचा अंतर्भाव आहे. शत्रूच्या रडार यंत्रणेची दिशाभूल करण्याची क्षमता ती बाळगून आहे. साधारणत: ३० हलकी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टरचा ताफा तिच्यावर तैनात राहतील. दोन धावपट्ट्यांना कमी जागेत उड्डाण आणि विमान नियंत्रित करण्याच्या व्यवस्थेची जोड मिळाली आहे. सध्या नौकेवर रशियन बनावटीचे मिग-२९, कामोव्ह-३१, स्वदेशी बनावटीचे प्रगत हलके हेलिकॉप्टर कार्यरत आहे. २६ बहुउद्देशिय लढाऊ विमाने खरेदीचा विचार सुरू आहे. त्या अनुषंगाने अलीकडेच फ्रान्सच्या राफेल – एम आणि अमेरिकन बोईंगच्या एफ ए- १८ हॉर्नेट विमानांच्या चाचण्याही पार पडल्या.

प्रवास आव्हानात्मक कसा?

देशात विमानवाहू नौका बांधणीचा हा पहिलाच प्रयत्न होता. फेब्रुवारी २००९मध्ये या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. भारतीय नौदलाच्या संरचना संचालनालयाने तिची मूळ रचना विकसित केली. संपूर्ण तपशीलवार अभियांत्रिकी रचना, बांधणी आणि त्यावरील प्रणालींचे एकत्रीकरण हे सर्व काम कोचीन शिपयार्ड कंपनीने केले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विमानवाहू नौकेच्या आकाराच्या जहाजाची संपूर्ण त्रिमितीय प्रतिकृती (मॉडेल) आधी तयार करण्यात आले. त्याआधारे निर्मितीसंबंधी आरेखने तयार झाली. तिची रचना, बांधणी आणि त्यावरील प्रणालींचे एकत्रीकरण ही सर्व कामे स्थानिक पातळीवर झाली. विशिष्ट क्षमतेचा धातू, नौकेतील यंत्रणा, दोन प्रकारच्या विमान संचलनांसाठी आरेखन आदी आव्हानांवर कौशल्यपूर्वक काम करावे लागले. वर्षभरात विमानवाहू नौकेचे परिचालन, यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, डेक यंत्रणा, जीवरक्षक उपकरणे, दिशादर्शक प्रणाली आणि अखेरच्या टप्प्यात हवाई वाहतूक सुविधा उपकरणे, जवळपास सर्वच उपकरणे आणि प्रणालीच्या एकात्मिक चाचण्या घेतल्यानंतर ती नौदलाच्या स्वाधीन करण्यात आली.

आत्मनिर्भर भारताला बळ कसे?

विक्रांतच्या निमित्ताने देशाने जहाज बांधणीत मैलाचा दगड गाठला. युद्धनौकेत ७६ टक्क्यांहून अधिक सामग्री आणि उपकरणे स्वदेशी आहेत. ज्यामध्ये २१ हजार ५०० टन विशेष दर्जाचा धातू तयार करून प्रथमच भारतीय नौदलाच्या जहाजात वापरला गेला. या नौकेची किंमत तब्बल २० हजार कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. या प्रकल्पाने कोचीन शिपयार्डसह देशातील शेकडो लहान-मोठ्या उद्योगांना नव्या संधी उपलब्ध करून दिल्या. हजारो कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला. नौदलाकडून हाताळली जाणारी आयएनएस विक्रांत ही चौथी विमानवाहू नौका ठरेल. याआधीच्या आयएनएस विक्रांत, आयएनएस विराट या सेवेतून निवृत्त झालेल्या आणि सध्या ताफ्यात असणारी आयएनएस विक्रमादित्य या तिन्ही परदेशी बनावटीच्या आहेत. इतरांनी वापरलेल्या या जुन्या नौका भारताने आवश्यकतेनुसार नूतनीकरण करून प्रचंड किमतीत खरेदी केलेल्या होत्या. त्यांचा विचार केल्यास नौदलास नवी करकरीत नौका पहिल्यांदा मिळत आहे. तिची देशांतर्गत बांधणी परदेशी लष्करी सामग्रीवरील अवलंबित्व कमी करणारी आहे.

काय साध्य होणार?

जगात नौदलाचे कार्यानुसार वर्गीकरण केले जाते. महासागरात खोलवर धडक देत कारवाईची क्षमता राखणारे नौदल निळ्या पाण्यातील नौदल म्हणून ओळखले जाते. त्यात कारवाईत इंधन वा तत्सम बाबींसाठी नौदलास घरच्या बंदरावर जाण्याची गरज भासत नाही इतके ते स्वयंपूर्ण असते. अतिशय विस्तृत सागरी क्षेत्रावर प्रभाव टाकण्याची क्षमता विमानवाहू नौका बाळगून असते. त्यामुळे सुदूर सागरातील (ब्लू वॉटर) संचारासाठी ती महत्त्वाची मानली जाते. भारतीय नौदलात समाविष्ट होणाऱ्या आयएनएस विक्रांत नव्या विमानवाहू नौकेचे महत्व त्यावरून लक्षात येईल. किनाऱ्यालगत म्हणजे जिथे गढूळ पाणी आहे, तिथे कार्य सीमित असणारे नौदल तपकिरी पाण्यातील (ब्राऊन) तर जे नौदल समुद्रात खूप दूरचा पल्ला गाठू शकते त्याला हरित पाण्यातील (ग्रीन) आणि विशाल महासागरात खोलवर जाऊन युद्ध कारवाईची क्षमता राखणारे निळ्या पाण्यातील (ब्लू वॉटर) नौदल म्हणून गणले जाते. स्वदेशी बनावटीच्या या विमानवाहू नौकेमुळे खोलवर कारवाईची क्षमता वृद्धिंगत होऊन भारतीय नौदलाचे प्रभाव क्षेत्र विस्तारणार आहे. शिवाय तिच्या बांधणीतून आत्मसात झालेले कौशल्य भविष्यात सक्षमता राखण्यास बळ देणार आहे. चीनची तिसरी विमानवाहू नौका पुढील वर्षी जलावतरण होण्याच्या मार्गावर असून तत्पूर्वी सज्ज होणाऱ्या विक्रांतने शक्ती संतुलनही साधले जाणार आहे.