देशात मंगळवारी करोनाच्या ३१७४ रुग्णांची नोंद करण्यात आली. सोमवारी नोंद झालेल्या ४५१८ च्या तुलनेत ही संख्या कमी झाली आहे. दोन दिवसांच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी देशासाठी वाढती करोना रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे.. अनेक राज्यांमध्ये धीम्या गतीने रुग्णवाढ होत असून देशपातळीवर याचा परिणाम जाणवत आहे.

देशात अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात येत असून करोनाची चौथी लाट येण्याची भीती सतावत आहे. जाणून घेऊयात देशात नेमकी काय स्थिती आहे….

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Francis Scott Key Bridge in Baltimore
जहाजाची धडक अन् नदीवरील ब्रिज पत्त्यासारखा कोसळला, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

संख्या काय दर्शवत आहे?

३ जूनला केंद्र सरकारने रुग्णसंख्या वाढत असलेल्या पाच राज्यांना पत्र लिहिलं होतं. या राज्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक असल्याने पत्र लिहिण्यात आलं होतं. तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये संसर्गाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता यावेळी नमूद करण्यात आली होती.

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. पालघर (३५० टक्के), ठाणे (१९२ टक्के) आणि मुंबई (१३६ टक्के) या तीन शहरांमध्ये गेल्या आठवड्यात राज्यातील सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली. सलग चार दिवसांनंतर मुंबईत सोमवारी रुग्णसंख्या कमी झाल्याचं पहायला मिळालं. पण रविवारी कमी चाचण्या झाल्याने ही संख्या कमी झाली असावी असा अंदाज आहे.

जूनच्या पहिल्या पाच दिवसांत नोंदवण्यात आलेली रुग्णसंख्या मार्चमधील एकूण रुग्णसंख्येच्या (१५१९) दुप्पट आहे. एप्रिलच्या तुलनेत ६० टक्के (१७९५) आणि मे महिन्याच्या तुलनेत ५० टक्क्यांहून (५८३८) अधिक आहे.

गेल्या आठवडाभरात केरळमध्ये दिवसाला एक हजाराहून जास्त रुग्णसंख्या नोंद होत आहे. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री वीना जॉर्ज यांनी चिंता करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं सांगितलं आहे. एर्नाकुलम, थिरुअनंतपुरम आणि कोट्टयम जिल्ह्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

याचप्रकारे तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणात वेगाने रुग्णसंख्या वाढत आहेत. बंगळुरुत पालिका प्रशासनाने जनतेला सार्वजनिक ठिकाणांवर मास्क बंधनकारक केलं असून सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास सांगितलं आहे.

तज्ज्ञ काय सांगत आहेत?

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ जेनेटिक्स अॅण्ड सोसायटीचे संचालक डॉक्टर राकेश मिश्रा यांनी करोनाची चौथी लाट येण्याची शक्यता फारच कमी असल्याचं सांगितलं आहे. मात्र रुग्णसंख्या वाढत असल्याने सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले आहेत. अचानक होत असणाऱ्या या रुग्णवाढीमागे नवा उपप्रकार तर नाही ना? अशी शंका डॉक्टर मिश्रा यांनी उपस्थित केली. संसर्गाची तीव्रता कमी असली तरी जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून ही रुग्णवाढ एखाद्या शक्तीशाली उपप्रकारामुळे होतेय की काय याची चाचपणी करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
राकेश मिश्रा यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, “ओमायक्रॉन आणि त्याचे उपप्रकार लसीकरण झालेल्या कोणत्याही व्यक्तीला पुन्हा संसर्गित करु शकतात. संसर्गाची तीव्रता फार कमी आहे आणि बहुतेक लोक लक्षणं नसलेले किंवा अतिशय सौम्य लक्षणं असणारी आहेत. पण जर लोक आजारी पडत असतील तर हे फार गांभीर्याने घेण्याची गरज आहे. नवीन उपप्रकार येत असल्याने कदाचित समस्या उद्भवू शकते”.

यामुळेच जिनोम सिक्वेन्सिंग वाढवलं पाहिजे असं सांगताना त्यांनी नवीन उपप्रकार या संसर्गामागे असू शकतो अशी शंका बोलून दाखवली.

एम्सच्या सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसिन विभागातील प्राध्यापक डॉक्टर संजय राय यांनी, “रुग्णसंख्या वाढली तरी संसर्गाची तीव्रता आणि मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाही,” असं सांगितलं आहे.

“रुग्णसंख्या वाढत असली तरी विषाणूत सतत बदल होत असल्याने चिंता करण्याची गरज नाही. तीव्रता आणि मृतांची संख्या वाढणं चिंताजनक आहे, पण तसं होणार नाही. अशाप्रकारचे संसर्ग लगेच संपत नाहीत आणि त्यात सतत बदल होत असतो,” असं राय यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. यावेळी त्यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेशी तुलना करता देशातील सध्याची स्थिती अत्यंत चांगली असल्याचं म्हटलं आहे.