प्रशांत केणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडू खेळणाऱ्या दिनेश कार्तिकने त्याच्या विजयवीराच्या म्हणजेच ‘फिनिशर’च्या भूमिकेने सर्वांवरच छाप पाडली आहे. एबी डीव्हिलयर्सच्या अनुपस्थितीत पुस्तकी फटक्यांच्या पलीकडचे अफलातून फटके खेळत कार्तिकने बंगळूरुचा तारणहार म्हणून जागा पक्की केली आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक काही महिन्यांवर येऊन ठेपला असतानाच कार्तिकच्या कामगिरीमुळे भारावलेल्या नामांकित क्रिकेटपटूंनी भारतीय संघात तो हवाच, अशी सूचना केली आहे. याच पार्श्वभूमीवर कार्तिकची उपयुक्तता समजून घेऊया.

कार्तिकबाबत नामांकित क्रिकेटपटू काय म्हणत आहेत?

यंदाच्या वर्षात होणाऱ्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात कार्तिक विजयवीराची भूमिका पार पाडू शकेल, अशी सूचना भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी केली आहे. याचप्रमाणे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही कार्तिकच्या कामगिरीविषयी म्हटले आहे की, ‘‘आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघाला महेंद्रसिंह धोनीसारख्या विजयवीराची आवश्यकता आहे. आपल्याकडे यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून बरेच पर्याय असले तरी विजयवीराची क्षमता असलेला कार्तिक या जागेसाठी योग्य वाटतो.’’ इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनलाही कार्तिक हा ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने सातव्या क्रमांकासाठी सर्वाेत्तम फलंदाज वाटतो आहे. कार्तिक हा ‘३६० अंशांचा’ खेळाडू आहे, अशा शब्दांत एबी डीव्हिलियर्सने त्याचे कौतुक केले. क्रिकेटजगतात डीव्हिलियर्स हा ‘मिस्टर ३६०’ म्हणून ओळखला जातो.

कार्तिकची चर्चा होण्याचे कारण काय आहे?

यंदाच्या हंगामात कार्तिकने ७ सामन्यांत २१० धावा (३२*, १४*, ४४*, ७*, ३४, ६६*, १३*) केल्या आहेत. परंतु बंगळूरुच्या खात्यावरील ७ सामन्यांपैकी ५ विजयातील कार्तिकची विजयवीराची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. सहा डावांत नाबाद राहणाऱ्या कार्तिकने दोन सामन्यांत सामनावीर किताबही जिंकला आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघ साखळीतच गारद झाला. या स्पर्धेत भारताला धोनीसारख्या विजयवीराची तीव्र उणीव भासली. त्यामुळेच कार्तिकची चर्चा होते आहे.

दिनेश कार्तिक कोण आहे?

कार्तिक हा तमिळनाडूत स्थानिक क्रिकेटमध्ये तावून सुलाखून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणारा यष्टीरक्षक-फलंदाज आहे. २००४मध्ये त्याने भारतीय संघात स्थान मिळवले. २६ कसोटी, ९४ एकदिवसीय आणि ३२ ट्वेन्टी-२० सामने तो खेळला आहे. संघाच्या गरजेनुसार सलामीवीर आणि मधल्या फळीतील जबाबदारी त्याने सांभाळली आहे. कार्तिकची कारकीर्द संपते आहे, असे वाटत असतानाच तो दिमाखदार पुनरागमन करीत अजून बरेच क्रिकेट बाकी आहे, याची ग्वाही देतो. अनेकदा अनपेक्षित विजय मिळवून देत त्याने लक्ष वेधले आहे. मार्च २०१८मध्ये निदाहास करंडक क्रिकेट स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताला दोन षटकांत ३४ धावांची आवश्यकता असताना कार्तिक मैदानावर आला आणि त्याने फक्त ८ चेंडूंत २९ धावांची वेगवान खेळी साकारत भारताला जिंकून दिले. यात अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना कार्तिकने मारलेला निर्णायक षटकार संस्मरणीय ठरला होता. हाच कार्तिक गतवर्षी भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर समालोचक म्हणून दिसला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले होते.

मग १८ वर्षांच्या कारकीर्दीतही त्याला महत्त्व प्राप्त का झाले नाही?

यष्टीरक्षक, फलंदाज, विजयवीर आणि यशस्वी कर्णधार म्हणून धोनी भारताच्या तिन्ही क्रिकेटमध्ये स्थान पक्के करून होता. त्यामुळे कार्तिकच्या कारकीर्दीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे धोनीला दुखापत झाली किंवा विश्रांती दिली की कार्तिकला संधी मिळे. पण राहुल द्रविड, पार्थिव पटेल, नमन ओझा, संजू सॅमसन, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, इशान किशन, केएल राहुल असे काही पर्यायसुद्धा वेळोवेळी यष्टीरक्षणाच्या स्पर्धेत होते. २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकात त्याला भारतीय संघातून अखेरची संधी मिळाली होती. विशेष म्हणजे धोनी, पंत, राहुल हेसुद्धा भारतीय संघात होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained ipl 2022 rcb dinesh karthik impressed everyone with his role as the finisher print exp abn
First published on: 20-04-2022 at 19:45 IST